भगवेकरण फिके; हिंदुत्व मात्र विजयी

शेखर गुप्ता
रविवार, 1 डिसेंबर 2019

भाजपचे सत्ताक्षेत्र आक्रसले आहे. त्यांच्याकडील महत्त्वाच्या राज्यांची संख्या कमी झाली आहे. मात्र, हिंदुत्व या संकल्पनेला मात्र यश येत असून, देशभरातून त्याचा विजयही होत आहे. 

भाजपकडे २०१७ मध्ये असलेली सत्ता आणि आता असलेली सत्ता याची तुलना करताना तुम्ही ‘पेला अर्धा रिकामा आहे की अर्धा भरलेला आहे,’ या दृष्टिकोनातून पाहू शकता. याबाबत प्रसिद्ध झालेल्या तुलनात्मक माहितीनुसार, भाजपची राज्यांवरील सत्ता ७१ टक्‍क्‍यांवरून ४० टक्‍क्‍यांपर्यंत आक्रसली आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप उत्कर्ष बिंदूवर पोचला असल्याचे म्हटले जात असताना ही स्थिती आहे. हा ‘पेला अर्धा रिकामा’ हा दृष्टिकोन आहे. उर्वरित अर्धा भाग सांगतो. अशीच तुलना गेल्या दोन लोकसभा निवडणुकांतील निकालांची करा. जवळपास संपूर्ण उत्तर भारत, पश्‍चिम किनारा, ईशान्य भारत या ठिकाणी भाजपने अनिर्बंध वर्चस्व गाजविले. त्यामुळे मोदींचे विरोधक कशाचा आनंद व्यक्त करत आहेत? मात्र, राजकीय वास्तव हे फारच गुंतागुंतीचे आणि भगव्याच्याही अनेक छटांमध्ये दिसणारे असते. आपण या एकेका छटेचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करू.

 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

 नरेंद्र मोदी म्हणजे इंदिरा गांधी नाहीत. किंवा असे म्हणूयात की, भारतीय मतदार पूर्वीपेक्षा अधिक प्रगल्भ झाला आहे. हे मतदार आता लोकसभा आणि विधानसभेत वेगवेगळी निवड करू शकतात. इंदिरा गांधींप्रमाणेच मोदी अजूनही ‘दगडा’लाही निवडून आणू शकतात. मात्र, हे फक्त लोकसभेत. ही जादू ते विधानसभा निवडणुकीत करू शकत नाहीत. असे इंदिरा गांधी करू शकत होत्या. हरियानाचा विचार करता, लोकसभेनंतर केवळ पाचच महिन्यांमध्ये भाजपला मिळालेली मते २२ टक्‍क्‍यांनी घटली. स्पष्ट बहुमताची अपेक्षा असताना जागा कमी पडल्या. ‘कलम ३७०’ रद्द केल्यानंतरच्या अकरा आठवड्यांत लष्करी सेवा आणि राष्ट्रवादी परंपरा असलेल्या या राज्यांत झालेला हा बदल आहे. २०१४ च्या अभूतपूर्व यशानंतरही हरियाना, उत्तराखंड, हिमाचल आणि आसाम वगळता मोदींना इतर राज्ये सहज जिंकता आलेली नाहीत. पहिला पराभव २०१५ ला दिल्लीतच झाला आणि लगोलग पंजाबमध्येही हार झाली. गुजरातमध्ये सहज विजयासाठी मोदींची दमछाक झाली. कर्नाटकात कशीबशी सत्ता आली. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड तर हातचे गेले. 

भाजपच्या सापळ्यातून सुटका; शिवसेैनिकांना बळ

यातील सर्वांत मोठा लक्षात घेण्याजोगा मुद्दा म्हणजे, इंदिरा काळाच्या तुलनेत भारत हा संघराज्य म्हणून अधिक विकसित झाला आहे. लोकसभेत एका पक्षाला मतदान केले तरी विधानसभेवेळी ते आपल्या प्रदेशातील पक्षांना अधिक महत्त्व देत आहेत, मग ते भाजपचे फारसे विरोधात असो वा नसो. नवीन पटनाईक, के. चंद्रशेखर राव, वाय. एस. जगनमोहन रेड्डी ही काही उदाहरणे आहेत. जनतेने केजरीवाल, ममता बॅनर्जी या मोदीविरोधकांनाही सत्ता दिली आहे. ममतांना नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत तिन्ही जागांवर मिळालेल्या विजयामुळे हेच सिद्ध होते. भाजपला अनुकूल आणि प्रतिकूल असलेल्या पक्षांप्रमाणेच भाजपचा सत्तेतील मित्रपक्ष हा आणखी एक प्रकार आहे. त्यांचाही सामना करावाच लागतो.  

भाजपला हरवण्याचं उद्धव ठाकरेचं महासत्तानाट्य

 महाराष्ट्रातील परिस्थितीकडे वळू. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेनेसोबत का गेले, याचे साधे स्पष्टीकरण आहे : ते अस्तित्वासाठी आणि सत्तेसाठी लढत आहेत; पण मग शिवसेनेने फारकत का घेतली? भाजपच्या वाढत्या विस्तारात शिवसेनेला त्यांच्या विचारसरणीचा प्रभाव ओसरत असल्याचे दिसते आहे. ‘शतप्रतिशत’पासून स्वत:चा बचाव करण्याचा हा मार्ग त्यांनी अनुसरला आहे. 

रश्मी ठाकरेंचा शालीन वावर तर, सुप्रीया सुळे राज्यात फ्रंटफूटवर

भारताच्या नकाशावरील राजकीय रंगाच्या छटा काहीही असोत, भाजपच्या मूलभूत मुद्यांचा विचार करता, या छटांमध्ये आता भगवाही मिसळला आहे. त्यामुळे भाजप नाही तर किमान रा. स्व. संघ आपला विजय झाल्याचे निश्‍चितच म्हणू शकतो. या विधानाशी हेडगेवार, गोळवलकर आणि सावरकर सहमत होतील.

भाजपची माघार; नाना पटोले विधानसभेचे बिनविरोध अध्यक्ष!

तडजोड करावी लागणार
मोदी-शहा जोडीचा उदय झाल्यापासून भाजपने सोपे सूत्र अवलंबिले आहे. हिंदीपट्टा काबीज करा, पश्‍चिमेकडील दोन राज्ये हातात ठेवा आणि काही छोटी राज्ये ताब्यात घ्या आणि देशावर सत्ता गाजवा. या सूत्राची अंमलबजावणी राज्यांमध्ये करता आली नाही, तर मग तुम्ही संघराज्यातच अडकून पडाल. मग तुम्हाला विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर तडजोड करावी लागेल, पोलिस दल तुमचे नसेल आणि कदाचित तुमच्या चांगल्या योजनांचीही अंमलबजावणी होणार नाही. एका आदेशावर तुमची कामे होणार नाहीत. तुम्हाला त्यांना आदराने आणि समान दर्जाने वागणूक द्यावी लागेल. आणि हे करण्यासाठी तुमच्या पद्धतीतही आमूलाग्र बदल करावा लागेल. कारण, पंतप्रधान ज्या ‘सहकारी संघराज्य’पद्धतीबाबत बोलत असतात, हा केवळ मंत्र नसून त्याचे रूपांतर कृतीत होणे आवश्‍यक आहे.

 (अनुवाद : सारंग खानापूरकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shekhar Gupta writes bjp