गोडवा संवादातला ! (शिवराज गोर्ले)

shivraj gorle write makar sankranti article in saptarang
shivraj gorle write makar sankranti article in saptarang

‘तिळगूळ घ्या, गोड बोला’ असं आपण म्हणतो; पण आपल्या संवादात गोडवा कितपत आहे?... प्रभावी, परिणामकारक म्हणजेच ‘गोड’ संवाद नेमका साधायचा कसा? त्यासाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं? वादांमधली कटुता टाळायची कशी? सोशल नेटवर्किंगच्या जमान्यात कोणतं पथ्य पाळायचं?
...आजच्या मकरसंक्रांतीच्या निमित्तानं संवादातल्या या गोडव्याबाबत कानमंत्र.

दिवाळी हा आनंदाचा सण मानला जातो, दसरा हा सीमोल्लंघनाचा, रंगपंचमी हा रंगून जाण्याचा, तर होळी हा अंतरीची अवघी दुरितं-सगळी ‘भडास’ जाळण्याचा, थेट बोंबा मारून ‘शिमगा’ करण्याचा! संक्रांत हा सण मात्र परस्परांना तिळगूळ देत- गोड बोलण्याचं आर्जवी आवाहन करण्याचा!

मकरसंक्रमणाचा भौगोलिक अन्वय काहीही असो - सांस्कृतिक सांगावा मात्र असतो, संवादातील गोडवा जपण्याचा. संक्रमणाच्या ‘पुण्यकाला’तलं सर्वांत महत्त्वाचं पुण्यकर्म असतं गोड बोलण्याचं! तसं तर प्रत्येक सणाचं काही औचित्य असतं, काही संदेश असतो. संक्रांत हा पुन्हा एकच असा सण आहे- त्यानिमित्तानं अभिप्रेत कृती आणि उक्ती स्पष्ट शब्दांकित करणारा : ‘तिळगूळ घ्या, गोड बोला!’

सहज मनात येतं, की हा सांगावा, हा संदेश मुख्यत: मराठीजनांसाठीच असावा काय? इतर भाषकही ‘संक्रमण’ साजरं करीत असतीलच; पण तिळगुळाचं आमिष दाखवत- गोड बोलण्याचं असंच आवाहन करत असतील? माझ्या तरी ऐकिवात नाहीय. एक तर नक्की, की ‘कणखर देशा’तल्या मराठमोळ्यांसाठी अशा स्पष्ट आणि थेट आवाहनाची गरज नाकारता नक्कीच येत नाही. आपण मराठी मंडळी गोड बोलण्यापेक्षा स्पष्टवक्तेपणासाठी जास्त प्रसिद्ध आहोत. संवादापेक्षा वादविवादात अधिक पटाईत आहेत. ब्रिटिश त्यांच्या ‘मॅनर्स’साठी ओळखले जातात. ‘मॅनर्स’ म्हणजे शिष्टाचार... सौजन्यानं बोलणं वगैरे. ‘प्लीज’, ‘सॉरी’, ‘थॅंक्‍यू’, ‘गुड मॉर्निंग’, ‘गुड नाइट’... अशा शब्दांची इंग्रजीत रेलचेल असते. त्यांच्याकडून आपण इतर बऱ्याच गोष्टी घेतल्या; मात्र सौजन्य घेतलं नाही. त्या संदर्भात बोलताना ‘पु.लं.’नी म्हटलं होतं : ‘त्याला इलाजच नाही. प्रत्येक भाषेची प्रकृती वेगळी असते. मराठी भाषेत माणूस नम्रपणे, गोड वगैरे बोलू लागला तर तो ढोंगी असावा, असं समजतात.’

आमच्या आईचं एक लाडकं वाक्‍य होतं : ‘गोड बोलायला पैसे पडतात का?’ गोड बोलूनच तिनं माणसं जोडली होती आणि प्रतिकूल परिस्थितीतही संसाराची वाट सुकर केली होती. मात्र, तिखट जिभेची मंडळीही हेच म्हणू शकतात : ‘तिखट बोलायला तरी पैसे कुठे पडतात?’ नाही पडत.... पण एक तर नक्कीच, तिखट बोलणं हे महागात पडू शकतं. कधी कधी तर खूपच.

संवादाला पर्याय नाहीच
माणूस हा सामाजिक प्राणी आहे. तो एकच असा प्राणी आहे, ज्यानं ‘संवादा’साठी शब्द शोधले... भाषा विकसित केली. परस्परांशी संवाद साधतच त्यानं प्रगती साधली. संस्कृती निर्माण केली. संवादाशिवाय माणूस जगूच शकत नाही. संवादाची भूक त्याला स्वस्थ बसू देत नाही. ‘कास्ट अवे’ चित्रपटातल्या टॉम हॅंक्‍ससारखा तो निर्जन बेटावर एकाकी राहिला, तरी ‘बाहुला’ तयार करून त्याच्याशी बोलत राहतो. त्या निर्जीव ‘दोस्ता’बरोबरचा संवादही त्याला एकटेपणातून तारून नेतो. जगण्याचं बळ देतो.
एक अगदी साधा प्रश्‍न आहे : संवाद साधावाच लागणार आहे, तर तो सुसंवाद का असू नये? बोलणं भागच आहे, तर गोड का बोलू नये? योग्य शब्दांत संवाद साधता येणं ही एक कलाच असते. ती ज्यांना अवगत असते, ते आयुष्यातही खूप काही साधू शकतात. मात्र, संवाद साधता आला नाही, तर खूप नव्हे - सगळंच बिनसत जातं. किती उदाहरणं द्यावीत?

पती-पत्नींमधला संवाद संपला तर संसार मोडतात, भावाभावांमधला संवाद थांबला तर घरं तुटतात. पालकांना मुलांशी संवाद साधता आला नाही, तर मुलांचं भवितव्य धोक्‍यात येऊ शकतं. शिक्षक-विद्यार्थी संवाद नसला, तर शिक्षणच खुंटतं. मालक-कर्मचारी संवादाच्या अभावी संप चिघळत राहतात- कंपन्या कोलमडून पडतात. जुन्या पिढीचा नव्या पिढीशी संवाद नसला, तर आस्था, आपुलकीऐवजी बेफिकीरी अन्‌ तुच्छता बोकाळते. ठायीठायी, पदोपदी संवादाची- फक्त संवादाची नव्हे तर ‘सुसंवादा’ची गरज असते. योग्य तो संवाद नसणं, हेच तर सर्व प्रश्‍नांचं मूळ असतं.
भारतासारख्या खंडप्राय देशात, भिन्न भाषा, जाती, धर्म, पंथाचे कोट्यवधी लोक एकत्र राहत असताना मतभेदाची, वादांची विपुल शक्‍यता असते. त्यावर मात करता येते, ती संवादातूनच. तो नसला, तर ‘विविधतेतून एकता’ याऐवजी ‘विविधतेतून अशांतता’ खदखदू लागते. दोन देशांमधला संवाद थांबला, तर युद्धालाच निमंत्रण दिलं जातं, जे उभयतांच्याही नाशालाच कारणीभूत ठरतं.

आजच्या काळात तर दोन देशांमधला विसंवाद, अवघ्या जगाला अणुयुद्धाच्या कडेलोटावर नेऊ शकतो. म्हणूनच - दक्षिण आणि उत्तर कोरियात ठप्प झालेला संवाद पुनश्‍च सुरू होतो; डोनाल्ड ट्रम्प ‘मी किम जोंग उन यांच्याशी संवाद साधायला तयार आहे,’ म्हणतात तेव्हा संपूर्ण जग सुटकेचा नि:श्‍वास सोडतं.

आपण काय करू शकतो?
प्रश्‍न असा आहे, की तुम्ही-आम्ही नेमकं काय करू शकतो? जग बदलणं काही आपल्याला शक्‍य नसतं; पण एक तर निश्‍चित- आपण स्वत:ला बदलू शकतो. आपल्या दैनंदिन जीवनात, व्यक्ती-व्यक्तीतील संबंधात सुसंवादाची कास धरू शकतो. अकारण वाद आणि त्यातून उद्‌भवणारी कटुता टाळू शकतो, संवादातला गोडवा जोपासून स्वत:चं आणि इतरांचं जगणंही गोड करू शकतो. कटुता टाळण्यासाठीचं पहिलं महत्त्वाचं सूत्र आहे, ते म्हणजे ‘माफ करा, मन साफ करा!’... इथं मला नेल्सन मंडेला यांचं वास्तव्य प्रकर्षानं आठवतं. ते म्हणतात : ‘ज्या दिवशी माझा तुरुंगवास संपला, मी बाहेर मुक्तीच्या दिशेनं निघालो, त्यावेळी मला जाणवत होतं, की मी माझ्या मनातला कडवटपणा, तिरस्कार मागं ठेवून गेलो नाही, तर मी अजूनही बंदिवासात असल्यासारखं होईल.’

कटुतेच्या मानसिक बंदिवासातून मुक्त होणं, हेच खरं स्वातंत्र्य असतं. कुणातही उपजत कटुता नसते, हे खरंच आहे. तुम्हाला येणारे कटू अनुभव, तुमच्यावरचा अन्याय ही कारणं असू शकतात; पण तरीही ते कटुतेचं फक्त स्पष्टीकरण असतं, समर्थन नव्हे. प्रयत्नपूर्वक तुम्ही त्या कटुतेवर मात करू शकता. जे तसं करू शकतात, तेच आयुष्यात पुढे जाऊ शकतात.

दुर्दैवानं प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाही. माणसं स्वत:वरच्या अन्यायाचीच नव्हे, तर मागच्या कैक पिढ्यांवरच्या अन्यायाची कटुता मनात खदखदत ठेवतात. मग अन्य समाजाच्या- आजच्याच नव्हे, तर भावी पिढ्यांचाही सूड घेण्याच्या इर्षेनंही पेटलेली असतात. मात्र इतिहास हेच सांगतो, की सुडानं, कटुतेनं साध्य काहीच होत नसतं. उभयपक्षी भलं साधण्याचा मार्ग फक्त ‘संवादा’तूनच जातो. म्हणूनच :
‘वाद नको, संवाद हवा’
तुम्ही आम्ही एवढं तरी करू या. परस्परांशी वाद टाळून, संवाद साधू या. अनेकदा आपण अकारण वाद घालत असतो. पुढच्या वेळी वाद घालण्यापूर्वी ‘हा वाद घालणं, त्या वादात वेळ घालवणं खरंच आवश्‍यक आहे का,’ हा प्रश्‍न स्वत:ला विचारा... आणि थांबा! बेस्ट टाइम टू स्टॉप इज बिफोर यू स्टार्ट!

लोक वाद का घालतात? स्वत:विषयीचे असंख्य गोड गैरसमज! गोडवा त्यांच्या बोलण्यात नसतो, स्वत:विषयीच्या समजांमध्ये असतो! आपण फार शहाणे आहोत, आपले मुद्दे कसे बिनतोड असतात, असा एक फाजील आत्मविश्‍वास असतो... वाद घालण्याचा अट्टहास असतो. वादविवादात सरशी होणं, हा मुद्दा ही मंडळी प्रतिष्ठेचा बनवतात. हिरीरीनं वाद घालून वादविवादात जिंकतातही; पण त्यामुळंच एखादा सहकारी, एखादा मित्र कायमचा दुरावून बसतात. म्हणूच वादविवाद टाळणंच शहाणपणाचं असतं. याचा अर्थ असा नव्हे, की आपल्या मनांना नेहमीच मुरड घालावी. अजिबात नाही. आपली मतं जरूर मांडावीत; पण मतं मांडणं म्हणजे भांडणं नव्हे, एवढं तरी भान ठेवावं, हेही लक्षात ठेवा. तुमची-आमची मतं उद्या बदलू शकतात. तेव्हा त्या मतांसाठी आज किती (वितंड) वाद घालायचा, याचा विचार करा. वादविवादातली मेख अशी, की शब्दानं शब्द वाढतो... मग चुकीची भाषा वापरली जाते, अशा वेळी मुद्दे बाजूला राहतात आणि ‘शब्दां’वरूनच वाद सुरू होतात.
मत-मतांतरं तर असणारच. मतभेद म्हणजे शत्रुत्व नव्हे. दुसऱ्याला त्याचं मत मांडू देणं, हे सुसंस्कृतपणाचं लक्षण असतं. मनमोकळेपणा हवा तसा मनमोकळेपणाही हवा.

अनेकदा आपण समोरच्याचं ऐकूनच घेत नाही. ते ऐकलं, तर बऱ्याच बाबतीत दोघांची मतं जुळणारी आहेत असा ‘साक्षात्कार’ होऊ शकतो. मग वादाचं प्रयोजनच उरत नाही. आणखी एक, मतामध्ये माणसाचं ‘मन’ही गुंतलेलं असतं. मतं खोडून काढताना आपण समोरच्याचं मनही थोडं दुखावत असतो, हे भान ठेवलं तर आपली भाषाही बदलू शकते. मग वादाऐवजी संवाद होऊ शकतो. अर्थात संवाद साधणं म्हणजे सर्व बाबतीत मतैक्‍य होणं नव्हे. काही मतभेद राहणारच. अशावेळी अशीही समंजस भूमिका घेता येते : ‘लेट अस ॲग्री टू डिफर!’

किर्लोस्कर उद्योगसमूहाचे संस्थापक शंतनूराव किर्लोस्कर यांना मी जवळून पाहिलं आहे. प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे शंतनूराव, कर्मचारी अथवा अधिकाऱ्यांवर क्वचितच रागावत असत. गोड बोलूनच ते समोरच्याचे दोष दाखवून देत. ते म्हणत : ‘जे गुळानं मरतं, त्याला विष कशाला वापरायचं?’

संवादातल्या गोडव्यासाठी...
होय. कटुता टाळता येते, वादही टाळता येतो. खरं तर प्रत्येक वाद हा एक ‘संवाद’च असावा लागतो; पण हे पुरेसं संक्रमण नव्हे. मकरसंक्रांतीचा सांगावा आहे, तो गोड बोलण्याचा. संवादात गोडवा पेरण्याचा...

कुठून येतो हा गोडवा?
उत्तर अगदीच स्पष्ट आहे. तो येतो तुमच्या स्वभावातून, तुमच्या वृत्तीतून, तुमच्या अंतरंगातून. आडातच नसेल, तर तो पोहऱ्यात कुठून येणार? तसं तर काय, तोंडदेखलं गोड बोलता येतंच. तसं बोलून आपला कार्यभाग साधणारे महाभाग अनेक असतात. सुदैवानं आपण त्या महाभागामध्ये मोडणारे नाही आहोत. गोडवा आजूनच यावा लागतो. अंतरंगात आस्था, जिव्हाळा, माणुसकी, प्रेम असेल, स्वभावात संवेदनशीलता असेल, सहानुभूतीबरोबरच (सिम्पथी) ‘समानुभूती’ (एम्पथी) असेल, तर तुम्ही तोडून, कटू बोलूच शकत नाही. अशा वेळी ‘ये हृदयीचे ते हृदयी’ अशा पातळीवरचा हृदयस्पर्शी संवाद आपोआपच होऊ लागतो.

होय, हे खरंय - इतकं तुमचं आमचं मन निर्मळ नसतं, पण तरीही एख तत्त्व आपण कसोशीनं पाळू शकतो. समोरच्याचं भलं नाही करता आलं, तरी त्याचं नुकसान करायचं नाही. गोड गोड बोलून त्याला फसवायचं नाही. नकारच द्यावा लागला तरी तोही नम्रतेनंच द्यायचा.

शेवटी तुम्ही किती यशस्वी आहात, यापेक्षा तुम्ही माणूस म्हणून कसे आहात, हे महत्त्वाचं असतं. त्यावरूनच लोक तुमची ‘किंमत’ करत असतात. अमिताभ बच्चन हे एक जितंजागतं उदाहरण आहे. ‘स्टार ऑफ द मिलेनियम’ असलेला हा माणूस ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात अगदी सर्वसामान्य स्पर्धकाशी ज्या सौजन्यानं बोलतो, ते तमाम भारतीयांसाठी आदर्श ठरावं. व्यक्तिमत्त्वातली ‘ग्रेस’ आणि संवादातला गोडवा यांचं इतकं बेमिसाल मिश्रण क्वचितच आढळतं. हा गोडवा येतो ते त्याच्या अभिजात नम्रतेतून, त्याच्या सुसंस्कृत जगण्यातून. फक्त सशक्त, दमदार अभिनयामुळं नव्हे, तर याही गुणामुळं अमिताभ राजेश खन्नापेक्षा ‘उजवा’ ठरला होता. राजेश म्हणायचा : ‘‘मैं तो गॉड बन गया.’ अमिताभ म्हणत असतो : ‘ये आप लोगोंका प्यार है, वरना मैं इस बढप्पनके लायक नहीं हूँ!’

आणि सोशल मीडिया!
आज ‘सोशल मीडिया’मुळं संवादाचा जणू विस्फोट झालाय. ‘फेसबुक’, ‘व्हॉट्‌सॲप’, ‘ट्विटर’, ‘इन्स्टाग्राम’... कुठल्याही क्षणी तुम्ही स्वत:चं मत, स्वत:चा अनुभव या माध्यमातून मांडू शकता. काही क्षणांतच तो जगभर पोचवू शकता. खरं आहे; पण आपण हे विसरतो आहोत, की यातून फक्त संपर्क वाढलाय, ‘संवाद’ नव्हे! जग जवळ आल्याचा आभास होत असला, तरी प्रत्यक्षात जवळच्यांमध्ये दुरावा आलाय. ‘शेअरिंग’पेक्षा चटपटीतपणाची चटक लागते आहे. कटुता पेरणारे काही व्हिडिओ, पोस्ट्‌स पाहिल्या, की मनात येतं : नाही गोडवा पेरता आला तरी हरकत नाही; पण निदान कटुता पसरवणं, प्रसृत करणं तरी थांबवू या. थांबवूच या. समाजासाठी काही योगदान देता आलं नाही तरी चालेल; पण समाजाचं नुकसान होईल असं काही करायचं नाही, एवढं तरी ठरवू या. मी तर म्हणेन, आयुष्याच्या वाटचालीत अखेरीस हेच शब्द यावेत ओठी...
‘माना के इस जहाँ को गुलशन न कर सके
काँटे तो कम करही गए, गुजरे जिधर से हम।’

‘सोशल मीडिया’ वापरताना
तरुण मित्रांनी स्वत:ला हे प्रश्‍न पुन:पुन्हा विचारावेत...

  •   मी मत मांडतोय, की लादतोय?
  •   ही अभिव्यक्ती आहे, की अभिनिवेश?
  •   ही माझी नम्रता आहे, की आढ्यता?
  •   ही खरी तळमळ आहे, की फक्त मळमळ?
  •   मी माणसं जोडतोय, की तोडतोय?
  •   मी जबाबदारीनं बोलतोय, की बेफिकीरीनं बरळतोय?
  •   मी ‘शेअर’ करतोय, की आगीत तेल ओततोय?
  •   मी खासगीत सांगतोय, की चव्हाट्यावर मांडतोय?
  •   मी जे ‘फॉरवर्ड’ करतोय, त्यामुळे समाजाला पुढे नेतोय, की मागंच खेचतोय?
  •   मी गोडवा मिसळतोय, की कटुता पसरवतोय?

संवाद साधण्याची ‘मंत्राक्षरी’

  •   सहा शब्दांचा मंत्र : ‘माझी चूक झाली, हे मान्य आहे.’
  •   पाच शब्दांचा मंत्र : ‘हे तू फारच छान केलंस!’
  •   चार शब्दांचा मंत्र : ‘तुझं मत काय आहे?’
  •   तीन शब्दांचा मंत्र : ‘एवढं प्लीज करशील?’
  •   दोन शब्दांचा मंत्र : ‘आभारी आहे.’
  •   एक शब्दाचा मंत्र : ‘आपण’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com