कसा हवा स्मार्ट टीव्ही? (शिवानी खोरगडे)

shivani khorgade
shivani khorgade

हल्ली सगळ्यांचंच जगणं "स्मार्ट' होत असताना टीव्हीही स्मार्टच पाहिजे अशी इच्छा वाढायला लागली आहे. हा स्मार्ट टीव्ही नेमका कसा असावा, तो खरेदी करताना कोणत्या गोष्टी बघाव्यात, काय काळजी घ्यावी, साध्या टीव्हीला स्मार्ट कसं बनवायचं आदी गोष्टींबाबत कानमंत्र.

आजच्या स्मार्ट जमान्यात आपणही स्मार्ट राहायला हवं, असं प्रत्येकालाच वाटतं. स्मार्ट फोन आलेत आणि आपल्यातला स्मार्टनेस अजूनच वाढला. त्यानंतर अनेक स्मार्ट गॅजेट्‌स बाजारात आली आहेत. आज आपण अशाच काही स्मार्ट गॅजेट्‌सबद्दल बोलणार आहोत. स्मार्ट फोन आणि स्मार्ट टीव्ही याशिवाय आज आपली दैनंदिनी पारच पडत नाही. आधी घरी टीव्ही घ्यायचा म्हटला, की कोणत्या कंपनीचा घ्यायचा यापलीकडं जास्त काही विचार केला जात नव्हता; पण आता टीव्ही घ्यायचा म्हटला, की तो स्मार्ट टीव्ही आहे का, किती मोठा घ्यावा, रेझोल्युशन किती असावं, असा सगळा विचार केला जातो आणि घरी येतो एक नवीन टेक्‍नॉलॉजीयुक्त स्मार्ट टीव्ही.
स्मार्ट टीव्ही घेताना काही छोटेच; पण महत्त्वपूर्ण निकषही आहेत. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या गेल्या पाहिजेत. त्या पुढीलप्रमाणं :

युजर फ्रेंडली : तुमचा स्मार्ट टीव्ही युजर फ्रेंडली असावा. म्हणजेच जेव्हा तुम्ही स्मार्ट टीव्ही खरेदी करायला जाता, तेव्हा तो जिथून खरेदी करत आहात तिथंच ऑपरेट करून बघावा. रिमोट बटन, कनेक्‍टिविटी, स्मार्ट टीव्हीला कनेक्‍ट होणारं इतर डिव्हाइस (उपकरण) जसं; मोबाईल, पेन ड्राइव्ह, कॅमेरा, हार्डडिस्क यांचा शक्‍यतो वापर करून बघावा. कोणतंही डिव्हाइस वापरताना किंवा स्मार्ट टीव्ही वापरताना किचकट स्टेप्स कुणालाही आवडणार नाही.

कनेक्‍टिविटी : तुमच्या घरी (किंवा ऑफिसला, जिथं स्मार्ट टीव्ही ठेवणार असाल तिथं) वायफाय असेल तर उत्तम. स्मार्ट टीव्हीसाठी कमीत कमी इंटरनेट स्पीड एक ते दोन एमपीबीएस असावी आणि कमीत कमी डाउनलोड लिमिट 40 जीबी असावी.
अंतर : स्मार्ट टीव्ही जिथं ठेवणार असाल तिथून ते जिथं बसून टीव्ही बघणार असाल तिथपर्यंतच्या अंतरावरून तुमच्या टीव्हीचा स्क्रीन किती इंच मोठा असावा हे ठरवता येतं. जर चार ते पाच फूट अंतरावर बसत असाल, तर 32 इंच स्क्रीनचा टीव्ही योग्य असेल. अंतर सहा फूट असेल, तर 47 इंच स्क्रीनचा टीव्ही योग्य असेल. अंतर आठ फूट असेल, तर 65 इंच स्क्रीनचा टीव्ही योग्य असेल.

रेझोल्युशन : रिझोल्युशन म्हणजे आपल्या टीव्ही स्क्रीनवर जे लहान पिक्‍सेल्स (डॉट्‌स) असतात. जितके जास्त पिक्‍सेल्स तितकं रेझोल्युशन उत्तम. रेझोल्युशननुसार एचडी रेडी, फुल एचडी, 4 के, किंवा अल्ट्रा एचडी असे प्रकार असतात. तुम्ही टीव्हीपासून सात ते आठ फूट अंतरावर बसत असाल आणि टीव्ही साइझ चाळीस इंचपेक्षा कमी असेल, तर यासाठी एचडी रेडी आणि फुल एचडी यापैकी काहीही चालू शकेल.
टीव्ही साइझ चाळीस ते साठ इंच असेल, तर फुल एचडी रेझोल्युशन योग्य पर्याय आहे आणि जेव्हा तुमच्या टीव्हीचा साइझ साठ इंच किंवा जास्त असेल, तेव्हाच 4 के घ्या.

फिचर्स : स्मार्ट टीव्हीमध्ये 3-डी आणि कर्व्हड्‌ असे दोन प्रकार येतात. 3-डी चित्र बघण्यासाठी टीव्हीसोबतच विशिष्ट प्रकारचे चष्मे मिळतात. कर्व्हड्‌ टीव्ही हे स्टायलिश असतात.

कनेक्‍टिविटी : स्मार्ट टीव्ही ऍप आपल्या स्मार्ट फोनमध्ये डाऊनलोड केलं, तर फेसबुकही टीव्हीवर वापरता येतं. इंटरनेट सर्फिंगसाठी स्मार्ट टीव्हीसोबत एक विशिष्ट रिमोटही (क्वेर्टी रिमोट) मिळतो.

ज्यांच्याकडं स्मार्ट टीव्ही नाहिये, अशांनी निराश व्हायची गरज नाही, किंवा लगेच असा टीव्ही खरेदी करण्याचीही गरज नाही. त्यापेक्षा कमी पैशांत काही स्मार्ट डिव्हाइसेसचा वापर करून तुम्ही तुमच्या घरातल्या साध्या एलसीडी/एलईडी टीव्हीलाही स्मार्ट बनवू शकता. अशी काही डिव्हाइसेस पुढीलप्रमाणं :

ऍमेझॉन फायर टीव्ही स्टिक : हा स्टीक साध्या एलईडी टीव्हीलाही कनेक्‍ट करू शकतो. सोबत व्हॉइस रिमोट ही या डिव्हाइससोबत आपल्याला मिळतो. या रिमोटमध्ये दिलेलं माईकचं बटण दाबून ठेवलं आणि ज्या चित्रपटाचं नाव आपण उच्चारू, तो चित्रपट आपल्या टीव्हीवर सुरू होईल. हे डिव्हाइस पूर्णपणे इंटरनेटवर अवलंबून आहे. एलईडी टीव्हीशी जोडल्यानंतर स्क्रीनवर डिव्हाइस सेटिंग कसं करायचं याबद्दल सांगितलं जातं. वायफायव्यतिरिक्त मोबाईलच्या हॉटस्पॉटशीदेखील डिव्हाइस कनेक्‍ट करता येतं. फायर टीव्ही रिमोट ऍप मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन मोबाईलवरूनही हे डिव्हाइस वापरता येऊ शकतं.

गुगल क्रोमकास्ट 2 : स्मार्ट टीव्ही नसला, तरी एलसीडी/एलईडी टीव्हीसोबत हे डिव्हाइस तुम्ही वापरू शकता. क्रोमकास्ट ऍप मोबाईलमध्ये डाऊनलोड केलं, तर या डिव्हाईसला मोबईल कनेक्‍ट करता येतो. हे ऍप उघडल्यानंतर फोनच्या स्क्रीनवर उजवीकडे स्वाइप केल्यानंतर "कास्ट स्क्रीन' हा पर्याय येतो. हा पर्याय सिलेक्‍ट केल्यास मोबाईल स्मार्ट टीव्हीला कनेक्‍ट होईल. तुमचा फोन स्क्रीन टीव्हीवर दिसेल.

शिओमी एमआय बॉक्‍स : हे डिव्हाइस गुगल कास्ट, 4 के आणि व्हॉइस स्पीचला सहकार्य करतं. डिव्हाइससोबत रिमोट असतो, ज्यात मायक्रोफोन दिलेला असतो. या डिव्हाइसचं वैशिष्ट्य म्हणजे डिव्हाइसला साउंड आऊटपुट कनेक्‍शन करता येऊ शकतं. एक्‍सटर्नल स्पीकर वापरता येईल. हे डिव्हाइस क्रोम कास्टची पुढची आवृत्ती आहे. त्याच्या मदतीनं स्मार्ट टीव्हीत गेम आणि ऍप्सगी इन्स्टॉल करता येऊ शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com