खेळातील सट्टेबाजीचं ‘ग्लोबल वॉर्मिंग’

स्पोर्टस् अर्थात खेळाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगवेगळी! खेळाडूंसाठी करिअर आणि पॅशन; टीव्ही ब्रॉडकास्टर्ससाठी मनोरंजन, तर जाहिरातदारांसाठी व्यवसाय...इथपर्यंत हे वर्गीकरण योग्य होतं.
Sports Betting
Sports BettingSakal
Summary

स्पोर्टस् अर्थात खेळाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगवेगळी! खेळाडूंसाठी करिअर आणि पॅशन; टीव्ही ब्रॉडकास्टर्ससाठी मनोरंजन, तर जाहिरातदारांसाठी व्यवसाय...इथपर्यंत हे वर्गीकरण योग्य होतं.

स्पोर्टस् अर्थात खेळाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगवेगळी! खेळाडूंसाठी करिअर आणि पॅशन; टीव्ही ब्रॉडकास्टर्ससाठी मनोरंजन, तर जाहिरातदारांसाठी व्यवसाय...इथपर्यंत हे वर्गीकरण योग्य होतं. कारण, यातूनच खेळाडूंसह, संयोजक आणि त्याच्याशी निगडित असलेल्या सर्वांचा आर्थिक फायदा तर होत असतोच, पण अर्थचक्रही व्यवहार्य मार्गानं सुरू राहतं...पण भ्रष्टाचाराची दुनिया ही एक वेगळी काळी बाजू आहे. सट्टाबाजार अर्थात बेटिंग हीच ती दुसरी बाजू! खेळांकडे म्हणजे सामन्यांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बरबरटलेला असतो आणि तो सर्वांसाठी घातक असतो... काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रसंघानं ‘जगभरातील खेळांमधील भ्रष्टाचार’ यावर एक अहवाल सादर केला.

अतिशय थक्क करणारे मुद्दे त्यात आहेत. जगभरात प्रत्येक वर्षाला १.७ ट्रिलियन इतकी अवैध सट्टेबाजी होत असते. मुळात ट्रिलियन म्हणजे एकावर किती शून्य याची मोजदाद करणं कठीण! गैरमार्गानं होणारी एवढी आर्थिक उलाढाल

एक समांतर

अर्थव्यवस्था निर्माण करत असते. फुटबॉल, टेनिस, बास्केटबॉल, रग्बी किंवा क्रिकेट अशा कोणत्याही सामन्यात खेळत असलेल्या खेळाडूला माहीतही नसेल की, आपल्यावर इतका मोठा व्यवहार होत असेल. मात्र, भ्रष्टाचाराची ही वाळवी खेळाची दुनिया पोखरत आहे.ती कधीतरी खेळाडूंना विळखा घालते आणि तिथूनच सुरू होतो फिक्सिंगचा रोग.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे आख्खी वसुंधरा संकटात सापडली आहे, त्याचप्रमाणे वैध किंवा अवैध सट्टेबाजीचे चटके खेळाच्या दुनियेला बसत आहेत. संयुक्त राष्ट्रसंघानं सादर केलेला हा अहवाल केवळ वाचून दुर्लक्षित करण्याजोगा नाही. त्याचं गांभीर्य ओळखून आत्ताच खेळाच्या जगानं सावध होण्याची वेळ सुरू झाली आहे. इंग्लंडसारख्या देशांत सट्टेबाजी वैध आहे; पण गैरमार्गानं होणाऱ्या सट्टेबाजीचा मार्ग खेळाडूंना फिक्सिंगच्या जाळ्यात ओढण्यापर्यंत पोहोचतो हे सत्य आहे, म्हणूनच हा अहवाल खडबडून जागं करणारा आहे.

खेळातील भ्रष्टाचार हा काही नवा नाही. प्राचीन ऑलिंपिकमध्येही खेळांतील हा भ्रष्टाचार झाला असल्याचे दाखले मिळतात; पण काळ जसा बदलत गेला तशी त्यात प्रचंड वाढ होत गेली.

गेल्या दोन दशकांत तर भ्रष्टाचार करणाऱ्यांची एक ‘इंडस्ट्री’च केवळ उभी राहिली असं नव्हे, तर ती बेफामपणे फोफावली. खेळाच्या दुनियेत होत असलेली ही वैध अथवा अवैध सट्टेबाजी काही नवी नाही. संभाव्य धोका ओळखून त्या त्या वेळी उपाययोजनाही करण्यात आल्या होत्या; परंतु प्रत्येक वेळी सट्टेबाजी पुढं राहिली आणि आता तर बघता बघता बिलियनचीही वेस ओलांडून तिनं ट्रिलियनकडे झेप घेतली आहे.

सोशल मीडियामुळे संपर्क सोपा

सट्टेबाजी फोफावण्यात सर्वात मोठा वाटा असेल तर तो सोशल मीडियाचा. या माध्यमांमुळे जगाच्या कानाकोपऱ्यातून कधीही आणि कुठंही, तसेच कुणाशीही कसाही संपर्क साधता येतो.

एवढंच कशाला, सोशल मीडियावर खेळाडूंकडून करण्यात आलेल्या पोस्टवरून त्यांच्या मनोवृत्तीचा अंदाज घेत सावज टिपण्यात येतं आणि फिक्सिंगच्या जाळ्यात त्यांना ओढलं जाऊ शकतं. आयपीएलमध्ये असा प्रयोग झालेला आहे. बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी विभागानं यासंदर्भात खेळाडूंना वारंवार सूचनाही केलेल्या आहेत. मुळात या विभागाचं प्रामुख्यानं आयपीएलमधील खेळाडूंच्या पोस्टवर आणि त्या पोस्ट्सवर येणाऱ्या कॉमेंट्सवर बारीक लक्ष असतं.

गंभीर धोका

अवैध सट्टेबाजी किती होत आहे एवढंच संयुक्त राष्ट्रसंघाच्या या अहवालातून गांभीर्यानं घेण्याजोगं नाही, तर गैरमार्गानं मिळवण्यात येणारा हा पैसा गुन्हेगारीसाठीही वापरला जातो. दहशतवादाचा फटका केवळ भारतासारख्या देशांनाच नव्हे तर, पेंटॅगॉन’सारखी तटबंदी असलेल्या अमेरिकेसारख्या प्रगतशील देशांनाही बसलेला आहे. त्यामुळे ‘ही केवळ खेळातली सट्टेबाजी’ एवढाच हा मुद्दा मर्यादित राहत नाही.

विश्वासार्हतेला बसतो तडा

मुळात प्रेक्षकांसाठी समोर दिसणारे सामने हे मनोरंजन असतं. तसं मनोरंजन चित्रपटांद्वारेही होत असतं; परंतु ते स्क्रिप्टेट (अगोदरच लिहिलेलं) असतं, खेळांचं तसं नाही. ॲक्शनपॅक्ड् घटना मैदानावर घडत असतात; परंतु सट्टेबाजीमुळे त्यात काही तरी वेगळं घडत आहे असं लक्षात आलं तर प्रेक्षकांचा त्यावरचा विश्वास उडतो. सन १९९९ मध्ये असंच काहीसं भारतीय क्रिकेटमध्ये घडलं होतं. भारतदौऱ्यावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हॅन्सी क्रोनिएनं फिक्सिंग केल्याचं मान्य केलं, त्यात भारताचे माजी कर्णधार महंमद अझरुद्दीन यांच्यासह मनोज प्रभाकर, अजय जडेजा, नयन मोंगिया अशा काही खेळाडूंची नावं आली. भारतीय क्रिकेटसाठी तो सर्वात मोठा धक्का होता. असं काही घडू शकतं असा विचार क्रिकेटवर निस्सीम प्रेम करणाऱ्या भारतातील चाहत्यांनी कधीच केला नव्हता. भारतीय क्रिकेटच्या विश्वासार्हतेला मोठा धक्का बसला होता. त्या वेळी सचिन तेंडुलकरनं नेतृत्व सोडलं होतं. नंतर सौरव गांगुली पुढं आला आणि कर्णधारपदाची जबाबदारी त्यानं स्वीकारली आणि सचिन-राहुल द्रविड-अनिल कुंबळे अशा प्रमुख खेळाडूंनी भारतीय क्रिकेटला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देत चाहत्यांचा विश्वासही पुन्हा मिळवला.

सट्टेबाजीच भोवली होती आयपीएलला

क्रोनिए आणि पर्यायानं भारतीय क्रिकेटमधील भ्रष्टाचाराची चौकशी करताना, सट्टेबाजी नेमकी कुठून सुरू झाली आणि तिचं रूपांतर फिक्सिंगपर्यंत कसं झालं याचा कसून तपास करत सीबीआयनं वस्तुस्थिती निदर्शनास आणली होती. तेव्हापासून सर्व उपाययोजनाही करण्यात आल्या होत्या. तरीही २०१३ च्या आयपीएलमध्ये श्रीशांत, अजित चंडेला आणि अंकित चव्हाण यांना स्पॉटफिक्सिंगप्रकरणी अटक झाली होती.

ते प्रकरण एवढ्यापुरतं मर्यादित नव्हतं, तर महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई संघाचे मालक आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई व चेन्नई संघाचा तत्कालीन सीईओ गुरुनाथ मय्यप्पन हाही सट्टेबाजी करत होता हे उघड झालं. हीच अवस्था शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा सहमालक असलेल्या राजस्थान संघाबाबतही झाली होती. पुढं या दोन संघांवर दोन वर्षांची बंदीही आली होती. भारतात सट्टेबाजीला मान्यता नाही, त्यामुळे जी सट्टेबाजी होते ती सर्व अवैधच आहे. परिणामी, यातून होणाऱ्या उलाढातील पैसा जातो कुठं, हा प्रश्नही तेवढाच महत्त्वाचा ठरतो.

फुटबॉलमध्ये सर्वाधिक सट्टेबाजी

संयुक्त राष्ट्रसंघाच्या या अहवालात देशागणिक किंवा खेळानुसार वर्गीकरण करण्यात आलेलं नाही; परंतु जगाच्या पाठीवर होत असलेल्या खेळांचा विचार करता जागतिक फुटबॉलमध्ये सर्वाधिक सट्टेबाजी होत असल्याचं स्पष्ट होतं. कारण, चॅम्पियन्स लीगचा अंतिम सामना आणि व्यावसायिक लीगचा पुढचा मोसम सुरू होण्यातील साधारणतः एका महिन्याचा अपवाद वगळता ११ महिने तरी कोणतं ना कोणतं फुटबॉल सुरू असतं. सट्टेबाजीसाठी ही पर्वणीच जणू काही!

सुचवण्यात आलेले काही उपाय...

  • जागतिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर खेळातील भ्रष्टाचाराच्या आणि गुन्हेगारीच्या विविध घटकांना प्रतिबंध करण्यासाठी कायदा कडक करणं, सक्षम धोरण तयार करणं आणि संस्थात्मक चौकट बळकट करणं.

  • तयार केलेल्या धोरणांची आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचीही तेवढीच सक्षम व्यवस्था करणं.

  • क्रीडासंघटना, न्यायाधिकारी, तसंच धोरणकर्ते यांच्यात सहकार्याची आणि माहितीची देवाण-घेवाण, सुसंवाद निर्माण करणं.

  • क्रीडासंघटनांना बदलत्या परिस्थितीची वारंवार माहिती करून देणं, तसंच खेळाडूंचं सातत्यानं प्रबोधन करत राहणं.

(अर्थात ही जबाबदारी प्रामुख्यानं त्या त्या देशातील क्रीडासंघटनांची आहे.)

...ते १६ सेकंद

मैदानावर एखादा क्षण घडतो तो टीव्हीवर आपल्याला साधारणतः १५ ते १६ सेकंदांनी दिसतो. सॅटेलाईटमार्फत हे प्रक्षेपण होत असल्यामुळे काही सेकंदांचा वेळ लागणं स्वाभाविक आहे; पण क्रिकेटपुरतं बोलायचं तर जाहिरातींचा मारा एवढा असतो की घडलेली ॲक्शन १६ सेकंदांनी आपल्याला दिसते, याच वेळेत सट्टेबाजी जोर धरते. कारण, सट्टेबाजी करणारे लोक मैदानात असतात आणि तिथून त्यांचे त्याच क्षणी देण्यात येणारे अपडेट्स आणि प्रेक्षकांना विलंबानं दिसणारा प्रसंग हा काळ सट्टेबाजीला पूरक असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com