सर्वांत यशस्वी राजकीय स्टार्टअप

सर्वांत यशस्वी राजकीय स्टार्टअप

गेल्या दशकभरात भारतात स्टार्टअपचा झालेला उदय ही अत्यंत आशादायक बाब आहे. भारतात शेकडो स्टार्टअप कंपन्या स्थापन झाल्या असून, त्यातील एक डझनहून अधिक कंपन्यांनी दहा लाख डॉलरचे मूल्यांकन अत्यंत कमी कालावधीत प्राप्त केले आहे. याबाबत बरेच लिहिले-बोलले गेले आहे. आपला मुद्दा मात्र राजकीय आहे. त्यामुळे आपल्या दृष्टिकोनातून या दशकातील सर्वोत्तम राजकीय स्टार्टअप म्हणजे अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष. याची अनेक कारणे आहेत. 

देशातील प्रस्थापित राजकीय पक्ष आणि जात-धर्म-वैचारिक शक्तींच्या ठरलेल्या मतपेढ्या, लोकसभेपासून पंचायतींपर्यंत सर्वव्यापी असलेला घराणेशाहीचा प्रभाव, यामुळे राजकारणात नव्याने प्रवेश करणाऱ्यांचा मार्ग अत्यंत निमुळता झालेला आहे. त्यामुळेच तर जनसंघ, स्वतंत्र पार्टी आणि जनता पार्टीपासून ते तेलगू देसम, बिजू जनता दल, तृणमूल काँग्रेस आणि द्रमुकसारख्या पूर्वीच्या काळातील स्टार्टअप पक्षांनी वैचारिकता, नेतृत्व, मतपेढ्या किंवा जातींची निष्ठा वगैरे गोष्टी तत्कालीन बलवानांकडूनच जशाच्या तशा उचलल्या. ‘आप’ मात्र याहून निराळा पक्ष ठरला आहे. छोट्या, तरीही अत्यंत महत्त्वाच्या राज्यात स्वत:चे स्थान बळकट करून देशभरातून त्या स्थानाला मान्यता मिळविणे, ही अतुलनीय कामगिरीच म्हणावी लागेल. 

‘आप’ची स्थापना अधिकृतपणे २२ नोव्हेंबर २०१२ ला झाली. या स्थापनेची बीजे मात्र २०१० च्या उत्तरार्धातच रुजविली गेली होती. संयुक्त पुरोगामी आघाडीने, स्पष्टच सांगायचे तर काँग्रेसने पायावर दगड मारून घेण्यास सुरुवात करण्याचा आणि प्रमुख विरोधक असलेल्या भाजपमधील संभ्रमावस्थेचा हा काळ होता. नरेंद्र मोदींनी भाजपचा ताबा घेण्यापर्यंत दिल्लीच्या राजकीय अवकाशात पोकळी निर्माण झाली होती. याच काळात सामाजिक कार्यकर्त्यांचे आधारस्तंभ आणि भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचे प्रचारक म्हणून अरविंद केजरीवाल यांना राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळण्यास सुरुवात झाली होती. तुम्ही आठवा, हाच तो काळ होता, ज्या वेळी राजकारण ते प्रशासन, माध्यमे, कंपन्या आणि जवळपास सर्व प्रस्थापितांवरील जनतेचा विश्‍वास आणि आदर उडून गेला होता. सर्वच जण चोर वाटत असल्याने जनता सभ्य माणसाच्या शोधात होती. अशा वेळी सत्तेचा आणि त्यामुळे भ्रष्टाचाराचा स्पर्शही न झालेले केजरीवाल आणि त्यांची तरुणांची टीम पुढे आली. 

टीम केजरीवालची राहणी साधी होती. ते सामान्यांचीच भाषा बोलत होते आणि आश्‍वासक वाटत होते. अशा वातावरणात अण्णा हजारे यांच्या रुपाने ही शक्ती अनेक पटींनी वाढविण्याचा स्रोत राष्ट्रीय राजकारणाच्या अवकाशात उदयास आला. हे लोक डावे नव्हते, उजवे नव्हते आणि मध्यममार्गीही नव्हते. त्यामुळे ते कोणत्याही पक्षावर, विचारसरणीवर टीका करू शकत होते. ते राजकीय बाजारपेठेत पाय रोवू पाहत होते, पण त्यांचे उत्पादन इतरांप्रमाणे अजिबातच नव्हते.  

अण्णा हजारेंच्या चळवळीपासून मी ‘आप’चा टीकाकार आहे. मी त्यांच्या अस्तित्वात नसलेल्या विचारसरणीचा शोध घेण्याच्या प्रयत्नात मी केजरीवाल यांची ‘स्वराज’ ही पुस्तिका वाचली. या पुस्तिकेत प्राचीन काळापासून सांगितलेल्या विचारांची सरमिसळ आहे. या पुस्तकात सांगितलेल्या योजनेनुसार त्यांना देश आणि ‘सिस्टीम’ बदलायची असेल तर ते कधीही शक्‍य नाही, असे मी तेव्हाच म्हटले होते. त्या लोकांचा शहाणपणा असा की, सत्तेत आल्यावर ते हळूहळू वास्तवात जगण्यास शिकले. आता हे लोक कोणावरही आक्रस्ताळी टीका करत नाहीत, मोर्चे काढत नाहीत. त्यांच्यातील हा बदल आणि त्यांना मिळालेले यश हे राजकीयदृष्ट्या निश्‍चितच कौतुकास पात्र आहे. 

दिल्लीतील आगामी निवडणूक जिंकली तरी केजरीवाल आणि ‘आप’ला बराच पल्ला पार करायचा आहे. मात्र, ते आता अत्यंत लवचिक धोरण असलेला प्रस्थापित पक्ष बनले आहेत. आपण त्यांच्या धोरणांशी सहमत असू अथवा नसू, त्यांना मोदींसह  कोणीही दुर्लक्षित मात्र करू शकत नाही.  

हुशारी आणि तत्परता
अरविंद केजरीवाल यांची तुलना राहुल गांधी या त्यांना समवयस्क असलेल्या नेत्याबरोबर करू. मोदी पर्वापासून राष्ट्रवाद, धर्म आणि विकास या राजकारणासमोरील तीन आव्हानांच्या संदर्भात ही तुलना करता येईल. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा वाद सुरू असताना राहुल गेले तसे, केजरीवाल कधीही ‘जेएनयू’मध्ये गेले नाहीत. ‘तुकडे-तुकडे’ प्रकारातून निर्माण झालेल्या वादापासून केजरीवाल हुशारीने दूरच राहिले. सर्जिकल स्ट्राइक आणि कलम ३७० वरून सरकारचे समर्थन करण्यात केजरीवाल यांनी तत्परता दाखविली. केवळ मोदीच राष्ट्रवादी आहेत, हे त्यांना सिद्ध होऊ द्यायचे नव्हते. राहुल गांधी ज्या वेळी मंदिर दौरे करत होते, त्या वेळी केजरीवालांनी आपले मवाळ हिंदुत्व जपत डाव्यांच्या शुद्ध निधर्मीवादाच्या मागणीला दूर ठेवले. एवढेच नाही तर, ज्येष्ठ नागरिकांना मोफत यात्राही घडवून आणल्या. या यात्रास्थानांमध्ये बहुतांशी ठिकाणे हिंदू आणि शीख तीर्थस्थळे होती, तरी यामध्ये एक नाव अजमेर शरीफ हेदेखील होते. 
(अनुवाद : सारंग खानापूरकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com