आता थांबायचं नाय...!

कोरोनाच्या ‘डेल्टा’ या प्रतिरूपानं (व्हेरिअंट) प्रामुख्यानं भारतात थैमान घातल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमायक्रॉन या प्रकारानं जगाची झोप पुन्हा उडवली आहे.
Cricket
CricketSakal

कोरोनाच्या ‘डेल्टा’ या प्रतिरूपानं (व्हेरिअंट) प्रामुख्यानं भारतात थैमान घातल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमायक्रॉन या प्रकारानं जगाची झोप पुन्हा उडवली आहे. आत्ता कुठं सर्व जग पूर्वपदावर येण्याच्या मार्गावर असताना ओमायक्रॉनच्या अडथळ्यामुळे सर्वच क्षेत्रांत चिंता पसरत आहे. या प्रकाराची उत्पत्ती जिथून झाली त्याच दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघ मोठ्या कालावधीच्या दौऱ्यावर जात आहे. सुरक्षिततेची सर्व पातळ्यांवर हमी दिली गेली आहे; पण संकट पावलोपावली कायम असताना बीसीसीआयनं दौऱ्याला परवानगी दिली...मग भले सामन्यांची संख्या कमी होणं हे स्वाभाविक असलं तरी शो मस्ट गो ऑन...आता कितीही अडथळे आले तरी क्रिकेटचं जग आता थांबणार नाही. आयसीसीकडे क्रिकेटचं पालकत्व असलं तरी आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीच्या आणि पैशाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटचा गाडा बीसीसीआयच चालवत असते, त्यामुळे इथून पुढं कितीही संकटं आली तरी क्रिकेट थांबणार नाही हे अधोरेखित झालं आहे.

जगाला एकत्र आणणारं एकच प्रमुख क्षेत्र आहे व ते म्हणजे खेळाचं. ऑलिंपिकपासून क्रिकेटपर्यंत असंख्य खेळ आणि त्यांचे द्विपक्षीय किंवा बहुराष्ट्रीय स्पर्धा-सामने सर्वांना विरंगुळा तर देत असतातच; पण त्यातून होणारी आर्थिक उलाढाल अर्थव्यवस्थेला मोठाच हातभारही लावत असते. मग तो खेळाडूंना मिळणारा पैसा असो वा जाहिरातदारांचं ब्रँडिग असो. खेळाचं हे जगही दोन वर्षांपूर्वी कोरोनानं ‘आयसीयू’त टाकलं होतं! तो अनुभव सर्वस्वी नवा आणि अनपेक्षित होता; पण अनुभवातून प्रत्येकानं मार्ग काढला आणि जागतिक फुटबॉल, टेनिस, बॅडमिंटन आणि क्रिकेटनं नव्यानं उभारी घेतली.

अनेक आव्हानं उभी असताना टोकिओतील ऑलिंपिकनं यशस्वीपणे आयोजन करून, कोरोनाकाळातही जगायचं कसं याचा वस्तुपाठ घालून दिला. हाच फॉर्म्युला ‘बायोबबल’च्या रूपानं सर्वांनी राबवला आणि खेळांचं जग पुन्हा सुरू झालं.

दोन वर्षांपूर्वी मार्च महिन्यात कोरोनाला भारतात पाय फुटत असताना दक्षिण आफ्रिकेचा संघ तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात आला होता; पण धोका समोर दिसू लागताच मालिका रद्द झाली. तिथूनच क्रिकेट ठप्प झालं होतं. त्यानंतर डेल्टा व्हेरिअंटनं हैदोस घातला तरी आयपीएल देशात सुरू होती. मात्र, जेव्हा काही खेळाडूच बाधित झाले तेव्हा स्पर्धा स्थगित करण्यात आली. ‘उर्वरित आयपीएल झाली नाही तर बीसीसीआयला अडीच हजार कोटींचा फटका बसेल,’ असं अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितलं होतं. यावरून भारतीय क्रिकेटमध्ये किती आर्थिक उलाढाल होते याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. ही पार्श्वभूमी सांगायचा हेतू एवढाच की, ओमायक्रॉनचं संकट असलं तरी दक्षिण आफ्रिकेचा दौरा रद्द करणं किंवा स्थगित करणं हे बीसीसीआयपेक्षा ब्रॉडकास्टरना आणि प्रामुख्यानं दक्षिण आफ्रिकेला परडवडणारं नाही. शिवाय, दक्षिण आफ्रिका मंडळाचे बीसीसीआयशी असलेले सलोख्याचे संबंधही तेवढेच महत्त्वाचे आहेत. आखातात झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या अगोदर न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानमध्ये असताना अखेरच्या क्षणी त्यांनी घेतलेली माघार, त्यानंतर लगेचच इंग्लंडनंही पाकिस्तानमधील मालिका स्थगित केली. हे करत असताना पाकिस्तान मंडळाला किती आर्थिक तोटा झाला याचा विचार त्यांनी केला नाही; पण जेव्हा भारतीय संघ खेळत असतो तेव्हा प्रसिद्धी आणि पैसा हातात हात घालून येत असतात. सध्या पाच कसोटी सामन्यांची मालिका इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जातेय. इंग्लंडनं भारताबरोबर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यामागंही असंच अर्थकारण दडलेले होतं.

‘डेल्टा’नं केलं होतं मोठं नुकसान

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर भारतात क्रिकेट सुरळीत झालं होतं. वर्षभरापूर्वी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील काही सामने प्रेक्षकांसह झालेले होते; पण गाफिलपणा नडला. आयपीएल स्थगित करावी लागल्यामुळे ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या मायदेशातील यजमानपदावर बीसीसीआयला पाणी सोडावं लागलं होतं. उर्वरित आयपीएल आणि टी-२० विश्वकरंडक आखातात खेळवणं बीसीसीआयचा खर्च निश्चितच वाढवणारं ठरलं. आता मात्र हा अनुभव लक्षात घेऊन पुढची आयपीएल भारतात होणार हे निश्चित आहे. देशांतर्गत क्रिकेटही सुरू झालं आहे; पण २०२३ मध्ये भारतात होणारी ५०-५० षटकांची विश्वकरंडक स्पर्धा यशस्वीपणे मायदेशातच पार पाडायची असेल तर सावधगिरी बाळगणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

आपण इथं क्रिकेटचा जसा विचार करतोय तशाच प्रकारची विचारसरणी जागतिक फुटबॉलची पालक-संघटना ‘फिफा’ आणि आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटना यांनीही पक्की केली आहे. काही महिन्यांपूर्वी यूरो अजिंक्यपद स्पर्धा युरोपात प्रेक्षकांसह पार पडली. ब्राझीलममध्ये कोरोनाचा ताप कायम असताना रिओमध्ये कोपा अमेरिका स्पर्धा, प्रेक्षक नसले तरी, झाली होती. टोकिओ ऑलिंपिकचं उदाहरण ताजं आहेच.

टेनिसमधील प्रतिष्ठेच्या ग्रँड स्लॅम स्पर्धा होत आहेत. डेव्हिस करंडकाबरोबरच बॅडमिंटनच्या स्पर्धा आणि फॉर्म्युला वनचाही थरार रंगत आहे. पुढच्या वर्षी कतारमध्ये विश्वकरंडक फुटबॉलचा थरार रंगणार आहे. त्यानंतर काही महिन्यांत ऑस्ट्रेलियात ट्वेन्टी-२० विश्वकरंडकही होणार आहे... सन २०२४ मध्ये पॅरिस ऑलिंपिकची तयारी सुरूही झाली आहे. शरीरवेधी असलेल्या खेळाच्या प्रो कबड्डी लीगचे पडघम वाजू लागले आहेत. एकूण काय तर, कोरोनाचे कितीही व्हेरिअंट आले किंवा येण्याची भीती असली तरी आता कुणी थांबणार नाही.

ओडिशा सरकारची बाजी

राज्य सरकारनं राष्ट्रीय हॉकी संघाला प्रायोजकत्व देणं हीच मुळात मोठी बाब आहे. त्यातच ओडिशा सरकारनं ज्युनिअर विश्वकरंडक हॉकीचं यशस्वी आयोजन करून, भारतात बहुराष्ट्रीय स्पर्धा आता व्यवस्थितपणे होऊ शकतात हे, बीसीसीआयलाच नव्हे तर, इतर संघटनांनाही दाखून दिलं आहे. हाच फॉर्म्युला इतरांनीही वापरायला हरकत नाही.

...तर खऱ्या अर्थानं शो पुढं जाईल

मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धा-सामन्यांचं आयोजन शक्य आहे. जैवसुरक्षा वातावरण, म्हणजेच पंचतारांकित सुरक्षित वातावरण, तयार करण्यासाठी लागणारा पैसा त्या त्या संघटनांकडून आणि पालक-संघटनांकडून उभा केला जाऊ शकतो; पण स्थानिक स्पर्धा जेव्हा सुरक्षित होतील तेव्हा खऱ्या अर्थानं खेळांबाबतचं ‘शो मस्ट गो ऑन’ हे म्हणणं अर्थपूर्ण ठरेल आणि हा शो पुढं जाईल. खुल्या वातावरणातील स्पर्धा-सामन्यांकडेही जातीनं लक्ष देणं आणि तेवढ्याच सुविधा पुरवणं अत्यावश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com