या राहुलचं चाललंय काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cricketer KL Rahul

खरं तर टार्गेट होता विराट कोहली अन् ट्रोल होतोय केएल राहुल...! या सोशल मीडियाचं काही खरं नाही.

या राहुलचं चाललंय काय?

खरं तर टार्गेट होता विराट कोहली अन् ट्रोल होतोय केएल राहुल...! या सोशल मीडियाचं काही खरं नाही. पार इज्जतच काढतात राव... सोशल मीडियावर राजकीय धुळवड नित्याचीच असताना हा राहुल ट्रेडिंगमध्ये असतो, म्हणजे नक्कीच त्याच्या फलंदाजीवर रोष आहे. पूर्वी गटागटानं, नाक्यानाक्यावर, ऑफिसमध्ये आणि कॉलेजच्या कट्ट्यावर क्रिकेटची यथासांग चर्चा झडायची. टीका-टिप्पणी आणि गौरवाच्या बाताही तेवढ्यापुरत्याच मर्यादित असायच्या; पण स्मार्टफोनच्या युगात अशा चर्चांना - क्रिकेटच्या मैदानाला असतात तशा - सीमा राहिल्या नाहीत. कुण्या एकानं एखादी पोस्ट करण्याचा अवकाश; लगेच प्रतिक्रियांचा पाऊस पडतो. बरं, यात लिहिणाऱ्यांना कुणी अडवूही शकत नाही. १८० शब्दांच्या मर्यादेत काही जण पुरते वाभाडे काढतात. एक वेळ तेजतर्रार वेगवान माऱ्याचा सामना करणं परवडेल; पण असं ट्रोलिंग नको, अशी अवस्था सध्या राहुलची झाली आहे.

KL Rahul Is Biggest Fraud In Indian Cricket असं एकानं केलेलं ट्विट आणि त्याला हजारोंचे लाईक्स, रिट्विट आणि कॉमेंट्स म्हणजे भयंकरच.

राहुलनं काही गैरव्यहार, गैरप्रकार किंवा कोणतीही प्रतारणा केलेली नाही; पण त्याच्याकडून सध्या होत असलेल्या खेळाबाबत इतका टोकाचा विरोध राहुलसह सर्वांना आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. आता हे सर्व ट्रोलिंग राहुलपर्यंत नक्कीच पोहोचलेलं असणार. कारण, आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत हाँगकाँग या दुबळ्या संघाविरुद्ध विजय मिळवल्यानंतर राहुलने स्वतः ट्विट केलं, त्यावर लाइक्सपेक्षा त्याच्यावर टीका करणाऱ्या कॉमेंट्सच अधिक होत्या.

प्रसादही म्हणतो, ‘अनाकलनीय’

टीका करणाऱ्यांची संख्या अमर्याद असली तरी त्यांत कोण ‘व्हेरिफाईड’ आहे यालाही महत्त्व दिलं जातं. राहुलच्या या ट्रोलिंगमध्ये सर्वांचाच समावेश आहे; पण राहुल ज्या कर्नाटक संघातून खेळून पुढं आला, त्या संघातील आणि भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज आणि ज्युनिअर निवड समितीचा माजी अध्यक्ष व्यंकटेश प्रसादही राहुलला समज देण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. ‘हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात खेळपट्टीत असं काही होतं, जे दिसून येत नव्हतं, तरीही प्रामुख्यानं (सुरुवातीच्या) फलंदाजीचा राहुलचा दृष्टिकोन अनाकलनीय होता...’ असं प्रसादनं म्हटलंय. प्रसाद हा भारतीय संघाचा गोलंदाजी-प्रशिक्षकही होता, त्यामुळे त्यानं आपली नाराजी उघडपणे मांडली; म्हणजे, काही तरी चुकत आहे हे निश्चित.

पूर्वी जेव्हा वर्तमानपत्र हेच केवळ माध्यम होतं, तेव्हा होणाऱ्या सुसंस्कृत शब्दांतील टीकेमुळेही खेळाडूंची चलबिचल व्हायची, त्यामुळे सामना सुरू असला की काही दिवस अगोदरपासूनच खेळाडूंना वर्तमानपत्रं वाचू दिली जायची नाहीत. मात्र, आता नियमानुसार, सामन्यासाठी स्टेडियममध्ये प्रवेश करत असताना खेळाडूंना आपला मोबाईल व्हिजिलन्स-अधिकाऱ्याकडे सादर करावा लागतो आणि सामन्यानंतर तो त्यांना लगेचच परत मिळतो, त्यामुळे सामना संपल्यानंतर, खेळाडूंसाठी मैदानावरच मोबाईल त्यांचा ‘सखा’ होतो. हे सांगायचा हेतू एवढाच की, सोशल मीडियावरील टीकांचे हजारो बाण राहुलच्या मनाला इजा करण्याइतपत डसले असणार.

‘कॉफी’सुद्धा एवढी कडू नव्हती!

हे सर्व वाचत असताना, या राहुलला अचानक एवढं काय झालंय, हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करण्याच्या त्या प्रसंगात हार्दिक पंड्यासह केएल राहुलही होता; पण त्या वेळपेक्षा अधिक टीका या वेळी सोशल मीडियावरून राहुलला सहन करावी लागत आहे.

कशामुळे होतोय ट्रोल?

आता नेमकं काय घडतंय ते पाहू या. आयपीएलमध्ये, म्हणजे याच ट्वेन्टी-२० प्रकारात, राहुल हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे; पण या वेळच्या आयपीएलनंतर त्याच्या मागं दुखापतीची पिडा लागली. आधी दुखापत, मग शस्त्रक्रिया, त्यातून बरा होत नाही तोच कोरोनाची लागण अशा फेऱ्यातून सावरल्यानंतर झिम्बाब्वे-दौऱ्यासाठी अगोदर नियुक्त करण्यात आलेल्या शिखर धवनऐवजी त्याच्याकडे कर्णधारपद देण्यात आलं. बरं, झिम्बाब्वे हा काही नावाजलेला संघ नाही; पण त्या संघाविरुद्ध राहुलला लय मिळवता आली नाही. मोठ्या ब्रेकनंतर असं घडत असतं, त्यामुळे राहुलच्या अपयशाकडे कुणी फारसं लक्ष दिलं नाही; परंतु आशिया करंडक स्पर्धेत सलामीलाच राहुल शून्यावर - आणि तेही त्रिफाळचीत - बाद झाला; त्यानंतर मात्र ‘टार्गेट राहुल’ सुरू झालं; कारण, काही महिन्यांपूर्वी दुबईच्या त्याच मैदानावर ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत राहुल अशाच प्रकारे शून्यावर त्रिफाळचीत झाला होता. गोलंदाज बदललेला असला तरी राहुलचा ‘भोपळा’ कायम होता. भारत-पाकिस्तानमधील तो सामना ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक कोटींहून अधिक जण पाहत होते. त्यात केबल टीव्हीवरून पाहणाऱ्यांची संख्या वेगळीच. त्यामुळे तुमची एक चूक कोट्यवधींच्या लक्षात लगेचच येते.

आठ महिन्यांत पहिली ‘टी-२०’

मुळात दुखापतींमुळे २०२२ या वर्षातल्या सरलेल्या आठ महिन्यांत राहुल एकही आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामना खेळला नव्हता. मोठ्या दुखापतीनंतर संघात निवड केली जाण्यासाठी स्थानिक सामन्यांत खेळून मॅचफिटनेस सिद्ध करावा लागतो असे संकेत आहेत. ‘राहुल उपकर्णधार म्हणून त्याला ही सूट का,’ असं अनेकांना वाटत असावं. भारतीयांच्या तुलनेत दुबळ्या असलेल्या हाँगकाँगविरुद्ध तरी राहुल धावा करेल आणि संघातील आपली निवड सार्थ ठरवेल अशी अपेक्षा होती; पण ती त्यानं फोल ठरवली. ३९ चेंडू तो खेळला; पण ‘चेंडूमागे धाव’ या गतीनंही त्याला धावा करता आल्या नाहीत. बरं, यात त्यानं दोन षटकार मारले; यातील एक षटकार फ्रीहिटवर होता. म्हणजे, एकच मोठा फटका मारण्याचं धाडस त्याला करता आलं.

याच ट्वेन्टी-२० प्रकारात दोन शतकं नावावर असलेला हा राहुल स्वतःसाठी खेळतोय का, असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. अशा प्रकारच्या सर्व टीकांचे उत्तुंग टोले राहुलपर्यंतच काय, निवडसमितीपर्यंत आणि संघव्यवस्थापनापर्यंतही पोहोचेलेले असणारच! भारताचा पुढचा सामना आज पाकिस्तानविरुद्ध होत आहे. राहुलनं वेळीच सावरलं नाही तर ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी निवडसमिती दुसरा पर्याय शोधू लागेलच; पण सोशल मीडियावरचं ट्रोलिंग थांबवण्यासाठी तरी, ‘आपण संघासाठी खेळतोय,’ हे राहुलला दाखवून द्यावं लागेल.