आयपीएलमधून शोध रोहितच्या उत्तराधिकाऱ्याचा

प्रत्येक आयपीएल ही भारतीय क्रिकेटला काही ना काही देणारी असतेच. नव्या खेळाडूंची गुणवत्ता दिसून येते, काहींचं अपयश ठळकपणे पुन्हा अधोरेखित होतं.
Rohit Sharma
Rohit SharmaSakal
Summary

प्रत्येक आयपीएल ही भारतीय क्रिकेटला काही ना काही देणारी असतेच. नव्या खेळाडूंची गुणवत्ता दिसून येते, काहींचं अपयश ठळकपणे पुन्हा अधोरेखित होतं.

प्रत्येक आयपीएल ही भारतीय क्रिकेटला काही ना काही देणारी असतेच. नव्या खेळाडूंची गुणवत्ता दिसून येते, काहींचं अपयश ठळकपणे पुन्हा अधोरेखित होतं, तर कुणाचे नेतृत्वगुणही क्रिकेटविश्वासमोर येतात. रोहित शर्मा आता तिन्ही प्रकारांत भारताचा कर्णधार झाला आहे आणि त्याच्या नेतृत्वाचा उदयही आयपीएलमधूनच झाला होता. सन २०१३ च्या मोसमात रिकी पाँटिंग ‘मुंबई इंडियन्स’चा कर्णधार होता; परंतु फलंदाजीत सातत्यानं अपयश येत असल्यानं त्यानं स्वतःहून जागा रिकामी केली. रोहित शर्मा कर्णधार झाला. आयपीएल त्यानं ‘मुंबई इंडियन्स’ला जिंकून दिली. त्या स्पर्धेपासून रोहितकडे कर्णधार या दृष्टिकोनातून पाहण्यात येत होतं. आता भारतीय संघाची मदार त्याच्या खांद्यावर आहे. कालपासून सुरू झालेल्या आयपीएलमध्ये यंदा ‘रोहितचा भविष्यातील उत्तराधिकारी कोण?’ याचा शोध पडद्यामागून घेतला जाणार आहे. ‘टीम इंडिया’चे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही तीन दिवसांपूर्वी हाच अंदाज व्यक्त केला होता. यावरून ही आयपीएल भारतीय संघाच्या भवितव्यासाठी किती महत्त्वाची असेल हे स्पष्ट होतं.

‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनी यानं नेतृत्वाची धुरा खाली ठेवल्यावर २०१४ मध्ये विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार झाला आणि २०२१ च्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत तो कायम होता. दरम्यान, ‘व्हाईट बॉल’ क्रिकेटसाठी रोहित शर्मा तयार झालेला होता, तर कसोटी क्रिकेटमध्ये अनुभवी अजिंक्य रहाणे विराट नसताना समर्थपणे नेतृत्व करत होता. त्यामुळे आणखी पर्याय शोधण्याची वेळ आली नव्हती; पण आत्ताची परिस्थिती काहीशी वेगळी आहे. तिन्ही प्रकारांत खेळणं हेच मुळात आव्हानात्मक. त्यात नेतृत्व म्हणजे सर्वात मोठी जबाबदारी.

रोहित ३४ वर्षांचा आहे. या वयात अनेक खेळाडू क्रिकेटलाच ‘गुड बाय’ करतात; पण रोहितच्या कर्णधारपदाची इनिंग या वयात सुरू झाली आहे. मुळात, रोहित हा ‘इंज्युरी-प्रोन’ म्हणजेच दुखापती होत असणारा खेळाडू. त्यामुळे ऐनवेळी गरज लागली तर सक्षम पर्याय तयार असायला हवा, याची जाणीव निवड समितीलाही असणारच, म्हणूनच ‘व्हाईट बॉल’मधील रोहितच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध घेण्यासाठी आयपीएल ही सुवर्णसंधी आहे.

केएल राहुल, रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर असे तीन पर्याय आहेत आणि तिघांच्या नेतृत्वावर सर्वांचं लक्ष असणार आहे. अर्थात्, विजेतेपद मिळवलं म्हणून तोच सर्वोत्तम कर्णधार असतो असंही नाही. शेवटी, यशाचं मोजमाप शोकेसमध्ये असलेल्या ट्रॉफींवर केलं जात असलं तरी संघात विजिगिषू वृत्ती आणि बेधडक खेळण्याची जिगर निर्माण करणाऱ्या कर्णधरांचंही योगदान तेवढंच मौल्यवान असतं, म्हणूनच आयसीसीच्या सर्व ट्रॉफी जिंकणाऱ्या धोनीचा उत्तराधिकारी, आयसीसीची एकही ट्रॉफी न जिंकतासुद्धा विराटलाच समजलं जात आहे, म्हणूनच यंदाच्या आयपीएलमध्ये केएल राहुल, रिषभ किंवा श्रेयस हे संघ कसे तयार करतात याचंही मूल्यांकन होणार आहे. ते दडपणाखाली कसे निर्णय घेतात याकडे आवर्जून लक्ष दिलं जाणार आहे. केएल राहुलनं रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे, त्यात त्याला अपयश आलं असलं तरी त्याच्याकडे चांगला अनुभव आहे.

राहुल-पंत- श्रेयस : तुलनात्मक आढावा

केएल राहुल

आयपीएलमध्ये ‘पंजाब किंग्ज्’च्या नेतृत्वाचा अनुभव; परंतु संघाची एकदाही भरीव कामगिरी नाही. धोनीप्रमाणे शांत आणि संयमी. दडपणाखाली योग्य निर्णय घेण्याची क्षमता. संघ अडचणीत असताना ‘कॅप्टन इनिंग’ खेळण्याची ताकद; परंतु विजेतेपदाचा शिक्का असणं आवश्यक.

रिषभ पंत

कमालीची नैसर्गिक गुणवत्ता, सामना एकहाती जिंकून देण्याची क्षमता, २०२१ च्या आयपीएलमध्ये श्रेयस अय्यर दुखापतीमुळे खेळू शकला नाही, त्याऐवजी पंतची ‘दिल्ली संघा’च्या कर्णधारपदी नियुक्ती. अर्ध्या आयपीएलमध्ये श्रेयस परतला तरी पंत कर्णधारपदी कायम. पाँटिंगसारख्या कसलेल्या माजी खेळाडूचं ‘दिल्ली संघा’तून मार्गदर्शन; परंतु एवढ्यात राष्ट्रीय नेतृत्वासाठी विचार होण्याकरिता प्रगल्भता येण्याची गरज.

श्रेयस अय्यर

रणजी स्पर्धेत ‘मुंबई संघा’च्या नेतृत्वाचा अनुभव. आयपीएलमध्ये दिल्लीचं नेतृत्व करताना संघाला उपविजेतेपद मिळवून देण्याची कामगिरी. आता मातब्बर ‘कोलकाता संघा’चा कर्णधार. धोनी आणि रोहित यांच्याप्रमाणे शांत आणि संयमी. संघ अडचणीत असताना जबाबदारीपूर्वक फलंदाजी करण्याची क्षमता.

कुणाला मिळेल पसंती?

केएल राहुल, रिषभ आणि श्रेयस हे तिघंही तिन्ही प्रकारांत भारतीय संघातून खेळतात, त्यामुळे सातत्यानं ‘टीम इंडिया’शी संबंधित ते आहेत. एकूणच सखोल विचार आणि आढावा घेतल्यावर केएल राहुल याला कसोटीसाठी आणि एकदिवसीय-ट्वेन्टी-२० साठी श्रेयस याला रोहितचा उत्तराधिकारी म्हणून भविष्यात पसंती मिळू शकते.

श्रेयस अय्यरकडे नेतृत्वाचे गुण उपजतच आहेत. तो मैदानात जातो तेव्हा त्याला सहकाऱ्यांकडून सन्मान मिळतो, ऑस्ट्रेलियाचा कसोटी-कर्णधार पॅट कमिन्स आयपीएलमध्ये अय्यरच्या नेतृत्वात खेळणार आहे.’’

- डेव्हिड हसी, ‘कोलकाता संघा’चे मेन्टॉर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com