Rajyabhishek Sohala : सुवर्णहोनांच्या प्रतिकृतींनी होणार अभिषेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv Rajyabhishek 2023

Rajyabhishek Sohala : सुवर्णहोनांच्या प्रतिकृतींनी होणार अभिषेक

महाड : रायगडावर तिथीप्रमाणे २ जूनला साजरा करण्यात आलेल्या ३५० व्या शिवराज्याभिषेकदिन सोहळ्यानंतर आता अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती, दुर्गराज रायगड यांच्या वतीने मंगळवारी (ता.६) तारखेनुसार रायगडावर शिवराज्याभिषेकदिन सोहळा साजरा होत आहे.

रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष व माजी खासदार कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा होत असून उत्सवमूर्तीला अस्सल सोन्यापासून बनवलेल्या ३५० सुवर्णहोनांच्या प्रतिकृतींचा अभिषेक हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य आहे.

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी महसूल प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. सर्व विभागामार्फत होळीच्या माळावर सोहळा संपेपर्यंत २४ तास नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत. ज्या प्रमाणे पोलिस प्रशासनाकडून २ जूनला राज्याभिषेकदिन सोहळ्यासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला होता, त्याचप्रमाणे ६ जूनलाही तीच खबरदारी घेतली जात आहे. अधिकारी आणि कर्मचारी मिळून जवळपास दोन हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.

या सोहळ्यासाठी पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, मिरज या विभागातून मोठ्या संख्येने शिवप्रेमी येतात. गडावर वाहनांची गर्दी होऊ नये, यासाठी माणगाव मार्गाने येणाऱ्या शिवप्रेमींची कवळीचा माळ या ठिकाणी वाहनतळाची सुविधा करण्यात आली आहे. महाड मार्गाने येणाऱ्यांसाठी कोंझर गाव येथे वाहनतळाची सोय करण्यात आली आहे. या दोन ठिकाणाहून पायथ्याजवळ म्हणजेच वाय पॉईंटपर्यंत शिवप्रेमींना नेण्यासाठी १५० बसची सुविधा करण्यात आली आहे.

अशी आहे सोय

 • शिवप्रेमींसाठी रायगडावर महसूल विभागामार्फत एक लाख पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या

 • दोन दिवस दोन वेळा भोजनाची सोयही करण्यात आली आहे.

 • शिवप्रेमींना शुद्ध पाण्यासाठी होळीच्या माळावर ‘वॉटर प्युरीफायर’ची सोय

असा होणार सोहळा

 • मंगळवारी (ता. ६) सकाळी सात ध्वजपूजन

 • सकाळी साडेसातपासून राजसदरेवर शाहिरी कार्यक्रम

 • पालखी पूजन व नंतर सकाळी आठ वाजता नगारखान्याजवळ मुख्य ध्वज फडकविणार

 • पालखी राजसदरेवर सकाळी नऊ वाजता आणली जाईल व मुख्य शिवराज्याभिषेक सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत सुरू होणार

 • राजपुरोहितांच्या मंत्रोच्चारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर जल, दुग्धाभिषेक केला जाणार आहे.

 • ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त उत्सवमूर्तीला अस्सल सोन्यापासून बनवलेल्या ३५० सुवर्णहोनांच्या प्रतिकृतींचा अभिषेक

 • प्रसिद्ध सराफ ‘चंदूकाका सराफ’चे मालक सिद्धार्थ शहा यांनी हे सुवर्णहोन तयार केलेले आहेत

 • शिवनेरी, राजगड, तंजावर, बंगलोर, सिंधखेड अशा विविध ठिकाणच्या गडांवरील व नद्यांचे शिवप्रेमींनी आणलेल्या जलानेही अभिषेक केला जाणार आहे.

 • शिवरायांच्या पालखीची राजसदरेपासून जगदिश्वर मंदिर ते शिवसमाधी अशी भव्य मिरवणूक काढली जाणार

 • मिरवणुकीत प्रत्यक्ष राज्याभिषेक दिनी असलेले वातावरण, जुन्या गोष्टी यांचा अंतर्भाव

 • राज्यातील विविध ठिकाणांचे ४० आखाडे, शाहीर, वारकऱ्यांचा कार्यक्रमात सहभाग