संकल्प आणि 'सिद्धी' (शिवराज गोर्ले)

New Year Resolutions
New Year Resolutions

नववर्ष आणि संकल्प यांचं अगदी जवळचं नातं. दोन वर्षांची सांधेजोड होत असताना अनेक जण वेगवेगळे संकल्प सोडतात. संकल्पांचा हा धुरळा कधी खाली बसला कळतही नाही. हे असे संकल्प ‘सिद्धी’पर्यंत जाण्यासाठी नेमकं काय करायचं, विचार कसा करायचा, कृती कशी करायची, मुळात संकल्पच कसे करायचे या सगळ्या गोष्टींबाबत मंथन.

वर्ष नव, हर्ष नव
जीवन उत्कर्ष नव
नवल चाह, नवल राह
जीवन का नव प्रवाह...

नव्या उमेदीनं येणारं नवं वर्ष. सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचं स्वागत. ३१ डिसेंबरच्या रात्री बाराच्या टोक्‍याला ‘हॅपी न्यू इअर’चा जल्लोष. त्यातही ज्यांच्या आयुष्यात आणखी अशी अनेक ‘नवी वर्षं’ येणार असतात, त्या तरुणाईच्या उत्साहाला उधाणच... रस्तोरस्ती आणि सोशल मीडियावरही नववर्षासाठी ‘हार्दिक’ शुभेच्छांचा वर्षाव. भिंतीवर नव्या वर्षाचं कॅलेंडर, नव्या वर्षाच्या कोऱ्या करकरीत डायऱ्या आणि मनोमनी नव्या वर्षाचे संकल्प!

तसं म्हटलं तर नवं वर्ष असं काय वेगळं असतं? ३१ डिसेंबरचा सूर्य आणि १ जानेवारीचा सूर्य तोच तर असतो. नवं वर्ष न म्हणता ‘पुढचं वर्ष’ असंही म्हणता येईल; पण त्यातली गंमतच हरवून जाईल. होय, सूर्य तोच असतो, जग तेच असतं, जीवन तेच असतं... पण उमेद नवी असते. ती जागवण्यासाठी नवं वर्ष हे आपण शोधलेलं एक सुंदर निमित्त असतं. अशी निमित्त हवीच असतात आपल्याला. म्हणूनच तर नव्या उमेदीनं केलेलं नव्या वर्षाचे संकल्प. अर्थात सारेच काही असे संकल्प करतात, असं नाही. ‘चाललंय ते ठीक आहे’, ‘आपण पुष्कळ ठरवतो; पण गोष्टी व्हायच्या तेव्हाच होत असतात,’ अशा विचारांची मंडळी असतातच. ती संकल्प करण्याच्या फंदातच पडत नाहीत. काहींचे नववर्षाचे संकल्प हे अगदी ‘सेम’ गेल्या वर्षाचेच संकल्प असतात. कारण ते पुरे झालेले नसतात. थोडक्‍यात, ‘सालाबादप्रमाणं यंदाही आमचे येथे जुनेच संकल्प नव्याने करण्याचे योजिले आहे...’ असे.

काही मंडळी मात्र उत्साहानंच नव्हे, तर अगदी हिरीरीनं नववर्षाचे संकल्प ठरवतात आणि जाहीरही करतात. प्रारंभी अगदी भरपूर उत्साह असतो. मात्र, तो हळूहळू विरत जातो. ‘संकल्पा’ची जादू ओसरत जाते. पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ हेच सुरू होतं.

काहींचे नववर्षाचे संकल्प हे अगदी ‘सेम’ गेल्या वर्षाचेच संकल्प असतात. कारण ते पुरे झालेले नसतात. थोडक्‍यात, ‘सालाबादप्रमाणं यंदाही आमचे येथे जुनेच संकल्प नव्याने करण्याचे योजिले आहे...’ असे.

‘संकल्प ते सिद्धी’ हा प्रवास पुरा करणारे फारच थोडे, असं का होत असावं? संकल्प पुरे व्हावेत यासाठी नेमकं काय करायला हवं, काय कारणं शक्‍य आहे? हे प्रश्‍न तर आहेतच; पण एक तर निश्‍चित - ‘संकल्पां’ना मुद्दलातच बगल देणाऱ्यांपेक्षा संकल्प करणारे, त्यांच्या पूर्तीसाठी थोडीफार धडपड करणारे हे कौतुकासच नव्हे, तर ‘माणूस’ म्हणवून घेण्यास पात्र ठरतात!

संकल्प तर हवेतच!
‘संकल्प कशासाठी’ या प्रश्‍नाचा संबंध थेट ‘जगायचं कशासाठी?’ या प्रश्‍नाशी असतो. शेवटी जगणं म्हणजे काय? विख्यात मानसतज्ज्ञ डॉ. अल्बर्ट एतिस म्हणतात ः ‘लिव्हिंग इसेन्शिअली मीन्स, डुइंग, ॲक्‍टिंग, लव्हिंग, क्रिएटिंग, थिंकिग...’

आपल्या देशी भाषेत सांगायचं तर ‘दुनियामें आये हैं तो कुछ करके जाएंगे।’

‘मजेत जगावं कसं?’ या पुस्तकात प्रारंभीच दिलेली माझी स्वतःची ‘मजेत जगण्या’ची व्याख्या अशी आहे ः

‘मजेत जगणं म्हणजे
आपलं आयुष्य आपण घडवणं
आणि आयुष्याचं ‘ऋण’ चुकतं करणं
स्वतःचं जगणं सुंदर करता करता
भोवतालचं जगही थोडं अधिक सुंदर करून जाणं!’

एवढं तरी आपण आयुष्याचं देणं लागतो की नाही? आणि हेही तितकंच खरं, की आपोआप काहीच होत नसतं. ‘केल्याने होत आहे हे अधी केलेची पाहिजे.’...पण त्यासाठी अगोदर संकल्प केले पाहिजेत. संकल्पामुळंच तर प्रयत्नांना दिशा मिळते, प्रेरणा आणि बळ मिळतं. अशक्‍य ते शक्‍य, करिता सायास... अरुणिमा सिन्हा हे त्याचं जितंजागतं उदाहरण आहे. धावत्या रेल्वेतून चोरांनी बाहेर फेकल्यामुळं गमवावा लागला. तरीही तिनं कृत्रिम पायांनिशी जगातलं सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा संकल्प सोडला आणि तो पुरा करून दाखवला. यानंतरही जगभरातली अवघड शिखरं पादाक्रांत करण्याचा तिचा संकल्प आहेच. ती म्हणते ः

‘अभी तो इस बाजकी असली उडान बाकी है
अभी अभी मैंने लांघा है समंदरको- अभी तो पुरा आसमान बाकी है’

 

अरुणिमाकडून आपण थोडीबहुत तरी प्रेरणा घेऊ शकतो की नाही? भले काही भव्य, दिव्य उदात्त नाही करता आलं, तरी आपापल्या कुवतीनुसार काही छोटं-मोठं करू शकतो की नाही? आता प्रश्‍न येतो. नववर्षातच का? संकल्पांसाठी मुहूर्त असतो का तो? या प्रश्‍नाचं उत्तरही आपल्या ‘माणूस’ असण्यातच दडलेलं आहे. 

आपोआप काहीच होत नसतं. ‘केल्याने होत आहे हे अधी केलेची पाहिजे.’...पण त्यासाठी अगोदर संकल्प केले पाहिजेत.

वर्ष नवे, संकल्प नवे
आपल्या मेंदूला नवं ते हवं असतं. त्याला नव्याची नवलाई असते. तेच तेच जुनं नकोसं झालं, की आपला नावीन्याचा शोध सुरू होतो. हा नावीन्याचा ध्यास प्रत्येकात असतो. फक्त कमी-अधिक प्रमाणात. त्या प्रमाणानुसारच आपल्या जीवनविषयक निवडी आणि दृष्टिकोन ठरत असतात. ‘नववर्षसंकल्पा’ची मानसिकता उलगडताना केतकी गद्रे म्हणतात ः ‘नवं वर्ष म्हणजे अशीच एक नवलाईची गोष्ट. नव्यानं सुरवात करून जीवनाकडं नव्या दृष्टिकोनातून पाहून त्याची नव्यानं बांधणी करण्याच्या प्रेरणेतून आपण नवे संकल्प करतो. जीवनात स्थैर्य लाभावं, त्यात सहजता यावी, यशप्राप्तीच्या संधी वाढाव्यात, घडलेल्या चुकांचं समोरच्या समस्यांचं विरसन व्हावं, व्यक्तिमत्त्व विकसित व्हावं... यासाठी आपण स्वतःला वेळोवेळी सज्ज करत असतो. म्हणूनच बदलत्या कॅलेंडरबरोबर आपणही जीवनाचं नवं पान, नव्या उमेदीनं, नव्या संकल्पानं उलगडू पाहतो.’

तसं म्हटलं तर येणारा प्रत्येक दिवस नवाच असतो. नित्यनूतनता हाच तर निसर्गाचा नियम आहे. रोज उगवणारा सूर्य आपल्याला हेच सुचवत असतो ः ‘हे आणखी २४ तास तुला बहाल केले आहेत. बघ त्याचं काय करतोस ते.’

नवं वर्षही सुचवत असतं ः ‘हे आणखी १२ महिने तुला बहाल केले आहेत. त्यांचं काय करायचं हे तूच ठरवायचं आहेस.’ हे ‘काही करायचं ठरवणं’ म्हणजेच तर संकल्प करणं. आयुष्याच्या प्रवासात काही टप्पे असावेच लागतात. कुठवर मजल मारली आहे, याचा लेखाजोखा घेऊन पुढच्या प्रवासाची आखणी करायची... त्यासाठीच नवं वर्ष हा एक टप्पा असतो. नव्या वर्षातले संकल्प हेच तुमच्या आयुष्यातल्या स्वप्नाच्या पूर्ततेच्या दिशेनं टाकलेलं एक ठोस पाऊल ठरू शकतं.

उद्दिष्ट स्पष्टच हवं
संकल्प म्हणजे ‘खयाली पुलाव’ नव्हे, दिवास्वप्न किंवा ‘मुंगेरीलालची स्वप्न’ नव्हेत. अविचारी, अवाजवी संकल्प पुरे होण्याची शक्‍यता मुळातच कमी असते. याचा अर्थ नेहमी ‘अंथरूण पाहून पाय पसरावेत’ असं नाही. कारण मग त्यात कसलंच आव्हान राहत नाही, की काही मिळवण्याचं समाधान मिळत नाही. तरीही आपल्या क्षमतांचा, परिस्थितीचा विचार करावा लागतोच. आपल्याला जीवनात नेमकी कोणती उद्दिष्टं साध्य करायची आहेत, ते ठरवून ती खऱ्या अर्थानं साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहणं महत्त्वाचं असतं.

बर्ट्रॉड रसेल म्हणतात ः  ‘प्राप्त परिस्थितीत, एक निश्‍चित दिशा डोळ्यांपुढं ठेवून आयुष्याला आकार देत राहणारी माणसंच समाधान आणि आत्मसन्मान मिळवत असतात. सुखी जीवनासाठी कायमस्वरूपी निश्‍चित उद्दिष्ट आवश्‍यक आहे.’ तुमचा नव्या वर्षाचा संकल्प हा या कायमस्वरूपी निश्‍चित उद्दिष्टांशी सुसंगत हवा - त्याच दिशेनं वाढणारा हवा. भाराभर संकल्प करण्यापेक्षा मोजके करावेत. संकल्पांच्या संदर्भातही हेच लागू पडतं- दो या तीन बस!

आयुष्याच्या प्रवासात काही टप्पे असावेच लागतात. कुठवर मजल मारली आहे, याचा लेखाजोखा घेऊन पुढच्या प्रवासाची आखणी करायची... त्यासाठीच नवं वर्ष हा एक टप्पा असतो.

त्यातही एक मुख्य असावा. बाकीचे दोन वेगळे असले, तरी मुख्य संकल्पाला पूरक असावेत. 

शेवटी संकल्प म्हणजे एक उद्दिष्टच असतं. तेही स्पष्टच असावं लागतं. ‘मला व्यक्तिमत्त्वविकास साधायचाय’, ‘मला सामाजिक योगदान द्यायचंय’ हे शब्दांकन भारदस्त असलं, तरी ते उपयुक्त नसतं. संकल्प नेहमी साध्या, सोप्या, नेमक्‍या शब्दांत मांडावा. उदाहरण म्हणून आमच्या काळातला एक ‘लाडका’ संकल्प घेऊ. वजन कमी करण्याचा. इथं तर आकडेच हवेत ः वर्षभरात किती वजन कमी करायचं आहे? त्याचबरोबर हेही स्पष्ट हवं, की तुम्हाला वजन नेमकं कशासाठी कमी करायचं आहे? आरोग्याच्या दृष्टीनं, की चांगलं दिसण्यासाठी? तुम्हाला नेमकं काय हवं आहे आणि कशासाठी हवं आहे, हे स्पष्ट असेल, तरच ते कसं साध्य करायचं हे ठरवता येतं. योजना आखून तिचा पाठपुरावा करता येतो. चांगलं दिसणं हे उद्दिष्टही चांगलंच आहे; पण तेच महत्त्वाचं असेल, तर ‘क्रॅश डाएटिंग’सारखे अतिरेकी उपाय केले जाऊ शकतात, ते आरोग्याला हानिकारकच ठरू शकतात. किती कमी करायचंय हे उद्दिष्टही वाजवी असेल, तर योग्य समतोल आहार व पुरेसा व्यायाम या आधारे ते पुरं करता येतं. मुख्य म्हणजे अशी शास्त्रीय पद्धतच टिकाऊ ठरते. झटपट उपाय नेहमी चुकीचेच ठरतात. म्हणूनच आहारतज्ज्ञ सल्ला देत असतात- डाएटिंग करू नका. असा आहार निवडा, जो फक्त वर्षभरासाठी किंवा महिन्याभरासाठी नव्हे, तर आयुष्यभरासाठी घेता येईल. स्वतःच्या प्रकृतीला साजेसा आहार घेतला, तरच वजन कमी करण्याचा संकल्प तडीस जाऊ शकतो. अन्यथा बारगळतो. 

खरा अडसर कोणता?
संकल्प आणि सिद्धी यांच्यामध्ये खरा अडसर असतो तो स्वतःचा, स्वतःच्या विचारांचा, हीच खरी ग्यानबाची मेख आहे. संकल्प पुरे का होत नाहीत? कारण ते आपण पुरे करू शकू, याची आपल्यालाच खात्री वाटत नसते किंबहुना नाहीच होणार असं आपण कुठंतरी गृहीत धरलेलं असतं.

जगभरातले तमाम मानसतज्ज्ञ, अक्षरशः रात्रंदिवस सकारात्मक विचारांचा घोषा लावतात, तो उगाच नव्हे.

डॉ. आनंद नाडकर्णी म्हणतात ः ‘यश आणि अपयश या फक्त शक्‍यता असतात. आपण जर सकारात्मक विचार ठेवून प्रयत्न केले, तर शक्‍यतेचं रूपांतर दाट शक्‍यतेमध्ये होतं; पण नकारात्मक विचारांमुळं मन अडकतं ते फक्त वाईटाच्या खात्रीवर.’ वाईटाची खात्री बाळगली (तीही अकारणच) तर प्रयत्नांमध्ये जोश कुठून येणार? उलट असलेल्या शक्‍यता आणि क्षमताही आपण वापरू शकत नाही. संकल्प पुरा होणार कसा?

संकल्पपूर्तीसाठी सकारात्मक विचार, आशावादी दृष्टिकोन आणि आत्मविश्‍वास हवा. आत्मविश्‍वास नसला, तरी तो प्रयत्नानं, सरावानं, अभ्यासानं मिळवता येतो. भले स्वतःवर पुरेसा विश्‍वास नसला, तरी निदान आखलेल्या योजनेवर ठेवू शकता. निसर्गावर, जीवनावर ठेवू शकता. हवं तर देवावरही ठेवू शकता! होतं काय, की संकल्प पुरा करणं ही एक प्रक्रिया असते. त्या प्रक्रियेत काही बदल अपेक्षित असतो; पण आपली त्या बदलाला सामोरं जाण्याची तयारी नसेल, तर आपला असलेला विश्‍वासही डळमळीत होऊ लागतो. बदलाशिवाय प्रगती शक्‍यच नसते; पण दुर्दैवानं आपल्या विधायक अशा बदलामध्येही आपणच अडसर बनून राहतो. म्हणूनच मुळात हे स्वीकारलं पाहिजे, की नवीन संकल्प करणं याचा अर्थच आपण जे काही करत आलो आहोत त्यात बदल करणं असा असतो. काही वेळा तर आपण करत होतो ते पूर्णपणे बदलून काहीतरी नवं निर्माण करायचं असतं. हे करायचं असेल, तर आपल्याला आपल्या कंफर्ट झोनमधून बाहेर येणं भाग असतं, गाडं नेमकं तिथेच बिनसतं, कारण हे सोपं नसतं. म्हणूनच कुठल्याही संकल्पाच्या सिद्धीसाठी पुरेपूर मानसिक तयारीही हवी. ती करणं सोपं जातं जेव्हा तुम्हाला तुमच्या संकल्पाचं मोल ठाऊक असतं. तुमचा संकल्प हा तुमच्या आयुष्यातल्या मुख्य उद्दिष्टांशी जोडलेला असेल आणि तुमचं ते उद्दिष्ट हा तुमचा ध्यास असेल, तर प्रयासाचे कष्ट जाणवत नाहीत. कुठल्याही संकल्पपूर्तीच्या प्रक्रियेत योजनेइतकीच बांधिलकी आणि चिकाटी महत्त्वाची असते. आरंभशूर मंडळी कमी पडतात ती इथं. मात्र, चिकाटीच अखेर कळीची ठरते. 

वाईटाची खात्री बाळगली (तीही अकारणच) तर प्रयत्नांमध्ये जोश कुठून येणार? उलट असलेल्या शक्‍यता आणि क्षमताही आपण वापरू शकत नाही.

जिथं हुशार माणसं मागं राहतात, तिथं सर्वसामान्य माणसं चिकाटीच्या जोरावर पुढं जातात. केवळ चिकाटी नसल्यामुळं शक्‍य कोटीतले आपले चांगले संकल्पही बारगळतात. ‘संकल्प’ या संकल्पनेतच काही निग्रह अभिप्रेत असतो. आळस, निष्क्रियता, चालढकल हे सारे संकल्पपूर्तीच्या मार्गातले अडथळे, स्पीडब्रेकर्सही! अगदी साधा, रोज थोडं चालण्याचा संकल्प असेल, तरी तो ‘जाऊ उद्यापासून’ या सोयीस्कर विचारानं राहूनच जातो. कारण तो ‘उद्या’ कधी उजाडत नसतो. म्हणूनच आपला संकल्प जवळच्यांना विश्‍वासात घेऊन सांगणंही फायद्याचं ठरतं. त्यांची साथ मिळू शकते. आपली ढिलाई झाली, तर प्रेमळ तंबीही मिळते. अनेकदा तर आप्तेष्टांचा, सहकाऱ्यांचा सहभाग महत्त्वाचाच नव्हे, तर आवश्‍यकही असतो. 

संकल्पपूर्तीसाठीचे प्रयत्न करताना आजूबाजूला योग्य, अनुकूल परिस्थिती असावी लागते. तशी नसेल तर प्रथम ती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.

कृती, सवय, आढावा
कुठलाही संकल्प सिद्धीस जातो तो अथक मनस्वी प्रयत्नांतून. अर्थात कृतीतून. आपल्या संकल्पाच्या सिद्धीसाठी आवश्‍यक अशा सोप्या, साध्या कृती ठरवाव्यात. अशा कृतींमुळं ‘आपण काही करतो आहोत,’ हे समाधान मिळतं आणि उमेद टिकून राहते. या कृतींपैकी एखादी कृती रोज शक्‍य असेल, तर तीही आवर्जून करावी. त्यातूनच त्या कृतीची सवय लागते. ती आपल्या अंगवळणी पडते. उदाहरणार्थ, रोज चार पानं वाचल्याशिवाय न झोपणं या भले छोट्या कृती असतील, छोटे बदल असतील; पण ते सहज शक्‍य असतात आणि अशा छोट्या छोट्या बदलांतूनच मोठे बदल घडत असतात. ‘थिंक बिग, ॲक्‍ट स्मॉल’ हे त्यासाठीचं एक लोकप्रिय सूत्र!

संकल्प ते सिद्धी हा एक प्रवास असतो. त्या प्रवासानं नेमक्‍या कुठल्या गोष्टींवर आपलं नियंत्रण आहे, तिकडं लक्ष केंद्रित करावं - म्हणजे आत्मविश्‍वास बळावत जातो. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे - केलेल्या संकल्पांचा, केलेल्या प्रवासाचा आढावा. तोही नियमित आढावा. त्यातूनच आपण कुठवर मजल मारली आहे, कुठं कमी पडतो आहोत, याचा अंदाज घेता येतो. अर्थात इथंही ‘नसेल आजवर जमलं, तरी पुढं जमेल’ असाच दृष्टिकोन ठेवावा लागतो.

आपण हे पुनःपुन्हा पाहतो आहोत की संकल्प ते सिद्धी हा एक प्रवास असतो. कुठल्याही प्रवासात मुक्काम महत्त्वाचं असतंच; पण तितकंच महत्त्वाचं असतं तो प्रवास एन्जॉय करणं. शेवटी प्रवासातला आनंद काही वेगळाच असतो. मात्र, सतत मुक्कामाचा विचार करीत राहिलं, तर प्रवासातली मजाच संपून जाते. ही मजा घेणंही जमायला हवं.

बाबा आमटे म्हणत असत ः ‘भान राखून योजना आखाव्यात आणि बेभान होऊन त्या अंमलात आणाव्यात.’ खरंच असं बेभान होणं जमलं, तर आणखी काय हवं? असो, तूर्त आपण भान राखून येत्या नव्या वर्षासाठी एखादाच छानसा संकल्प तर करू या....

कुठला संकल्प करायचा हे अर्थातच तुम्ही ठरवायचंय; पण अद्याप नसेल ठरवला तुम्ही, तर मी एक सोपा संकल्प सुचवू?

रोज चार पानं वाचल्याशिवाय न झोपणं या भले छोट्या कृती असतील, छोटे बदल असतील; पण ते सहज शक्‍य असतात आणि अशा छोट्या छोट्या बदलांतूनच मोठे बदल घडत असतात.

येत्या नव्या वर्षात, रोज किमान दोन व्यक्तींना आनंदी करण्याचा संकल्प करा. त्या दोन व्यक्तींपैकी एक तुम्ही स्वतः असाल, एवढं मात्र पाहा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com