संघनिवडीच्या नावानं चांगभलं! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cricketer mohammed shami

विश्वकरंडक स्पर्धा जिंकण्याची सुरुवात त्या स्पर्धेत पहिला सामना खेळण्यापासून नव्हे, तर संघनिवडीपासून सुरू होते, असा आजकालचा वस्तुपाठ. त्यामुळे वर्ल्डकपचे पडघम संघनिवड झाली रे झाली की वाजू लागतात.

संघनिवडीच्या नावानं चांगभलं!

विश्वकरंडक स्पर्धा जिंकण्याची सुरुवात त्या स्पर्धेत पहिला सामना खेळण्यापासून नव्हे, तर संघनिवडीपासून सुरू होते, असा आजकालचा वस्तुपाठ. त्यामुळे वर्ल्डकपचे पडघम संघनिवड झाली रे झाली की वाजू लागतात. पण, जुना काळ वेगळा होता. १९८३ मध्ये कपिलदेव यांच्या नेतृत्वाखाली पहिलावहिला विश्वकरंडक जिंकला, तेव्हा वर्तमानपत्र हाच मीडिया होता. ‘विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघ जाहीर’ एवढीच काय ती घडामोड घडली असेल. आत्ता २००७ चं उदाहरण पाहू या - महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिल्यावहिल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत खेळला आणि जिंकलाही होता. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, अनिल कुंबळे हे टी-२० मधील नावाजलेले नसले, तरी एकूणच क्रिकेटमध्ये दिग्गज असलेल्या या धुरंदरांनी माघार घेतल्यामुळे धोनीच्या संघाची अजिबात चर्चा झाली नव्हती.

पण, कपिलदेव काय आणि धोनी काय, या दोघांनी इतिहास घडवला. याच धोनीने २०११ मध्येही विश्वकरंडक (५० - ५० षटकांचा) जिंकला; पण त्या वेळी मात्र संघनिवडीवरून अनुकूल-प्रतिकूल अशा दोन्ही बाजूंच्या चर्चा झडल्या होत्या. पीयूष चावला हा धोनीचा आवडता खेळाडू म्हणून त्याची संघात निवड झाली अशी टीका होत होती. पण धोनीने पुन्हा विश्वकरंडक उंचावला आणि संघनिवडीवरूनच्या टीका विस्मृतीत गेल्या. त्या संघात खरंतर रोहित शर्माला स्थान मिळायला हवं होतं; परंतु भारतातील या स्पर्धेअगोदर दक्षिण आफ्रिकेत झालेल्या मालिकेत युसूफ पठाणने एका सामन्यात अफलातून कामगिरी केली आणि रोहितऐवजी त्याच्या पारड्यात निवड समितीचं दान पडलं होतं. आता याच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची आगामी ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघनिवड झाली आणि काही दिग्गजांकडून एक-दोन खेळाडूंबाबत नाराजीचा सूर लागला.

एरवी कोणत्याही द्विराष्ट्रीय मालिकांपेक्षा विश्वकरंडक स्पर्धेची संघनिवड ही खास असते. मुळात बहुतेक खेळाडू तेच असतात, प्रश्न केवळ एक-दोन खेळाडूंबाबतच असतो. या वेळी महम्मद शमी याला का वगळलं? प्रत्येकाचा दृष्टिकोन आणि विचारांची क्षमता वेगवेगळी असते. सर्वांचंच समाधान होईल असं घडत नाही. आज काल सोशल मीडियावरील ज्ञानामृतामुळे क्रिकेटप्रेमी अधिकच प्रगल्भ झालेले दिसून येतात, त्यासाठी आकडेवारीच समोर असते म्हणा.

असो, माजी दिग्गज खेळाडूंचं काय म्हणणं आहे किंवा क्रिकेटपंडित चाहत्यांचे काय विचार आहेत, यापेक्षा आपण वास्तव पाहू या...

मुळात क्रिकेट हा असा विचित्र खेळ आहे की, जो खेळाडूंच्या गुणवत्तेएवढाच मैदान, हवामान, खेळपट्टी, ऊन-पाऊस एवढंच कशाला, रात्री पडणाऱ्या दवावरही अवलंबून असतो. दोन्ही प्रतिस्पर्ध्यांना एकसमान परिस्थिती मिळाली, तर सुदैवच समजावं; पण या खेळात अशी समानता मिळत नाही. फुटबॉल, हॉकीसारख्या सांघिक खेळांत काय ते सर्व घोडे बारा टक्के! पण क्रिकेटमध्ये कधी कोणता घोडा रेस जिंकेल किंवा जिंकून देईल, हे त्यावेळची परिस्थितीही ठरवते. भारतात किंवा उपखंडात स्पर्धा असेल तर अधिक फिरकी गोलंदाज हवेत, इंग्लंडमध्ये खेळायचं असेल तर स्विंग गोलंदाज हवेत आणि ऑस्ट्रेलियात जिथं चेंडू अधिक प्रमाणात उडतो, तिथं स्पर्धा असेल तर आखूड टप्प्याचा मारा करणारे वेगवान गोलंदाज आवश्यकच. आता टी-२०चा विश्वकरंडक ऑस्ट्रेलियात होणार आहे म्हणजे अमिरातीत झालेल्या आशिया करंडकाला प्राधान्य, एक-दोन शिल्लक असलेल्या जागेसाठी प्राधान्य देणं योग्य नाही इथंच मुळात गुगली पडला.

मुळात या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेली संघरचना पाहू या. स्पर्धा ऑस्ट्रेलियात खेळायची असल्यामुळे वेगवान गोलंदाजांना प्राधान्य हवं यात कोणाचं दुमत नाही; पण चेतन शर्मा यांच्या निवड समितीने तीन फिरकी आणि चारच वेगवान गोलंदाज निवडले, सोबत हार्दिक पंड्या हा एकमेव वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू. बरं जे वेगवान गोलंदाज आहेत, त्यांत बुमराचा अपवाद वगळला तर भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि अर्षदीप सिंग वेग सर्वसाधारण. बुमरा दुर्दैवाने जायबंदी झाला, तर भारतीय माऱ्याची तोफ थंड पडण्याची भीती. त्यात हर्षल आणि अर्षदीप हे तसे नवोदित, मग भुवनेश्वर काय आक्रमणाची धुरा सांभाळणार? काही माजी खेळाडू संघनिवडीवर नाराजी व्यक्त करताना हर्षलऐवजी शमीची निवड करायला हवी होती असं म्हणतात; पण ऑस्ट्रेलियातील परिस्थिती पहाता भुवनेश्वरऐवजी शमी हाच योग्य पर्याय होता.

भुवनेश्वरवर अधिक विश्वास

आशिया करंडक स्पर्धेत पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्याविरुद्धचे सामने भारताने गमावले, त्यात १९ व्या षटकात भुवनेश्वरने उधळून दिलेल्या धावा मुळावर आल्या होत्या. त्यानंतर केवळ औपचारिक असलेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने वरातीमागून घोडं नाचवलं होतं, तरीही त्याच्यावर विश्वास दाखवायचाच होता तर दोनच फिरकी गोलंदाज निवडून शमीला पसंती द्यायला हवी होती. कारण युझवेंद्र चहल, आर. अश्विन आणि अक्षर पटेल हे तिन्ही फिरकी गोलंदाज एकाच वेळी खेळवायला ही स्पर्धा भारतात होणार नाहीये.

भूतकाळापेक्षा वर्तमानाचा विचार हवा

भुवनेश्वरला पसंती देताना त्याच्या भूतकाळाला पसंती देण्यात आली, तसंच केएल राहुलबाबतही म्हणता येईल. केवळ सीनियर खेळाडू म्हणून असं झुकतं माप मिळू नये. आशिया करंडकातील गतवेळचं विजेतेपद या वेळी राखण्याचीही संधी मिळाली नाही. जे सामने गमावले, त्यात राहुलची फलंदाजी तपासायला हवी होती. भुवनेश्वरप्रमाणे तोही अफगाणिस्तानविरुद्ध खेळला म्हणून संघात कायम राहिला, असं म्हणावं लागेल. आयपीएलमधून अनेक नवे पर्याय समोर येतात; पण शेवटी वर्तमानापेक्षा भूतकाळालाच अधिक पसंती मिळते हे तेवढंच सत्य.

एकदम ओक्के?

अर्थात, हा आपला विचार झाला, निवड समिती त्यांच्या अनुभवावरून आणि विचारविनियम करून संघनिवड करत असते. संघनिवडीत कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड विचार मांडतात, सोबत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांचंही मार्गदर्शन मिळतं. यावरून निवडलेलं प्रत्येक नाणं खणखणीत वाजणार असं आपण समजू या. पण प्रामुख्याने ट्वेन्टी-२० प्रकारात किती मॅचविनर आहेत, म्हणजेच एकहाती सामना जिंकून देण्याची क्षमता असणारे खेळाडू आहेत, यावर संघाचं भवितव्य ठरत असतं. आत्ता आपण प्रत्येकाने रोहित शर्मापासून ते नवोदित अर्षदीपपर्यंत संघातील १५ खेळाडूंबाबत मॅचविनरचा निकष लावून पाहू या, म्हणजे संघनिवड एकदम ओक्के आहे की नाही, हे मनोमन पक्कं होईल.

Web Title: Shailesh Nagvekar Writes India Cricket Team Selection World Cup Competition Mohammed Shami

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..