ऑनलाईन शॉपिंगचे मायाजाल... 

शैलेश पांडे
सोमवार, 8 मे 2017

ऑनलाइन शॉपिंगमध्ये बराच वेळ जातो, खूप व्हेरायटी असते आणि ताबडतोब पैसे न देता आपल्या कार्टमध्ये ती वस्तू येऊन पडते, हे पाहून विशिष्ट प्रकारची रसायने त्यांच्या मेंदूत पाझरतात आणि त्यांना "फील गुड'चे भास होतात.

छंदांची दुनिया अमर्याद आहे. कुणाला कशाचा छंद असेल सांगता यायचे नाही. सिनेमाचा, गाण्याचा, पेंटिंगचा, नाचण्याचा, अभिनयाचा छंद असणे ही छंदाची नेहमीची रूपे झाली. काही छंद याहून वेगळे आणि अनोखे असतात.

छंद एखाद्या गोष्टीच्या आवडीतून, त्यातून मिळणाऱ्या आनंदातून निर्माण होतात. त्यातून व्यक्तिमत्त्वाची जडणघडणही होते. बव्हंशी छंद हे माणसांच्या जगण्याच्या आनंदात भरच घालत असतात. पण, काही गोष्टींच्या आवडी निर्माण केल्या जाण्याचा आणि त्यांना बाजारासाठी छंद म्हणून विकसित करण्याचा हा काळ आहे. गोरेपणाची अत्याधिक आवड निर्माण करून त्यासाठीची सौंदर्य प्रसाधने तुमच्या माथी मारली जाण्याचा हा काळ आहे. गरजेपुरतेच विकत घ्यायचे, हा पारंपरिक व्यवहारवाद बाजूला पडून दिसले ते सारे हवेच, अशी मानसिकता तयार केली जाण्याचा हा काळ आहे. एखादी गोष्ट तुम्हाला आवडत नसेलही किंवा तिची गरज नसेल, पण ती तुम्हाला आवडू लागेल, अशी व्यवस्था नव्या बाजारीकरणाच्या युगात तयार झाली आहे. त्यातून शॉपिंगसारखा नवा छंद विकसित होऊ लागला आहे. 

काहीच खरेदी करायचे नसले तरी दुकाने फिरण्याची, विंडो शॉपिंग करण्याची काही लोकांना सवय असते. त्यांचा तो "छंद' असतो. असे लोक दुकानांच्या काचांपल्याड ठेवलेल्या वस्तू बघूनच सुखावतात. ते सारे गरीबच असतात, असे नव्हे. सुखवस्तू घरातल्या लोकांनाही असा छंद असू शकतो. ऑनलाइन शॉपिंग हे अशा छंदाचे मोबाईल किंवा लॅपटॉपकेंद्री स्वरूप. आपल्याला घ्यायचे असते भलतेच, आपण त्यासाठी वेगवेगळ्या ऑनलाइन शॉपिंग साइट्‌सवर भरभक्कम भटकंती करतो आणि त्या मूळ गरजेच्या वस्तूसोबत आणखी दोन-चार वस्तू खरेदी करून बसतो. त्या वस्तू पार्सलने घरी येतात तेव्हाच पैसे द्यायचे असतात. त्यामुळे वस्तू ऑर्डर करताना काहीच वाटत नाही. तो छंद असतो. ती आवड असते. पार्सल सोडवताना पैसे द्यावे लागतात तेव्हा जरासे चुकचुकते आणि गरज नसलेल्या वस्तू घरात तशाच पडून राहतात तेव्हा आपला हा छंद विनाकारण खर्चात पाडणारा असल्याची जाणीव होते...पण, ती तेवढ्यापुरतीच!...मग पुन्हा ऑनलाईन शॉपिंग सुरू होते आणि आणखी एक वर्तुळ पूर्ण होते. पुढे त्याला मर्यादा नसते.

ऑनलाईन बाजार हा ऑफलाईन बाजाराएवढाच भुरळ पाडणारा आहे. मोठ्या मॉलमध्ये फिरणे आणि ऑनलाईन साइट्‌सवर भटकंती करणे यात खर्चाच्या दृष्टीने फारसा फरक राहिलेला नाही. उलट ऑनलाईन शॉपिंग अधिक मोहात आणि खर्चात पाडणारे ठरल्याचे दिसत आहे. अनेकांसाठी तर ऑनलाईन शॉपिंग हे एक व्यसन झाले आहे. त्यामुळे त्यासंदर्भात अभ्यासही सुरू झाले आहेत आणि "अल्कोहोलिक्‍स'सारखे त्यांना "शॉपाहोलिक्‍स' असे नावही मिळाले आहे. यातही अनेक उपप्रकार आहेत म्हणे...पहिला प्रकार सातत्याने खरेदी करणाऱ्यांचा. त्यांना भावनिक किंवा मानसिक असा कोणत्याही प्रकारचा ताण निर्माण झाला की, ते तो ताण शॉपिंग करून घालवतात...मग ती ऑनलाईन असो वा ऑफलाईन. काही लोकांना आपल्या स्वप्नातील नेमक्‍या वस्तूंसाठी शॉपिंग करायचे असते आणि त्यांच्यासाठी ऑनलाईन शॉपिंग साइट्‌ससारखे भलेमोठे दुकानही कमी पडते. काहींना फक्त "सेल' किंवा "डिस्काउन्ट' या शब्दांचीच एवढी भुरळ पडते, की गरज असो-नसो, ते त्यातले काही ना काही विकत घेतल्याशिवाय थांबत नाहीत. यातला आणखी एक प्रकार मोठा इंटरेस्टिंग आहे. वस्तू खरेदी करायची आणि मग ती परत करायची, यातच आनंद मानणाऱ्यांचा एक मोठा वर्ग शहरी समाजात तयार झाला आहे. अशा वेगळ्या विक्रमादित्यांच्या संदर्भात एक अभ्यास नुकताच झाला.

ऑनलाईन शॉपिंगमध्ये बराच वेळ जातो, खूप व्हेरायटी असते आणि ताबडतोब पैसे न देता आपल्या कार्टमध्ये ती वस्तू येऊन पडते, हे पाहून विशिष्ट प्रकारची रसायने त्यांच्या मेंदूत पाझरतात आणि त्यांना "फील गुड'चे भास होतात. त्यातून त्यांचे शॉपिंगचे व्यसन वाढत जाते, असे या अभ्यासकांचे म्हणणे. हा छंद अर्थातच मोठ्या खर्चाचा असल्यामुळे मग त्यात लपवाछपवी आली..."मी तसे नाही करत' असे सांगणे आले. अनेकांचे तर बजेटच या अनावश्‍यक खरेदीमुळे कोलमडल्याचे दिसते. ज्या वस्तूची तुम्हाला खरोखर गरज नाही, तिचीच तुम्हाला किती गरज आहे, हे वारंवार सांगून तुमचा खिसा हलका करण्याचे बाजारपेठी कारस्थान यामागे असते. तुमचे नेटसर्फिंग ट्रॅक केले जाते. तुमच्या सवयी नोंदवल्या जातात. त्यांचा अभ्यास केला जातो. तुम्ही वारंवार ज्या गोष्टी नेटवर शोधता, त्या आपसूकच तुमच्या स्क्रीनवर प्रकट होतात आणि तुम्हाला खरेदीची भुरळ पडते, इथवर हे प्रकरण पोचले आहे. यात अल्पसंतुष्टी, बचत, गरजांएवढीच खरेदी किंवा परवडेल तेवढीच खरेदी ही पारंपरिक शिकवण आपसूक बाजूला पडते. त्या व्यक्तीच्या आणि कुटुंबाच्या अर्थकारणावर आणि मानसिकतेवरही अशा खरेदीचा वाईट परिणाम होतो तो वेगळा. खरे तर भारतात "अंथरूण पाहून पाय पसरणे' ही शिकवण लहानपणापासून दिली जाते. अंथरुणाहून पाय मोठे झाले की काय होते, याचा अनुभव दशकभरापूर्वी अमेरिकेने घेतला. क्रेडिट कार्डचे अर्थकारण धाडकन्‌ कोसळले. अमेरिका आजही मंदीतून पुरेसा बाहेर आलेला नाही.

आपल्याकडे अल्पबचत हे जगण्याचे मूल्य म्हणून प्रस्थापित आहे म्हणून भारताला या मंदीचा फटका तितकासा बसला नाही. परंतु, पाश्‍चात्त्य किंवा अमेरिकी वर्तन-व्यवहाराचे अनुकरण ही आधुनिक काळाची रीत असल्यामुळे याकडे आपले दुर्लक्ष होते आहे. अल्प काळासाठी शॉपिंगचे व्यसन फारसे त्रासदायक वाटणारे नसेलही. परंतु, दीर्घ काळाचा विचार केला तर कुटुंब-समाजाच्या एकूण अर्थकारणासाठी ते वाईटच आहे. कित्येकांना या क्रेडिट कार्डातून पैसे काढून त्या क्रेडिट कार्डाचे पैसे भरताना आपण पाहतो. चांगला पगार असतानाही दरमहा त्यांना उधारी करावी लागते तेव्हा त्यामागे फक्त घरातल्या कुणाचे आजारपण असते असे नव्हे. त्यामागे त्या व्यक्तीचे शॉपिंगचे व्यसन किंवा त्या कुटुंबातल्या कुणाचा तरी अशाप्रकारचा छंदही असू शकतो. कर्ज काढून सण साजरे करू नयेत, अशी एक चांगली शिकवण आपल्याकडे आहे. पण, नव्या काळात ती वेगाने विस्मृतीत जाते आहे. त्यातून एखादी व्यक्ती किंवा त्याचे कुटुंब कर्जबाजारी होते, हा त्याचा एक परिणाम झाला. दुसरा आणखी एक परिणाम आहे, जो साधारणतः आपल्या लक्षात येत नाही. गरजेपेक्षा अधिक खरेदी करण्याची सवय समाजातल्या सुस्थित घटकांना लागते तेव्हा बाजारात मालाला उठाव असतो आणि साधारण किंवा गरीब ग्राहकीला वाव नसतो. त्यामुळे एका सुबत्ता असलेल्या घरात कपड्यांचे थर लागलेले असतात आणि गरिबाच्या अंगावरचे फाटकेच असते.

हॉटेल-जेवणावळीतून अन्न रस्त्यावर फेकले जाते आणि गरिबांची उपासमार तशीच कायम असते. बाजारातून हा हव्यासी उठाव कमी झाला, ही चंगळ कमी झाली तर वस्तूंच्या किमती आपोआप कमी होतील आणि गरिबांना-सामान्यांना त्याचा लाभ मिळेल. आपले अर्थकारण सुदृढ असेलही आणि त्याचा आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबावर वाईट परिणाम होत नसेलही, पण सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून ही दुसरी बाजू आपल्याला विचारात घ्यावी लागेल की नाही?... 

Web Title: Shailesh Pande writes about online shopping