आधी ‘बोध’ तर व्हायला हवा! 

आधी ‘बोध’ तर व्हायला हवा! 

बालक-पालक
ज्ञानरचनावादी शिक्षण प्रक्रियेत ‘संबोध’ हा परवलीचा शब्द म्हणता येईल. त्यामुळे पालकांनीही त्याच्याशी ओळख करून घ्यायला हवी. संबोध म्हणजे काय? संबोध याचा अर्थ बोध होणे हा आहे. बोध कशाचा? तर अर्थातच मिळणाऱ्या माहितीचा. माहितीचा अर्थ लावण्याचं जे शास्त्र आहे ते बोधाचं मानसशास्त्र आहे. त्या आधारे इतर शास्त्रांची किंवा विषयांची मांडणी, संरचना कशी तयार झाली हे अगदी स्पष्ट होते. त्यानुसार मग कुठलाही विषय कसा शिकायचा हे उमजतं. ही संरचना अगदी थोडक्‍यात अशी असते. तपशील - अवबोध - संबोध - बृहत्‌संबोध. - नियम - उपपत्ती. उदाहरणावरून हे सारंच स्पष्ट होईल. भाषा हा विषय घेऊ. भाषेतले मूलभूत तपशील कोणते - तर स्वर अथवा ध्वनी. प्रत्येक तपशील वेगळा असतो. अ, क, क्ष, ज्ञ.... हे वेगळेपण ओळखा येणं म्हणजेच बोध होणं. याला अवबोध म्हणतात. नंतर या ध्वनींमधलं सारखेपण व इतरांपासूनचं वेगळेपण ध्यानात घेऊन आपण त्यांचा गट करतो. अ ते औ हा गट स्वरांचा अं, अः म्हणजे स्वरादी. तर क ते ज्ञ हा गट व्यंजनांचा. ज्या नावाने हे गट ओळखले जातात, त्यांना संबोध म्हणतात. स्वर संबोध, व्यंजन - संबोध. 

आता पुढची पायरी - स्वर, स्वरादी, व्यंजने यांचा मिळून जो मोठा गट होतो तो वर्ण. म्हणजेच वर्ण हा झाला बृहत्‌संबोध. जरा आणखी स्पष्ट होण्यासाठी - पद्याचं उदाहरणं घेऊ. ओवी, लावणी, अभंग, पोवाडा हे पद्याचे प्रकार म्हणजेच संबोध आहेत, तर या सर्व संबोधांना सामावून घेणारा पद्य हा आहे बृहत्‌संबोध! 

मग या संबोधाचे परस्परसंबंध लक्षात घेऊन ते विधानांच्या स्वरूपात मांडले जातात. या विधानांचा पुन्हा पुन्हा पडताळा घेतला जातो. 

त्यानंतर पटलेल्या संबंधांची विधाने नियम म्हणून स्वीकारली जातात. या नियमांच्या आधारेच नंतर मिळणारे नवे तपशील समजून घेतले जातात. 

यातून मग वेगवेगळे निष्कर्ष उपपत्ती मांडल्या जातात. या उपपत्ती त्या त्या विषयाच्या सखोल ज्ञानग्रहणाला उपयोगी पडतात. असा असतो माहितीच्या तपशिलापासून ते ज्ञानग्रहणापर्यंतचा प्रवास. या प्रवासातला महत्त्वाचा टप्पा अर्थातच संबोधाचा- बोध होण्याचा फन्डाज्‌ क्‍लीअर असण्याचा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com