इतिहासपुरुष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इतिहासपुरुष

इतिहासपुरुष

- पांडुरंग बलकवडे, इतिहास अभ्यासक

बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता ऐकून मी भावविवश झालो. लहानपणापासून त्यांच्याविषयी ऐकलेल्या गोष्टी आणि पुढे त्यांचा लाभलेला ५० वर्षांचा सहवास, याचे चित्र माझ्यासमोर उभे राहिले. त्या आठवणींनी मी गहिवरलो.

बाबासाहेबांचा आणि माझा ५० वर्षांचा ऋणानुबंध. वयाच्या दहाव्या वर्षी मी माझ्या वडिलांबरोबर बाबासाहेबांना भेटायला त्यांच्या घरी गेलो. हे मला झालेले त्यांचे पहिले दर्शन. बाबासाहेबांचा आणि माझ्या वडिलांचा स्नेह होता. दोघेही समवयीन आणि भारत इतिहास संशोधक मंडळाचे सदस्य. त्यातून त्यांची मैत्री जमली होती. माझे पूर्वज, सिंहगड विजेते नावजी बलकवडे, यांच्या संबंधित ऐतिहासिक कागदपत्रे माझ्या वडिलांनी बाबासाहेबांना दाखवली. बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी ‘गड घेउनी सिंह आला’ ही कथा लिहिली. या कथेमुळे आणि बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळेच मी इतिहास संशोधनाकडे वळलो.

पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी गेली पाऊणशे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान आणि अद्भुत चरित्राचा देशभरात नव्हे तर जगभरात प्रचार आणि प्रसार केला. अगदी लहान वयापासून त्यांनी शिवचरित्राच्या अभ्यासाला सुरुवात केली. त्यांचे वडील मोरेश्वर पुरंदरे हे इतिहासाचे शिक्षक होते. त्यांनी अगदी लहान वयात बाबासाहेबांना शिवाजी महाराजांच्या कथा सांगून त्यांच्या मनात शिवाजी महाराजांविषयी अपार भक्तिभाव निर्माण केला. आपल्या वडिलांबरोबर शिवाजी महाराजांच्या जीवनाशी निगडित काही ठिकाणं त्यांनी पाहिली आणि त्याचबरोबर ते पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळात आले. थोर इतिहास संशोधक ग. ह. खरे यांचा सहवास बाबासाहेबांना लाभला. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांनी इतिहास संशोधनाचे प्राथमिक धडे गिरवले.

१९४७ मध्ये बाबासाहेब पुरंदरे यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या त्रैमासिकात मराठ्यांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी अत्यंत महत्त्वाची अप्रसिद्ध २८ पत्रे प्रसिद्ध केली. यात मराठ्यांच्या माळवा, बुंदेलखंड, गुजरात येथील अठराव्या शतकातील सत्तेविषयीची, तसेच पानिपत, राक्षसभुवनची लढाई व खर्ड्याच्या लढाईवर प्रकाश टाकणारी ऐतिहासिक मोडी कागदपत्रे होती. यावरून बाबासाहेबांचा मराठेशाहीचा सखोल अभ्यास दिसून येतो. १९५० नंतर बाबासाहेबांनी शिवचरित्राशी निगडित अनेक कथा लिहिल्या. त्यामध्ये पुरंदर, प्रतापगड, पन्हाळा, आग्रा या प्रसंगांवर आधारित कथासंग्रहांचा समावेश होता. १९५५ च्या सुमारास मराठेशाहीतील अनेक अज्ञात वीरांच्या चरित्रावर आधारित लघुकथा त्यांनी प्रसिद्ध केल्या. त्यामध्ये कान्होजी जेधे, बाजी सर्जेराव-जेधे, नागोजी जेधे, नावजी बलकवडे, पिलाजी नाईक अशा अनेक अज्ञात वीरांचा समावेश होता. त्याच सुमारास त्यांच्या डोक्यात शिवचरित्र लिखाणाची निश्चित स्वरूपाची योजना आकार घेऊ लागली. प्रचंड अभ्यास, कठोर परिश्रम, ऐतिहासिक साधनांची चिकित्सा आणि लेखनाची विलक्षण प्रतिभा यातून हे अद्भुत शिवचरित्र साकार झाले आहे. गेली पाऊणशे वर्ष या शिवचरित्राचे गारूड अवघ्या मराठी जनांवर कायम आहे. या शिवचरित्राच्या आजवर अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. तर कित्येक लाख ग्रंथ मराठी शिवभक्तांच्या संग्रहाची शोभा वाढवत आहेत.

बाबासाहेबांनी गेल्या पाऊणशे वर्षात दळणवळणाची साधने उपलब्ध नसतांनाही हजारो मैलांचा प्रवास आणि पायपीट करून खेड्यापाड्यात आपल्या अमोघ वाणीने सर्वसामान्यांपर्यंत सातत्याने शिवचरित्र पोचविण्याचे काम केले. ज्याप्रमाणे नेपोलियन, अलेक्झांडर, ज्युलियस सीझर अशा ऐतिहासिक व्यक्तींवर महानाट्ये सादर झाली, पण त्यांच्यापेक्षा कांकणभराने श्रेष्ठ असणाऱ्या माझ्या शिवाजी महाराजांवर महानाट्य का निर्माण होत नाही, या प्रेरणेतून त्यांनी ‘जाणता राजा’ या महानाट्याची निर्मिती केली. शेकडो कलाकार, हत्ती, घोडे, उंट यांच्या सहभागातून साकार होणाऱ्या या महानाट्याचे आजवर हजारो प्रयोग देश आणि विदेशातही सादर झाले आहेत. या महानाट्याच्या माध्यमातून त्यांनी सातासमुद्रापार शिवचरित्र पोचवले आहे. ‘जाणता राजा’ या महानाट्याच्या माध्यमातून शेकडो सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांना त्यांनी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. अगदी लहान वयापासून बाबासाहेबांना दुर्ग भ्रमंतीची ओढ लागली. त्यातून त्यांनी शेकडो दुर्गांची भ्रमंती केली. आज राज्यातील लाखो युवकांना दुर्गभ्रमंतीची आवड निर्माण करण्यामागे बाबासाहेबांचे हे अथक प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचे महान चरित्र जगासमोर आणण्यासाठी शिवसृष्टीची निर्मिती करावी, असा ध्यास त्यांनी घेतला. त्यातून पुण्यातील आंबेगाव येथे २७ एकर परिसरात शिवसृष्टीच्या निर्मितीच्या कार्याला प्रारंभ झाला. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावरील दरबार हॉल, प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिराची प्रतिकृती, रायगडावरील नगारखाना, प्रतापगड येथील महादरवाजांच्या प्रतिकृती, वैशिष्ट्यपूर्ण दुर्ग माचा, शिवाजी महाराजांवर देशविदेशांत प्रसिद्ध झालेल्या चरित्रग्रंथ व साहित्याचा संग्रह, शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रसंगांचे म्युरल, शिवकालीन आरमाराची वैशिष्ट्य अशा शिवचरित्राशी निगडित सर्व गोष्टींचे अभ्यास केंद्र निर्माण करण्याचे कार्य यात सुरू आहे. ‘जाणता राजा’ महानाट्याच्या प्रयोगातून मिळालेले सर्व उत्पन्न त्यांनी या कार्यासाठी सुपूर्द केले.

बाबासाहेबांनी स्वातंत्र्यसेनानी म्हणूनही काम केले. १९४७ ला देश स्वतंत्र झाला, परंतु पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोवा, दीव-दमण, दादरा नगर हवेली हा प्रदेश मात्र पारतंत्र्यातच होता. सुधीर फडके यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दादरा नगर हवेलीवर सशस्त्र हल्ला करून तो प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला. इतिहास संशोधक, शिवचरित्रकार, शिवव्याख्याते, ‘जाणता राजा’ महानाट्याचे लेखक आणि निर्माते, दुर्ग अभ्यासक, ऐतिहासिक संग्राहक, क्रांतिकारक व स्वातंत्र्यसेनानी आणि शिवसृष्टी साकारण्याचा ध्यास घेतलेले, अशी बाबासाहेबांची विविध रूपे आपण पाहिली आहेत. बाबासाहेबांचे हे अनेकविध पैलू पाहून अचंबित व्हायला होते. नुकतेच नागपंचमीच्या दिवशी बाबासाहेबांनी शंभराव्या वर्षात पदार्पण केले होते. त्या वेळी भारत इतिहास संशोधक मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या निमित्ताने दसऱ्याच्या दिवशी त्यांना भेटण्याचा मला योग आला. शंभराव्या वर्षात देखील बाबासाहेबांची अफाट स्मरणशक्ती व हाती घेतलेले कार्य पूर्णत्वाला नेण्यासाठी जगण्याची प्रचंड इच्छाशक्ती पाहून मी स्तिमित झालो. त्यांच्या निधनाने एक चालताबोलता इतिहासपुरुष गमावला आहे.

शिवाजी महाराजांनी ३५० वर्षांपूर्वी राष्ट्रीय चारित्र्य घडविले, देश समृद्ध करण्यासाठी पुन्हा राष्ट्रीय चारित्र्य घडवावे लागेल. त्यासाठी शिवाजी महाराजांचे चरित्र प्रेरणादायी आहे. म्हणून मी शिवचरित्र जगासमोर मांडतो, असे बाबासाहेब सांगत. सरंजामशाहीमध्ये राजेशाहीच्या माध्यमातून लोककल्याणकारी राज्याची निर्मिती शिवाजी महाराजांनी करून दाखविली. त्यामुळे मिळालेल्या स्वातंत्र्याला सुराज्य करण्यासाठी शिवचरित्र आवश्यक आहे.

(शब्दांकन : महिमा ठोंबरे)

loading image
go to top