शिक्षणाचं नवं 'तंत्र' (शिवानी खोरगडे)

shivani khorgade technodost article in saptarang
shivani khorgade technodost article in saptarang

अनेक विषय आत्मसात करण्यासाठी, शाळेतले अभ्यासक्रम सोप्या पद्धतीनं समजून घेण्यासाठी आता महाग कोचिंग क्‍लासेस लावायची गरज नाही. अगदी प्राथमिक स्तरावरचा अभ्यास करून घेण्यापासून विविध भाषा शिकण्यापर्यंतच्या अनेक गोष्टींसाठी आता अनेक शैक्षणिक ऍप्स मदतीला सज्ज आहेत. अशाच काही ऍप्सवर एक नजर.

अध्ययन आणि अध्यापन करण्याच्या पद्धतींमध्ये काळानुरूप बदल होत गेले. पारंपरिक विषयांशिवाय शिक्षणात इतरही विषयांना स्थान मिळालं आहे. संगणक, व्यक्तिमत्त्वविकास, कार्यानुभव, विविध भाषा, पर्यावरण असे विषय लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना घडवण्यात उपयोगाचे ठरत आहेत. मात्र, अध्यापनपद्धतीत सध्या सगळ्यात महत्त्वाचं स्थान घेतलं आहे ते म्हणजे टेक्‍नॉलॉजीनं. बीजगणित, भूमिती, विज्ञान, इतिहास असे विषय बऱ्याच शालेय विद्यार्थ्यांना कठीण जातात. त्यात कुशल होण्यासाठी मग कोचिंग क्‍लासेस, पर्सनल कोचिंग असेही मार्ग विद्यार्थी आणि पालक निवडतात. आताच्या कोचिंग क्‍लासेसच्या फीच्या रकमा तर आपल्याला माहीत असतीलच... काही वेळा शाळेइतक्‍याच फीज भराव्या लागतात. एकीकडं हे विषयही शिकायचे आहेत आणि त्याच वेळी नवं तंत्रज्ञानही शिकायचं आहे अशी इच्छा असेल, तर त्यासाठी मदतीला येतो तो म्हणजे आपण घरात वापरतो ते मोबाईल फोन. अनेक एज्युकेशनल (शैक्षणिक) ऍप्स आपल्यासाठी प्ले-स्टोअरवर उपलब्ध आहेत. टेक्‍नॉलॉजीशी संबंधित विषय, आपल्याला कठीण जाणारे, किचकट वाटणारे विषय सहज, सोप्या पद्धतीनं आणि आपल्याला हवे तेव्हा, हवे तितक्‍या वेळा शिकण्यासाठी ही एज्युकेशनल ऍप्स उपयोगाची आहेत. अशाच काही निवडक ऍप्सची माहिती आपण बघूया.

बीवायजेयू (BYJU's : The Learning App) :
इयत्ता चौथी ते इयत्ता बारावीसाठी गणित आणि विज्ञान हे विषय; तसंच महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांसाठी (जेईई, एआयपीएमटी, कॅट, जीमॅट आणि आयएएस यांसाठी आवश्‍यक असणाऱ्या सर्व संकल्पना "बीवायजेयू'मध्ये समजावून सांगितल्या आहेत. या ऍपचं वैशिष्ट म्हणजे त्यातले व्हिडिओ क्‍लास भारतातल्या त्या त्या विषयांतल्या सर्वोत्कृष्ट शिक्षकांकडून डिझाईन करून घेण्यात आले आहेत. विषयांतल्या काही संकल्पना कितीही किचकट असल्या, तरी या व्हिडिओंमध्ये सोप्या पद्धतीनं समजावून सांगण्यात आल्या आहेत. इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई, आयसीएसई यांच्या अभ्यासक्रमाचे सॅम्पल पेपर्स आणि अकरावी आणि बारावीसाठी एआयपीएमटी आणि आयआयटी जेईई कोचिंगचं स्पेशल मॉड्युल या ऍपवर उपलब्ध आहे. शिवाय टेस्ट सिरीज, मॉक टेस्ट यावरून विद्यार्थी परीक्षेचा सराव करू शकतील.
रेटिंग : 4.6

एनसीईआरटी सोल्युशन्स (NCERT Solutions) :
इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीपर्यंतच्या सर्व शैक्षणिक विषयांचा अभ्यास विद्यार्थी "एनसीईआरटी सोल्युशन्स' या ऍपच्या मदतीनं करू शकतात. एनसीईआरटीच्या पुस्तकांतल्या अभ्यासक्रमाशी निगडित प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांना या ऍपद्वारे मिळतील. ऑफलाइन असतानाही या ऍपवरची उत्तरं सेव्ह करता येऊ शकतात.
रेटिंग : 4.5

ड्युलिंगो (Duolingo: Learn Languages Free) :
विविध भाषा शिकता याव्यात यासाठी तुम्हाला प्रचंड फी भरून बाहेर क्‍लास लावण्याची गरज नाही. घरच्या घरी "ड्युलिंगो' या ऍपद्वारे विविध भाषा शिकता येतील. स्पॉनिश, फ्रेंच, जर्मन, रशियन, डच, स्विडिश, ग्रीक, इंग्लिश आणि अशा बऱ्याच भाषांचे पर्याय या ऍपवर उपलब्ध आहेत. बोलणं, वाचणं, ऐकणं आणि लिहिणं या सगळ्यांचा सराव या ऍपवरून करता येतो आणि तोही एखादा गेम खेळल्यासारखा. शब्दावली और व्याकरण यांचा त्या भाषेसाठी आवश्‍यक पाया पक्का होईल, असे प्रश्न आणि टास्क या गोष्टी ऍपमध्ये देण्यात आल्या आहेत.
रेटिंग : 4.7

मॅथ ट्रिक्‍स (MATH TRICKS) :
गणिताशी संबंधित समीकरणं शिकताना त्यातला किचकटपणा कमी करण्याचा प्रयत्न "मॅथ ट्रिक्‍स' हे ऍप करतं. कमी वेळात अचूक समीकरणं सोडवता यावीत, या उद्देशानं काही सोप्या पद्धती ऍपमध्ये सांगण्यात आल्या आहेत. प्रत्येक प्रकारची समीकरणं सोडवण्यासाठीच्या युक्‍त्या जाणून घेतल्यास गणितातली गोडीही वाढेल आणि ते कंटाळवाणंही वाटणार नाही. उलट काही सोप्या पद्धती एकदा का पाठ झाल्या, तर शाळा, कॉलेज, कामाच्या ठिकाणी कुठंही गणिताशी संबंधित आपलं पक्कं ज्ञान तुम्ही सहज सिद्ध करून दाखवू शकता.
रेटिंग : 4.5

क्विझलेट (Quizlet) :
"क्विझलेट' या ऍपनं स्वत:ची फ्लॅशकार्डस्‌ युजर्सना उपलब्ध करून दिली आहेत. विविध भाषा, इतिहास, शब्दावली, भूगोल, सामान्यज्ञान आणि विज्ञान हे विषय प्रभावी पद्धतीनं शिकण्यासाठी ही फ्लॅशकार्डस्‌ उपयोगी पडतील. या ऍपवर आपण स्वत:सुद्धा आपलं फ्लॅशकार्ड तयार करू शकतो, किंवा आवश्‍यकतेप्रमाणं इतर युजर्सनी तयार केलेली फ्लॅशकार्डसुद्धा वापरू शकतो. सुमारे18 परदेशी भाषांमध्ये आपण विविध शब्द, वाक्‍यं शिकू शकतो.
रेटिंग : 4.6

टेड (TED) :
एखादा विषय समजण्यात काही विद्यार्थ्यांना अडचण येते. घरातली आर्थिक परिस्थिती बिकट असल्यास कोचिंग क्‍लास लावणंही शक्‍य नसतं. अशा विद्यार्थ्यांना अभ्यास करताना निराशा येऊ शकते. "टेड' या ऍपवर या सर्व अडचणींवर मात केलेल्या, जगातल्या यशस्वी व्यक्तींची सकारात्मक आणि प्रेरणादायी भाषणं उपलब्ध आहेत. नैराश्‍यानं खचून न जाता ते दूर करता येईल, अशी ही प्रेरणादायक भाषणं आहेत. त्यांच्या गोष्टींवरून आपण बोध घेऊ शकतो. सध्याच्या शैक्षणिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मानसिक प्रबळता या ऍपच्या मदतीनं तयार करता येऊ शकते.
रेटिंग : 4.6

एज्युकेशनल गेम्स फॉर किड्‌स (Educational games for kids) :
खेळातून शिक्षण देणारं, लहान मुलांसाठीचं हे ऍप. "एज्युकेशनल गेम्स फॉर किड्‌स' या ऍपमध्ये बारा गेम्स देण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, शंभरपेक्षा जास्त प्राण्यांचे आवाज ओळखणं, संगीत वाद्यांचा आवाज ओळखणं, काही मजेदार चित्र आणि म्युझिकसह कोडी सोडवणं, केवळ चार स्टेप्समध्ये वेगवेगळ्या प्रकारची चित्रं काढणं इत्यादी. या गेम्सच्या स्तरांनुसार त्यातला अवघडपणा वाढत जातो. ज्यामुळं कमी वेळात किचकट प्रश्नांची अचूक उत्तरं मिळवता येतात. अशा गेम्समधून बुद्धीला चालना मिळते आणि आव्हानांवर मात करण्याची सवय लागते. लहान मुलांची बुद्धी तल्लख होण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी या ऍपमधल्या साधनांचा योग्य उपयोग करता येऊ शकतो.
रेटिंग : 3.8

"जिओमेट्रिक्‍स' (Geometryx: Geometry - Calculator) :
भौमितिक आकृत्या काढणं, त्यांच्याशी संबंधित अभ्यास करणं, महत्त्वाच्या गोष्टींचं मोजमाप अचूकरित्या आणि लवकर करणं आदींसाठी मदत करणारं हे ऍप. रेषाखंड, त्रिज्या, कोन, बाजूची लांबी, परिमिती, कर्ण, पार्श्वपृष्ठभागाचे क्षेत्र, त्रिमितीय भूमितीय आकाराचं एकूण पृष्ठफळ इत्यादी सर्व गोष्टींशी संबंधित समीकरणं मांडण्यासाठी हे ऍप उपयोगी पडेल. भूमितीसाठी आवश्‍यक प्रमेयांचा (थेरम्स) अभ्यास सोप्या पद्धतीनं करता येईल. काही भौमितिक सूत्रं आणि समीकरणंही या ऍपमध्ये दिलेली आहेत. त्यांच्या मदतीनं भूमितीमधला कोणताही प्रश्न सोडवता येईल.
रेटिंग : 4.7

"खान अकॅडमी' (Khan Academy) :
गणित, विज्ञान, अर्थशास्त्र आणि वित्त, कला आणि सामाजिक विज्ञान, संगणकशास्त्र असे विषय "खान अकॅडमी' या ऍपमध्ये हाताळण्यात आले आहेत. शिवाय सॅट, एमकॅट, जीमॅट, आयआयटी जेईई या आणि अशा काही प्रवेशपरीक्षांसाठीची तयारी करण्यासाठीसुद्धा हे ऍप उपयुक्त आहे. दहा हजारपेक्षा अधिक व्हिडिओंद्वारे विविध विषयांवरचं मार्गदर्शन या ऍपमध्ये करण्यात आलं आहे. आपण सर्च केलेला विषय अर्धवट वाचला असेल, किंवा व्हिडिओ पूर्ण बघता आला नसेल, तर त्याला बुकमार्क करून ऑफलाइन सेव्ह करू शकता.
रेटिंग : 4.6

"ईडीएक्‍स' (edX) :
जगातली सर्वोत्तम विद्यापीठं आणि शैक्षणिक संस्थांमधले अभ्यासक्रम आपल्याला "ईडीएक्‍स' हे ऍप उपलबध करून देतं. संगणकविज्ञान, डेटा विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवसाय व्यवस्थापन, विपणन, वित्त, लेखा, गणित, डिझाइन, भाषा आणि अशा इतर अनेक विषयांचं ज्ञान या ऍपवरून आपल्याला मिळवता येऊ शकतं. आपलं कौशल्य वाढवण्यासाठी आणि करिअरच्या संधी मिळवण्यासाठी हे ऑनलाइन अभ्यासक्रम आपल्याला नक्कीच उपयोगाचे होतील. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर या ऍपवरच आपण आपल्या ज्ञानाची पडताळणी परीक्षेद्वारे करू शकतो. घरबसल्या आणि कोणताही कोचिंग क्‍लास न लावता एखाद्या विषयातला अभ्यासक्रम आपण "ईडीएक्‍स'द्वारे पूर्ण करू शकतो.
रेटिंग : 4.5

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com