बेरोजगार तरुणांचे मोदी करणार काय?

शेखर गुप्ता
सोमवार, 18 डिसेंबर 2017

बंगालमधील तरुणांसारखे ते गरीब नाहीत. अनेक जणांकडे मोटारसायकली असतात; पण ते बेरोजगार मात्र आहेत. त्यांच्यापैकी अनेक जणांकडे पूर्वी तात्पुरत्या नोकऱ्या होत्या. टाटा नॅनो क्षेत्राच्या मध्यवर्ती भागातील चारल गावात अशा तरुणांचे दोन गट दिसले. ते नरेंद्र मोदींच्या भाषणांची नक्कल करत आपल्या बेरोजगारीचे गाऱ्हाणे मांडत होते.

मतदानोत्तर चाचण्यांत तथ्य असल्यास आणि योगेंद्र यादव तसे म्हणतात म्हणजे त्यात तथ्य असेलच, मोदी जिंकतील. 2014 मध्ये मिळालेली आघाडी नक्कीच उपयुक्त ठरेल; मात्र भिंतीचे टवके उडाल्याचेही आढळते. 

"रायटिंग ऑन द वॉल' (अनिष्टाचे संकेत) या रुपकाचा वापर आपण दोन दशकांपासून करत आहोत. देशात आणि देशाबाहेर निवडणुकांच्या काळात आणि अन्य वेळी फिरताना आपण ही "भिंतीवरची अक्षरे' पाहात आलो आहोत. कान, नाक आणि मनाची कवाडे खुली ठेवून काळजीपूर्वक हे "भिंतलेखन' वाचल्यास लोकांच्या मनाचा - विचारांचा ठाव घेता येईल. काय बदलत आहे, काय बदलत नाही आणि का, हे उमगेल. त्यातून अगदी नेहमीच नसले; तरी बहुतेक वेळा लोक कोणाला आणि कोणाच्या विरोधात मत देऊ इच्छितात, हे समजते. 

2012 च्या निवडणुकीकडे चाललेल्या गुजरातमध्ये आम्ही अखेरच्या वेळी गेलो होतो (मोदी स्कूल ऑफ मार्केटिंग आणि केवळ डावी- संतप्त सक्रियता मोदींना पराभूत करू शकत नाही), तेव्हा आढळले, की नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील "भिंती' अगदी वेगळ्या आहेत. इतर ठिकाणच्या भिंतींवर फक्त "ग्राफिटी' किंवा जाहिरातीच वाचायला मिळतात. गुजरातमधील भिंतींना 2012 मध्ये वेगळा अर्थ होता. त्या भिंती म्हणजे महामार्गांच्या दुतर्फा उभ्या असलेल्या कारखान्यांच्या काळ्या - करड्या न संपणाऱ्या रेषांच्या मालिका होत्या, पाण्याने भरून वाहणारे कालवे होत्या. विमानातून खाली बघितल्यावर अगणित छोटे तलाव आणि बंधाऱ्यांनी चिन्हांकित केलेली जमीन दिसली, की आपण गुजरातवरून जात असल्याचे कळत होते. नरेंद्र मोदी यांची अजिंक्‍यता त्या "भिंतीं'वर लिहिलेली होती. मोदी यांच्या सत्ताकाळातील गुजरातमधील महत्त्वाची बाब म्हणजे, प्रकट आर्थिक अथवा रोजगारविषयक तणाव आणि "इतरां'च्या समृद्धीबाबतची चीड तसेच निराशावाद यांचा अभाव. ती स्थिती आता बदलली आहे. हे निश्‍चित; की उत्तर प्रदेशात, विशेषतः उत्तरेकडील भागात निवडणुकीच्या काळात दिसणारा हताशपणा अथवा निराशा गुजरातमध्ये आजही नाही; पण नाराजी मात्र आहे. तरुणवर्ग ही नाराजी लपवतही नाही. गावात गेल्यास, बंगालमध्ये अत्यंत परिचित असलेले चित्र येथे काही प्रमाणात दिसते. बेरोजगार तरुणांचे निरुद्देश भटकणे, धूम्रपान, मोबाईलवर खिळलेल्या नजरा, पत्त्यांचे डाव... फक्त वेळ घालवणे. 

बंगालमधील तरुणांसारखे ते गरीब नाहीत. अनेक जणांकडे मोटारसायकली असतात; पण ते बेरोजगार मात्र आहेत. त्यांच्यापैकी अनेक जणांकडे पूर्वी तात्पुरत्या नोकऱ्या होत्या. टाटा नॅनो क्षेत्राच्या मध्यवर्ती भागातील चारल गावात अशा तरुणांचे दोन गट दिसले. ते नरेंद्र मोदींच्या भाषणांची नक्कल करत आपल्या बेरोजगारीचे गाऱ्हाणे मांडत होते. अर्थात, त्यांच्यापैकी बहुतेक पाटीदार समाजातील होते, त्यामुळे ही विशिष्ट प्रकारची संतापाची भावना अपेक्षित होती. परंतु, हे दृश्‍य पूर्वी गुजरातमध्ये दिसणारे - परिचित नव्हते. हे कुठून आले, ते जाणण्यासाठी अहमदाबादमधील भिंती पाहा.

कुठल्याही विस्तीर्ण रस्त्याच्या बाजूला पूर्ण भिंतीवर रंगवलेल्या जाहिराती दिसतात. पंजाब आणि देशाच्या इतर भागांतही त्यांचे प्रमाण वाढते आहे. या जाहिराती असतात परदेशांतील निम्न दर्जाच्या शिक्षणसंस्थांत सहजपणे प्रवेश मिळवून देण्याबाबतच्या. गुजरातमध्ये पूर्वीही अशा जाहिराती दिसायच्या; पण त्यांचे प्रमाण एवढे नव्हते. आता फक्त भिंतींवरच नव्हे, तर या जाहिराती रस्त्यावरील फलकांवर, विजेच्या खांबांवर आढळू लागल्या आहेत. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया हे विकसित देश शिक्षणासाठी प्रसिद्ध असल्याचे आपण जाणतो; त्यांच्या यादीत पोलंड नवागताचे नाव समाविष्ट झाले आहे. आता, पोलंड हा देश काही दर्जेदार शिक्षणासाठी ओळखला जात नाही; परंतु काहीही करून बाहेर पडण्याइतकी निकडीची स्थिती असल्यास कोणतेही ठिकाण चालते. यातून तीन गोष्टी पुढे येतात. उच्च शिक्षणाची गरजेच्या तुलनेत कमी उपलब्धता, जे उपलब्ध आहे त्याचा निष्कृष्ट दर्जा, तसेच रोजगार मिळवण्याच्या दृष्टीने अनुपयुक्तता आणि बेरोजगारी. पंजाबमधून परदेशात होणारे स्थलांतर बहुशः अशाच प्रकारच्या हताशपणाचे निदर्शक आहे. त्यापैकी बहुतेकांना आर्थिक निर्वासितही म्हणता येईल. गुजरातमधून पूर्वी परदेशगमन व्हायचे, ते व्यापार- उदिमासाठी. सध्या परदेशी जाण्याची लाट आली आहे, ती आर्थिक निकड आणि बेरोजगारीपायी. 

अर्धवट बांधकाम झालेल्या एका इमारतीमधील सदनिकेत राहणारा 24 वर्षांचा हार्दिक पटेल अशाच प्रातिनिधिक हताशपणाचा वापर त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण राजकारणाचे इंधन म्हणून करत असल्याचे दिसते. राजकारणात अचानक आलेला हार्दिक पटेल आता गुजरातमधील रस्त्यावरचा दुसऱ्या क्रमांकाचा नेता - अलबत्‌ पाटीदार अथवा पटेल या एका जातीचा झाला आहे. अश्रुधूर आणि बंदुकीच्या गोळ्यांची तमा न बाळगता लाखो तरुण पटेल त्याच्या हाकेला प्रतिसाद देतात, त्याच्या मिरवणुकांत आणि रोड-शोमध्ये सहभागी होतात. त्यावरून मला 1980 च्या दशकातील आसाममधील लोकप्रिय नेत्याची आठवण येते. त्याच्या अनुयायांत एक प्रकारची अंधनिष्ठा आढळते. त्यांचा एक पंथच तयार झाला आहे. पाटीदार समाजाला इतर मागासवर्गाचा दर्जा आणि त्याद्वारे आरक्षण मिळावे, ही हार्दिकची मुख्य मागणी आहे. त्याच्या रोड-शोमध्ये नरेंद्र मोदी यांच्याविषयी ऐकू येणारी भाषा त्यांचे अगदी कडवे विरोधकही किमान गुजरातमध्ये वापरत नाहीत. "देखो, देखो कौन आया, मोदी तेरा बाप आया' ही घोषणा तिथे माझ्या कानावर आदळली. चोवीस वर्षांच्या तरुणाने अशी भाषा वापरणे म्हणजे वेडेपणाच वाटतो. त्याने एका स्थानिक महाविद्यालयात बी.कॉम. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. मात्र, विद्यार्थी राजकारणातून त्याचा उदय झालेला नाही. एका प्रकारच्या पटेल खाप चळवळीचे ते उत्पादन आहे. समाजाच्या चळवळीतील सहभागातून तो पुढे आला.

"आमच्या बहिणी- मुलींना इतर समाजांनी पळवून नेण्यापासून वाचवण्यासाठी' चळवळीत भाग घेतला, असे तो सांगतो. त्याच्या मूलभूत प्रेरणेची मुळे जातीयवादात खोलवर रुजलेली, सामाजिकदृष्ट्या प्रतिगामी आणि जनप्रक्षोभाला चिथावणी देणारी आहेत. त्याच्या विचारात अत्यंत स्पष्टता आहे. 

मी का लोकप्रिय आहे, ते तुम्हाला जाणून घ्यायचे आहे? माझ्या आजोबांकडे 100 बिघा जमीन होती, माझ्याकडे दोन बिघा आहे. बाकीच्या जमिनीचे काय झाले? जमिनीचे तुकडे विकून उदरनिर्वाह चालवत आहोत. प्रत्येक पटेल कुटुंबाला अशा दुर्दशेला तोंड द्यावे लागते, असे तो म्हणतो. गुजरातमध्ये कोणालाही नोकरी अथवा चांगला व्यवसाय असल्याशिवाय लग्न करणे शक्‍य होत नाही. हे दोन्ही आता उपलब्ध नाहीत. त्यामुळे मुलांना विवाह करणेही अशक्‍य झाले आहे, असा दावा तो करतो. जनभावनेला हात घालणारी भाषणे करण्याच्या कलेत नवा असला, तरी तो ज्या आत्मविश्‍वासाने बोलतो, त्यावरून त्याच्या अकालपक्व बुद्धिमत्तेबद्दल विस्मय वाटतो किंवा त्याच्या जन्माचा दाखला तरी तपासून पाहावासा वाटतो. 

पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक आरक्षण शक्‍य तरी आहे? असे तो विचारतो. त्याने काय फरक पडतो? काहीतरी विशेष तोडगा काढावाच लागेल, असे उत्तरही देतो. मोदी यांच्या सरकारने त्याला राज्यातून हद्दपार केले आणि राजस्थानमधील उदयपूर येथे स्थानबद्धतेत ठेवले. पोलिस गोळीबारात सुमारे 15 पाटीदारांचा बळी घेतला आणि एका अनोळखी स्त्रीसोबत हार्दिकच्या कथित लैंगिक संबंधांची चित्रफीत जारी केली. मोदींना पराभूत करणे, हे त्याचे सध्याचे एकमेव उद्दिष्ट आहे. निवडणूक लढवण्यासाठी वय कमी असल्याची आठवण इतरांनी करून देणे त्याला आवडते. आपल्याला कोणत्याही पदात स्वारस्य नाही, असे तो ठासून सांगतो. त्याच्या खोलीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे फ्रेम केलेले पोर्ट्रेट आणि उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यासोबत त्याची छायाचित्रे असल्याचे मी बघितले. ते "ब्रिलियंट' आहेत असे तो म्हणतो. बाळासाहेबांचे पोर्ट्रेट का? ते तुझे दैवत आहेत का? हे पाहा, त्यांच्याकडे कधीही, कोणतेही पद नव्हते, तरीही राष्ट्रपती आणि पंतप्रधान त्यांच्या घरी जाऊन भोजन घ्यायचे. बोलत असताना त्याच्या डोळ्यांत ओतप्रोत आदरासोबत आकांक्षाही दिसते. तरुण हार्दिकला पटेलांचा बाळासाहेब व्हायचे आहे. कोणत्याही पदाची शपथ न घेता रस्त्यांवरील सत्ता गाजवायची आहे. व्यापार उदीम आणि आर्थिक व्यवहारांसाठी ओळखल्या जाणाऱ्या, तसेच शेतीचा सर्वांत वेगाने विकास होणाऱ्या राज्यांपैकी एक असणाऱ्या गुजरातमध्ये त्याचा वाढता प्रभाव कोड्यात टाकतो. परंतु, शिक्षण आणि नोकऱ्यांची बिकट स्थिती अधोरेखित करणारी भिंतीवरील लिखिते वाचल्यास त्याचा उलगडा होतो. मूल्यहीन पदवी असलेला अथवा नसलेला बेरोजगार गुजराती युवक हा त्याचा संतप्त सैनिक आहे. 

गुजरातमध्ये काही बदल झालाच आहे. पूर्वीच्या तुलनेत, म्हणजे 2002 नंतरच्या काळात जास्त लोक सरकारबद्दल आणि जीवनमानाबद्दल तक्रारी करत आहेत. याला मुस्लिम वस्त्यांचा अपवाद आढळतो. मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष वस्तुस्थिती निदर्शक असले तर, तसे ते असतील. कारण योगेंद्र यादव तशी ग्वाही देतात, भाजपच जिंकेल; पण या विजयातही लोकांमध्ये असलेला असंतोष कुशाग्र नरेंद्र मोदी यांना जाणवेलच. इंडिया टुडे समूहाने घेतलेल्या "एग्झिट पोल'मधील आकडेवारी अत्यंत बोलकी आहे. मतदारांच्या सर्व वयोगटांत भाजप किंवा मोदी आघाडीवर असल्याचे दिसते. फक्त 18 ते 25 या एका वयोगटात कॉंग्रेस पुढे आहे. 

हेच इशाऱ्याचे चिन्ह आहे. आतापर्यंत युवक हेच मोदींची शक्ती होते. त्यांच्यावरच आता दबाव आल्याचे आढळते. त्याची कारणे आहेत. शिक्षण, नोकऱ्यांचे संकट, उत्पादन आणि त्यामुळे व्यापारात आलेली मंदी. याच मतदानोत्तर चाचण्यांतून असे अनुमान निघते, की मोदी किंवा भाजप यांच्यावर अधिक वय असलेल्या गटांची निष्ठा कायम आहे. 60 वर्षांवरील गट तर पूर्णतः त्यांचा पाठीराखा आहे. दबावाखाली आहे, तो फक्त युवागट आणि नरेंद्र मोदी जाणतात, की हाच गट भविष्य आहे. भाजपला 2014 मध्ये मिळालेली 27 टक्के मतांची आघाडी या निवडणुकीत उपयुक्त ठरेल. त्यात लक्षणीय घट झाली असली, तरी विजय मिळवण्यासाठी पुरेशी होईल. परंतु पक्षाला गरज आहे, ती अधिक चांगल्या स्थानिक नेतृत्वाची आणि शैक्षणिक सुधारणांची, अन्यथा घसरणीला वेग येईल, हेच 2017 मध्ये गुजरातमधील भिंतीवर लिहिलेले आहे. 
अनुवाद : विजय बनसोडे
 

Web Title: Shekhar Gupta writes about Youth unemployment and Narendra Modi