ट्‌विटरशिवाय वाचाळता व्यर्थ आहे!

शेखर गुप्ता
रविवार, 29 जानेवारी 2017

सोशल मीडियाने आपल्या संवाद साधण्याच्या पद्धतीत अमूलाग्र क्रांती घडविली आहे; परंतु हा पारंपरिक प्रशासन, राजकारण आणि चर्चेला पर्याय ठरू शकत नाही.

मागील काही आठवड्यांत आपण सोशल मीडिया, यातही विशेषतः ट्‌विटर आणि व्हॉट्‌सऍप ही नवी शक्तिस्थाने समोर आल्याचे पहिले आहे. या माध्यमांनी जागतिक पातळीवर मोठ्या बातम्या निर्माण केल्या आहेत. यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मेक्‍सिकोचे अध्यक्ष एनिरक पेना निटो यांनी ट्‌विटरवर मुद्दा सोडून केलेल्या चर्चेमुळे मानवी इतिहासातील सर्वाधिक यशस्वी करार असलेला नाफ्ता (नॉर्थ अमेरिका फ्री ट्रेड ऍग्रिमेंट) रद्दबातल होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. जगातील सर्वांत शक्तिशाली देशाचा नेता आणि शेजारील मोठी लोकसंख्या असलेल्या देशाचा नेता यांनी केवळ 280 अक्षरांमध्ये इतिहास घडविला अथवा बिघडवला. याला कारण म्हणजे, अमेरिका बांधत असलेल्या 15 अब्ज डॉलरच्या सीमाभिंतीचा खर्च कोण करणार हा प्रश्‍न?

आता आपण आपल्या जवळचे उदाहरण पाहू. तमिळनाडूमधील जनचळवळीची सुरवात होण्यापासून ती पसरण्यापर्यंत सर्व सोशल मीडियावरून घडले. जलिकट्टूवरील बंदीच्या विरोधातील आंदोलन ट्‌विटर, व्हॉट्‌सऍप आणि फेसबुकवरून पसरले. यात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आवाज उठविला. यामध्ये बुद्धिबळपटू विश्‍वनाथन आनंद, अभिनेते कमल हसन, क्रिकेटपटू आर. अश्‍विन आणि सर्वांत आश्‍चर्यकारक म्हणजे संगीतकार ए. आर. रेहमान हेही सहभागी होते. कोणताही नेता नसलेली ही चळवळ होती. तिला कोणी अधिकृत प्रवक्ता नव्हता, की जो पुढे जाऊन चर्चा करेल आणि तोडगा काढेल. ही लोकप्रिय चळवळ केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढली. अरब जगतातील क्रांतीपेक्षा ही काही फार वेगळी चळवळ नाही. मात्र, या मुद्‌द्‌याकडे आपण नंतर वळू.

याच काळात भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांत घडलेली घटनाही महत्त्वाची आहे. भारतीय सरकारने ऍमेझॉन या जगातील बड्या कंपनीला (कंपनीकडून भारतात अब्जावधी डॉलरची गुंतवणूक होणार आहे.) माफी मागण्यास भाग पाडले. कंपनीच्या कॅनडातील संकेतस्थळावर भारतीय राष्ट्रध्वजाचे चित्र असलेल्या पायपुसण्यांची विक्री सुरू असल्यावरून हा गदारोळ निर्माण झाला होता. आपल्या परराष्ट्रमंत्र्यांनी माफीची मागणी केली आणि ती पूर्ण झाली. तसेच, त्यांनी ओट्टावामधील आपल्या राजदूतांना ऍमेझॉनकडे हा मुद्दा उपस्थित करण्याचे निर्देश ट्‌विटरवरून दिले. यात परंपरावादी सरकारने कशाप्रकारे राजनैतिक संबंध हाताळले हे पाहण्यासारसाखे आहे. नेहमीच्या पद्धतीने विचार केल्यास याप्रकरणी आपण परराष्ट्र मंत्रालयातील प्रमुखांनी अमेरिकी दूतावासाला नाराजीचे पत्र लिहिले असते.

वॉशिंग्टन, मेक्‍सिको, चेन्नई आणि नवी दिल्लीत घडलेल्या घटना पाहता एका निष्कर्षापर्यंत पोचणे एवढे पुरेसे पुरावे तुमच्याकडे जमा होतात. हा निष्कर्ष म्हणजे सोशल मीडिया आता केवळ संवाद, चर्चा आणि टीका करण्याचे साधन न राहता प्रशासन, राजकारण आणि राजनैतिक बाबींचे माध्यम बनले आहे. दुसरी बाब म्हणजे यात प्रशासनातील मोठा विलंब लागत नाही. तसेच, बंद दरवाजामागील चर्चा आणि अन्य प्रशासनातील गोष्टी यात येत नाहीत. तमिळनाडूतील आंदोलन हाताबाहेर जाण्याबद्दल तुम्ही कोणाला जबाबदार धरणार? जगातील महासत्तेचा अध्यक्ष एका जुन्या आदिवासी प्रमुख अथवा राजाप्रमाणे युद्धाची घोषणा शेजारील देशाच्या दूताचे शिर परत पाठवून करतो, या जगाशी तुम्ही कसे सामोरे जाणार आहात? जगातील सर्वांत मोठ्या ई-कॉमर्स कंपनीला तिचा सर्वाधिक वेगाने विस्तार होत असलेल्या देशातून सरकारमधील मंत्री अचानक मध्यरात्री लक्ष्य करतो. सोशल मीडियाकडून होत असलेल्या नव्या प्रशासन आणि राजकारणाच्या जगात तुमचे स्वागत!
अतिशय संतुलित आणि परिपक्व असलेले देशांचे प्रमुख, राजनैतिक अधिकारी आणि नेते या वादळात वाहवत जातात आणि पारंपरिक माध्यमे याचा माग घेत नाहीत, हे अकारण आहे. गुगलनंतर सोशल मीडियाचा प्रभाव वाढला आहे. तुमच्या आवडत्या वाहिन्यांवरील कार्यक्रम, डिजिटल न्यूज प्लॅटफार्म्स आणि जुन्या प्रकारची नीरस वृत्तपत्रे पाहा. यात तुम्हाला सोशल मीडियावर कोण काय म्हणाले हेच दिसेल. आता हे अधिक गंभीर होत आहे. ट्रम्प यांनी जगातील महासत्तेचे आदेश ट्‌विटरवरून देण्यास सुरवात केली आहे. हा सोशल मीडियाचा प्रभाव आहे.

गेले काही दिवस मी वरील घटनांचा विचार करीत आहे. यात लेबानीज- स्वीस व्यंग्यचित्रकाराचे व्यंग्यचित्र दखल घेण्याजोगे आहे. त्याने व्हाइट हाउसमधील टेबलवर ट्रम्प बसले असून, त्यांच्यासमोर "ट्विट' आणि "अण्वस्त्रे' अशी दोन बटने दाखविली आहेत. उद्योजिका किरण मुजुमदार-शॉ आणि मी कोणलाही हानी न पोचवणारे ट्‌विट विजय मल्ल्यांचे कर्ज आणि पलायन याबाबत केले. तीन मोठ्या माध्यमांनी मला किरण मुजुमदार- शॉ यांची ट्‌विटरवरील चर्चा पुढे नेण्यासाठी शोमध्ये सहभागी होण्याची विनंती केली. त्यामुळे चालू असलेल्या वादांवर प्रतिक्रिया देण्यासाठी आपण या माध्यमाचा वापर करीत आहोत.

सोशल मीडियाचे टीकाकार "इको चेंबर' अशी संकल्पना बराच काळ मांडत आहेत. आता याच "इको चेंबर'मध्ये आपले सरकार, राजकारणी, जनमत आणि चर्चा अडकली आहे. काही बाबतीत हे हानिकारक नसते. मात्र, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी सोशल मीडियावरील खोटा संदेश खरा समजून इस्राईलला आण्विक हल्ल्याचा इशारा दिला. यात मोठा धोका असून, भारताकडून अशा परिस्थितीत संतप्त प्रतिक्रिया दिल्यास काहीही घडू शकते.

हा सोशल मीडियाचा निषेध नाही. मी यात माध्यमाच्या आकर्षणात गुरफटलो असून, मलाही आता याविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. काही वर्षांपूर्वी मी असे म्हटले होते, की 8 हजार 618 अक्षरांचा लेख केवळ 140 अक्षरांत कसा बसणार? यासाठी मी हॉलिवूड अभिनेता जॉर्ज क्‍लूनी याचे वाक्‍य उद्धृत केले होते. त्याचे वाक्‍य होते, "मी माझे संपूर्ण करिअर 140 अक्षरांमुळे धोक्‍यात घालणार नाही.' यानंतर लवकरच माझे मतपरिवर्तन झाले. पहिली गोष्ट म्हणजे, टीका होण्याच्या भीतीने सोशल मीडियाचा वापर टाळण्याऐवजी तुमचा मुद्दा पटवून देण्यासाठी त्याचा वापर करावा. पत्रकारांना तंत्रज्ञानाने एक नवे साधन दिले असून, ते तुम्हाला वाचकापर्यंत पोचविते. व्यासपीठ बदलले असले तरी आता वाचक राजे झाले असून, त्यांचा सहभाग वाढला आहे.

मेलबर्नला जाताना विमानात मी बर्डमन चित्रपट पाहिला. या चित्रपटाला 2015 मध्ये चार ऑस्कर पुरस्कार मिळाले होते. यातील मुख्य पात्राला त्याच्या सुपरहिरो भूमिकेच्या बाहेर काही माहिती नसते. चित्रपटात त्याचे आणि त्याच्या मुलीचे वादाचे संवाद आहेत. तो मुलीला म्हणतो, "तुम्हाला व्हायरल होण्यापेक्षा दुसरी काही महत्त्वाकांक्षा नाही.' यावर ती म्हणते, "तुम्ही कितीही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, तरी घडणाऱ्या घटना घडत असतात. तुम्ही ब्लॉगर्सचा द्वेष करता, तुम्ही ट्‌विटरचा द्वेष करता, तुमचे फेसबुकवर पेजदेखील नाही. म्हणजे तुम्ही अस्तित्वातच नाही.'

दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स झाले असताना हे मी म्हणत आहे. मी या सर्वांचा आभारी असून, तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोचण्याचे व्यासपीठ मला मिळवून दिले आहे. तसेच, लोकांशी संवाद साधण्यासोबत ठराविक लोकांशी ठराविक गोष्टींबाबतही चर्चा अगदी कमी वेळात करता येत आहे. गंभीर लोक जे आपण आणि आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी करतात, ते कधी या माध्यमाकडे वळतील, अशी चिंता मला वाटते. राजकारण, प्रशासन आणि गंभीर वस्तुस्थितीला धरून असलेल्या चर्चेपेक्षा अतिशय साधे, सोपे, आळशी आणि कमी खर्चिक माध्यमाचा पर्याय ते निवडतील, अशीही भीती आहे.

Web Title: Shekhar Gupta's Article on Social Media