‘रॉकस्टार’ जडेजा

विराट कोहलीच्या शंभराव्या कसोटी सामन्यात अपेक्षा होती विराटच्याच बहुचर्चित आणि प्रलंबित शतकाची; पण या सामन्यात भाव खाऊन गेला तो रवींद्र जडेजा!
Ravindra Jadeja
Ravindra JadejaSakal
Summary

विराट कोहलीच्या शंभराव्या कसोटी सामन्यात अपेक्षा होती विराटच्याच बहुचर्चित आणि प्रलंबित शतकाची; पण या सामन्यात भाव खाऊन गेला तो रवींद्र जडेजा!

विराट कोहलीच्या शंभराव्या कसोटी सामन्यात अपेक्षा होती विराटच्याच बहुचर्चित आणि प्रलंबित शतकाची; पण या सामन्यात भाव खाऊन गेला तो रवींद्र जडेजा! नाबाद १७५ धावा आणि दोन्ही डावांत मिळून नऊ विकेट अशी अष्टपैलू कामगिरी करून भारताच्या क्रिकेट-इतिहासात त्यानं स्वतःला विनू मंकड आणि पॉली उम्रीगर यांच्या पंक्तीत नेऊन बसवलं (एका डावात दीडशे धावा आणि पाच विकेट हा विक्रम). सन १९६२ मध्ये पॉली उम्रीगर यांनी वेस्ट इंडीजविरुद्ध पोर्ट ऑफ स्पेनमध्ये एकाच डावात नाबाद १७२ धावा आणि पाच विकेट अशी कामगिरी केली होती. त्यानंतर तब्बल ४० वर्षांनी हा योग जडेजामुळे जुळून आला. म्हणजे एक तर, जडेजानं त्याच्यातल्या गुणवत्तेला न्याय दिला किंवा भारतात असा दुसरा अष्टपैलू क्रिकेटपटू निर्माण झाला नाही असाही याचा अर्थ निघू शकतो. असो. दुसरा योगायोग अनपेक्षित आहे.

एकीकडे जडेजा सर्वोत्तम अष्टपैलूत्व सादर करत असताना त्याला ‘रॉकस्टार’ ही उपाधी देणाऱ्या शेन वॉर्नचं याच दरम्यान अकाली निधन झालं. मोहालीत श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी जडेजा ४५ धावांवर नाबाद होता आणि त्याच सायंकाळी वॉर्नचं निधन झाल्याची बातमी थडकली. पुढच्या दोन दिवसांत जडेजानं नाबाद १७५ धावा तर केल्याच; पण गोलंदाजीत पाच विकेट्सही मिळवल्या. ज्या वॉर्ननं जडेजाला ‘रॉकस्टार’ ही उपाधी दिली होती त्या वॉर्नला जडेजानं दिलेली ही मानवंदनाच म्हणायची!

‘विराटच्या ‘लग्नात’ जडेजा ‘वऱ्हाडी’ ’ असंही मोहालीत झालेल्या सामन्याबाबत म्हटलं जाऊ शकतं; पण विराट-जडेजा यांच्यातील ‘नवरदेव’ आणि ‘पाठिराखा’ हे नातं फार जुनं आहे. सन २००८ मध्ये विराटनं आपल्या कर्णधारपदी १९ वर्षांच्या आतील विश्वकरंडक जिंकला, त्या संघाचा जडेजा हा उपकर्णधार होता. तेव्हापासून ही जोडी भारतीय क्रिकेटची सेवा करत आहे. म्हणूनच विराटच्या शंभराव्या कसोटीत जडेजानं ठसा उमटवला नसता तरच कदाचित ते आश्चर्य ठरलं असतं.

आता झाला असता ‘पुष्पराज’

भारतीय संघात वेगवेगळे ‘कॅरेक्टर्स’ आहेत! जडेजाचा क्रमांक यात वरचा असेल. अर्धशतक असो वा शतक, ते झाल्यानंतर तलवारीसारखी बॅट फिरवणं अशी जगावेगळी कृती जडेजाच करू शकतो. राजपूतांसारखी वाढलेली दाढी आणि टोकदार मिशा आणि अधूनमधून त्या मिशांना पिळ देऊन ‘हम से ना टकराना...’ असं अप्रत्यक्षपणे सुचवणं...अशा प्रकारे जडेजाच वागू शकतो. मात्र, त्याच्या या वागण्यानं कधी कुणी दुखावलं गेलं नाही किंवा कुणाला तुच्छ समजण्याच्या उद्देशानंही जडेजानं अशी कृती केलेली नाही. म्हणूनच कदाचित वॉर्ननं त्याला ‘रॉकस्टार’ ही उपाधी दिली असावी. वॉर्न हयात असता तर आणि सध्या गाजत असलेला ‘पुष्पा’ हा चित्रपट त्यानं पाहिला असता तर जडेजाला त्यानं ‘पुष्पराज’ असंही संबोधलं असतं! कारण, जडेजाची गुणवत्ता आहेच मुळात काहीही शक्य करून दाखवण्याची. दुखापतीमुळे तो दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ संघाबाहेर होता. एरवी, एवढा काळ क्रिकेटपासून दूर राहिलेल्या खेळाडूला मुख्य संघात स्थान देताना तंदुरुस्ती सिद्ध करावी लागते; पण जडेजा याला अपवाद ठरला आणि पहिल्याच सामन्यात त्यानं भारतासाठी विक्रमी कामगिरी केली.

मांजरेकरबरोबरचं द्वंद्व

स्वतःच्या मर्जीनं मैदानाबाहेरचं आयुष्य जगणारा जडेजा मैदानावरही स्वतःचं अस्तित्व जाणवून देत असतो. सलग क्रिकेट खेळून आणि दौरे करून कधी सौराष्ट्रातील आपल्या घरी परतल्यावर स्वतःच्या तबेल्यातील घोड्यांवर बसून घोडेस्वारीचाही आनंद तो घेतो. असा बिनधास्त असलेला जडेजा कुणाच्या टोमण्यांना प्रत्युत्तर दिल्याशिवाय कसा शांत बसेल? नेहमीच तिरकस बोलणारा माजी खेळाडू संजय मांजरेकर यानं समालोचन करताना जडेजाला ‘बिट्स आणि पीसेस’ असं संबोधलं होतं, म्हणजे ‘तुकड्यातुकड्यांत कामगिरी करणारा खेळाडू’!

त्यावर ‘तू जेवढे सामने खेळला आहेस त्याहून दुपटीनं अधिक सामने मी खेळलोय आणि अजूनही खेळत आहे. तुझ्यापेक्षा अधिक यश मिळालेल्या खेळाडूंचा आदर करायला शीक...’ हे जडेजानं दिलेलं उत्तर म्हणजे त्यानं मारलेल्या सणसणीत षटकाराप्रमाणेच रोखठोक होतं आणि वाढलेल्या दाढीवरून हात फिरवत ‘झुकेगा नही...’ अशाच आविर्भावातलं ते होतं. आता मंकड आणि उम्रीगर या दिग्गजांच्या पंक्तीत बसलेल्या आणि आयसीसीच्या अष्टपैलू क्रमवारीत पहिल्या स्थानावर आलेल्या जडेजाबाबत मांजरेकरचं कोणतंही ट्विट अद्याप आलेलं नाही. खरं तर क्रिकेटप्रेमी त्याची वाट पाहत आहेत...

आयपीएल-बंदी ते संभाव्य कर्णधार

अशा या जडेजालाही काही वर्षांपूर्वी बॅडपॅच आला होता; पण रणजीच्या सामन्यात त्रिशतक आणि शतक करून त्यानं पुन्हा भारतीय संघात मिळवलेलं स्थान अधिक पक्कं केलं. कोहलीच्या १९ वर्षांच्या आतील संघात उपकर्णधार असलेल्या जडेजाकडे ‘भारतीय संघाचा उपकर्णधार’ म्हणून कधी पाहिलं गेलं नाही. आयपीएलमध्ये चेन्नई संघाचा तो तेवढाच महत्त्वाचा खेळाडू आहे. चाळिशीकडे झुकलेला महेंद्रसिंह धोनी या वेळची आयपीएल खेळून कदाचित निवृत्त होईल. त्यानंतर जडेजाकडे नेतृत्वाची जबाबदारी जाण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास तो त्याच्यासाठी आणखी एक सन्मान असेल. कारण; सन २००८ च्या पहिल्या आयपीएलमध्ये विजेत्या राजस्थान संघाचा कर्णधार शेन वॉर्न यानं त्याला ‘रॉकस्टार’ संबोधूनही जडेजा वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न करत होता. राजस्थान संघाशी करारबद्ध असतानाही ‘मुंबई इंडियन्स’नं आपल्याला संघात घ्यावं असा त्याचा प्रयत्न सुरू होता. हे नियमबाह्य असल्यामुळे बीसीसीआयनं त्याच्यावर एका वर्षाची आयपीएलबंदी घातली होती. आता जडेजा चेन्नईचा कर्णधार कधी होतो हे पाहणं उत्सुकतेचं असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com