जानव्याच्या चक्रव्यूहातील राहुल

शेखर गुप्ता
सोमवार, 3 डिसेंबर 2018

काँग्रेसच्या राजकारणात आपल्या धर्माचा रंग मिसळण्याचे साहसी पाऊल राहुल गांधी यांनी उचलले आहे. यात एक तर ते विजयी होऊ शकतात, वा त्यांना परागंदा व्हावे लागेल; पण या चक्रव्यूहातून कुठल्याही परिस्थितीत ते मागे हटू शकत नाहीत.

आपण हिंदू आणि त्यातही उच्च कोटीचे ब्राह्मण असल्याचे जाहीर करून राहुल गांधी यांनी एकाच वेळी आपल्या वैचारिक विरोधकांना चकित तर संभाव्य मित्रांना नाराज केले आहे. या दोन्ही आघाड्यांवर त्यांना नाराजीचा सामना करावा लागत आहे. देशातील राजकीय परिस्थितीचा विचार करता, या टप्प्यावर त्यांनी असे करून एक साहसी आणि हुशार राजकीय खेळी खेळल्याची चर्चा सुरू झाली आहे. राहुल यांनी आपण ब्राह्मण असल्याचे सांगितल्यामुळे भाजपचा एवढा संताप झाला आहे की, या पक्षाच्या नेत्यांनी त्यांचे गोत्र जाणून घेण्याचा, एवढेच नव्हे तर ते जानवेधारी ब्राह्मण आहेत की नाही, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचे गोत्र पुढे आल्यानंतर तर ही अस्वस्थता अधिकच वाढली. त्यांनी चक्क विज्ञान व तंत्रज्ञान मंत्र्यांकडे ब्राह्मणांमध्ये गोत्राचा प्रसार कसा होतो, याची तंत्रशुद्ध मांडणी करण्याची जबाबदारी सोपविली आहे. राहुल यांच्या या दाव्याने काय साध्य केले, ते आता बघूया. 

आतापर्यंत राहुल गांधी हे हिंदू आहेत की छुपे ख्रिश्‍चन, यावर चर्चा चालायची. यानंतर चर्चेचा सूर ते खरेच ब्राह्मण आहेत काय, असा झाला. आता ते स्वतःला दत्तात्रेय गोत्राचे काश्‍मिरी कौल ब्राह्मण म्हणू शकतात काय, यावर खल होत आहे. धर्म, जात आणि गोत्र हे राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहे. राहुल गांधी यांनी हा मुद्दा जाणीवपूर्वक उपस्थित केला असावा, असे आत्ता तरी खात्रीशीरपणे सांगता येत नाही. गुजरातमधील निवडणुकीदरम्यान त्यांनी वेगवेगळ्या मंदिरांना भेटी देणे सुरू केले आणि त्यातून नकळत हा मुद्दा पुढे आला असण्याची शक्‍यता आहे. तुम्ही राहुल वा काँग्रेसचे पाठीराखे असाल तर या प्रकाराला एक धुरंधर राजकीय खेळी असे संबोधू शकता. तुम्ही भाजपचे चाहते असाल तर असे करून राहुल यांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्याचे मत मांडू शकता. त्यांना हिंदूंची मते तर मिळणार नाहीच, शिवाय सेक्‍युलर आणि विशेषतः मुस्लिमांची मते त्यांना मिळणार नाहीत, असे तुम्ही म्हणू शकता. हिंदी पट्ट्यात म्हणतात ना, ‘दुविधा में दोनो गये, माया मिली ना राम!’ 

दुसरीकडे राहुल यांनी डावे-धर्मनिरपेक्ष-उदार भाष्यकार समर्थकांना घाबरवून सोडले आहे. त्यांनी भूमिका बदलून काँग्रेसनेच आतापर्यं जपलेल्या मूल्यांशी प्रतारणा केली असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. पक्षाच्या विचारसरणीची नव्याने मांडणी, असेही त्यांच्या खेळीकडे बघितले जात आहे. यासंदर्भाने व्यक्त झालेली मते पाहा. आपण आस्तिक आहोत असे राहुल यांना सांगायचे असेल तर ते सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांना भेटी देऊ शकत नाहीत काय, असा सवाल सुहास पळशीकर यांनी केला आहे. दुसरीकडे नेहरू आणि गांधीजी यांचे आत्मकथाकार रामचंद्र गुहा म्हणतात की, ज्या पक्षाचे आपण पाईक असल्याचे राहुल सांगतात, त्या पक्षाच्या सर्वोच्च परंपरांना त्यांच्या मंदिरभेटींमुळे छेद दिला आहे. नेहरू वा गांधीजी यांना अशा निर्लज्ज बहुसंख्यवादाचा धक्काच बसला असता. तर ब्राह्मण असल्याच्या ३० फायद्यांचा मोह त्यांना झाला असल्याची टीका दिलीप मंडल यांनी केली आहे.

या साऱ्या प्रकरणात राहुल यांच्यावर मुख्य आरोप होत आहे तो ढोंगीपणाचा; पण ढोंगीपणा हे राजकारणात ओझे कधी ठरते? उलट हा गुण अत्यावश्‍यक आहे. या देशातील कुठला पुढारी ढोंगी नाही? पत्रकारितेच्या प्रारंभीच्या काळात मी भारतीय राजकारणाचा विद्यार्थी असताना ओमप्रकाश चौटाला यांना एक प्रश्‍न विचारला होता. चौटाला कुटुंबीयांचे राहणीमान बघता त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या बाता करणे ढोंगीपणा नाही काय, असा प्रश्‍न मी त्यांना विचारला. त्यावर त्यांचे उत्तर होते, ‘भाईसाहब, हम राजनीती करने आए हैं या तीर्थयात्रा पे?’ 

आता तडजोडी सुरू होतील. तोंडी तलाकच्या मुद्‌द्‌यावर राहुल यांची काँग्रेस सुरक्षित अंतर राखून आहे, राम मंदिराच्या मुद्‌द्‌यावर शून्यावर, तर शबरीमला मुद्‌द्‌यावर आरएसएससोबत असल्याचे दिसते. मध्य प्रदेशातील या पक्षाचा गाय आणि गोमूत्रावर आधारित जाहीरनामा बघा. यामुळे उदारमतवाद्यांचा राहुल यांच्यावरील राग समजण्यासारखा आहे. तथापि, नेहरू विचारांनी भारीत कठोर धर्मनिरपेक्षतेचा झेंडा घेऊन त्यांचा राजकीय टिकाव लागू शकत नाही. भूमिकेतील बदलामुळे त्यांना निवडणुकीत विजय मिळविता येईल, असे मुळीच नाही. साध्या जेएनयूत त्यांना कुणाला निवडून आणता येणार नाही. दुसरीकडे त्यांनी आपल्या आजीच्या विचारांची कास धरली तर आस्था आणि राष्ट्रीयत्व या दोन विचारांवर सध्या भाजपकडे असलेला एकाधिकार काही प्रमाणात नाकारला जाऊ शकतो. 

नेहरू यांनी वारशात दिलेल्या भारतापेक्षा आजच्या भारताची परिस्थिती फार वेगळी आहे. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेस आणि यूपीएने धर्म व परंपरांवर आधारित संस्कृती आणण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना फारसे यश लाभले नाही. यामुळे ते अधिकच परके वाटू लागले. या देशातील संसाधनांवर अल्पसंख्यकांचा पहिला हक्क आहे या माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या विधानाचे भूत काँग्रेसच्या मानगुटीवरून अद्याप उतरलेले नाही. हिंदु-राष्ट्रवाद हे मैदान यूपीएने मोदी यांच्या भाजपसाठी अक्षरशः खुले करून दिले. या पार्श्‍वभूमीवर राहुल यांच्या राजकीय धोरणातील बदलामागे तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान आहे, असे वाटत नसले तरीही हा बदल त्यातील धाडसीपणामुळे वेगळा भासतो. अपरिचित वाटेवर जाणुनबुजून प्रवास सुरू करायचे धाडस त्यांनी दाखविले आहे. भाजप-संघातील काही धुरीणांना तर राहुलला भाजप-संघाला अनुकूल अशा स्थानावर येणे भाग पडले आहे, असे वाटते. राहुल यांनी राजकीय चक्रव्यूहात प्रवेश केला आहे. यात एक तर त्यांचा विजय होईल वा पराभव. आता त्यांना मागे हटता येणार नाही. आता त्यांनी ‘थोडे हे, थोडे ते’ असे धोरण स्वीकारले तर या धोरणाने सन १९८९ मध्ये त्यांच्या वडिलांना कुठे नेऊन ठेवले होते, हे ठाऊक आहे.

हुशारपणाचे लक्षण
आजीने त्यागलेले जानवे राहुल यांनी आज उचलले असेल तर त्याकडे हुशारपणाचे लक्षण म्हणून बघितले पाहिजे. कारण २०१४ च्या निवडणुकीत हिंदुत्वावर हक्क सांगणाऱ्या भाजपने काँग्रेसच्या जागा ४४ पर्यंत कमी केल्या आहेत. तसेही देवांना विरोधकांच्या हवाली करण्यात काय हशील? तुम्ही राहुल यांचे वागणे नैतिकतेला धरून नाही, असे म्हणू शकता; परंतु राजकारणात मला अद्याप ‘मर्यादा पुरुषोत्तम’ भेटलेला नाही. 

(अनुवाद - किशोर जामकर)

Web Title: shekhar gupta article on rahul gandhi