आज आहे.... मौका....मौका !!

कोणतीही जागतिक किंवा विश्वकरंडक स्पर्धा ही केवळ त्या त्या खेळापूरती मर्यादित राहिलेली नाही. सध्याच्या व्यावसायिक युगात तर नाहीच आणि त्यात क्रिकेटची विश्वकरंडक स्पर्धा तर अजिबातच नाही.
आज आहे.... मौका....मौका !!

कोणतीही जागतिक किंवा विश्वकरंडक स्पर्धा ही केवळ त्या त्या खेळापूरती मर्यादित राहिलेली नाही. सध्याच्या व्यावसायिक युगात तर नाहीच आणि त्यात क्रिकेटची विश्वकरंडक स्पर्धा तर अजिबातच नाही. जे काही विकायचे त्यातून मोबदला कसा मिळणार हा सध्याच्या कॉर्पोरेट विचार खेळातही मुरलेला आहे. क्रिकेटपूरते बोलायचे तर आयपीएल आणि जागतिक फुटबॉलमध्ये तर प्रीमीयर लीग, स्पॅनिश लीग, जर्मन लीग अशा स्पर्धांचा पाया हा आर्थिक गणितावर आधारलेला आहे, पण देशांचे प्रतिनिधीत्व होत असले तरी अशा स्पर्धांमध्येही व्यावसायिक हित जपले जाते. त्यात गैर काहीच नाहीच मग क्रिकेटची विश्वकरंडक स्पर्धा असते तेव्हा भारत-पाकिस्तान यांच्यातील लढत म्हणजे आयसीसीसाठी सोन्याची खाणच. खरे तर अंतिम सामन्यापेक्षा याच सामन्याला अधिक महत्व. भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याशिवाय विश्वकरंडक पूर्णच होऊ शकत नाही अशीही त्याची दुसरी बाजू. सर्वोच्च उत्कंठा असलेली ही लढत आज रविवारी सुट्टीच्या दिवसाच्या मुहुर्तावर होत आहे.

आयसीसी क्रमवारीनुसार विश्वकरंडक स्पर्धेसाठी काही संघ पात्र ठरत असतात आणि त्यांनंतर स्पर्धेची क्रमवारीही निश्चित होत असते, हे गणित काहीही असले तरी भारत - पाक साखळीत लढत व्हायलाच हवी. अशा प्रकारे सर्व सुनियोजित असते. हे आज कालचं नाही, जेव्हापासून या सोन्याच्या अंड्याची महती कळली तेव्हापासून हा मौका साधला जात आहे. केवळ क्रिकेट रसिकच सोडा इतर कोणासमोर मौका हा शब्द उच्चारा...विश्वकरंडक स्पर्धेत भारत-पाक सामना असे उत्तर येईल. हे म्हणजे मोती साबणासारखे झाले आहे. टीव्हीवर मोती साबणाच्या जाहिराती झळकू लागल्या की दिवाळी जवळ आल्याची जाणीव होते तसेच याचे महत्त्व आहे. २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेच्या वेळी मौका मौका ही जाहिरात प्रथम तयार करण्यात आली होती. त्या स्पर्धेतही भारताने पाकिस्तानला पराभवाचे खडे चारले होते. पाकिस्तानी चाहत्यांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या होत्या, पण त्या स्पर्धेत भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यावर पाकिस्तानकडून भारतीयांना खिजवण्याचा प्रयत्न झाला होता. विश्वकरंडक स्पर्धेत कधीही पाकिस्तानचा संघ भारताविरुद्ध जिंकलेला नसला तरी २०१६ मधील चॅम्पियन्स करंडक अंतिम सामन्यात भारताचा पाकिस्तानकडून पराभव झाला आणि पाकिस्तानी सर्वच टीव्ही चॅलेन्सना आनंदाचे नुसते भरते आले होते. मौका साधला अशी दुधाची ताक ताकावर भागवण्यात आली होती..

तेव्हा नव्हता व्यावसायिक दृष्टिकोन

भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेतच, पण आयसीसीचा व्यावसायिक दृष्टीकोन नव्हता तेव्हा या लढतीकडे इतर लढतींप्रमाणे पाहिले जात होते. म्हणूनच एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा १९७५ मध्ये सुरू झाली त्यानंतर १९७९, भारताने जिंकलेली १९८३ आणि भारतात झालेली १९८७ ची स्पर्धा या पहिल्या चार विश्वकरंडक स्पर्धांत भारत-पाकिस्तान कधीच आमनेसामने आले नव्हते. १९९२ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या रंगीत कपड्यातील आणि प्रकाशझोतातील कलरफूल स्पर्धात भारत-पाकिस्तान पहिली लढत झाली आणि जावेद मियाँदादच्या माकड उड्यांनी ही लढत गाजली तेथून हा सिलसिला सुरू झाला. आता तर ही लढत नित्याचीच झाली आहे.

सट्टेबाजांसाठीही मौका...

एकीकडे आपण भारत -पाक लढत...ब्रॉडकास्टर...आयसीसी आणि त्याद्वारे मिळणारे बक्कळ उत्पन्न असा विचार केला जात आहे पण दुसऱ्या बाजुला सट्टेबाजांसाठी तर मौकाच मौका आहे. २००० मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दिवंगत कर्णधार हॅन्सी क्रोनिएने फिक्सिंगसाठी सट्टेबाजांशी केलेलं संभाषण दिल्ली पोलिसांनी टॅप केले, भारतीय क्रिकेटशी संबंधीत फिक्सिंगचे पहिले प्रकरण उघड झाले आणि त्यानंतर क्रिकेट विश्व ढवळून निघाले होते. क्रिकेटमध्ये भ्रष्टाचार होऊ शकतो आणि कसा होऊ शकतो हे उघड झाले. पुढे २००८ मध्ये आयपीएल सुरू झाली आणि सट्टेबाजांना पर्वणीच मिळाली. २०१३ मध्ये तीन खेळाडूंना स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अटक झाली. इंग्लंड दौऱ्यात असाच प्रकार केल्यामुळे पाकिस्तानच्या तिघा खेळाडूंना तुरुंगात जावे लागले होते. हा इतिहास आहे. क्रिकेट भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी सर्व छिद्रे बुजवण्याचा प्रयत्न झाला तो अजूनही सुरू आहे, फिक्सिंग आणि स्पॉट फिक्सिंगला आळा बसला असला तरी जगाच्या कानापोऱ्यात सुरू असलेल्या सट्टेबाजीला कोणीच काही करू शकत नाही. याच सट्टेबाजासांठीही भारत-पाक सामना निश्चितच मोठा मौका असणार आहे. मैदानाबाहेर किती तरी कोटींची उलाढाल निश्चितच होणार. थोडक्यात काय तर भारत-पाकिस्तान क्रिकेट संघ मैदानावर लढतात आणि अनेक जण मौका मौका करत रहातात..

भारताचे यश पैकीच्या पैकी

एकदिवसीय म्हणजेच ५० - ५० षटकांच्या आणि ट्वेन्टी- २० विश्वकरंडक स्पर्धांत मिळून भारत-पाक यांच्यात एकूण १२ लढती झाल्या आहेत आणि या सर्व १२ लढती भारताने जिंकल्या आहेत. (यातील एक लढत टाय आहे, पण भारताने बॉल आऊट जिंकल्याने विजयाचे गुण भारताला मिळालेले आहेत) म्हणूनच आता तरी भारताला हरवण्याचा तुम्हाला मौका आहे, असे पाकिस्तानला उद्देशून या जाहिरातीचे हे प्रयोजन. जेव्हा ही जाहिरात पहिल्यांदा झळकली तेव्हा पाकिस्तानच्या माजी खेळाडूंच्या जखमेवर मीठ चोळले गेले होते. पण ही जाहिरात होती स्पर्धेचे प्रक्षेपण करणाऱ्या भारतीय ब्रॉडकास्टर्सची आणि समालोचनासाठी करारबद्ध असलेले पाकिस्तान समालोचकांना ही जाहिरात हसण्यावारी नेण्याशिवाय पर्याय नव्हता. यंदाही ही जाहिरात तेवढीच चर्चेत आलेली आहे. यंदाचीही स्पर्धा भारतात होणार होती, परंतु कोरोनामुळे डेस्टिनेशन अमिराती झाले. त्यामुळे भारतीय प्रेक्षकांचा याची देही याचा डोळा मौका साधण्याची संधी हुकणार आहे. लक्षात घ्या जर ही स्पर्धा भारतात झाली असती तर अजून कितीतरी पटीने उत्कंठा वाढवण्यात आली असती. मुळात हा सामना कोठे घ्यायचा यावरून वाद झालाच असता आणि तिकिटांचा भावही गगनावरी गेला असता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com