गायकीतली समग्रता शोधायची आहे... (शिवानी मारुलकर-दसककर)

shirwani marulkar daskakar write article in saptarang
shirwani marulkar daskakar write article in saptarang

संगीताचा वारसा मला घरातच मिळाला. आजोबा राजाभाऊ देव यांनी संगीताची पायाभरणी केली आणि मला योग्य वेळी आई अलका देव-मारुलकर हिच्याकडं सुपूर्द केलं. "राग काय सांगतो, त्याचं व्यक्तिमत्त्व, त्याचा विशिष्ट स्वभाव या गोष्टींचा आधी विचार करायला हवा, त्यानंतर घराण्याचा विचार! एखादा राग गाताना आपण कुणीही नसतो, आपण फक्त तो राग असतो,' हाच विचार आई सतत माझ्यावर बिंबवण्याचा प्रयत्न करते. हा सगळा वारसा पुढं नेण्याची माझी इच्छा आहे आणि त्या दृष्टीनंच मी मेहनतही घेते आहे.

सांगीतिक घराण्यात माझा जन्म झाल्यामुळं, मी संगीताच्या विश्वात कधी रममाण झाले, हे माझं मलाच कळलं नाही. मला माझ्या दोन्ही आजोबांकडून सांगीतिक वारसा लाभला आहे. माझ्या वडिलांचे वडील डॉ. ना. र. मारुलकर हे ज्येष्ठ संवादिनीवादक व संगीततज्ज्ञ होते आणि माझे दुसरे आजोबा म्हणजे माझी आई डॉ. अलका देव-मारुलकर हिचे वडील आणि गुरू राजाभाऊ देव यांचंही मला प्राथमिक मार्गदर्शन मिळालं. माझे वडील प्रमोद मारुलकर हे अतिशय कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व. एक प्रतिभावंत इंजिनिअर, उत्तम तबलावादक; तसंच संगीताचे जाणकार अशा गुणांनी संपन्न. माझ्या लहानपणी ते मला तबल्याची साथ करत असत आणि भरभरून कौतुकही करत असत. आई ज्येष्ठ गायिका आणि गानगुरू. अशा प्रकारे संगीताचं बाळकडू मला माझ्या घरातच लाभलं. संगीताबरोबरच मानसशास्त्र हा माझा आवडता विषय. मानसशास्त्र या विषयात मी विशेष प्रावीण्यासह बीए केलं, तेव्हा याच विषयात एमए करावं, असा माझा मानस होता; परंतु संगीताचं प्रशिक्षण लहानपणापासूनच सुरू असल्यामुळं कलाकार म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्याचं ध्येय होतं, म्हणून मानसशास्त्र या विषयात एमए न करता, संगीतात एमए ही पदवी विशेष प्रावीण्यासह मिळवली. मानसशास्त्राचा अभ्यास केल्यामुळं मला त्याचा माझ्या गायनातही फायदा नक्कीच होतो.

वयाच्या चौथ्या वर्षापासून संगीताची भक्कम पायाभरणी केली ती माझे आजोबा - थोर संगीतकार आणि "समग्र गायकी'चे प्रणेते राजाभाऊ देव यांनी. आजोबा आणि नातवंडं हे एक अतिशय सुंदर नातं आहे. त्यांनी माझ्याकडून असंख्य बेहेलावे, बंदिशी घोकून घेतल्या. या रियाजामुळं माझा आवाज खुलत गेला आणि त्याला गोलाई आली. आजोबांना जेव्हा माझ्या रियाजानं समाधान वाटलं आणि आता मी पुढच्या तालमीसाठी सक्षम आहे, असा विश्वास वाटला, तेव्हा त्यांनी मला आईच्या सुपूर्द केलं. ग्वाल्हेर, जयपूर आणि किराणा या तीनही घराण्यांचा समन्वय साधणं आणि रागाकडं पाहण्याचा वस्तुनिष्ठ दृष्टिकोन ही आईच्या गायकीची वैशिष्ट्यं. "राग काय सांगतो, त्याचं व्यक्तिमत्त्व, त्याचा विशिष्ट स्वभाव या गोष्टींचा आधी विचार करायला हवा, त्यानंतर घराण्याचा विचार! एखादा राग गाताना आपण कुणीही नसतो, आपण फक्त तो राग असतो,' हाच विचार आई सतत माझ्यावर बिंबवण्याचा प्रयत्न करते.

माझ्या आजवरच्या सांगीतिक प्रवासात मला माझ्या गुरूंचे आशीर्वाद मिळाले आणि अजूनही मिळत आहेत, त्याचप्रमाणं मला काही दिग्गज कलाकारांचेही आशीर्वाद लाभले. आईची गायकी; तसंच तिच्या उच्चतम सांगीतिक विचारांमुळं, तिला अनेक थोर कलाकारांचं प्रेम मिळालं, त्यामुळं या कलाकारांना माझंही गायन आश्वासक वाटलं हे विशेष. गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांनी त्यांच्या निवासस्थानी माझं गाणं ऐकून मला भरभरून आशीर्वाद दिले. त्याचप्रमाणं त्यांनी "गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू...' या श्‍लोकाचाही अर्थ अतिशय मार्मिकपणे समजावला, जो मला कायम प्रेरणा देत राहील. धारवाड इथं सुमारे दहा वर्षांपूर्वी माझा कार्यक्रम होता, त्याला ज्येष्ठ शास्त्रीय गायक व्यंकटेशकुमार आले होते. त्यांनीही माझ्यासारख्या होतकरू कलावतीचं कौतुक केलं आणि आशीर्वाद दिले. माझे आजोबा राजाभाऊ देव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, आम्ही "देवगंधार' या नावानं संगीतमहोत्सव करतो. दोन वर्षांपूर्वी या महोत्सवात माझं गाणं आणि त्यानंतर लगेच पंडित राजन-साजन मिश्रा यांचं गायन होतं. खूप दडपण आलं होतं मला. ते आवर्जून माझं गाणं ऐकायला बसले होते. मी राग "पूर्वी' गायले. मिश्रा बंधूंनी माझं गाणं अतिशय प्रेमानं ऐकलं आणि त्यानंतर त्यांच्या मैफलीमध्ये त्यांनी माझं खूप कौतुक केलं. ""आज तो शिवानी ने हमारा मूड बना दिया, ऐसी ऊँचे दर्जे की तालीम अब कम ही देखने को मिलती है,'' हे त्यांचे शब्द मला अतिशय प्रोत्साहन देऊन गेले.

आई-वडिलांप्रमाणं माझं आणखी एक दैवत म्हणजे पु. ल. देशपांडे. त्यांना भेटण्याचा योग मला आईमुळंच आला. ते त्या वेळी आजारी होते - व्हील चेअरवर होते. इशाऱ्यानं त्यांनी मला गायला सांगितलं. मी आईचीच एक गझल गायले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला दिसला. ते म्हणाले ः ""अलका, शिवानी गाणं सुंदरच गायली; पण तिचे उर्दू उच्चारही अगदी योग्य आहेत.''
पुलंच्या या कौतुकानं आईलाही खूप आनंद झाला. आयुष्यभर पुलंच्या पायाशी असंच बसून राहावं, असंच मला त्या क्षणी वाटलं!
मला अनेक संगीतसंमेलनांमध्ये स्वतंत्र गायन सादर करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य. दादर-माटुंगा कल्चरल सेंटर युवामहोत्सव, मराठामंदिर इथला
युवामहोत्सव; गोव्यातलं सूरश्री केसरबाई केरकर आणि गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर संगीतसंमेलन; तसंच प्रेस क्‍लब (जयपूर), देवल क्‍लब (कोल्हापूर), गानवर्धन (पुणे), एनसीपीए ( मुंबई) अशा संस्थांमधलं सादरीकरण यांचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातर्फे दिली जाणारी सिनिअर टॅलेंट स्कॉलरशिप, उषाताई मुजुमदार पारितोषिक, वसंतराव देशपांडे युवापुरस्कार आणि 'सूरसिंगार संसद'तर्फे (मुंबई) दिली जाणारी "सूरमणी' ही उपाधी या गोष्टी माझ्या पुढच्या वाटचालीसाठी प्रेरक वाटतात.

गेल्याच वर्षी आईबरोबर अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना माझ्याही स्वतंत्र मैफली झाल्या. आईबरोबर भारतात अनेक ठिकाणी; तसंच कॅनडा, ब्रिटन आणि सिंगापूर इथल्या कार्यक्रमांमध्ये तिला स्वरसाथ करताना मला विविध प्रकारच्या अभिरुचीच्या श्रोत्यांसमोर गाण्याचाही अनुभव मिळाला. त्यामुळं कलाकार आणि श्रोता यांच्यातला संवाद कसा असतो, याचंही शिक्षण मला मिळत गेलं. आईची गायकी मी तालमीतून घेते, तशीच तिच्यामागं साथीला बसूनही गायकीच्या सखोलतेची प्रचीती मला येते. एखाद्या रागाची शिस्तबद्ध तालीम महिनोन्‌महिने मला आईकडून मिळते आणि जेव्हा तोच राग आई तिच्या मैफलीत गाते, तेव्हा त्या रागाचे अनेक पैलू दिसतात आणि तो राग किती विशाल आहे, किती समृद्ध आहे याचा साक्षात्कार होतो. नियमांच्या चौकटीत राहूनही राग अनेक प्रकारे खुलवता येतो. राग एखाद्या क्षितिजासारखा आहे. आता हा राग समजला, असं आपल्याला वाटतं; पण तो आपल्याला आणखी पुढं घेऊन जातो. रसिकता, रंजकता आणि शास्त्रशुद्धता यांच्याबरोबरच रागाचं विश्वरूप दर्शन हे मर्म म्हणजे आजोबा आणि आई यांनी मला दिलेला एक अमूल्य ठेवा आहे.

शास्त्रीय संगीताची व्यापकता आणि अमूर्त स्वर-लयीचं कलात्मक संयोजन हा तर भारतीय संगीताचा आत्माच आहे. त्याच्याबरोबरच ललित संगीताचीही भुरळ मला पडलेली आहे. आईच्या प्रोत्साहनानं आणि मार्गदर्शनानं ठुमरी, दादरा; तसंच गझल, भावसंगीत यांच्याशीही माझी भावनिक एकरूपता साधली गेली आहे. मेहदी हसन, गुलाम अली यांच्या गझला आवाजाला आणि बुद्धीला आव्हान देणाऱ्या असतात. या वैशिष्ट्यानं युक्त असणाऱ्या त्यांच्या अशा गझला सादर करण्यात मला आनंद मिळतो, तसाच आनंद आईच्या स्वररचना सादर करण्यातही मिळतो. "प्रेमांजली', "मधुघट', "अजी आनंद आनंद' आणि "कबीरा' या आईनं निर्मिलेल्या भावसंगीतात मला स्वर, लय आणि शब्द यांचा परमोच्च आनंद घेण्याची आणि देण्याची संधी मिळते. भावसंगीतामुळं शास्त्रीय संगीताच्या सादरीकरणात हृदयाचा ओलावाही मिसळण्यास मदत मिळते.

मला घरातच संगीताचा वारसा जसा मिळाला, त्याच प्रकारे संगीतात रमलेलं सासरही मिळालं. माझे आजेसासरे प्रभाकर दसककर हे नाशिकमधले विद्वान संगीततज्ज्ञ आहेत; तसंच माझे चुलतसासरे सुभाष दसककर हे ज्येष्ठ संवादिनीवादक आहेत. माझे पती चैतन्य दसककर इंजिनिअर आहेत आणि तबलाही उत्तम वाजवतात. त्यांच्या आणि माझ्या सासू-सासऱ्यांच्या प्रोत्साहनामुळं मी माझ्या रियाजाकडं आणि कार्यक्रमांकडं पूर्णपणे लक्ष देऊ शकते. मला मिळत असलेल्या प्रदीर्घ तालमीबरोबरच, माझे विचार आणि स्वतःचे रंग भरून अभिजात संगीताला भरीव योगदान द्यावं, असं माझं स्वप्न आहे. मला मिळालेली सुंदर, रसाळ; पण तितकीच बुद्धीला चालना देणारी गायकी मला समर्थपणे पुढे न्यायची आहे. माझ्या गुरूची माझ्याबद्दलची अपेक्षा मला पूर्ण करायची आहे, त्यासाठी खूप मेहनत करण्याची माझी तयारी आहे, त्याचबरोबर गुरुतुल्य गानसाधकांचेही मला आशीर्वाद लाभोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com