अजून यौवनात मी...

ट्वेन्टी-२० हा प्रकार युवकांचा असल्याचं म्हटलं जातं. ज्याच्या अंगी अधिक चपळता तोच उमटवी अधिक ठसा...! हा गुणविशेष ट्वेन्टी-२० प्रकाराचा आत्मा समजला जातो.
dinesh karthik
dinesh karthiksakal
Summary

ट्वेन्टी-२० हा प्रकार युवकांचा असल्याचं म्हटलं जातं. ज्याच्या अंगी अधिक चपळता तोच उमटवी अधिक ठसा...! हा गुणविशेष ट्वेन्टी-२० प्रकाराचा आत्मा समजला जातो.

ट्वेन्टी-२० हा प्रकार युवकांचा असल्याचं म्हटलं जातं. ज्याच्या अंगी अधिक चपळता तोच उमटवी अधिक ठसा...! हा गुणविशेष ट्वेन्टी-२० प्रकाराचा आत्मा समजला जातो, म्हणूनच कोणत्याही संघाचा भर नवोदित खेळाडूंना प्राधान्य देण्यावर असतो; पण प्रत्येकासाठी वय हे प्रमाण नसतं म्हणून तरुण खेळाडूच ठसा उमटवेल असंही नसतं. दिनेश कार्तिक हे याबाबतचं उत्तम उदाहरण आहे. सन २००६ मध्ये भारतीय संघ पहिलावहिला ट्वेन्टी-२० सामना खेळला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या त्या सामन्यात दिनेश कार्तिक सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. आता तो ३६ वर्षांचा आहे आणि गेल्या आठवड्यात आयपीएलमध्ये राजस्थानविरुद्ध एक जबरदस्त आणि थरारक खेळी करून तो सामन्याचा मानकरी ठरला. सोळा वर्षांनंतरही तो सामन्याचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून पुरस्कार मिळवण्याची धमक दाखवतो, म्हणजे ट्वेन्टी-२० हा प्रकार केवळ युवकांचाच आहे असं नाही. पांढरी दाढी कलप लावून काळी करून भले तो तरुण असल्याचं दाखवत असेल; पण त्याच्या बॅटला आणि जिद्दीला अशी कोणती रंगरंगोटी करण्याची गरज नाही.

अशा या जिगरबाज खेळाडूला भारतीय संघातलं स्थान प्रदीर्घ काळ कायम ठेवता आलं नाही; पण आयपीएलमध्ये मात्र त्याला मोठी मागणी असते. कोलकाता संघाचा तो कर्णधार होता. स्पर्धेच्या मध्येच त्याला कर्णधारपदावरून दूर करण्यात आलं. आयपीएलच्या कारकीर्दीला पूर्णविराम मिळणार अशी शक्यता निर्माण झाली असताना विराट कोहली खेळत असलेल्या बंगळूर संघानं त्याच्यासाठी साडेदहा कोटी मोजले. ही रक्कम थोडीथोडकी नव्हे. यावरून कार्तिकची उपयुक्तता अधोरेखित होते.

कमालीची चपळता

चपळता हा कार्तिकच्या अंगी असलेला सर्वात महत्त्वाचा गुण आहे. सन २००४ मध्ये त्याला योगायोगानंच पदार्पण करण्याची संधी मिळाली आणि क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या ‘लॉर्डस्’वरील एकदिवसीय सामन्यात त्यानं इंग्लंडचा कर्णधार मायकेल वॉनला जमिनीशी समांतर राहत यष्टिचीत केलं. यष्टिरक्षक म्हणून त्याच्या खात्यात नोंद झालेली ती पहिली आंतरराष्ट्रीय विकेट होती. नजरेचं पारणं फेडणारी ती चपळता सर्वांना थक्क करणारी होती; पण वॉनला यष्टिचीत करताना मारलेली झेप त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचं उड्डाण मात्र ठरू शकली नाही! याच काळात महेंद्रसिंह धोनीचा उदय होत होता. त्यानंतर टीम इंडिया आणि धोनी असं समीकरण तयार झालं. इतर यष्टिरक्षक हे राखीव खेळाडू म्हणून संघात असायचे.

कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० अशा तिन्ही प्रकारांत एकाच वेळी संघात स्थान मिळवण्याचं भाग्य मोजक्याच खेळाडूंना मिळतं. सन २००८ मध्ये कार्तिकला ही संधी मिळाली होती; पण धोनीच्या अनुपस्थितीत जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा तो नजरेत भरणारी कामगिरी करू शकला नाही. परिणामी, तळ्यात-मळ्यात असाच त्याचा खेळ सुरू राहिला. यादरम्यान देशांतर्गत क्रिकेटमध्ये मात्र धावांचा पाऊस त्याच्या बॅटमधून पडत होता. सन २००८-०९ च्या मोसमात रणजी क्रिकेटमध्ये एक हजार धावा करण्याचा पराक्रमही त्यानं केला होता. धोनीनंतर पार्थिव पटेल, दिनेश कार्तिक आणि वृद्धिमन साहा या तिघांमध्ये शर्यत असयाची. अशा वेळी, जी संधी मिळाली ती कदाचित अखेरची असू शकेल, या दडपणामुळे कार्तिकला संधीचं सोनं करता आलं नसावं. मात्र, नंतरच्या काळात त्याच्याऐवजी वृद्धिमन साहाला उत्तम यष्टिरक्षक म्हणून प्राधान्य मिळालं.

८ चेंडूंत २९ धावा

प्रत्येक खेळाडूच्या कारकीर्दीत एक अविस्मरणीय खेळी असते. कार्तिकनं आंतरराष्ट्रीय असो वा आयपीएल, कितीही मॅचविनिंग खेळी केलेल्या असोत; पण श्रीलंकेत झालेल्या ‘निदहास करंडक’च्या अंतिम सामन्यात बांगलादेशविरुद्ध केलेली केवळ ८ चेंडूंतील नाबाद २९ धावांची झंझावाती खेळी अफलातूनच होती.

तो मैदानावर आला तेव्हा भारताचा पराभव जवळपास निश्चित झाला होता; पण कार्तिकनं आठपैकी दोन चेंडूंना चौकार आणि तीन चेंडूंना षटकार मारून अशक्य ते शक्य करून दाखवलं होतं. गेल्या आठवड्यात राजस्थानविरुद्धही त्यानं अशीच खेळी साकारली. सन २०१८ नंतर आता २०२२...चार वर्षं झाली तरी कार्तिकची धमक कायम राहिली.

अजूनही शिकण्याची वृत्ती

कार्तिक आता भारतीय संघातून दूर आहे; पण त्याच्याकडे समालोचनाचंही चांगलं कौशल्य आहे, म्हणूनच आयपीएल किंवा देशांतर्गत क्रिकेट नसलं की कार्तिकच्या हाती बॅटऐवजी माईक असतो. सुनील गावसकरांच्या साथीत समालोचन करत असताना, मैदानावरील खेळाडूंनी आता कशी फलंदाजी करायला हवी किंवा कशी मानसिकता बाळगायला हवी याचं आकलन तो समालोचनकक्षातून करत असतो; पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आपण या क्षणी मैदानात असतो तर कसा दृष्टिकोन बाळगला असता हा विचारही तो करत असतो. हासुद्धा शिकण्याचा एक मार्ग असतो. यायाच फायदा कार्तिकला आता आयपीएलमध्ये होत आहे.

पुनरागमनाची संधी?

‘संधी एकदाच मिळते.’ असं म्हटलं जातं; पण काही खेळाडूंना ती वारंवार मिळत असते. कार्तिक त्याच श्रेणीतील खेळाडू. धोनीनंतर रिषभ पंत भारताचा प्रथम पसंतीचा यष्टिरक्षक फलंदाज...त्यानंतर इतर पर्याय सुरू होतात; पण सध्या तरी ईशान किशनचा अपवाद वगळता सक्षम असा पर्याय नाही. आयपीएलमधील पुढील सामन्यांत कार्तिकनं अशा अफलातून खेळी साकार केल्या तर निवड समितीला त्याची दखल घ्यावी लागेल. शेवटी, संघासाठी योगदान महत्त्वाचं असतं. वय हा निकष नसतो. अर्थात्, निवड समिती कसा विचार करते यावर सर्व अवलंबून आहे. याच वर्षात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी आयपीएलमधील कामगिरी लक्षात घेतली जाणार आहे. तेव्हा, कार्तिकसाठी दरवाजे बंद झालेले नाहीत हे खरं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com