भान राखा आपल्या घरातही आया-बहिणी आहेत...

शीतल पवार
गुरुवार, 18 एप्रिल 2019

एकीकडे पवार कुटुंबाचा वारसा, दोन वेळा खासदार झालेल्या सुप्रिया सुळे, सुप्रिया ताई..तर दुसरीकडे राजकारणात उमेदवार म्हणून नवख्या, बारामतीची लेक कमी अन् दौंडची सुनबाई अधिक असलेल्या कांचन कुल..म्हणजे राहुल कुल यांच्या कार्यकर्त्यांच्या वहिनीसाहेब..

सुप्रिया सुळेंच्या नावे फिरणारी एक 'ऑडिओ क्लिप' व्हॉटस्ऍपवर ऐकली. थोड्यावेळात त्याचीच बातमी एका चॅनेलवर दिसली. सध्या भाजपनिवासी असलेल्या कुणा कार्यकर्त्याला सुप्रिया सुळेंनी घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याचं ते चॅनेल दाखवत होतं. त्यावर सुप्रिया सुळेंनी दिलेलं स्पष्टीकरण ऐकलं. मी महिला उमेदवार आहे आणि मी जिंकतेय, असं दिसल्यानं विरोधकांनी असल्या 'क्लीप' प्रसारित केल्याचा दावा त्यांनी केला.

महिलेनं घरात घुसून मारण्याची धमकी देणं म्हणजे काहीतरीच काय वगैरे असा सूर कुठंतरी उमटतो आहे, असं दिसलं. सुळेंविरोधात उभ्या ठाकलेल्या कांचन कुलही महिला उमेदवारच आहेत. आज सुळेंविरुद्ध क्लीप आली. उद्या कांचन कुल यांच्याविरुद्ध येईल. एक महिला दुसऱ्या महिलेला कसं पाण्यात बघते, हे फालतू टीव्ही मालिकेत रोजच्या रोज पाहणाऱ्या लाखो बाया-बापड्यांना चर्चा उगाळायला एक मुद्दा मिळेल. महिला उमेदवारांमधील निवडणूक तर महिलांचे प्रश्न अग्रस्थानी यायला हवेत, ही अपेक्षा मग फोल ठरेल. आज हे बारामतीत घडतंय, उद्या आपल्या दारातही येईल. महिला जिथं काही करायला जातेय, तिथं तिनं अमुकच बोललं पाहिजे, असंच वागलं पाहिजे ही गृहितकं पाळावीच लागतील. हे असं व्हायला नको असेल, तर आजच बारामतीची निवडणूक मुद्द्यांकडं वळवावी लागेल; अन्यथा, निवडणुकीवरचा पुरूषी मानसिकतेचा पगडा काही कमी होणार नाही.

बारामती लोकसभेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे. खरंतर बारामती नेहमीच निवडणुकीच्या केंद्रस्थानी असते. पण यावेळी चर्चा अधिक झाली ती भाजपने दिलेल्या नवीन महिला चेहरा कांचन कुल यांच्यामुळे. निवडणूक म्हणजे जाती-गटाची गणित मोजूनच तिकीट दिली जातात. यंदा बारामतीसाठी उमेदवार शोधताना भाजपने जात, राजकीय गट-तट यासोबत महत्वाचा एक फॅक्टर लक्षात घेतला तो म्हणजे - महिला ! २०१९ च्या निवडणुकीत बहुदा ही एकमेव लढत आहे जिथं जाणीवपूर्वक महिला उमेदवार दिला गेला. त्यामुळे एक महिला म्हणून या निवडणुकीबद्दल कुतुहूल अजूनच वाढले.

एकीकडे पवार कुटुंबाचा वारसा, दोन वेळा खासदार झालेल्या सुप्रिया सुळे, सुप्रिया ताई..तर दुसरीकडे राजकारणात उमेदवार म्हणून नवख्या, बारामतीची लेक कमी अन् दौंडची सुनबाई अधिक असलेल्या कांचन कुल..म्हणजे राहुल कुल यांच्या कार्यकर्त्यांच्या वहिनीसाहेब..

मुंबईतुन शिक्षण आणि शरद पवार यांचा राजकीय वारसा असलेल्या सुप्रिया सुळे अर्थातच बोल्ड आहेत. त्यांच्या वागण्या बोलण्यात तो रुबाब कायम असतो. शिक्षणामुळे इंग्रजीवर पकड, त्यांची स्वतःची संशोधन-अभ्यास आणि समाज माध्यम सांभाळणारी टीम असल्यामुळे त्या नेहमीच खूप प्रभावीपणे स्वतःला प्रेझेंट करू शकतात.

याउलट कांचन कुल. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कुल माध्यमांमध्ये चर्चेत आल्या. दोन वेळा खासदार झालेल्या सुळे यांना टक्कर देणारी ही नवीन बाई कोण हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. कांचन कुल या सुद्धा खूप आत्मविश्वासाने माध्यमांना सामोरे जाताना दिसल्या. निरागस चेहरा, डोक्यावरून खांद्यावर पदर, बोलताना वारंवार कुल कुटुंबीयांचा उल्लेख.. अगदी टिपिकल सुनबाईंच्या रूपात. पण अगदी कमी वेळात त्यांनी प्रचार, समाज माध्यमांवरील प्रसिद्धीत जोर पकडला. पक्ष कार्यकर्त्यांसोबत मतदारसंघात आत्मविश्वासाने त्या प्रचारात दिसल्या. यांनंतर मात्र या निवडणुकीची उत्सुकता अजूनच वाढली.

'सकाळ'च्या #कारणराजकारण मालिकेत बारामती मतदार संघात फिरताना या लढतीचे अनेक पैलू समोर आले. मतदारसंघात शेती-पाणी-रोजगाराच्या प्रश्नांनी टोक गाठलंय. त्यामुळे तिसऱ्यांदा मतदारांकडे जातांना सुळे यांना ठोस काम घेऊन जावं लागेल आणि ते लोकांना पटवून द्यावं लागेल. तरुणींमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाचं वातावरण आहे. कुल यांची पाटी कोरी असली तरी त्यांना त्यांचे पती विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या कामाचा लेखाजोखा मांडावा लागेल. कांचन कुल यांना स्वतःची कार्यक्षमता सुळेंना समोर ठेऊन सिद्ध करावी लागेल. गंमत म्हणजे दोन्ही उमेदवारांच्या घराणेशाहीच्या मुद्द्यावर अपवादानेच कोणी बोललंय. म्हणजे महिला उमेदवारामागचा घराण्याचा आधार समाजमनाने गृहीतच धरलाय का, असा प्रश्न पडतो.

महिला उमेदवार निवडणूक फिरवू शकतात. कारण आकडा मोठाय; पण त्यांची निवडणूक कधीच महिलांच्या मुद्द्यांभोवती उभी राहिलेली नाही, असं इतिहास सांगतो. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जाणीवपूर्वक महिला उमेदवारांची लढत फक्त बारामतीत होतेय. यानिमित्ताने नेहमीच दुर्लक्षित असलेल्या महिला वर्गाला एक संधी मिळतेय (अर्थात इथेही घराणेशाहीचा डाग आहेच) म्हुणुन सुळे आणि कुल समर्थकांना विनंती की ही निवडणूक निकोप होऊ द्या. विकासाच्या मुद्य्यांवर होऊ द्या. समाजाच्या प्रश्नांवर होऊ द्या. तुमच्या गलिच्छ पुरुषी मानसिकतेत याचा बळी जाता काम नये.

Web Title: Shital Pawar writes about Baramati MP Supriya Sules viral audio clip