‘स्नेहां’कित

आता सत्य परिस्थिती पाहू या...भारतीय महिला संघ तब्बल सात वर्षांनी कसोटी सामना खेळत होता. मुळात देशातही महिलांसाठी लाल चेंडूचं क्रिकेट अत्यंत कमी झालं आहे.
Sneh Rana
Sneh RanaSakal

एकीकडे युरो आणि कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेची रंगत आणि दुसरीकडे भारत-न्यूझीलंड कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्याची उत्सुकता, असा भारतीय क्रीडाप्रेमींना दुहेरी आनंद मिळत असताना महिलांचा इंग्लंडविरुद्धचा एकमेव कसोटी सामना कमालीचा रंगला. मुळात महिला क्रिकेट तसं दुर्लक्षित, त्यामुळे फार जणांचं लक्ष या सामन्याकडे नव्हतं; पण भारतीय महिलांची ताकद, क्षमता आणि गुणवत्ता किती प्रगतिपथावर आहे याची जाणीव त्या सामन्यातून, केवळ भारतीयांनाच नव्हे, तर क्रिकेटविश्वाला झाली. भारतीय महिलांची नवी पिढी किती ताकदीनं पुढं येत आहे हेसुद्धा सिद्ध झालं. एकीकडे ‘महिलांची वीरेंद्र सेहवाग’ असं जिला म्हटलं जातं त्या शेफाली वर्माची ‘तोडफोड’ फलंदाजी ऑस्ट्रेलियाच नव्हे तर, इंग्लंडच्याही कसलेल्या गोलंदाजांना धडकी भरवणारी आहे. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात हिऱ्याप्रमाणे चमकली ती स्नेह राणा! समोर पराभव आ वासून उभा असताना ती वाघिणीप्रमाणे एकटी भिडली आणि भारतीय संघाला तिनं पराभवातून सहीसलामत वाचवलं.

आता सत्य परिस्थिती पाहू या...भारतीय महिला संघ तब्बल सात वर्षांनी कसोटी सामना खेळत होता. मुळात देशातही महिलांसाठी लाल चेंडूचं क्रिकेट अत्यंत कमी झालं आहे. मर्यादित षटकांच्या, म्हणजे पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटलाच, प्राधान्य असतं. त्यातच २०१९ मध्ये जानेवारी-फेब्रुवारीत भारतीय संघ ऑस्ट्रेलियात विश्वकरंडक स्पर्धा खेळला.

कोरोनाच्या साथीनंतर इतर देशांचं क्रिकेट सुरू झालं; पण भारतीय महिला मायदेशात केवळ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळल्या. त्यानंतर थेट इंग्लंडमध्ये हा कसोटी सामना. त्यातच मायदेशात आणि लंडनमध्ये विलगीकरण म्हणजे सरावही मोजका, तसंच मर्यादित. इंग्लंडचा संघ मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध नियमित कसोटी मालिका खेळतोय, म्हणजे त्यांच्याकडे चांगला अनुभव तर आहेच. शिवाय, सामना त्यांच्याच देशात, म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून मायदेशातच, असल्यामुळे विलगीकरणाचे तेवढ कठोर नियमही नाहीत. अशा परिस्थितीत भारतानं तो सामना अनिर्णित ठेवणं म्हणजे तो जिंकण्याएवढीच महान कामगिरी करण्यासारखं आहे.

पाच वर्षांनंतर पुनरागमन

मिताली राज, जुलन गोस्वामी, हरमनप्रीतकौर यांच्यानंतर स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज् अशी नवी पिढी तयार होत असताना स्नेह राणा हिनं सामना वाचवणारी अफलातून खेळी करून भारतीय महिला संघाचा दरारा प्रस्थापित केला. यात महत्त्वाची बाब म्हणजे, स्नेह राणा पाच वर्षांनंतर भारतीय संघात पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळत होती, त्यात तिनं अशी खेळी करावी म्हणजे केवळ अफलातूनच.

‘पितृदिना’पूर्वी वडिलांना आदरांजली

ता. २० जून रोजी सर्वत्र पितृदिन सादरा झाला; पण स्नेह हिनं आपले दिवंगत वडिल भगवानसिंह यांना आदल्या दिवशीच एका जिगरबाज खेळीनं आदरांदली वाहिली. भगवानसिंह यांचं दोन महिन्यांपूर्वी निधन झालं.

ज्यांनी आपल्याला क्रिकेटचा हा मार्ग दाखवला त्या वडिलांच्या निधनाचं दुःख पचवून स्नेह ही क्रिकेटच्या कर्मभूमीवर उतरली. ‘आपले वडील मैदानात कुठं तरी होते आणि मला प्रोत्साहन देत होते,’ असं स्नेह हिनं बहिणीला फोन करून सामन्यानंतर सांगितलं. ती किती भावनिक आहे हे यातून दिसून येतं.

कसा सुरू झाला प्रवास?

भारतातील पुरुषांचंच क्रिकेट नव्हे तर, आता महिलांचंही क्रिकेट प्रमुख शहरांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. स्नेह राणा ही डेहराडूनपासून २० किलोमीटरवरच्या सिनोला गावात जन्मली. लहानपणापासूनच तिला खेळाची मोठी आवड. बॅडमिंटनपासून ते क्रिकेटपर्यंत सर्व खेळ खेळायची तिची तयारी. समोर खेळायला मुलीच हव्यात असं नाही, मुलांबरोबरही खेळत असे. नवव्या वर्षी शेजारच्या मैदानात मुलांबरोबर क्रिकेटचा सामना खेळायची. स्नेह हिच्यामधील हा उत्साह पाहून वडिलांनी ‘लिटिल मास्टर अकादमी’त तिला दाखल केलं आणि तिथून स्नेह हिचा पहिला प्रवास सुरू झाला.

कसं झालं पुनरागमन...?

स्नेह हिची मुळात गुणवत्ताच अफलातून. तिचा भारतीय संघापर्यंतचा प्रवास रेल्वेतून सुरू झाला. महिला क्रिकेटपटू म्हणून रेल्वेत नोकरी मिळाली. २०१४ मध्ये भारतीय संघात पदार्पण. दोन वर्षांनंतर गुडघ्याला दुखापत झाली आणि त्यानंतर तिची गाडी जणू काही यार्डातच गेली. एकीकडे भारतीय संघाला एकापेक्षा एक सरस खेळाडू मिळत असताना स्नेह दुर्लक्षित राहिली. पण म्हणतात ना...हिऱ्याचं तेज लपून रहात नाही!

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मायदेशात मालिका सुरू होती, त्याच वेळी महिलांची एकदिवसीय राष्ट्रीय स्पर्धा झाली. प्रमुख खेळाडू देशाकडून खेळत असल्यामुळे स्नेहला रेल्वेतून खेळण्याची संधी मिळाली. तिनं स्पर्धेत १६० धावा आणि १८ विकेट अशी अष्टपैलू कामगिरी करत निवड समितीला आपली आठवण करून दिली. तिची दखल घेण्यात आली आणि या इंग्लंडदौऱ्यासाठी तिची निवड झाली. आता पुढच्या अनेक सामन्यांत तरी संघ निवडताना प्रमुख खेळाडूंच्या यादीत स्नेह हिचं नाव तारांकित केलं जाईल यात शंका नाही.

तरबेज स्नेह

कसोटी सामन्यात भारताला हरवण्यासाठी इंग्लंडच्या महिला खेळाडूंनी जंग जंग पछाडलं. स्नेह राणा आणि तानिया भाटिया बाद होत नाहीत हे लक्षात आल्यावर इंग्लिश महिलांनी स्लेजिंग सुरू केलं. मुळात पहिल्यांदा कसोटी सामना खेळत असलेल्या स्नेह-तानियासाठी हाही अनुभव नवाच; पण त्यांनी आपलं लक्ष जराही विचलित होऊ दिलं नाही. खेळातील क्षमतेबरोबरच मानसिकदृष्ट्याही आपण किती कणखर आहोत हे कोणताही अनुभव नसताना सिद्ध करणं हे तिच्यातल्या परिपूर्णतेचा दाखला देणारंच आहे.

  • आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना स्नेह हिची १५४ चेंडूत नाबाद ८० धावांची खेळी.

  • भारताची ८ बाद २४० अशी अवस्था झाल्यानंतर स्नेह आणि तानिया यांची १०४ धावांची नाबाद भागीदारी, त्यामुळे सामना अनिर्णित.

  • स्नेह आणि तानिया यांची २१ षटकं नाबाद फलंदाजी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com