आजी-आजोबांची मदत प्रेमानंच मागा... (शीला वैद्य)

shila vaidya
shila vaidya

मुलांना जन्माला घालणं हे जसं महत्त्वाचं वाटतं, तसंच त्या मुलांना वाढवणं, त्यांचं संगोपन करणं हीसुद्धा पूर्णपणे आपलीच जबाबदारी आहे, हे प्रत्येक आई-वडिलांनी लक्षात घ्यायला हवं. त्यात मदत लागली तर तुम्ही आजी-आजोबांना विचारू शकता; पण तेही प्रेमानंच विचारायला हवं! आजा-आजोबांनाही त्यांचं जग आहे, त्यांचं स्वातंत्र्य आहे, याचा विचार नक्की करायला हवा.

"आजी-आजोबा नातवंडांना राजीखुशीनं सांभाळत असतील तर गोष्ट वेगळी; पण त्यांनी नातवंडांना सांभाळलंच पाहिजे, अशी जबरदस्ती त्यांच्यावर करता येणार नाही,' अशा आशयाचा आदेश कौटुंबिक न्यायालयानं एका प्रकरणात नुकताच दिला आहे. खरं तर या गोष्टी अगदी घरातल्या असतात. त्या न्यायालयापर्यंत जाव्यात, यातच आपली कुटुंबव्यवस्था किती खालावत चालली आहे, हे दिसून येतं. सध्याच्या काळात कोणताही कौटुंबिक प्रश्न हा न्यायालयाच्या दारात उभा ठाकतो असं सातत्यानं दिसून येत आहे. खरंच याची गरज आहे का? आपल्या कुटुंबातले प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला दुसऱ्याची मदत का लागते आहे? त्यासाठी न्याय का मागावा लागतो आहे? अशा आणि अशा प्रकारच्या सगळ्या प्रश्नांचा गांभीर्यानं विचार करण्याची आवश्‍यकता आहे.

खरं तर भारतीय कुटुंबव्यवस्थेबद्दल अनेक चांगले उद्गार अन्य देशांमध्ये काढले जातात. इथली कुटुंबव्यवस्था पाहण्यासाठी, ती नक्की कोणत्या मूल्यांवर टिकून आहे हे जाणून घेण्यासाठी अनेक परदेशी विद्यार्थी भारतात येतात. बाहेरच्या लोकांना कौतुक वाटावं इतकी ही कुटुंबव्यवस्था चांगली असेल, तर आपण या अशा कुटुंबातले प्रश्न सोडवण्यासाठी न्यायालयात का जात आहोत? म्हणजे आपण आपल्या कुटुंबव्यवस्थेबाबत नीट जाणून घेतलेलंच नाही, असं काही आहे का?
कुटुंब म्हटलं की आई-वडील, आजी-आजोबा, नातवंडं हे प्रामुख्यानं आलेच. एकत्र कुटुंबात आई-वडील, त्यांची मुलं, वडिलांची भावंडं, त्यांची मुलं, आजी-आजोबा अशा अनेक व्यक्ती समाविष्ट असतात. सध्याच्या काळात एकत्र कुटुंबपद्धती बऱ्याच प्रमाणात लोप पावलेली दिसून येते. बदलती नोकरी, बदलते व्यवसाय, त्यानुसार आवश्‍यक वाटणारं स्वातंत्र्य या आणि अशा अनेक कारणांनी एकत्र कुटुंब नष्ट होऊन विभक्त कुटुंब निर्माण झालं. या विभक्त कुटुंबात आई-वडील, मुलं आणि आजी-आजोबा एवढ्याच व्यक्ती उरल्या; परंतु अलीकडच्या काही वर्षांत यातही बदल घडून आले आहेत. आई-वडील आणि मुलं एवढाच परिवार या कुटुंबात उरला. ही सर्वच कुटुंबं आपापल्या परीनं सुखी आहेतही आणि नाहीतही. "नाहीतही' म्हणण्याचं कारण असं की या अशा कुटुंबात प्रश्न निर्माण झाले की ते सोडवण्याच्या आधीच ते उग्र स्वरूप धारण करतात. मग त्यांची वाटचाल न्यायालयाच्या दिशेनं होताना दिसते. मग विचार येतो, की पूर्वी हे असे प्रश्न नव्हते का? तर...ते पूर्वीही होते; परंतु त्यांचं स्वरूप थोडं वेगळं होतं. ते प्रश्‍न समजून घेणाऱ्या व्यक्ती घरामध्ये होत्या. कित्येकदा त्यांचाशी चर्चा करून ते प्रश्न सोडवले जात असत. अर्थात या सगळ्यांबरोबर काही तडजोडीही स्वीकाराव्या लागत होत्या. कधी त्या मनाविरुद्धही असत; पण कुटुंबाच्या भल्याचा विचार करून हे निर्णय घेतलेले असत. या सगळ्या प्रकारात, सहवासानं का होईना, एकमेकांविषयी प्रेम-आपुलकी निर्माण होत असे. एकमेकांना त्या प्रेमापोटी मदत केली जात असे. आता हे सगळंच चित्र बदललं आहे. प्रत्येक नात्यात व्यवहार येऊ पाहत आहे. यासारखी दुःखाची गोष्ट दुसरी नाही.

नात्यात व्यवहार आला की...
आजी-आजोबांच्या लेखी नातवंडं म्हणजे दुधावरची साय. आपल्या मुलांपेक्षा त्यांचं आपल्या नातवंडांवर थोडं जास्तच प्रेम असतं; परंतु यामागची मानसिकता समजून घ्यायला हवी. अनेकदा आज आजी-आजोबा असणाऱ्या व्यक्ती आपल्या तरुणपणात आपल्या मुलांना वाढवताना इतरही अनेक जबाबदाऱ्या पेलत असत; त्यामुळं त्यांना त्यांच्या मुलांसाठी हवा तेवढा वेळ देता आलेला नसतो. त्यांच्याशी खेळता आलेलं नसतं आणि आता या उतारवयात इतर कोणत्याही जबाबदाऱ्या नसतात. त्यामुळं फक्त आपल्या समोरील लहान मुलांबरोबर खेळायचं असतं. त्यांच्या बाललीला अनुभवायच्या असतात. त्यात त्यांना आपल्या मुलांचं बालपण दिसत असतं. ते पुन्हा अनुभवायचं असतं. त्यामुळं आजी-आजोबांना नातवंडं अधिक प्रिय असतात. हे नातं अत्यंत नाजूक, रेशमासारखं मुलायम, तरीही घट्ट असतं. आपल्या मुलाचं लग्न झाल्यावर सगळे आई-वडील नातवंडाचं तोंड कधी बघायला मिळणार, याची वाट पाहत असतात. मग असे आजी-आजोबा नातवंडांचा सांभाळ करणार नाहीत का? जरूर करतील. त्यासाठी न्यायालयात जाण्याची काय आवश्‍यकता आहे? मात्र, आता या नात्यांनाही व्यवहाराची झालर आली आहे. नातवंडांचा सांभाळ करण्यासाठी आजी-आजोबांचा वापर करून घेतला जाताना दिसत आहे. कित्येकदा आपल्या स्वार्थासाठी आपल्या मुलांना त्यांच्या आजी-आजोबांकडं म्हणजेच आपल्या आई-वडिलांकडं ठेवायचं; पण कधी त्यांची विचारपूस करायची नाही की कधी प्रेमाचे चार शब्द त्यांच्याशी बोलायचे नाहीत...सतत "वेळ नाही' हे कारण पुढं करायचं...त्यांना भावनिक करून त्यांच्याकडून नातवंडांकरता काम करवून घ्यायचं आणि आपण मोकळं व्हायचं...नातवंडं मोठी झाली की आजी-आजोबांची गरज संपली असं वागायचं... असं दृश्‍यही अनेक ठिकाणी दिसतं. हे दृश्‍य खूप खेदजनक आहे. जे नातं प्रेमावर टिकत असतं, त्यात व्यवहार आणला की ते नातं संपून जातं.

पर्यायी व्यवस्थेचा विचार
आजच्या काळात प्रत्येकाला घराबाहेर पडायचं असतं. कुणाला करिअर करण्याकरिता, कुणाला आर्थिक गरज म्हणून, तर कुणाला घरात बोअर होतं म्हणून, कुणाला घरातल्या लोकांबरोबर राहण्यापेक्षा बाहेरच्या लोकांमध्ये छान वाटतं म्हणून...कारणं कोणतीही असोत, त्यांचा परिणाम म्हणजे, आपल्या मुलांना सांभाळायला आपल्याकडं वेळच नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे! "मुलांना सांभाळायचं तर माझं आयुष्य काय फक्त मुलं सांभाळणं आणि घरकाम करणं यासाठीच आहे का?' असा प्रश्न विचारला जातो. यात चूक काहीच नाही; पण प्रश्न असा आहे की लग्न करताना आपण दोघांनी - म्हणजे असे प्रश्न विचारणारे आत्ताचे जे आई-वडील आहेत त्यांनी - याचा विचार केला होता का? लग्नानंतर आपल्या दोघांच्या भूमिका आपल्या कुटुंबासाठी नेमक्‍या काय असणार आहेत, याचा विचार केला होता का? तेव्हा केला नसेल तर आता तरी करावासा वाटतो आहे का? कारण, मुलांना जन्माला घालणं हे जसं आपल्याला महत्त्वाचं वाटतं, तसंच त्यांना वाढवणं, त्यांचं संगोपन करणं हीसुद्धा पूर्णपणे आपलीच जबाबदारी आहे, हे प्रत्येक आई-वडिलांनी लक्षात घ्यायला हवं. त्यात मदत लागली तर तुम्ही आजी-आजोबांना विचारू शकता; पण तेही प्रेमानंच विचारायला हवं! आजा-आजोबांनाही त्यांचं जग आहे, त्यांचं स्वातंत्र्य आहे, याचा विचार नक्की करायला हवा. काही वेळा आजी-आजोबांची प्रकृती नाजूक असते, अशा वेळी त्यांच्यावर आपल्या मुलांची जबाबदारी टाकणं चुकीचं आहे. प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांना वाढवताना आपलं करिअरही करायचं असेल तर मुलांना सांभाळण्यासाठी पर्यायी व्यवस्थेचा विचार करणं आवश्‍यक आहे. ही सध्याच्या काळाची गरज आहे. अशा वेळी आजी-आजोबांनीही आपल्या मुलांना बोलता कामा नये.

अशी असावीत पाळणाघरं
काळाची गरज म्हणून मुलांना सांभाळायला बाहेर पाठवायचं असेल तर पाळणाघरं सर्वार्थानं सुसज्ज असायला हवीत. तिथं सर्व वयाच्या मुलांच्या खेळण्याची, खाण्या-पिण्याची, त्यांच्याकडं लक्ष देणाऱ्या सुविद्य कर्मचारीवर्गाची आवश्‍यकता आहे. तिथं मुलांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणंही गरजेचं आहे. घरात आजी-आजोबांकडून मिळणारं प्रेम, संस्कार पाळणाघरात देण्याचा प्रयत्न केला गेला तर दुधात साखर घातल्यासारखंच होईल. आजकाल पाळणाघरांचे अनेक "प्रकार' पाहायला मिळतात. अगदी घरच्या घरी पाळणाघर चालवण्यापासून ते व्यवसाय म्हणून पाळणाघर चालवण्यापर्यंतचे अनेक प्रकार. प्रत्येक पाळणाघर आपल्या कुवतीनुसार सुविधा देत आहे, तर पालकही आपल्या आर्थिक कुवतीनुसार पाळणाघर पसंत करताना दिसतात. हे करताना पाळणाघर व पालक दोघांनीही मुलाच्या भवितव्याचा, आरोग्याचा, सुरक्षिततेचा आणि त्यांच्यावर होणाऱ्या संस्कारांचा नीट विचार करणं आवश्‍यक आहे. पाळणघराला एक डॉक्‍टर आणि एक समुपदेशक - जो मानसशास्त्रीयदृष्ट्या समुपदेशन करू शकेल - असणं आवश्‍यक आहे. असं सर्व सोईंनी युक्त पाळणाघर असल्यावर पालकांची चिंता काहीशी कमी होईल आणि आजी-आजोबा व नातवंडं यांच्यातलं निखळ प्रेमाचं नातंही टिकून राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com