दैव जाणिले कुणी...

‘क्षेत्र कोणतंही असो, आयुष्यात एकदा तरी मोठी संधी मिळतेच...सातत्यानं प्रयत्न करत राहा’! असा सल्ला नेहमीच दिला जातो. संधीच्या शोधात असलेल्या प्रत्येक उमेदवाराच्या आशा या सल्ल्यानं पल्लवित होतात.
Cricket
CricketSakal
Summary

‘क्षेत्र कोणतंही असो, आयुष्यात एकदा तरी मोठी संधी मिळतेच...सातत्यानं प्रयत्न करत राहा’! असा सल्ला नेहमीच दिला जातो. संधीच्या शोधात असलेल्या प्रत्येक उमेदवाराच्या आशा या सल्ल्यानं पल्लवित होतात.

‘क्षेत्र कोणतंही असो, आयुष्यात एकदा तरी मोठी संधी मिळतेच...सातत्यानं प्रयत्न करत राहा’! असा सल्ला नेहमीच दिला जातो. संधीच्या शोधात असलेल्या प्रत्येक उमेदवाराच्या आशा या सल्ल्यानं पल्लवित होतात. मात्र, प्रत्येक गोष्टीला अपवाद असतोच. मिळालेल्या संधीचं सोनं केलं तरीही संघाबाहेर राहावं लागणारे अशा वेळी निश्चितच म्हणतील...दैव जाणिले कुणी!

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे दोन खेळाडू आहेत. त्यांच्या नशिबी संधीपेक्षा दुर्दैवच अधिक आलं. हे दोघंही भारतीय वंशाचे. पहिला, भारतीय संघातून खेळलेला करुण नायर आणि दुसरा न्यूझीलंडमधून खेळणारा एजाज़ पटेल. डिसेंबर महिन्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्यात एजाज़नं भारतीय संघाचे दहाच्या दहा फलंदाज बाद केले. तरीही त्याला पुढच्या सामन्यासाठी न्यूझीलंड संघातून वगळण्यात आलं. मुळात शंभरपेक्षा अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या क्रिकेटमध्ये एकाच डावात दहा विकेट मिळवणारे तीनच गोलंदाज आहेत. त्यातील एजाज़ तिसरा. एवढी मोठी विक्रमी कामगिरी करूनही त्याला न्यूझीलंडनं पुढच्या सामन्यासाठीच नव्हे तर, मालिकेतूनही वगळलं, हे जरा अतीच म्हणायला हवं.

एजाज़नं भारतात दहा विकेट मिळवल्या, न्यूझीलंडची पुढची मालिका त्यांच्या देशात होणार आहे. येथील हवामान आणि खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना साथ देणारी असली तरी हा विक्रमवीर पुढच्या सामन्यात स्थान मिळवू शकत नाही हे पटणारं नाही. कारण, एजाज़ पराक्रम करत असताना त्याच्यासह गोलंदाजी करणाऱ्या; पण एकही विकेट मिळवू न शकलेल्या रचिन रवींद्र याचं संघातलं स्थान कायम राहतं आणि एजाज़ला मात्र वगळलं जातं, हे कसं? न्यूझीलंडनं यासंदर्भात दिलेलं समर्थन न पटणारं आहे.

करुणची चूक काय?

करुण नायर हा संयमी फलंदाज. त्याची कारकीर्द खरं तर केएल राहुल या कर्नाटकातील त्याच्या सहकाऱ्याप्रमाणेच बहरायला हवी होती; पण आपली काय चूक झाली याचं उत्तर त्याला अजून सापडलेलं नसेल. कारण, ढोबळमानानं विचार केला तर एखाद्या फलदाजानं शतकी खेळी केली तर त्याचे पुढचे काही सामने संघातलं स्थान निश्चितच असतं; पण करुणला त्रिशतक केल्यानंतरही पुढच्या सामन्यासाठी वगळण्यात आलं होतं. सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर अशा विक्रमी फलंदाजांनाही त्रिशतक करता आलेलं नाही. वीरेंद्र सहवाग आणि करुण अशा दोनच भारतीयांनी ही कामगिरी केलेली आहे.

एखाद्याकडे कितीही गुणवत्ता असली तरी आणि ती त्यानं सिद्धही केलेली असली तरी परिस्थितीमुळे सर्व गणितं बदलू शकतात. अजिंक्य रहाणे दुखापतीमुळे खेळू शकत नव्हता, त्यामुळे करुणला संधी मिळाली होती, तीत त्यानं त्रिशतक केलं; परंतु पुढच्या सामन्यासाठी रहाणे तंदुरुस्त झाला, त्यामुळे अर्थातच करुणला जागा रिकामी करावी लागली होती. तीन सामन्यांनंतर करुणला पुन्हा संघात खेळवण्यात आलं होतं; परंतु त्याचा खचलेला आत्मविश्वास पुन्हा जोमदार होऊ शकला नाही. त्यामुळे या गुणवान फलंदाजाची कसोटी-कारकीर्द अल्पजीवी ठरली. आता तसंच काहीसं एजाज़ पटेलचंही होऊ शकतं.

मर्वान अटापट्टू नशीबवान...

एजाज़ पटेल आणि करुण हे ‘फारच दुर्दैवी’ आहेत असं आपण म्हणत असू तर श्रीलंकेचा माजी सलामीवीर मर्वान अटापट्टू हा ‘फारच सुदैवी’ या श्रेणीत मोडतो. सन १९९० मध्ये भारताविरुद्ध त्याचं पदार्पण झालं होतं. पहिल्या कसोटीतील दोन्ही डावांत तो शून्यावर बाद झाला. एवढंच कशाला, सहा डावांपैकी पाच डावांत त्याला भोपळाही फोडता आला नाही, तरीही त्याचं स्थान कायम राहिलं. नंतरच्या काळात तो श्रीलंकेचा भरवशाचा सलामीवीर झाला होता.

सर्वोत्तम कामगिरी केल्यानंतरही संघातून बाहेर जाण्याची वेळ कुणावरही येऊ शकते. अगदीच ताजा प्रकार इंग्लंड-ऑस्ट्रेलिया अॅशेस मालिकेतही घडला. पॅट कमिन्स आणि जॉश हेझलवूड खेळत नसल्यामुळे झाय रिचर्डसनला संधी मिळाली. त्यानं पाच विकेट मिळवण्याची कामगिरी केली; परंतु पुढच्या कसोटीसाठी कमिन्स उपलब्ध झाल्यामुळे रिचर्डसनला वगळलं. त्याचबरोबर बत्तिसाव्या वर्षी स्कॉट बोलंडला पदार्पणाची संधी मिळाली आणि त्यानं अवघ्या सात धावांत सहा विकेट मिळवत अद्वितीय गोलंदाजी केली. आता हेझलवूड तंदुरुस्त होत असल्यामुळे बोलंडला जागा रिकामी करावी लागणार आहे.

खचू नका...स्थान गृहीत धरू नका

खेळ कोणताही असो, प्रयत्न करत राहणं हे खेळाडूचं काम आहे. संधी मिळाली नाही आणि सर्वोत्तम खेळ करूनही संघातून वगळण्याची वेळ आली तरी खचू नये आणि कितीही श्रेष्ठ खेळ केला तरी संघातील स्थान गृहीत धरू नये, हे सूत्र प्रत्येकानं लक्षात ठेवायला हवं. संधी मिळताच केलेला पराक्रम अनंतकाळपर्यंत कायम राहतो.

एजाज़ पटेल काय किंवा करुण नायर काय, त्यांचे विक्रम कुणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि हे सत्य दैवालाही पुसता येणार नाही!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com