एकच हृदय किती वेळा जिंकशील रे...!

Ajinkya Rahane
Ajinkya Rahane

अजिंक्‍य रहाणे कर्णधार म्हणून आला...खेळला आणि विजयाबरोबर सर्वांची मनंही जिंकून गेला! 
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा कसोटी सामना भारतीयांच्या अफलातून कामगिरीमुळे आणि विजयामुळे क्रिकेटच्या पुस्तकात लिहिला जाईल; पण खेळाच्या पलीकडेही आपल्या स्वभावगुणानं आदर्श निर्माण करणारे काही खेळाडू असतात. अजिंक्‍य रहाणे हा त्यांपैकी एक. आधुनिक क्रिकेटविश्र्वात असं एक नवं युग तो आणत आहे...

खेळाडूंबाबत ‘कॅरॅक्टर’ हा शब्दप्रयोग नेहमीच वापरला जातो. या शब्दाचा अर्थ स्वभाव किंवा स्वभावगुण असा होतो. तुमच्याकडे खेळाची किती गुणवत्ता आहे, ती तुम्ही कशी फुलवली आहे यावरून तुमचं रेकॉर्ड - बॅंक बॅलन्स तयार व्हावा तसं - तयार होत असतं; पण या वाटचालीत तुम्ही मैदानावर कसं वर्तन करता किंवा कसे वावरता यावर तुमच्या विक्रमांना सोनेरी मुलामा मिळत असतो. आंतररराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या एकच चर्चा आहे...ती म्हणजे, अर्थातच भारतीय संघानं घेतलेल्या फिनिक्सभरारीची आणि ज्यानं शिडात हवा भरली त्या अजिंक्‍य रहाणेची! ही चर्चा केवळ कर्णधारपदाची नव्हे, तर त्याच्या आदर्शवत् वर्तणुकीचीही.

केवळ ऑस्ट्रेलियातच नव्हे, तर संपूर्ण क्रिकेटविश्वात अजिंक्यचं गुणगान होत आहे. आक्रमक आणि देहबोलीत जणू काही तुफान असल्यासारखं जाणवणाऱ्या विराट कोहलीऐवजी अजिंक्य हा भारतीय संघाची धुरा वाहतोय; पण सहकारी तेच आहेत आणि कर्णधारपदाची शैली जमीन-आसमानाएवढा फरक असणारी. दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवसापासून वर्चस्व गाजवल्यानंतर शांत आणि संयमित नेतृत्व करूनही प्रतिस्पर्ध्यांना शरण आणता येतं हे यातून अधोरेखित होतं.

इतर खेळातले जंटलमन
टेनिस सुपरस्टार बियॉन बोर्गही जसा जिंकत होता, तसा जॉन मॅकेन्रोही कमाल करत होता; पण आजच्या पिढीतही बोर्ग यांचं नाव आदरानं घेतलं जातं. तोच सन्मान रॉजर फेडररलाही मिळत आहे. ‘जंटलमन्स गेम’ म्हणून ओखळल्या जाणाऱ्या क्रिकेटमध्ये सर्वच जंटलमन नसतात. मात्र, राहुल द्रविडला मनापासून आदर्श मानणाऱ्या अजिंक्‍यनं मात्र वर्तणुकीसंदर्भात आपल्या गुरूच्या पावलावर पाऊल टाकलं आहे.मुळात घरातून होणारे संस्कार आणि स्वभाव या दोन बाबी जुळून आल्या की शांत, संयमी वर्तन आणि आदर्शवत् वर्तणूक आपसूकच येते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अजिंक्‍य लहानपणी एकदमच शांत आणि अबोल. त्याच्यात आक्रमकता आणण्यासाठी वडिलांनी त्याला कराटे क्‍लासला पाठवलं. आपल्याला आवडो वा न आवडो, जे काम करायचं ते प्रामाणिकपणे, या भूमिकेतून अजिंक्यनं कराटेत ब्लॅक बेल्टही मिळवला; पण त्याचा स्वभाव शांतच राहिला.

रिंगणात प्रतिस्पर्ध्याला ठोसा मारण्याची, हातात बॅट असताना समोर आलेला चेंडू सीमापार धाडण्याची किंवा आपल्या गोलंदाजांसाठी आक्रमक व्यूहरचना करण्याची आक्रमकता देहबोलीपेक्षा त्याच्या विचारांत आली.

मैदानाबाहेरचा अजिंक्‍य
दुसऱ्या कसोटीतल्या अजिंक्‍यच्या रूपानं आदर्श कर्णधार जगासमोर आला; पण त्याअगोदरही त्याची एक कृती त्याला महान ठरवणारी होती. कसोटीमालिका सुरू होण्याअगोदर झालेल्या पहिल्या सरावसामन्यात ऑस्ट्रेलियाचा नवोदित फलंदाज विली पुकोवस्कीच्या डोक्‍याला चेंडू लागल्यानं तो ड्रेसिंगरूमध्ये परतला होता. दिवसाचा खेळ संपल्यानंतर पुकोवस्कीची चौकशी करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या ड्रेसिंगरूममध्ये अजिंक्य गेला होता. खेळाच्या आणि सामन्याच्याही पलीकडे एक विश्र्व असतं...नातं असतं, ते असं एखाद्या छोट्या कृतीनं जोपासता येतं हे अजिंक्यनं दाखवून दिलं. अफगाणिस्तानचा पहिलावहिला कसोटी सामना भारतात झाला.

विराटच्या अनुपस्थितीत नेतृत्व करणाऱ्या अजिंक्‍यच्या भारतीय संघानं अपेक्षेनुसार तो सामना जिंकला; पण सामना संपल्यानंतर विजयी करंडकाबरोबर झालेल्या छायाचित्रणात अजिंक्‍यनं भारतीय संघाबरोबर अफगाणिस्तानच्याही सर्व खेळाडूंना बोलावलं. त्याच्या या कृतीनं सर्व अफगाण खेळाडूंची मनं जिंकली. अफगाणिस्तानातला त्या संघातला कोणताही खेळाडू यापुढं  अजिंक्यसमोर नेहमीच आदरानं मान झुकवल्याशिवाय राहणार नाही....म्हणूनच म्हणावंसं वाटतं...‘अजिंक्य...अरे, वर्चस्वासाठी मैदानावर कुरघोडी करण्याच्या या युगात तू आमचं एकच हृदय किती वेळा जिंकशील?’

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com