
‘एकमेकांना धडा शिकवायला निघालेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचे पुरते वाटोळे करून ठेवले आहे.
सोशल डिकोडिंग : वास्तवदर्शी आकलनासाठी!
‘एकमेकांना धडा शिकवायला निघालेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचे पुरते वाटोळे करून ठेवले आहे. राजकीय पक्षांनाच मोठ्या टोळ्यांचे स्वरूप यावे आणि नेत्यांनी टोळीनायकाच्या भूमिका केल्याप्रमाणे आरोप, चिथावणी, हिंसात्मक भाषा अशा पायऱ्या एकेक करून ओलांडाव्यात आणि बाका प्रसंग येताच कार्यकर्त्यांनी मोकाट सुटावे, परस्परांवर सूड घ्यावयाचा प्रयत्न करावा, याला राजकारण म्हणायचे काय? आरोप-प्रत्यारोपाच्या वातावरणात सामाजिक प्रगती तरी होणार कशी?’
...सध्याच्या राजकारणाबद्दल वाचतोय असं वाटलं ना?
पण हा उतारा आहे अरुण टिकेकर यांच्या ‘अस्वस्थ महाराष्ट्र’ या पुस्तकातला. नव्वदच्या दशकातील राजकीय घडामोडींबद्दलचं भाष्य या पुस्तकातून टिकेकर यांनी केलं आहे.
राजकीय टीकेला व्यक्तिद्वेषासोबत आक्रमक आणि अविवेकी भाषेची जोड मिळाली, की राजकारणात हिंसा घडते. सध्या तर प्रत्येक पक्षाच्या नेत्यांकडे बघितलं, तर सतत काही ना काही राजकारण सुरू असलेलं दिसेल. कुठे पक्षीय राजकारण, कुठे प्रतिपक्षावर कुरघोडी. टिकेकर यांच्या भाषेत लिहायचं, तर ‘टोळीयुद्ध’ सुरू असल्यासारखी परिस्थिती सध्या दिसते. त्यामुळे ‘महाराष्ट्राच्या राजकीय परंपरा’ आणि ‘सभ्यता’ वगैरे सगळेच नेते आपापल्या सोयीनं कितीही सांगत असले, तरी यात किती वास्तव आहे हे नागरिकांनीही चाचपून बघणं आवश्यक आहे.
‘तुम जो कहो वही सच, हम जो कहें वो झूठा बोलबाला है।’ अशा अविर्भावात सध्याचे सर्वच राजकीय पक्षनेते आणि कार्यकर्ते बघायला मिळताहेत. नेत्यांची अशी भूमिका राजकारणाची अपरिपक्वता तर दाखवतेच; पण बदललेल्या माध्यमांचा आणि माहितीचा अवकाश नागरिकांच्या मनात या सगळ्याबद्दल एक विचित्र संभ्रम निर्माण करणारा ठरतो आहे. विशेष म्हणजे वाढत्या माहितीमुळे आपला संभ्रम दूर होण्याऐवजी ‘अल्गोरिदम’ आपला ‘कन्फर्मेशन बायस’च अधिक ठळक करताहेत.
परिणामी नाण्याची एकच बाजू आपल्याला सतत दिसत राहतेय आणि तीच सत्य असल्याचा आभास निर्माण होतोय. रोज येणारी नवीन माहिती हा आभासच सत्य असल्याचा भास निर्माण करत जातेय. याचा थेट परिणाम आपल्या राजकीय आकलनावर आणि मतांवर होऊ लागलाय. त्यामुळे नागरिकांनीही ध्यानात ठेवायला हवं, की न्याय्य भूमिका घेताना नेहमीच दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घ्यायचं असतं.
दोन्ही कानांनी, दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकणं ही फक्त राजकारण्यांकडूनच अपेक्षा नाहीय; तर जनतेकडूनही आहे. आपल्या राजकारणात भविष्याबद्दल कमी आणि वारशाबद्दल अधिक बोललं जातं. या वारशातला संयमाचा भाग तेवढा सोयीस्करपणे विसरला जातो. गमावत चाललेला तो संयम परत मिळवला आला, तर आपलं राजकीय, सामाजिक आकलन अधिक वास्तवदर्शी होईल; अधिक न्याय्य होईल.