महत्त्व जाणा संबोधाचे 

शिवराज गोर्ले
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

शिक्षण, पालकत्व व नोकरीच्या संधींबद्दल उपयुक्त अशी माहिती हवी आहे? तर मग आवर्जून वाचा" सकाळ पुणे टुडे"मधील "EDU" या पुरवणीतील दर्जेदार लेख... शिवराज गोर्ले, डॉ. श्रीराम गीत, हेरंब कुलकर्णी, दिलीप ओक या तज्ञ्जांच्या लेखणीतून.

बालक-पालक
ओझ्याविना शिक्षण या संदर्भात अहवाल देताना प्रा. यशपाल यांनी म्हटलं होतं, मुलांना ओझं होतं ते भरमसाट माहितीचं. हे माहितीच्या तपशिलांचं ओझं कमी करण्यासाठीच आता अभ्यासक्रमात संबोधांचा समावेश केला गेला आहे. ज्ञानरचनावादी शिक्षणात मुलांच्या विचारप्रक्रियांना महत्त्व आहे. या प्रक्रियांसाठी संबोधाची फार मोठी मदत होत असते. संबोध म्हणजे काय तर (नेमका व चटकन) बोध होणं. मुलांच्या मनात हे संबोध कसे तयार होतात? मुलं वस्तू, व्यक्ती, पशू, पक्षी यांचे अनुभव घेत असतात व त्यांच्यातील सारखेपणाच्या आणि वेगळेपणाच्या आधारे वर्गीकरण करत असतात. सुरवात एखाद-दुसऱ्या उदाहरणावरून होते म्हणजे प्रथम दिसते ते मांजर.... मग कुत्रा.... मग गाय... म्हैस. यातून त्यांच्यातील समान गुणविशेष (चार पाय असणं इ.) ध्यानात घेऊन गट तयार होतो. एकत्रित गट या विचारानं पशुसंबंधीचा संबोध तयार होतो. मग तेच गुणविशेष दिसतात का ते पाहून घोड्याचा स्वीकार होतो. बाग, पाने, फुले, फळे हे निसर्गातील संबोध तर सर, मॅडम, हेडमास्तर, शिपाई... हे माणसांसंबंधीचे संबोध. जरा वरच्या पातळीवर... आपापसांतील बोलणे हा झाला संदिग्ध संबोध तर संभाषण, संवाद, चर्चा... हे स्पष्ट संबोध तयार होतात. 

     अशा संबोधांचे विचारप्रक्रियेत फार महत्त्व आहे. 
     प्रत्यक्ष व्यक्ती, वस्तू, प्रतिमान, चित्र... समोर नसतानाही संबोधामुळे विचार करणं शक्‍य होतं. 
     संबोधाच्या आधारे तर्क करणं, अनुमान बांधणं, कल्पना करणं, नवनिर्मिती करणे शक्‍य होतं. 

पाठ्यपुस्तकातल्या चार-पाच निसर्ग वर्णनपर कवितांमुळे त्यातलं वर्णन, कवीच्या कल्पना, वापरलेल्या प्रतिमा, त्यातील शब्दसाधर्म्य व शब्दसामर्थ्य.... यांचे परस्परसंबंध उमगले की त्या साहित्य प्रकाराचा सखोल परिचय होतो. संबोध दृढ होतो. त्यामुळे साहित्याचा आस्वाद घेणे, स्वनिर्मिती करणे अशा क्षमतांचा विकास होतो म्हणूनच शिक्षक पालकांनी बालवयापासून असे विविध संबोध मुलांमध्ये रुजविण्याचा, विकसित करण्याचा प्रयत्न करायला हवा. हेही तितकंच खरं की घरातली भाषा व शिकवण्याची भाषा एकच असेल तर मुलांमध्ये ते ‘संबोध विकसन’ पर्यायाने ज्ञानग्रहण वेगाने होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivraj gorle article Education without the burden