नजरबंदी करणारं शिल्पवैभव

शेफाली वैद्य shefv@hotmail.com
Sunday, 21 February 2021

राउळी मंदिरी
‘थांबा, मी तुम्हाला एक गंमत दाखवतो...’
आमचे गाईड विरूपण्णा म्हणाले आणि त्यांनी आपल्या खिशातून एक हातरुमाल काढला. आम्ही आंध्र प्रदेशातील लेपाक्षीमंदिराच्या नृत्यमंडपात उभे होतो. तब्बल ७० ग्रॅनाईटच्या खांबांवर तोलून धरलेला भव्य नृत्यमंडप.

‘थांबा, मी तुम्हाला एक गंमत दाखवतो...’
आमचे गाईड विरूपण्णा म्हणाले आणि त्यांनी आपल्या खिशातून एक हातरुमाल काढला. आम्ही आंध्र प्रदेशातील लेपाक्षीमंदिराच्या नृत्यमंडपात उभे होतो. तब्बल ७० ग्रॅनाईटच्या खांबांवर तोलून धरलेला भव्य नृत्यमंडप. प्रत्येक खांबावर सुरेख मूर्ती कोरलेल्या आणि छतावर नैसर्गिक रंगांचा वापर करून रंगवलेली अप्रतिम म्यूरल्स. खास आंध्रच्या ‘व्रतपाणी’ या चित्रशैलीत - जिला आजकाल ‘कलमकारी शैली’ म्हटलं जातं - रंगवलेली ही चित्रं आज चारशे वर्षांनंतरही त्यांतली रंगसंगती, प्रमाणबद्धता आणि विषयांचं वैविध्य या गुणवैशिष्ट्यांमुळे लक्ष वेधून घेतात. अगदी मान मोडून मोडून मी ती अद्भुत चित्रं डोळ्यांत साठवून घेत होते. 

‘आता आणि विरूपण्णा अजून कसली गंमत दाखवणार,’ असा प्रश्न स्वतःलाच विचारत काहीशा नाराजीनंच मी माझं लक्ष चित्रांवरून हटवून त्यांच्यावर केंद्रित केलं. 
त्या सत्तर खांबांमधल्या एका कडेच्या खांबाकडे बोट करून विरूपण्णा म्हणाले : ‘‘हाच तो लेपाक्षीचा जगप्रसिद्ध तरंगता स्तंभ, हा अधांतरी आहे. याचं खालचं टोक जमिनीला टेकलेलं नाही. तुम्ही स्वतःच बघा.’

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

असं म्हणून विरूपण्णांनी खाली वाकून खरंच तो हातरुमाल त्या खांबाच्या एका टोकापासून खांबाखाली सरकवून दुसऱ्या बाजूनं आरपार बाहेर काढून दाखवला. आमच्या सगळ्या ग्रुपच्या तोंडून आश्चर्योद्गार निघाले. हे स्थापत्य खरोखरच अद्भुत आहे. इथं येणारे सर्वच लोक हा तरंगता खांब बघून आपल्या पूर्वजांचं स्थापत्यशास्त्रातील ज्ञान बघून अवाक् होतात. आत्तादेखील आमच्या मागं बऱ्याच लोकांची रांग लागलेली होती. लेपाक्षीच्या या वीरभद्रमंदिरात दर्शनाला येणारे सर्वच लोक खांबाखालून कापड काढायचा हा प्रयोग आवर्जून करतात. कारण, स्वतः अंगावर घातलेलं एखादं कापड या दगडी खांबाखालून आरपार केलं की घरात सुख-समृद्धी नांदते असा भाविकांचा विश्वास आहे.

सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा. 

मात्र, हा एक तरंगता खांब इतकंच लेपाक्षीच्या या मंदिराचं वैशिष्ट्य नाही, तर ‘विजयनगर-वास्तुकले’चा अतिशय उत्तम नमुना असलेलं हे मंदिर शिल्पवैभवानं ओतप्रोत आहे. इथली एकाच दगडापासून बनवलेली कड्याकड्यांची साखळी, एकाच मोठ्या ग्रॅनाईटच्या शिळेतून कोरलेलं नागलिंग आणि विशाल श्रीगणेश, अतिशय देखणे कोरीव स्तंभ असलेला कल्याणमंडप आणि छतावरचं अतिशय सुंदर म्यूरल पेंटिग हे सर्वच बघण्यासारखं आहे. 

May be an image of sculpture, outdoors and text that says "एकाच प्रस्तरातून कोरलेला महाप्रचंड नंदी हे लेपाक्षी इथल्या वीरभद्रमंदिराचं वैशिष्."

लेपाक्षीचं हे देखणं मंदिर दक्षिण आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात आहे. बंगळुरू विमानतळापासून सुमारे १०० किलोमीटरवर असलेलं हे मंदिर, स्वतःचं वाहन असेल तर, बंगळुरूहून एका दिवसात बघून होतं. बंगळुरूहून लेपाक्षीला   बसनं व रेल्वेनंही सहजपणे जाता येतं. सध्या अस्तित्वात असलेलं लेपाक्षीचं हे वीरभद्रमंदिर सन १५८३ मध्ये, विजयनगरच्या साम्राज्यातर्फे या भागाचं काम बघणारे दोन सेनानायक सरदार वीराण्णा आणि विरूपण्णा या सख्ख्या भावांनी बांधून घेतलं. 

एका आख्यायिकेनुसार, कासवाच्या पाठीच्या आकारामुळे ‘कूर्मशैल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘या टेकडीवर वीरभद्राचं मंदिर बांधा,’ असा दृष्टान्त वीरण्णा आणि विरूपण्णा या दोघा भावांना झाला आणि त्यांनी हे मंदिर बांधायचं ठरवलं; पण बांधकाम अर्ध्यावर असताना विजयनगरच्या सम्राटांकडे कुणीतरी चुगली केली की ‘मंदिर बांधायला पैसा सरकारी तिजोरीतून वापरला जातोय.’ हंपीवरून चौकशीचे आदेश आले तेव्हा विरूपण्णानं आपला प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी म्हणून स्वतःच आपले डोळे काढून भिंतीवर फेकले. ते जिथं पडले त्या जागी दगडावर दोन लाल खुणा आजही आहेत. विरूपण्णाच्या निःस्पृहतेची खूण म्हणून या रक्तरंजित खुणा इथले गाईड आजही इथं येणाऱ्या सर्व लोकांना दाखवतात.

मात्र, पौराणिक कथा अशी आहे की हे वीरभद्रमंदिर सर्वप्रथम अगस्त्य ऋषींनी इथं बांधलं होतं. या मंदिराच्या परिसरात एका प्रस्तरात एक मोठं पदचिन्ह आहे, जे नेहमीच पाण्यानं भरलेलं असतं. काही भाविक याला अगस्ती ऋषींचं पदचिन्ह मानतात, तर काही जण सीतेच्या पावलाचा ठसा मानतात. रावण सीतेचं हरण करून नेत असताना त्याचं आणि जटायूचं प्रसिद्ध युद्ध इथंच झालं. जेव्हा श्रीराम सीतेला शोधत आले तेव्हा त्यांना इथं जटायू पंख तुटलेल्या जखमी अवस्थेत आढळला, तेव्हा त्यांनी जटायूचे डोकं मांडीवर घेऊन हळुवार आवाजात त्याला ‘ले पक्षी’ म्हणजे ‘ऊठ पक्ष्या’ असं सांगितलं. या जागेला तेव्हापासून ‘लेपाक्षी’ असंं नाव पडलं अशी आख्यायिका आहे. 

लेपाक्षीच्या या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, इथला एकाच प्रस्तरातून कोरलेला महाप्रचंड नंदी. असं म्हणतात की एकेकाळी या मंदिराचा प्राकार इतका प्रचंड होता की हा नंदी मंदिराच्या प्राकारात होता. पुढं तालिकोटाच्या लढाईत मुसलमानी सल्तनतींनी एकत्र येऊन केलेल्या आक्रमणांत विजयनगरचं साम्राज्य धुळीला मिळालं आणि तिथल्या इतर मंदिरांचा झाला तसा विध्वंस इथंही झाला, अतिक्रमणं झाली, मंदिराचा प्राकार आक्रसला आणि नंदी त्याच्या लाडक्या शिवापासून दूर, एकीकडे राहिला.  

 ...पण हा नंदी आहे मात्र अतिशय देखणा. एकाच गुलाबी रंगाच्या ग्रॅनाईट प्रस्तरखंडातून कोरलेला हा नंदी २७ फूट लांब आणि १५ फूट उंच आहे. त्याचा चेहरा, बसण्याची ऐट, त्याच्या गळ्यातली घुंगुरमाळ, घंटा सर्वच इतकं लोभस आहे की या नंदीकडे कितीही वेळ बघितलं तरी मनाचं समाधान होत नाही. ग्रॅनाईट हा दगड तसं पाहिलं तर अतिशय कठीण, कोरायला अजिबात सोपा नाही; पण इतक्या कठीण दगडातूनसुद्धा भारतीय शिल्पकारांनी लेपाक्षीचं हे अद्वितीय शिल्पवैभव उभं केलं. त्यांच्या कलेपुढं नतमस्तक होण्यासाठी तरी या मंदिराला भेट द्यायलाच हवी. 

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shefali Vaidya Writes about virbhadra mandir lepakshi