छपराखालचं क्रिकेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shailesh Nagvekar writes  Put roof over the cricket stadium Aakash Chopra sensation

‘क्रिकेटच्या स्टेडियमवर छप्पर लावा,’ आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा

छपराखालचं क्रिकेट

टेनिस, पाऊस आणि स्ट्रॉबेरी म्हटलं की लगेचच डोळ्यासमोर येते ती विम्बल्डन! ब्रिटनमधला पाऊस मुळातच लहरी...ऊन्ह पडलेलं असतानाच सरी कधी अवतरतील याचा नेम नाही. त्यामुळे जूनच्या अखेरच्या आठवड्यात सुरू होणाऱ्या विम्बल्डनच्या अनेक सामन्यांवर पाणी पडायचं. सेंटर कोर्टवरही असंच चित्र काही वर्षांपूर्वी असायचं. आता मात्र जोरदार पाऊस असला तरी सेंटर कोर्टवरील विम्बल्डनचे सामने सुरू असतात...कारण, सर्वात मोठी प्रतिष्ठा असलेल्या सेंटर कोर्टच्या डोक्यावर सरकतं छप्पर आलं आहे. खुल्या मैदानावरचा खेळ असला तरी पावसामुळे ‘बंदिस्त स्टेडियममधला खेळ’ असं रूपांतर अशा प्रकारच्या खेळाचं होत असतं.

टेनिससारख्या खेळाचं कोर्ट आणि पर्यायानं स्टेडियम फार मोठं नसे, त्यामुळे छप्पर शक्य आहे. मात्र, आता ‘क्रिकेटच्या स्टेडियमवर छप्पर लावा,’ अशी मागणी करण्यात आली आहे. ती कुण्या सर्वसामान्य प्रेक्षकानं नव्हे तर, आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी केली आणि चर्चेला एक विषय मिळाला.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील, बंगळूरमध्ये असलेला अखेरचा ट्वेन्टी-२० सामना पावसामुळे अवघ्या तीन षटकांचा झाला आणि चोप्रा यांची नजर ‘आकाशा’कडे म्हणजेच छपराकडे गेली. त्यातच इंग्लंडचा माजी कर्णधार आणि आयपीएलमधील समालोचक केविन पीटरसन यानंही, बीसीसीआयनं आता प्रेक्षकांना अधिक सुविधा द्याव्यात, अशी मागणी केली. खरंच किमान खेळपट्टीपासून सरासरी ७० ते ७५ मीटर सीमारेषा असलेलं मैदान, त्याच्यामागं स्टेडियम आणि त्यावर छप्पर घालणं शक्य आहे का? म्हटलं तर शक्य आहे. ऑस्ट्रेलियात मेलबर्नमध्ये ‘इतिहाद स्टेडियम’ आहे. त्याचं छप्पर पाऊस आला की बंद होतं आणि लगेचच उघडलंही जाऊ शकतं. महिलांच्या ‘बिग बॅश लीग’मधील सामने तिथं अधूनमधून होत असतात; पण काही वर्षांपूर्वी छप्पर असलेल्या या स्टेडियममध्ये वरचे वर सामने खेळवले जात असायचे. या इतिहाद स्टेडियमचं महत्त्व पटवून देण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि वर्ल्ड इलेव्हन यांच्यात २००५ मध्ये एक प्रदर्शनीय सामना खेळवण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाकडून खेळणाऱ्या माईक हसीनं मारलेला एक षटकार बंद झालेल्या छपराला लागला; पण नियमानुसार तो डेड बॉल ठरवण्यात आला आणि षटकार देण्यात आला नाही. मात्र, २०१२ मध्ये या नियमात ‘बिग बॅश’ स्पर्धेसाठी अपवाद करण्यात आला.

किती झाला होता खर्च?

सन २००० मध्ये हे स्टेडियम ४६० दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर खर्चून तयार करण्यात आलं. त्यामध्ये केवळ क्रिकेटच खेळलं जातं असं नाही. वर्षभरात जवळपास ८० पेक्षा अधिक वेगवेगळ्या खेळांचे सामने होत असतात. यात ऑस्ट्रेलियातील फुटबॉल-सामने सर्वाधिक असतात. भारतातील क्रिकेट स्टेडियम अच्छादित करण्याचा मुद्दा आत्ताच नेमका पुढं आला तो अब्जावधी रुपयांची उलाढाल आयपीएलच्या प्रसारणहक्कातून झाल्यामुळेच; पण भारतात अशी स्टेडियम शक्य आहेत का, हा प्रश्न सर्वाधिक महत्त्वाचा आहे.

अहमदाबादमध्ये उभारण्यात आलेलं सव्वा लाख प्रेक्षकसंख्येचं स्टेडियम हे क्रिकेटविश्वातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे; पण त्याअगोदर एक लाख क्षमतेचं मेलबर्नमधील स्टेडियम सर्वात मोठं होतं. या स्टेडियवर सरकतं छत बांधायचं झालं असतं तर १७३.६ मीटर लांब आणि १४८.३ मीटर रुंद छत तयार करावं लागलं असतं. अहमदाबाद स्टेडियमची व्याप्ती तर त्याहून अधिक आहे.

भारतातील हवामान पूरक नाही

मुळात क्रिकेट हा खेळ बंदिस्त स्टेडियमध्ये खेळणं सोपं नाही. कारण, हा खेळ हवामान, खेळपट्टी, नवा-जुना चेंडू यांवर अवलंबून असतो. फुटबॉल, हॉकी हे खेळ दोन्ही संघ एकाच वेळी खेळत असतात, त्यामुळे ऊन्ह-पाऊस असो वा थंडी किंवा मैदानाची अवस्था...दोन्ही संघांना एकाच वेळी संधी मिळत असते.

मात्र, क्रिकेट हा जगातला असा एकमेव खेळ असावा जिथं दोन्ही संघांना उपलब्ध होणारी परिस्थिती वेगवेगळी असते. एखादं उदाहरण द्यायचं तर, एक संघ सायंकाळी फलंदाजी करत असतो तेव्हा परिस्थिती उत्तम असते आणि दुसरा संघ दुसऱ्या सत्रात फलंदाजी करत असताना दव पडल्यास चेंडू स्विंगही होत नाही आणि फिरकही घेत नाही. अशा वेळी केवळ दवासाठी छप्पर बंद करता येणार नाही, मग कोट्यवधी खर्चून अशा सुविधेचा फायदा काय?

फुटबॉलसाठी वातानुकूलित सुविधा

यंदाच्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात कतारमध्ये विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा होणार आहे. या महिन्यात आखातात प्रचंड उष्मा असतो. अशा परिस्थितीत स्पर्धा खेळवणं हे मोठं आव्हान; पण दिऱ्हामची कमतरता नसलेल्या या देशानं नव्यानं तयार केलेल्या स्टेडियममध्ये वातानुकूलित सुविधा तयार केली आहे. असं थंड वातावरण खेळाडूंसाठी आणि प्रेक्षकांसाठीही आल्हाददायी असणार आहे.

आर्द्रतेचा त्रास

आयपीएलचा कालावधी हा मार्च ते मे असा असतो. भारताच्या कोणत्याही भागात गेलात तरी या महिन्यांत प्रचंड उष्मा असतो आणि रात्रीची आर्द्रता (ह्युमिडिटी) फार वाढलेली असते. साध्या स्टेडियममध्ये साधारणतः ५० हजार प्रेक्षक असले तरी तिथं निर्माण होणारा उष्मा आणि ऊर्जा ही इतर ठिकाणांपेक्षा अधिक असते, मग छप्पर बंद झाल्यावर आतमधला उष्मा किती घातक असेल याचा विचारच केलेला बरा. आता कतारप्रमाणे बंदिस्त स्टेडियममध्येही वातानुकूलित सुविधा तयार करण्याचा मुद्दा पुढं येऊ शकतो; पण एकूणच हे किती खर्चिक होईल याची आकडेमोड करणं सोपं जाणार नाही. एकूण काय तर, आपल्या देशात जेवढे खुल्या मैदानात सामने खेळवले जातील ते प्रेक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठीही मोलाचं आहे. त्यामुळे बंदिस्त स्टेडियमचा हा विचार ‘बंदिस्त’च केलेला बरा!

Web Title: Shailesh Nagvekar Writes Put Roof Over The Cricket Stadium Aakash Chopra Sensation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Cricketarticlesaptarang