एक पाऊल स्वच्छतेकडे...!

शायना एन सी
मंगळवार, 6 जून 2017

कचरा गोळा करणे आणि त्याची विल्हेवाट लावणे हे आजही अनेक शहरांत आव्हान आहे. उघड्यावर मलविसर्जन करण्याचे प्रमाण मोठे असलेल्या मुंबईतही हे आव्हान कायम असले, तरी देशातील रस्त्यांची स्वच्छता, सांडपाणी निचरा, मलनिःसारण सुविधा आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने २०१४ पासून राबवण्यात येत असलेल्या ‘स्वच्छ भारत मोहिमे’मुळे मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत असून शहरे स्वच्छ राखण्याच्या मनोवृत्तीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसते... 

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दोन विरोधाभास नेहमी प्रकर्षाने दिसतात. अफाट श्रीमंती आणि ऐषारामी जीवन जगणाऱ्यांची मुंबई आणि अत्यंत गरीब असलेल्यांची मुंबई. शहरातील स्वच्छतेची स्थिती या दोन्ही मुंबईतील दरीचे विदारक दर्शन घडवते. या ‘दुसऱ्या’ मुंबईतील झोपडपट्ट्या, रेल्वे, सार्वजनिक रुग्णालये आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांतील स्थितीवर नजर टाकल्यास आपल्या सार्वजनिक शौचालयांतील स्वच्छता ही मोठी समस्या असल्याचे जाणवते. झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्यांची/ सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणाऱ्यांची मोठी संख्या आणि त्यांची मोठी उपयुक्तता लक्षात घेता हा मुद्दा आपण तातडीने हाती घेण्याची गरज असल्याचे प्रकर्षाने जाणवते.

शहरांतील वस्त्यांत बिकट अवस्थेत असलेल्या सार्वजनिक शौचालयांपासून रेल्वेस्थानकांपर्यंत अक्राळविक्राळ पसरलेल्या या समस्येचे सातत्याने कसे संक्रमण होते, त्यावर कोणतीही ठोस उपाययोजना होत का नाही, हे माझ्यासाठी अनाकलनीय आहे. आपल्याला सध्या भेडसावत असलेल्या अनेक समस्यांचे मूळ कारण हे त्याचे निराकरण करण्याबाबत असलेली लोकांची तसेच संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची उदासीनता हे आहे. स्वच्छतेबाबतची आपली संकल्पना केवळ आपल्या घरापुरतीच मर्यादित असते. सार्वजनिक मालमत्तांच्या महत्त्वाकडे आपले नेहमीच दुर्लक्ष होत असते. या समस्येचे निराकारण करण्याबाबत आपण गांभीर्याने पावले उचलत नसल्याने ती अधिकाधिक गंभीर होताना दिसते.

हा मुद्दा थेट आपल्याशी निगडित आहे, हे मी लिहीत असले तरी मुंबई तसेच देशातील अन्य भागांत हजारो नागरिक मोकळ्या जागांचा शौचालये म्हणून वापर करत आहेत. त्यांना असे का करावे लागते? त्याचे उत्तर बिकट-दयनीय अवस्थेत असलेली शौचालये हे आहे. या समस्येचे निराकारण करण्यासाठी आपण चांगली शौचालये उभारण्याच्या तसेच त्यांचे योग्य व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे. ही समस्या केवळ गरिबांशी संबंधित नसून सधन व्यक्तींशीही तेवढीच निगडित आहे. शहरातील ही समस्या पाहता देशातील छोटी शहरे किंवा गावांतील मुख्य रस्ते अन्य मार्गांलगत उघड्यावर शौच करणाऱ्यांपेक्षा आपण वेगळे नाही, हे वास्तव आहे. सार्वजनिक स्वच्छता, सांडपाण्याचा निचरा करणाऱ्या मलनिःसारण व्यवस्थेच्या अभावामुळे अतिसार, आमांश किंवा विषमज्वरासारखे (टायफॉईड) अन्य जलजन्य आजार होण्याचे प्रमाण वाढत आहे. उघड्यावरील विष्ठेमुळे पोटात जिवाणूंचा संसर्ग होऊन जंत तसेच अतिसारासारखे आजार होतात. एक ग्रॅम विष्ठेमध्ये एक कोटी विषाणू १० लाख जिवाणू, एक हजार परजीवी गळू आणि शंभर परजीवी अंडी असतात, असे जागतिक आरोग्य संस्थेचा अहवाल सांगतो. आजार गरीब-श्रीमंत असा भेदभाव करत नाहीत. त्यामुळे त्याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतात.

सांडपाणी निचऱ्याची- मलनिःसारण सुविधेची बिकट अवस्था आणि अस्वच्छ शौचालयांमुळे देशातील प्रमुख शहरांतील महिला- मुलींना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. त्यांची सुरक्षा आणि प्रतिष्ठेच्या मुद्द्याबरोबर महिलांच्या आरोग्याशी निगडित अतिमहत्त्वाचा भाग असलेल्या मासिक पाळीतील स्वच्छतेवरही त्यामुळे परिणाम होत असतो. मला भेटलेल्या अनेक महिलांसमोर सार्वजनिक शौचालयांचा वापर करण्याशिवाय किंवा उघड्यावर निसर्गाच्या हाकेला ओ देण्याशिवाय पर्याय नव्हता. बिकट अवस्थेतील सार्वजनिक शौचालये आणि सार्वजनिक स्वच्छता- मलनिःसारण सुविधेच्या अभावामुळे त्यांच्या जीवनाचा दर्जा अतिशय निराशाजनक आहे. आम्हाला १२ तासांहून अधिक काळ पोटातील कळ दाबून ठेवावी लागते; तसेच दिवसाच्या ठराविक वेळेतच शौचालयात जाण्याची आम्हाला ‘शिकवण’ मिळाल्याचे या महिला-मुली सांगत असताना मला माझ्या आत्मसंतुष्टपणाचा राग आला. त्यातूनच यासंदर्भात काही तरी करण्याचा विचार मनात आला.

स्वच्छतेकडे तातडीने लक्ष देणे ही खरी गरज आहे. प्रत्येक घरात शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देऊनच आपण ‘स्वच्छ भारता’चे लक्ष्य गाठण्याच्या आसपास जाऊ शकू. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन चळवळ उभारण्याची गरज आहे. त्या दृष्टीने दोन वर्षांपासून पावले पडत आहेत. सध्याचे सरकार ‘स्वच्छ भारत मोहिमे’च्या माध्यमातून त्यावर लक्ष केंद्रित करत असून त्याला लक्षणीय यश मिळत आहे. त्यास मिळत असलेला सकारात्मक प्रतिसाद- सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आपण ‘स्वच्छ भारता’च्या दिशेने वाटचाल करत आहोत. 

क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाने ‘स्वच्छ भारत’ मोहिमेवर आधारित नुकतेच देशभरात ४३४ शहरांतील १७ हजार ५०० भागांत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१७’ (स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१७) केले. त्यात सहभागी झालेल्या ८३ टक्‍क्‍यांहून अधिक लोकांनी आपला विभाग गेल्या वर्षाच्या तुलनेत कितीतरी पटीने स्वच्छ झाल्याचे आवर्जून सांगितले. थुंकदाण्या, घरोघरी घनकचरा गोळा करण्यासारख्या सुविधांत तसेच स्वच्छतेसंदर्भातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झाल्याचे ८२ टक्के लोकांनी सांगितले. सर्वेक्षण झालेल्या शहरांपैकी ७५ टक्के रहिवासी विभाग स्वच्छ असल्याचे या सर्वेक्षणात आढलले १८५ शहरांतील रेल्वेस्थानकांवरही स्वच्छता आढळली.

कचरा गोळा करणे आणि त्याची विल्हेवाट करणे हे आजही अनेक शहरांत आव्हान आहे. उघड्यावर मलविसर्जन करण्याचे प्रमाण मोठे असलेल्या मुंबईतही हे आव्हान कायम असले, तरी देशातील रस्त्यांची स्वच्छता, सांडपाणी निचरा-मलनिःसारण सुविधा आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने २०१४ पासून राबवण्यात येत असलेल्या ‘स्वच्छ भारत मोहिमे’मुळे मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत असून शहरे स्वच्छ राखण्याच्या मनोवृत्तीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसते. त्याचे सकारात्मक परिणामही दिसत आहेत. ४२ हजार वॉर्डांत घरोघरी जाऊन कचरा जमा करण्याचे प्रमाण शंभर टक्‍क्‍यांवर पोचले आहे. असे असले तरी अत्याधुनिक शौचालये, सांडपाणी-मलनिःसारणाची योग्य सुविधा असलेल्या सुंदर घरांत राहणाऱ्यांना मला असे सांगावेसे वाटते की, ‘तुमच्या घरातील शौचालये जरी स्वच्छ असली तरी तुमचे शहर अस्वच्छ आहे. त्यामुळे मुंबईला उघड्यावर मलविसर्जन होण्यापासून मुक्त करण्यासाठी, मुंबईला उत्तम सांडपाणी निचरा-मलनिःसारणाची सुविधा- चांगली शौचालये असलेले शहर बनवण्याच्या मोहिमेत सहभागी व्हा.’ योग्य सांडपाणी निचरा- मलनिःसारण सुविधा तसेच पुरेशा प्रमाणात शौचालये नसलेल्यांनाही मला असे सांगावेसे वाटते की, ‘तुम्ही तुमच्या हक्कांसाठी लढायलाच हवे आणि या लढ्यात मी तुमच्यासोबत असेन.’ 

shainancnow@gmail.com/ @shainaNC 
लेखिका सामाजिक कार्यकर्त्या तसेच भाजपच्या प्रवक्‍त्या आहेत.

Web Title: Shayna N.C. article bjp maharashtra