सक्तीच्या अतिरेकी राष्ट्रवादाचा उदय

अधिकृतरीत्या बंधनकारक अशा अतिरेकी राष्ट्रवादाचा जगभर सर्वत्र होत असलेला उदय हे आजच्या काळाचं एक अजब वैशिष्ट्य म्हणावं लागेल.
WTO
WTOSakal
Summary

अधिकृतरीत्या बंधनकारक अशा अतिरेकी राष्ट्रवादाचा जगभर सर्वत्र होत असलेला उदय हे आजच्या काळाचं एक अजब वैशिष्ट्य म्हणावं लागेल.

- शशी थरूर

अधिकृतरीत्या बंधनकारक अशा अतिरेकी राष्ट्रवादाचा जगभर सर्वत्र होत असलेला उदय हे आजच्या काळाचं एक अजब वैशिष्ट्य म्हणावं लागेल. या शतकाच्या आरंभी जागतिकीकरण ही एक कधीच न थांबणारी प्रक्रिया बनल्याची स्पष्ट चिन्हं दिसू लागली होती. राष्ट्राराष्ट्रातील सीमा अधिकाधिक मोकळ्या होऊ लागल्या होत्या. राष्ट्रराज्यें आपलं सार्वभौमत्व युरोपिअन युनियन सारख्या संघटनांपायी वाकवू लागली होती, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयासारख्या वैधानिक संस्थांपुढं झुकवू लागली होती आणि जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) देखरेखीखाली होणाऱ्या प्रादेशिक आणि जागतिक करारापायी त्याचा संकोच करू लागली होती; परंतु पाठोपाठ आलेल्या या शतकाच्या दुसऱ्याच दशकात जागतिकीकरणाविरुद्धच्या तीव्र प्रतिक्रियेच्या तडाख्यानं ही प्रक्रिया अशी अकस्मात उलट्या दिशेनं गती घेईल असं क्वचितच कुणाला वाटलं असेल. आणि आता सक्तीचा होत असलेला अतिरेकी राष्ट्रवाद हे याचंच एक आनुषंगिक फलित आहे.

जागतिकीकरणाविरुद्धच्या या उलट्या झटक्याला जगभर सगळीकडे त्या त्या ठिकाणचं एक देशी रंगरूप प्राप्त झालं आहे. युरोप-अमेरिकेत त्यानं स्थलांतरित आणि अल्पसंख्याकांविरुद्धच्या वांशिक किंवा धार्मिक विरोधाचं रूप घेतलं आहे. अशा नकारात्मक संदेशाला काहीएक सकारात्मक रूपडं देण्याची नितांत आवश्यकता असते. ही उणीव ‘राष्ट्रवाद’ या कल्पनेनं भरून काढली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या Make America Great Again (अमेरिकेला पुनःश्च महान बनवा) या घोषणेपासून एर्दोगन यानं सुरू केलेल्या तुर्की साम्राज्याच्या गतवैभवाच्या पुनरुज्जीवनापर्यंत हाच कल आपण सर्वत्र पाहतो. प्रत्येक देशातील विविध राजकीय प्रवृत्ती एका कृत्रिम एकतेत गोवण्याचा प्रयत्न लोकानुनयी विचारसरणीद्वारा होत आहे. यालाच राष्ट्रवाद असं गोंडस नाव दिलं जात आहे. आपापसातील मतभेद नष्ट करून सर्वांनाच विविध स्वातंत्र्यांचा लाभ पोहोचवणाऱ्या नव्या जगाचं अभिवचन जागतिकीकरणानं आपल्याला दिलं होतं. याउलट, आजचा हा प्रतिक्रियाजन्य राष्ट्रवाद मतभेद गडद करू पाहतोय. राजकीयदृष्ट्या परिभाषित केलेल्या विशिष्ट लोकांच्या ठायीच असलेले विलक्षण सद्गुण तो अधोरेखित करतो आणि त्या प्रत्येकाच्या अंगी राष्ट्राविषयी संपूर्ण निष्ठा बाणवण्याचा प्रयत्न करतो.

हा प्रयत्न राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, बिल्ले आणि आपल्या सैनिकांच्या बलिदानाविषयी अपार आदर अशा गोष्टींपुरताच मर्यादित असतो तोवर त्यात मला काही वावगं वाटत नाही; परंतु प्रतीकांचा वापर राष्ट्र या कल्पनेवरचं आपलं प्रेम वृद्धिंगत करण्याकरता नव्हे तर, एक प्रकारची अटळ कर्तव्यभावना निर्माण करण्याकरता आणि विद्यमान सरकारच्या धोरणांना संपूर्ण मान्यता मिळवण्याकरता केला जातो तेव्हा माझ्या दृष्टीनं समस्या निर्माण होते.

अशा वेळी राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज यांना दिला जाणारा ‘सन्मान’ हा राज्य, सरकार आणि सत्तारूढ पक्ष यांच्याबद्दलच्या आज्ञाधारकतेचा संकेत बनतो. आज ‘लोकरीतीप्रमाणे वागणं’ हेच निष्ठेचं बिरुद बनलं आहे. युरोपभर उसळलेली उजव्या लोकानुनयाची प्रभावी लाट आपल्याला हाच कल दर्शवते. फ्रान्समधील नॅशनल फ्रंट, ग्रीसमधील सिरिझा आणि इटलीतील फाईव्ह स्टार मूव्हमेंट अशा व्यवस्थाविरोधी लोकानुनयी पक्षांना मिळणारे जनाधार ही याचीच अधिक टोकाची उदाहरणं होत. युरोपमध्ये सत्तेची पोकळी निर्माण होण्याचा पुरेपूर धोका आज समोर दिसत असताना असा अनुदार राष्ट्रवाद ठिकठिकाणी उदयाला येत आहे.

आज फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन पुन्हा निवडणुकीला उभे असताना फ्रान्समध्ये त्यांना दोन प्रमुख पर्याय निर्माण झाले आहेत. या दोघांपैकी अधिक कट्टर अतिराष्ट्रवादी कोण याचा निर्णय घेणं अशक्य व्हावं इतके ते याबाबत एकमेकांना शेरास सव्वाशेर आहेत. नॅशनल फ्रंटचे मरीन लेपेन आणि त्यांच्याहून वरताण, तिखट जिभेचे चिथावणीखोर एरिक झेमोर. ऑस्ट्रियातील अती-उजव्या गटांची आणि जर्मनीतील AFD या संघटनेची कामगिरी ही एकंदर कल अशा संघटनांच्या विस्ताराचाच असल्याची उदाहरणं होत. या सर्व घटना चिंताजनक आणि धोक्याचा इशारा देणाऱ्या आहेत. राष्ट्र म्हणजे सर्वच्या सर्व नागरिकांचा समावेशक समुदाय. ते प्रत्येक व्यक्तीला घटनात्मक कवचाच्या संरक्षणाखाली सुरक्षित आसरा देतं. त्यात सत्ताधाऱ्यांच्या मनमानी फर्मानांचं भय न बाळगता प्रत्येक व्यक्तीला आपल्या मर्जीनुसार आनंद मिळवता येतो, तसंच निष्ठा बाळगता आणि व्यक्त करता येतो. ही राष्ट्राची मूळ कल्पना; परंतु आज अधिकृतरीत्या मान्य असाच राष्ट्रवाद अंगीकारण्याचं उच्च राष्ट्रभक्तिपर कर्तव्य पार पाडण्याच्या नावाखाली राष्ट्राची ही मूळ कल्पना सपशेल बाजूला सारली गेली आहे.

सन १९२० आणि १९३० च्या दशकांत इटली आणि जर्मनी याच निसरड्या वाटेनं फॅसिझम आणि नाझीझमच्या गर्तेत कोसळले याची यामुळे आठवण होते. संवादाची अत्याधुनिक साधनं उपलब्ध असलेल्या आणि माध्यमांची रेलचेल असलेल्या आजच्या लोकशाहीत ही भीती थोडी अतिशयोक्त वाटणं शक्य आहे; परंतु समाजमाध्यमांवर सर्वत्र होत असलेल्या विखारी-विषारी आगपाखडीवर एक नजर आपण टाकली तरी या वातावरणात आत्मसंतुष्टतेला जागा नाही याची खात्री पटेल.

सन १९९१ मध्ये आपलं वसाहतोत्तर स्वावलंबनाचं धोरण आपण सोडून दिल्यामुळे आणि परकीय गुंतवणुकीवर बंधनं घालणारे आणि व्यापार कमी करणारे संरक्षक अडथळे थोडे कमी केल्यामुळे आपल्या देशाला खूपच फायदा झाला. संपूर्ण जगाशी आपला व्यवहार अधिक खुला होऊ लागल्याबरोबर सर्वच बाबतींतील आंतरराष्ट्रीय रीती-रिवाजांबाबत आपण अधिक स्वागतशील झालो. अगदी व्यावसायिक संस्कृतीपासून ते मान्य लैंगिक वर्तनापर्यंत. आपली राष्ट्रभक्तीची भावनासुद्धा अधिक उदार आणि सार्वत्रिक अशा आंतरराष्ट्रीयत्वात मिसळून टाकण्याइतके आपण खुले झालो. हे सारं आता आपल्या सध्याच्या व्यवस्थेत ठप्प होत आहे. आपले पंतप्रधान घटनात्मक संकेत बाजूला सारतात आणि अयोध्येत जाऊन पूजा करतात. त्यांचा पक्ष बेदरकार हिंदुत्वाचा उघडउघड ठासून पुरस्कार करतो. अल्पसंख्य समाजाचं, विशेषतः मुसलमानांचं, मानहानिकारक विलगीकरण करणं खपवून घेतो. धर्मपिसाट आणि संधिसाधू राजकारणी आपला पारंपरिक पोशाख घालणाऱ्या कोवळ्या मुलींना शिक्षण घेण्याला प्रतिबंध करतात. भारत अनुदार झाला आहे आणि असे अनुदार होण्यानंच तो खराखुरा भारतीय होत असल्याचं मानलं जात आहे. अस्सल होण्याच्या मागं लागून आम्ही असभ्य होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

(सदराचे लेखक हे खासदार आणि माजी राजनैतिक अधिकारी असून, त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.)

(अनुवाद : अनंत घोटगाळकर)

anant.ghotgalkar@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com