यशामागच्या सकारात्मकतेचा नेमका आलेख

book review
book review

प्रेरणादायी पुस्तकांच्या लेखन मालिकेतलं "सकारात्मकतेतून यशाकडे' हे जयप्रकाश झेंडे यांचं अलीकडंच प्रकाशित झालेलं पुस्तक.

एकूण अकरा लेखांतून त्यांनी विविध क्षेत्रांत यशस्वी झालेल्या व्यक्तींच्या गोष्टी कथन केल्या आहेत. भारतातल्या; तसंच जागतिक कीर्तीच्या व्यक्तींच्या यशस्वीतेमागील सकारात्मकता झेंडे यांनी त्यांतून अधोरेखित केली आहे. सकारात्मक विचार आणि कृतीच माणसाला आयुष्यात यशस्वी करतात, याचा मूलमंत्र झेंडे यांनी या पुस्तकातून दिला आहे. यासोबत यशस्वी होण्याचं तंत्रदेखील त्यांनी विशद केलं आहे.

महात्मा गांधी, अब्राहम लिंकन, डॉ. ए. पी. जे. कलाम, डॉ. व्हर्गिस कुरियन, धीरूभाई अंबानी, रघुनाथ माशेलकर, सचिन तेंडुलकर अशा व्यक्ती यशस्वी का होऊ शकल्या, याचं सुरेख विवेचन झेंडे यांनी "यश-अपयशाची सरमिसळ' या प्रकरणात केलं आहे. मनात जिद्द, ध्यास, स्व-प्रेरणेची जोड आणि अथक परिश्रमाची साथ लाभली, तर प्रत्येक व्यक्ती यशस्वी होऊ शकते, असं ते यातून वाचकाला सुचवतात. दृष्टिकोन म्हणजे काय, त्याचं महत्त्व आणि त्याचं मापन कसं करावं याची चिकित्सादेखील त्यांनी दोन प्रकरणांत केली आहे.

विचारांची सकारात्मकता जोपासण्यासाठी आणि ती प्रगल्भ व्हावी म्हणून आवश्‍यक अशा "मनाच्या व्यायामां'वरचं भाष्य "असे होता येईल सकारात्मक' या प्रकरणात केलेलं असल्यानं पुस्तकाचं मोल खचितच वाढलं आहे. आयुष्यातली आव्हानं, प्रतिकूलता यांना भिडून त्यांच्यावर मात करताना दुर्दम्य इच्छाशक्तीचा कस लागतो, हे एव्हरेस्ट शिखर सर केलेल्या अरुणिमा सिन्हा, एरीक वैहेनमायर यांच्या; तसंच अंधत्व आणि मूकबधिरपणाचाही सामना करणाऱ्या हेलन केलर यांच्या उदाहरणांतून झेंडे यांनी यथार्थ स्पष्ट केलं आहे.

पुस्तकातले सुविचार, सूचना, बोधपर वचनं, काव्यपंक्ती, उद्दिष्ट साध्य करण्याच्या क्‍लृप्त्या, दाखले आणि चौकटीतले संदेश यामागं लेखकानं घेतलेले परिश्रम जाणवतात. या पुस्तकावरचं मुखपृष्ठ आणि आतली मांडणी लक्षवेधक अशीच आहे. सगळ्या वयोगटाच्या व्यक्तींना उपयुक्त अशा "सकारात्मकते'वरच्या या प्रेरणादायी पुस्तकाची निर्मिती करून "सकाळ प्रकाशना'नं एक मोलाची भेट वाचकांना दिली आहे, हे नमूद करावे लागेल. डॉ. माधवी वैद्य यांची प्रस्तावना असलेलं हे पुस्तक संग्रही असावं असंच आहे. "Thinking positively & doing positively, patiently and persistently is the only key for success' हे सुचवणाऱ्या या पुस्तकातल्या विचारांचा सातत्यानं पाठपुरावा केला, तर प्रत्येकाच्या हाती "यशाचा करंडक' नक्कीच असेल!

पुस्तकाचं नाव : सकारात्मकतेतून यशाकडे
लेखक : जयप्रकाश झेंडे
प्रकाशक : सकाळ प्रकाशन, पुणे (020-24405678)
पृष्ठं : 152, मूल्य : 170 रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com