आरोग्यासाठीचे स्मार्ट मित्र (शिवानी खोरगडे)

रविवार, 1 एप्रिल 2018

आरोग्यासाठी काही सवयी खूप उपयुक्त असतात. पाणी पिणं, व्यायाम करणं आदी गोष्टींसाठी वेळोवेळी आठवण करून देणारी, मदत करणारी अनेक ऍप्स सध्या उपलब्ध आहेत. अशाच काही ऍप्सची माहिती...

आरोग्यासाठी काही सवयी खूप उपयुक्त असतात. पाणी पिणं, व्यायाम करणं आदी गोष्टींसाठी वेळोवेळी आठवण करून देणारी, मदत करणारी अनेक ऍप्स सध्या उपलब्ध आहेत. अशाच काही ऍप्सची माहिती...

आरोग्यदायी आहाराचा अवलंब करणं आणि नियमानुसार व्यायाम करणं ही बाब आपल्या सगळ्यांना चांगलीच माहिती असते; पण याकडं लक्ष देऊन ते आपल्या रोजच्या दिनक्रमात उतरवण्यात आपण मागं पडतो. विलंब, आळस किंवा वेळेचा अभाव यामुळं आपण किती वेळा व्यायाम, योग्य प्रमाणात पाणी पिणं, खाण्याच्या वेळा या सगळ्या गोष्टी पाळल्या आहेत? हो! मात्र, एक गोष्टं आहे जिथं आपण कंटाळा करत नाही किंवा ती आपल्या कामाचा बराचसा भागही व्यापते. ती गोष्टं म्हणजे आपला लाडका मोबाईल! मग रात्रंदिवस सावलीसारखी सोबत असणाऱ्या या मोबाईलमध्येच आपण आपल्या व्यस्त आणि काहीशा बेशिस्त रूटिनमधून आरोग्यासाठी चालताफिरता वेळ काढता येईल अशी सोय केली तर? अशी काही मोबाईल ऍप्स आहेत जी आपल्या शरीरासाठी, बुद्धीसाठी, मनासाठी निरोगी आरोग्य राखण्यास खूप सहजपणे मदत करतात. ही ऍप्स कधी तुमच्या दिनक्रमात हळूच डोकावून आरोग्यासाठी चार चांगल्या सवयी लावतील, ते तुम्हालाही कळणार नाही....

सेव्हन मिनिट वर्कआऊट (7 Minute Workout ) :
व्यायामासाठी दिवसातली सात मिनिटं खरं तर अगदीच कमी आहेत. मात्र, इतक्‍या कमी वेळात परिपूर्ण व्यायाम होऊ शकतो, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे ऍप आहे. या ऍपद्वारे प्रत्येक व्यायाम करण्याच्या सूचना आणि व्हिडिओ उपलब्ध आहेत. विशेषतः हृदय आणि रक्तवाहिन्या यांच्या आरोग्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्या योग्य सिद्ध व्यायामप्रकारांना या ऍपच्या माध्यमातून आपण फॉलो करू शकतो. हे ऍप प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी "सर्किट ट्रेनिंग' देतं. आपले स्नायू आणि ऍरोबिक फिटनेस सुधारण्यावर भर असलेल्या या व्यायामप्रकारासाठी फार कमी वेळ लागतो.
रेटिंग ः 4.5

वॉटर टाइम प्रो ः ड्रिंक रिमाइंडर (Water Time Pro: drink reminder) :
पाणी पिणं शरीरासाठी चांगलं असतं; पण आपल्यापैकी बरेच जण हा सल्ला गांभीर्यानं घेतात का? त्वचेच्या रंगात सुधारणा करण्यापासून विषारी पदार्थ बाहेर फेकणं, वजन कमी करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी शरीरासाठी "प्युरिफायर' म्हणून उत्तमरित्या काम करतं; पण आजकालची लाइफस्टाइल अशी व्यस्त झालीय, की तहान लागेपर्यंत पाण्याचा अंशही आपल्या पोटात उतरत नाही. शरीरास शुद्ध करणं आणि चयापचय सुधारणं यासाठी बेस्ट असलेलं पाणी आपण प्यायचं विसरलो, तरी "वॉटर टाइम प्रो' हे ऍप नाही विसरणार. हे एक सोपं एक रिमाइंडर ऍप असून, तो आपल्या पाण्याच्या सेवनला सूचित करतो आणि ट्रॅक करतो. या वैयक्तिक ऍपमध्ये एक "हायड्रो कॅल्क्‍युलेटर'देखील आहे, जे आपल्या शरीराला आवश्‍यक तितक्‍या पाण्याची गणना करतं.
रेटिंग : 4.7

स्लीप सायकल अलार्म क्‍लॉक (Sleep Cycle alarm clock) :
विश्रांतीही पूर्ण झालीय आणि झोपेतून उठल्यावर उत्साहीसुद्धा वाटलं पाहिजे, या दोनही गोष्टींची आवर्जून काळजी घेत हे ऍप स्लीप ट्रॅकिंगचं काम करतं. आपल्या झोपेचे पॅटर्न म्हणजे आपण गाढ झोपेत आहोत की हलक्‍या झोपेत हे सगळं ट्रॅक करत आपल्या शरीराच्या ताकदीला किती झोप आवश्‍यक आहे, याचं प्रमाण ते ठरवतं. आपल्या झोपेचं मोजमाप करण्यासाठी एक्‍सिलरोमीटर (झोपेत शरीराच्या हालचाली आणि आपल्या श्वासाचं व्हायब्रेशन ठरवणारं तंत्र) सिस्टिम या ऍपमध्ये आहे.
रेटिंग : 4.4

सिंपली बीइंग (Simply Being) :
सततच्या गोंगाटात राहूनराहून गोष्टी विसरायला होतात. ताण पडायला लागतो. एकाग्र होण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतात. या सगळ्यावर मन आणि बुद्धी शांत करण्याचा उपाय म्हणजे "सिंपली बीइंग' हे ऍप. मेडिटेशनवर भर देणारं हे ऍप. सोपं आणि ताणरहित करणारं मेडिटेशन 'सिंपली बीइंग' आपल्याला शिकवतं. या ऍपसाठी फक्त 20 रुपये किंमत मोजावी लागत असली, तरी दिवसभराच्या एकाग्रतेसाठी हे बेस्ट ऍप आहे.
रेटिंग : 4.4

ग्लोबल ट्रॅकर अँड हॅबिट लिस्ट (Goal Tracker and habit List) :
आपल्याला आयुष्यात यश मिळवायचं असेल, तर त्यासाठी आधी मनाला आणि शरीराला चांगल्या सवयी असणं गरजेचं आहे. हे ऍप आपल्या या प्रवासात योग्य सोबत देऊ शकतं. ऑफलाइन असलो, तरी हे ऍप काम करतं. व्यायाम, खाण्यापिण्याच्या सवयी, कामाच्या पद्धती, रोजच्या दिनक्रमातली महत्त्वाची कामं या सगळ्याची रीतसर मांडणी हे ऍप करतं. फक्त एकदा आपलं रूटिन पक्कं झालं, की यात खंड पडता कामा नये एवढंच आपल्याला लक्ष द्यावं लागेल. कॅलेंडरप्रमाणे आपल्या कामांची यादी तयार करून देणारं हे ऍप एक चांगलं रिमाइंडर म्हणूनही काम करतं.
रेटिंग : 4.6

फ्लो पिरिअड अँड ओव्ह्युलेशन ट्रॅकर (flo period and Ovulation Tracker) :
हे ऍप खास महिलांसाठी उत्तम आहे. मासिक पाळी ट्रॅकर म्हणून हे ऍप काम करतं. अनियमितता हा अनेक स्त्रीला मासिक पाळीत होणारा त्रास या ऍपनं ट्रॅक होतो. शिवाय प्रेग्नन्सीवेळीदेखील काय, कधी केलं पाहिजे याची यादी आपण या ऍपद्वारे करू शकतो, जी हे ऍप आपल्याला सतत आठवण करून देतं. अन्न, झोप आणि शरीरासाठी आवश्‍यक पाण्याचं प्रमाण या गोष्टींची योग्य गरज या काळात ओळखणारे हे ऍप उपयुक्त आहे.
रेटिंग :4.9

Web Title: shivani khorgade technodost article in saptarang