वर्ल्डकपमधील अपयश आणि महिलांचं आयपीएल

भारतीय महिला-क्रिकेटबाबत गेल्या काही दिवसांत महत्त्वाच्या घडामोडी घडल्या...
Women Cricket Team
Women Cricket TeamSakal
Summary

भारतीय महिला-क्रिकेटबाबत गेल्या काही दिवसांत महत्त्वाच्या घडामोडी घडल्या...

भारतीय महिला-क्रिकेटबाबत गेल्या काही दिवसांत महत्त्वाच्या घडामोडी घडल्या...

1) महिलांची पूर्ण आयपीएल पुढील वर्षापासून खेळवण्याचा निर्धार बीसीसीआयनं व्यक्त केला.

2) त्यानंतर काही दिवसांनी महिलांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं.

3) भारतीय महिलांची आयपीएल झाली तर पुढील १० वर्षांत भारतीय संघ अपराजित असेल, असं भाकीत ऑस्ट्रेलिया महिला संघाची स्टार खेळाडू आणि मिशेल स्टार्कची पत्नी अलिसा हीली हिनं व्यक्त केलं...

हे आयपीएल काय रसायन आहे, पाहा... केवळ एका घोषणेनं भारतीय संघाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. पैसा, प्रसिद्धी आणि नवोदितांना संधी ही त्रिसूत्री असली तरी. हीलीचं वक्तव्य सध्या निराश झालेल्या भारतीय संघाला आशेचा किरण दाखवणारं आहे हे निश्चित.

देशात होत असलेल्या ट्वेन्टी-२० व्यावसायिक लीग आणि टी-२० प्रकारातील मक्तेदारी याचा संबंध जोडणं योग्य नाही; मात्र, अशा प्रकारच्या लीगमध्ये नवी संस्कृती तयार होत असते. भारतीय महिला क्रिकेट संघाला याची सध्या गरजच आहे. मर्यादित षटकांच्या गतस्पर्धेत थोडक्यात हुकलेलं विजेतेपद आणि यंदा साखळीतच पराभूत होण्याची नामुष्की यातून सातत्याचा अभाव असल्याचं स्पष्ट होतं.

कोरोनानंतरच्या युगात भारतीय महिला संघानं पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका या आशियातील संघांवर वर्चस्व राखलं; परंतु ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड या मातब्बर संघाचे चक्रव्यूह भेदता आले नाहीत हे खरं आहे. खरं तर गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळात भारतीय संघानं इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या देशात झालेली एकमेव कसोटी अनिर्णित राखून या प्रकारात भारताचं भवितव्य उज्ज्वल असल्याचं दाखवून दिलं आहे. मात्र, व्हाईट बॉल क्रिकेटचा प्रश्न येतो तेव्हा गणित कुठं तरी चुकतंय हे स्पष्ट होतं.

तंदुरुस्तीचा प्रश्न

खेळ कोणताही असला तरी आधुनिक स्पर्धांत तंदुरुस्तीला सर्वाधिक प्राधान्य असतं. भारतीय पुरुषांच्या संघात विराट कोहलीनं तंदुरुस्तीचा नवा बेंचमार्क तयार केला. आता कोणत्याही खेळाडूला संघात स्थान देण्यापूर्वी, तो किती तंदुरुस्त आहे, हे तपासलं जातं. भारतीय महिला संघातील खेळाडूंकडे गुणवत्तेची कमतरता नाही; परंतु काही खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा प्रश्न दिसून येतो. कोरोनामुळे प्रामुख्यानं महिलांच्या तंदुरुस्तीवर मोठा परिणाम झाला हेही तेवढंच सत्य आहे. मुळात देशात महिलांचे क्रिकेट सामने या काळात होऊ शकले नाहीत, त्याचा परिणाम होणं स्वाभाविक होतं; पण स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर अशा खेळाडूंनी कोणतीही कारणं न देता तंदुरुस्तीसाठी मिळेल तशी मेहनत घेतलीच, म्हणून त्यांचा स्तर उच्च आहे.

सातत्याचा अभाव

एखाद्या परीक्षेत वरचा क्रमांक मिळवला म्हणून तो गुणवंत विद्यार्थी होत नाही, तर आपल्या क्रमवारीत जो सातत्य राखतो तो हुशार म्हणून ओखळला जातो. महिला संघाची नेमकी हीच अडचण आहे. याच विश्वकरंडक स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध ३०० धावांच्या पलीकडे मजल मारणारा भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध १५० धावाही करू शकत नाही.

मिताली, झुलन कधीपर्यंत खेळणार?

मिताली राज आणि झुलन गोस्वामी प्रथितयश खेळाडू आहेत यात शंका नाही. त्यांनी एक काळ गाजवला होता; परंतु आता वाढत्या वयाबरोबर कामगिरीचा कधी काळी असलेला स्तर कायम राहणं शक्य नाही.

मितालीबाबत नेहमीच स्ट्राईक रेटचा प्रश्न उपस्थित केला जातो. ही शेवटची विश्वकरंडक स्पर्धा असल्याचं सूतोवाच दोघींकडून करण्यात आलं होते, परंतु आता महिलांची आयपीएल जर होणार असेल तर मिताली तरी एवढ्यात निवृत्त होईल असे वाटत नाही. मात्र, कर्णधार म्हणून या विश्वकरंडक स्पर्धेत आलेलं अपयश तिला कर्णधारपदावरून दूर करण्यास कारणीभूत ठरू शकतं. विराट कोहली हे उदाहरण ताजं आहेच.

आता प्रश्न महिला आयपीएलचा. या स्पर्धेची संकल्पना अस्तित्वात आली तर भारतीय क्रिकेटला फायदा होईल. ऑस्ट्रेलियात महिलांची ‘बिगबॅश’ स्पर्धा होत असते. आजच्या घडीला ऑस्ट्रेलियाच्या महिलांचा किती दबदबा आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. या बिग बॅश स्पर्धेत काही महिला खेळाडू यंदा सहभागी झाल्या होत्या, तेथे त्यांनी प्रभावही पाडला, परंतु विश्वकरंडक स्पर्धेत मात्र त्याचे रुपांतर झाले नाही. पुरुष असो वा महिला भारतात क्रिकेटची गुणवत्ता उपजत आहे. पुरुषांच्या आयपीएलचे काहीच सामने झाले आहेत, परंतु आयुष बोदानी आणि सदरंगानी या दोन खेळाडूंनी पदार्पणातच आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवली. महिलांची आयपीएल झाली तर असे अनेक खेळाडू पुढं येतील. मात्र, त्यासाठी खेळाडूंकडूनही प्रामाणिक प्रयत्नांबरोबरच सातत्यसुद्धा राखलं जाणं आवश्यक आहे.

सन २००७ ची पुनरावृत्ती ?

सन २००७ मध्ये वेस्ट इंडीजमध्ये झालेल्या मर्यादित षटकांच्या विश्वकरंडक स्पर्धेत राहुल द्रविडच्या नेतृत्वात खेळलेला भारतीय संघ साखळीतच गारद झाला होता. त्यानंतर २००८ मध्ये आयपीएल अस्तित्वात आली. तेव्हा महेंद्रसिंह धोनीचा उदय झाला होता आणि लगेचच ट्वेन्टी-२० विश्वकरंडक आणि २०११ मध्ये ५०-५० षटकांचा विश्वकरंडक भारतानं जिंकला. आता महिलांबाबतही असंच घडणार? उत्सुकता तर ताणली गेली आहे...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com