नवरदेव नसलेली ‘शिवजी की बारात’

शेखर गुप्ता
सोमवार, 21 जानेवारी 2019

आपल्या देशात देवेगौडा होण्याची इच्छा बाळगणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कारण सोपे आहे. माजी पंतप्रधान हे ‘लेबल’ माजी मुख्यमंत्री या पदापेक्षा अधिक चांगले आहे.

एकूण दोन टप्प्यांत मी पंचेवीस वर्षे जेथे काम केले त्या ‘इंडियन एक्‍स्प्रेस’मधील अनेक प्रसिद्ध किस्स्यांपैकी हा एक किस्सा. एका जवळच्या मित्राने रामनाथ गोएंका यांना ते एका संपादकाला मुदतवाढ का नाकारत आहेत, याबाबत प्रश्‍न केला. ‘ही व्यक्ती एकदम संत आहे. तुम्ही त्यांना मुदतवाढ नाकारत आहात याचे आश्‍चर्य वाटते,’ असे मित्र म्हणाला. त्यावर रामनाथजींचे उत्तर होते, ‘ते संत आहेत हे मला ठाऊक आहे मित्रा. पण ‘इंडियन एक्‍स्प्रेस’ ही ‘शिवजीकी बारात’ आहे. हा पसारा त्यांना सांभाळता येणं कठीण आहे.’

भगवान शिव यांच्या वरातीत प्राणिमात्रांच्या विविध प्रजाती, भूत-प्रेत, आत्मे आणि चेटकिणींचा समावेश होता, असे प्राचीन रुपक आपल्याला सांगते. हे सारे आपापल्या आवडत्या पेयाच्या अमलात निघाले होते. आता तुम्ही मला सांगा आज देशात भाजपच्या विरोधात उभे ठाकलेले राजकीय पक्षांची स्थिती अशीच नाही काय? कुणाचेही आव्हान नसलेले नेतृत्व आणि दबदबा यामुळे भगवान शिव यांच्या वरातीला बऱ्यापैकी शिस्त होती. म्हणूनच नरेंद्र मोदी आणि त्यांचे रणनीतिकार राज्यांमधील अलीकडच्या पराभवानंतरही या वरातीकडे बघून हसत आहेत.

या वरातीत कोण कोण आहेत हे आता मोजूया. यात सगळ्यात पुढे आहेत ते अलीकडेच शिवभक्त झालेल्या नेत्याच्या नेतृत्वाखालील काँग्रेस. काँग्रेससोबत चार बऱ्यापैकी विश्‍वसनीय मित्र आहेत. यात शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, एम. के. स्टॅलिन यांचा द्रमुक, लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल आणि एच. डी. देवेगौडा यांचा धर्मनिरपेक्ष जनता दल आदींचा समावेश आहे. ही आपण दुसरी फळी समजू (एनडीए ही पहिली फळी असेल तर) यानंतर क्रम आहे तो उत्तर प्रदेशात ‘गठबंधन’ करणाऱ्या समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाचा. आताची परिस्थिती अशी आहे की निवडणूक प्रचारात हे दोन पक्ष भाजपवर टीका करतील तसेच काँग्रेसवरही प्रहार करतील. ही तिसरी फळी आहे असे समजू. दुसरीकडे ममता बॅनर्जी यांच्या शक्तिप्रदर्शनाच्या निमित्ताने आणखी एक आघाडी आकार घेऊ लागली आहे. यात काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष यांच्यासह  द्रमुक, चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष असे प्रादेशिक पक्षही आहेत. ही एक प्रकारची चौथी फळी तयार होत आहे.

यानंतर नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल, के. चंद्रशेखर राव यांची तेलंगण राष्ट्र समिती, जगनमोहन रेड्डी यांचा वायएसआर काँग्रेस हेही विरोधकांच्या एकजुटीत आपली जागा निश्‍चित करण्याच्या प्रयत्नात आहेत. ही पाचवी, सहावी आणि सातवी फळी ठरते. सगळ्यांत शेवटी डावे जे कुणालाही नको आहेत. भाजपविरोधी पक्षांचा पसारा हा असा आहे. याला नवरदेव नसलेली ‘शिवजी की बारात’ म्हणणेच योग्य ठरेल. भाजपविरोधी या आघाड्यांचे आणखी काप केले जाऊ शकतात. ममतांच्या व्यासपीठावर काँग्रेस आणि आप सोबत दिसत असले तरीही दिल्ली आणि पंजाबमध्ये ते परस्परांच्या विरोधात आहेत. तेलुगू देसम पक्षानेब काँग्रेससोबतच्या युतीवर अद्याप शिक्कामोर्तब केलेले नाही. उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा अपमानास्पद पराभवाचा सामना होऊ नये म्हणून समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्ष काँग्रेसशी दोन हात करण्यास तयार आहेत. पटनाईक यांनी नेहमीप्रमाणेच सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. के. चंद्रशेखर राव यांना आपल्यात पंतप्रधान होण्याची क्षमता आहे, असे वाटू लागले आहे. केरळमध्ये काँग्रेस आणि डाव्यांमध्ये जुंपली आहे. एवढे सारे पक्ष एकत्र येण्यामागे एकच समान धागा आहे तो भाजप विरोधाचा. तथापि, काँग्रेस वगळता एकाही पक्षाची क्षमता लोकसभेच्या ५० जागा मिळविण्याएवढी नाही. त्यामुळे भाजपला १७० च्या आसपास आणि काँग्रेसला शंभर जागांच्या जवळपास रोखणे हाच त्यांच्यासाठी आशादायी पर्याय ठरतो. असे झाल्यास आघाड्यांच्या कडबोळ्याला काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा मिळवत सरकार स्थापन करायचे, असा त्यांचा प्रयत्न आहे. यात या पक्षाच्या साऱ्या नेत्यांना देवेगौडा होण्याची संधी दिसते आहे.

मोदी विरुद्ध सगळे 
विरोधी पक्षांमधील दुफळी, परस्परांना छेद देणाऱ्या महत्त्वाकांक्षा, वैयक्तिक विरोध आणि ‘मोदी हटाव’ हा एकच अजेंडा यामुळे मोदी यांचे रणनीतिकार ही निवडणूक १९७१च्या इंदिरा विरुद्ध सगळे या निवडणुकीप्रमाणे होईल, यावर ठाम आहेत. त्या निवडणुकीत सर्व राजकीय पंडितांनी गणितीय आधारे इंदिरा गांधी कशा निवडून येऊ शकत नाहीत, असे छातीठोकपणे सांगितले होते. परंतु, ‘इंदिरा हटाव’ला ‘गरीबी हटाव’ या नाऱ्याने उत्तर देत त्यांनी एकहाती बाजी मारली होती.

रोजंदारीवर काम करणारा पंतप्रधान
पुढील निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांना मिळून २५० जागा मिळाल्या तरीही यातील एका पक्षाने बाहेरून पाठिंबा दिल्याखेरीज अन्य आघाडीला २७२ चा जादुई आकडा गाठणे शक्‍य होणार नाही. याचा अर्थ व्ही. पी. सिंग, चंद्रशेखर, देवेगौडा वा गुजराल यांच्याप्रमाणे रोजंदारीवर काम करणारा पंतप्रधान मिळू शकतो. नरेंद्र मोदी वा राहुल गांधी वगळता देशातील एकही नेता ५० पेक्षा अधिक जागा मिळविण्याच्या क्षमतेचा नाही. त्यामुळे असे नेते पाच वर्षांसाठी सोडा एक वर्ष तरी सोबत राहतील काय, हा कळीचा मुद्दा आहे. असे नवरदेव नसलेल्या ‘शिवजीकी बारात’मधील पक्षांचे सरकार अल्पजीवी ठरेल. १९७९ मध्ये जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या संतालाही विरोधकांची एकजूट ठेवणे जमले नव्हते. चेहरा नसलेल्या विरोधकांच्या ऐक्‍यात मोदी यांना फक्त आपले भाषण सांगणे सोयीचे असून मतदार त्यांचे ऐकण्याची शक्‍यता अधिक आहे. तसे झाले नाही आणि दहा महिन्यांचे सरकार आले तरीही अमित शहा यांना ५० वर्षांसाठी भाजपचे सरकार अशी बढाई मारण्याची संधी आहेच की.

पर्याय खुले
भाजपमधील चाणक्‍य २०१९ च्या निवडणुकीची तुलना १९७१च्या निवडणुकीशी करीत असताना प्रत्यक्षात त्यापेक्षाही चांगली परिस्थिती राहू शकते. याची दोन कारणे आहेत. १९७१ मध्ये तसे झाले नाही; परंतु या निवडणुकीत विविध राज्यांमध्ये स्थानिक पक्षांकडे मोठ्या संख्येने जागा जातील. यातील द्रविड राजकारण करणाऱ्या पक्षांपासून ते मायावती यांच्या पक्षापर्यंत तसेच ममता यांच्या पक्षाला विचारधारेचे सोवळे नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी  सर्व पर्याय खुले असतील. या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांना मिळून ५४३ पैकी अधिकाधिक ३५० जागा मिळतील, असा अंदाज आहे. त्या ३०० च्या आसपास राहिल्या तर सर्व प्रकारच्या शक्‍यता पुढे येतील. त्या २७५च्या आसपास असतील तर मात्र हे पक्ष उदार मनाने शिकारीसाठी सरसावतील. हे स्थानिक पक्ष भाजपकडेही वळण्याची शक्‍यता मोठी आहे.  दुसरे कारण असे, की आज भाजप विरोध असला तरी काँग्रेस विरोधाचा आवेगही आहेच. १९७१मध्ये अशी परिस्थिती नव्हती. अशा स्थितीत गैरभाजप, गैरकाँग्रेस आघाडीचे सरकार ५० जागांची क्षमता असलेल्या पक्षांच्या नेत्यांना खुणावते आहे.

(अनुवाद - किशोर जामकर)

Web Title: shekhar gupta article former Prime Minister is better than the former Chief Minister