भाजप जात्यात, मोदी सुपात 

भाजप जात्यात, मोदी सुपात 

मागील काही वर्षांत निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये केलेल्या दौऱ्यात प्रकर्षाने समोर आलेली बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींची अद्याप कायम असलेली लोकप्रियता. सर्वसामान्य जनता ज्या गोष्टींबद्दल संतापते त्याबद्दल नक्कीच संतापत आहे. यामध्ये भाववाढ (विशेषत: पेट्रोल आणि डिझेल), शेतीवरील संकट, बेरोजगारी, व्यवसायातील घट, नोटाबंदी आणि वस्तू व सेवाकर (जीएसटी) यासह अनेक मुद्दे आहेत. यातील अनेक मुद्‌द्‌यांबाबत भाजपच्या केंद्र व राज्यांतील सरकारांकडे थेट बोट दाखवता येते. 

विशेष म्हणजे या सर्व गोष्टींचा परिणाम पंतप्रधानांवर झालेला दिसत नाही. त्यांचा स्वत:चा असा ब्रॅंड कायम आहे. तो सरकार, पक्ष आणि तथ्य या सर्वांच्या वर आहे. यासाठी अमेरिकी संकल्पना ‘टेफ्लॉन कोटेड’ वापरणे हे अतिशय गुळगुळीत असून, आळशीपणाचे ठरेल. मात्र, हा ब्रॅंड ‘टेफ्लॉन कोटेड’ असण्यापेक्षा टिटॅनियमचा बनल्यासारखा वाटतो. एका व्यक्तीने स्वत:हून बनविलेला हा ब्रॅंड भारतीय राजकारणात अभूतपूर्व आहे. 

घराणेशाही व प्राधान्यक्रमाखाली दबलेल्या आणि भारतीयतेची पार्श्‍वभूमी असलेल्या व्यवस्थेतील नरेंद्र मोदी एक स्वयंभू नेते आहेत. त्यांनी स्वत:चा ‘सुपरब्रॅंड’ निर्माण केला आहे. त्यांचे राजकारण आणि अर्थधोरण वाईट असले तरी मोठ्या प्रमाणात भारतीय या ब्रॅंडचे समर्थन करतात. त्यांना विरोध करणारे सर्वच स्तरांमध्ये आहेत. अल्पसंख्य, कटिबद्ध समाजवादी आणि आता दलितांमधून त्यांना विरोध वाढू लागला आहे. मात्र, मागील अनेक दशकांमध्ये मोदींसारखा करिष्मा मी पाहिलेला नव्हता. 

राजीव गांधी हे अतिशय लोकप्रिय होते (मोदींपेक्षा) आणि डिसेंबर १९८४ पासून सत्तेतील पहिल्या १८ महिन्यांत त्यांनी कोणतीही चूक केली नाही. मात्र, १९ व्या महिन्यापासून ते बोलतील त्या गोष्टीला लहान मुलेही हसू लागली. एका ‘रॉकस्टार’ पंतप्रधानाचे विनोदात रूपांतर होण्यास एवढा कमी अवधी लागला होता. प्रत्येक नेत्याला सरकारविरोधी लाटेचा सामना करावा लागते. सध्याच्या अधिकाधिक संपर्काच्या आणि घाईच्या काळात मधुचंद्राचा कालावधी अतिशय अल्प असतो. हे वैश्‍विक सत्य नरेंद्र मोदींना लागू होत नाही का? 

यावरून मला काही जण ‘भक्त’ ठरवतील. आता एक प्रश्‍न. सरन्यायाधीश, राष्ट्रपती, निवडणूक आयोग आणि पत्रकार मतदान करतात. तुमच्या मतदानाचा प्राधान्यक्रम तुमच्या व्यावसायिक विवेकावर मात करतो का? आता माझा पुढचा प्रश्‍न आहे. मोदी कर्नाटकमध्ये त्यांच्या पक्षाला बहुमत मिळवून देऊ शकले नाहीत, असे म्हणता येईल का? त्यांच्याच राज्यात गुजरातमध्ये काठावर बहुमत मिळाल्यानंतर काही महिन्यांतच कर्नाटकचे निकाल लागले आहे. त्यांच्या पक्षाची लोकप्रियता घसरू लागली आहे का? याचे उत्तर होय आहे. भाजपची घसरण सुरू आहे; परंतु पंतप्रधानांची नाही. गुजरात आणि कर्नाटकमध्ये मोदींचे आगमन होईपर्यंत जनमत भाजपच्या बाजूला नव्हते. गुजरातमध्ये त्यांच्या पक्षाला बहुमतापेक्षा आठ जागा अधिक मिळाल्या आणि कर्नाटकात तेवढेच आमदार त्यांना कमी पडले. कर्नाटकातील कल चाचण्यांनुसार, काँग्रेसला मतांच्या टक्केवारीत पाच टक्के पुढे दाखविण्यात आले होते. या चाचण्या मोदींचे राज्यातील आगमन होण्याआधीच्या होत्या. त्यांनी शेवटच्या टप्प्यात जोर लावला नसता तर काय परिस्थिती दिसली असती, याचा विचार करा. या निवडणुकांमध्ये विजय खेचून आणण्याएवढे ते लोकप्रिय आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये स्थानिक नेत्यांचे उत्तरदायित्व मोदींवर होते. विजय रूपानी हे कोणीच नव्हते. येडियुरप्पा हे वृद्ध, रागीट, भ्रष्टाचारात अडकलेले आणि एका जातीचा शिक्का बसलेले नेते आहे. कर्नाटकात मोदी यांच्या २१ रॅलींनी हे चित्र बदलले. उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटकमध्ये मोदींनी मते मागताना स्वत:साठी मागितली. राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये मोदींविरोधात; तर कर्नाटकमध्ये सिद्धरामय्या यांच्यासाठी मत हवे होते. यातून मिळालेले अपयश स्पष्ट आहे. 

कर्नाटक दौऱ्यात गदग येथे महाविद्यालयीन युवतींशी मी संवाद साधला. यातील सर्वच या वर्षी अथवा पुढील वर्षी मतदान करतील, अशा प्रथम मतदार होत्या. यातील प्रत्येक तरुणीने मोदींमुळे भाजपला मतदान करणार असल्याचे बोलून दाखविले. परंतु का? या प्रश्‍नावर त्या म्हणाल्या, की स्वच्छ भारतमुळे आमची खेडी ७५ टक्के स्वच्छ झाली आहे. डिजिटल इंडियामुळे जगात भारताची प्रतिमा सुधारली असून, भ्रष्टाचार संपला आहे. त्यांनी हे ‘सत्य’ स्वत:पुरते स्वीकारल्याने त्यांच्याशी वादविवाद करण्यात अर्थ नव्हता. राहुल गांधींबद्दल काय वाटते? या प्रश्‍नावर त्या म्हणात्या, ते चांगली व्यक्ती असावेत; पण आम्हाला नक्की सांगता येणार नाही. म्हणजे आम्हाला नेता म्हणून केवळ मोदी माहिती आहेत. 

कोणतीही विचारसरणी नसलेली आणि भारताचे काही देणे लागत नसलेल्या तरुण पिढीबद्दल मी २०१४ च्या निवडणुकीनंतर लिहिले होते. त्यांचे घराणी आणि त्यांनी केलेला त्याग याबद्दल कोणतेही स्वप्नरंजन नाही. या पिढीच्या मनात केवळ मोदी हेच नेते आहेत. त्यांना दुसरा नेता माहितीच नाही. कर्नाटक, गुजरात आणि उत्तर प्रदेशात हे समोर आले आहे. प्रौढांनी मात्र पक्षनिष्ठा बदललेल्या नाहीत. यामुळे मोदींविरोधकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात मते मिळत आहे; परंतु तरुणांचा विचार करता चित्र वेगळे आहे. पुढील वर्षी १४ कोटी तरुण मतदार असतील. त्यांच्यात विभिन्न मते असतील मात्र, त्यांचा पाठिंबा मोदींना असेल. 

इथपर्यंत मोदी आले कसे? त्यांनी स्वच्छता, प्रामाणिकपणा, शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा वापर यासारख्या चांगल्या गोष्टींचा संदेश दिला. याचवेळी या गोष्टी तुम्हीच कराव्यात, अशी जबाबदारी टाकली. कोणतीही गोष्ट त्यांच्यावर उलटल्यानंतर ते गप्प राहिले. कथुआ बलाकारप्रकरणी ते बोलले नाहीत. नंतर मात्र, त्यांनी मुलींचे संरक्षण आणि मुलांमध्ये सुधारणा करण्याची आवश्‍यकता मांडली. त्यांनी उना प्रकरणावर बोलणे टाळले. नंतर दलित बांधवांबद्दल आत्मीयता व्यक्त केली. ते कधीही बचावात्मक पातळीवर जात नाहीत. ते कायम उच्च नैतिक पाळीवर राहणे पसंत करतात. कोणत्याही गोष्टीबद्दल स्व:तला जबाबदार ठरविले जाऊ नये, अशा प्रकारचे वातावरण ते निर्माण करीत आहेत. नोटाबंदीसारख्या चुकीच्या निर्णयातही त्यांना भारतासाठी तुम्ही वेदना सहन करा, असे आवाहन जनतेला केले. हे म्हणजे तुमच्या दु:खावरून सिद्ध होते, की देव आहे आणि त्यामुळे त्याची तुम्हाला गरज अशा पद्धतीचे आहे. सध्याचे नवमतदार मोदींमुळे प्रभावित झाले आहेत. ते अद्याप रोजगाराच्या बाजारात न उतरल्यामुळे त्यांचे मोदीप्रेम कायम आहे. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात मोदी हे सर्वाधिक धुव्रीकरण करणारे नेते आहेत. त्यांचा तिरस्कार करणारे आणि प्रेम करणारे माझे हे म्हणणे मान्य करणार नाहीत. 

जनतेचा कौल महत्त्वाचा ! 
एखादा नेता त्याच्या पक्षाच्या प्रतिमेचा स्वत:वर परिणाम होऊ न देता, सर्वांवर मात करून वरची पायरी चढतो. याचे प्रमाण आपल्यासमोर आहे. आपणा सर्वांना माहिती आहे, की त्यांच्या नेतृत्वाखाली अर्थव्यवस्थेची घसरण झाली, रोजगारातील वाढ थांबली, सामरिक संबंध आणखी बिघडले आहेत. याचबरोबर सामाजिक संघर्षही धोकादायकरीत्या वाढीस लागले आहेत. त्यांचे आघाडीवरील नेते कसेही असले तरी पुरेशी जनता मोदींसाठी मतदान करीत आहे. आता स्वत:च मोदीच २०१९ मध्ये निवडणुकीत समोर असतील त्या वेळी जनता काय करेल? 

(अनुवाद - संजय जाधव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com