
आकसणारी काँग्रेस आणि भाजपला चिंता
२००९ आणि २०१४ ते २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान भाजपने मतांची टक्केवारी दुप्पट केली आणि सत्तेचा सोपान पार केला. त्यापुढे जाऊन आजघडीला भाजप देशातील भक्कम पक्ष बनलेला आहे. हे समोर येणाऱ्या आकडेवारीवरून अगदी पुराव्यानिशी दिसून येत आहे. २०१७ पासून भारताच्या अर्थव्यवस्थेला ब्रेक लागला आहे. त्यातून सावरण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत; पण ते फारच तोकडे पडताना दिसत आहे. बेरोजगारी वाढतच आहे. त्याबरोबरीने महागाईचा आलेख उंचावतच आहे. इंधन आणि खाद्यतेलाच्या किमती चढत्या आहेत. त्याला दोन वर्षांच्या कटू कोरोनाचीही साथ लाभलेली आहे. एकूणच सामान्यांची जगण्यासाठी कसरत सुरू आहे. मात्र, असे असूनही मतदारांचा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वास कायम आहे. बरं, हे मतदार भाजपचे म्हणता येतील असे किंवा जे मूळ हिंदुत्व जपणारे मतदार आहेत. २००९ मध्ये याच मतदारांनी भाजपला मतदान केले होते.
त्यांनाच भाजपने आकर्षित करून बांधून ठेवल्याचे दिसून येते. सद्यःस्थितीत देशाची अर्थव्यवस्था नाजूक बनलेली आहे. त्यावरून मतदार चिडत आहेत. मात्र, तरीही ते भाजप आणि मोदींपासून फारकत घेताना दिसत नाहीत. हे असे कशामुळे होते याचा विचार केल्यास समोर येणारी कारणे ही आश्चर्यचकित करणारी आहेत. ते भाजपला पर्याय शोधत आहेत.मात्र राहुल गांधी हे त्यांना पर्याय वाटत नाहीत आणि त्यांना खिचडी सरकारचा पर्यायही नको आहे. म्हणजेच भाजपच्या अपारंपरिक मतदारांपैकी अनेक मतदार विरोधी छावण्यांमध्ये उभे राहण्यास सुरवात झाली आहे. मात्र ते काँग्रेसच्या छावणीत न जाता इतर पक्षांना आपलेसे करत आहेत.हा बदल फार महत्त्वाचा आहे.याचा मोठा धोका काँग्रेसला बसतो आणि आणि भविष्यातही बसणार आहे.हे होत असताना भाजप आणि नरेंद्र मोदी यांना पर्याय नाही हे अधोरेखित होत आहे.काँग्रेसला मात्र पर्याय उभा राहत आहे आणि ही बाब काँग्रेससाठी गंभीर आहे.
एकीकडे मोदींचा झंझावात कायम असतानाही काँग्रेसने २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत २० टक्के मतदार कायम राखण्यात यश मिळविले आहे.देशातील इतर पाच प्रमुख पक्षांची एकत्रित मतांची गोळाबेरीज केली तरी ती २० टक्क्यांपर्यंत जात नाही. त्यामुळे भविष्यातही भाजपच्या विरोधात काँग्रेसकेंद्रित आघाडीच आव्हान उभे करू शकेल. मात्र, त्यासाठी यापुढे काँग्रेसची निष्ठावान व्होट बँक टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. काँग्रेसशिवाय कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला नरेंद्र मोदी यांना आव्हान देणे शक्य होणार नाही. त्यासाठी प्रशांत किशोर यांच्यासारखे पर्यायही फारसे प्रभावशाली ठरणार नाहीत.
सद्यःस्थितीचा विचार केल्यास राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसकडे दुसऱ्या क्रमांकाची व्होट बँक असूनही काँग्रेस कोणत्याही राज्यात निर्विवाद सत्तेवर नाही आणि या पुढेही त्यात आणखी बदल होताना दिसेल. २०१४ च्या दरम्यान जेव्हा काँग्रेसचे ज्या राज्यांत वर्चस्व होते त्या राज्यांतून हळूहळू सफाया होऊ लागल्याचे दिसते.यात आंध्रप्रदेश आणि तेलंगणमध्ये सर्वाधिक वाईट अवस्था आहे. जेथे एकेकाळी या पक्षाची निर्विवाद सत्ता होती तेथे आज एकही सदस्य सभागृहात नाही. मात्र या दोन्ही राज्यांत स्थानिक पक्षांनी सत्ता काबीज केली आहे. तेथे भाजपला सत्ता मिळविता आली नाही. यातील अलीकडील उदाहरण पंजाबचे देता येईल. तेथे झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसचा दणकून पराभव झाला. येथे अरविंद केजरीवाल यांनी करिष्मा दाखवण्यात यश मिळविले आणि आप सरकार काँग्रेसपेक्षा वेगळे आव्हान उभे करू शकते, हे तेजिंदर बग्गा वरून झालेल्या प्रकारामध्ये दिसून येते.
गोव्यातील जनता जशी काँग्रेसला वैतागली होती तशीच ती भाजपलाही वैतागली होती.त्यामुळेच त्यांनी आप व तृणमूलला केलेल्या मतांची टक्केवारी वाढताना दिसते.हे मूलत: भाजपविरोधी मतदार होते. परंतु ते काँग्रेसमध्ये येण्यास तयार नाहीत.आसाममध्ये तीन वेळच्या सत्ताधारी काँग्रेसला भाजपने पराभूत केल्यानंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्यासाठी गुवाहाटी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे. मात्र येथेही ‘आप’ने आव्हान उभे केले. तेथेही भाजपने ६० टक्के मते मिळविली, काँग्रेस १३.७२ मते मिळविली तर ‘आप’ने १०.६९ टक्के मते मिळवून काँग्रेसपाठोपाठ कामगिरी केली. त्यातून राष्ट्रीय राजकारणात भाजपला नाही तर काँग्रेसला पर्याय निर्माण होत असल्याचेच दिसून येत आहे.
महाराष्ट्राचा विचार केल्यास मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होताना दिसतो. हरियाना आणि राजस्थानमध्ये पक्षांतर्गत असंतोष आहे, गुजरातमध्ये पक्षात नेमके काय सुरू आहे समजत नाही.तेथे मोठ्या दणक्यात पक्षासाठी नियुक्त केलेला नेता पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. देशभरातून भाजपचा जुना प्रतिस्पर्धी अस्ताला जात असताना काँग्रेसला भक्कम पर्याय उभा राहिला तर काय, याचा विचार करण्याची वेळ भाजपवर आली आहे.
पारंपरिक मते टिकवण्यात अपयश
काँग्रेसला पर्याय उभे राहत असताना काँग्रेस सर्वात पारंपरिक मते टिकवून ठेवण्यात असमर्थ ठरत आहे.आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डी, तेलंगणात के. चंद्रशेखर राव, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि पंजाब व दिल्लीत ‘आप’ने काँग्रेसची जागा व्यापली आहे. तमिळनाडूत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, त्यातही पक्षाची पकड नाजूक असल्याचे दिसून आले. त्यांना ३.३१ टक्के मते मिळाली. येथे भाजपने स्वतःच्या बळावर ५ टक्क्यांहून अधिक मते गोळा केली.ही देखील काँग्रेससाठी धोक्याची घंटा आहे.