मकर-संक्रमण (शोभा माळवे)

मकर-संक्रमण (शोभा माळवे)

वर्षांमागून वर्षं सरत गेली. ती कुणासाठी थांबतात? मनीषाचा तारुण्यातला अहंकारही उताराला लागून ती आता सारासार विचार करण्याच्या स्थितीत आली. वाढत्या वयानं आणि अनुभवानं आलेली परिपक्वता मनीषाला आतून सांगू लागली...पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे! आपण इतके का चुकलो? का फसलो? सगळे प्रश्‍नच प्रश्‍न...सगळा गुंताच गुंता! स्त्रीमनाची उकल कोण करणार? तिला उत्तर कोण देणार?

दिसायला सुंदर, उच्चविद्याविभूषित मनीषा पुण्याला आयटी कंपनीत नोकरीला होती. लठ्ठ पगाराचं पॅकेज होतं. मनीषा घरात जशी सगळ्यांची लाडकी, तशीच कंपनीतही सगळ्यांची आवडती. ध्येयासाठी, करिअरसाठी ती झपाटून काम करायची. ती आता सगळ्या बाजूंनी सेटल झालेली असल्यामुळं मनीषाच्या आई-बाबांनी तिच्यापुढं लग्नाचा प्रस्ताव मांडला. मात्र, तो तिनं ‘मला इतक्‍यात लग्न करायचं नाही,’ असं सांगत लागलीच धुडकावून लावला. अखेर मित्र-मैत्रिणींनी आणि थोरल्या भावानं मन वळवल्यावर नोकरी न सोडण्याच्या अटीवर ती बोहल्यावर चढली.

तिचं सासर सधन, सुशिक्षित, संस्कारशील होतं. सासरच्या मंडळींनी तिचं प्रेमभरानं स्वागत केलं. आपल्या सुनेनं किमती पोशाख घालावेत, भरजरी साड्या वापराव्यात, भरपूर दागिने ल्यावेत, लालबुंद टिकली लावावी असं तिच्या सासूबाईंना आणि नवऱ्यालाही वाटायचं. मात्र, मनीषाचा हट्ट वेगळाच होता. तिला आवड होती ती जीन पॅंट व टी शर्ट यांची. गळ्यात मंगळसूत्राचंही ‘लोढणं’ तिला नको होतं. टिकलीची तर बातच नको! नवरा मनीषाला समजून सांगायचा ः ‘‘अगं, तुझ्या फॅशनला आई-बाबांचा विरोध मुळीच नाही. नोकरीला जाताना तू तुझ्या आवडीच्या पोशाखातच जात जा; पण घरी आल्यानंतर, आपल्या पाहुण्यांच्या घरी जाताना, सण-समारंभात, घरगुती कार्यक्रमाच्या वेळी तू नव्या नवरीसारखी, नव्या सुनेसारखी दिसावीस एवढीच त्यांची माफक अपेक्षा आहे. ती थोडे दिवस पूर्ण करायला काय हरकत आहे?’’ पण मनीषाला काही ते पटलं नाही. ती तिच्या हट्टावर कायमच राहिली. इतकंच काय पण, करिअरसाठी मुला-बाळांचाही ‘अडसर’ही तिला नको होता. संसार करूनही नोकरी करता येते...करिअर करता येतं...थोडीशी तडजोड करून आपल्या माणसांची मनं जपता येतात आणि त्यातून आनंदही मिळवता येतो...हे तिच्या विचारसरणीत बसतच नव्हतं. शेवटी, धुसफूस वाढतच गेली आणि टोकाची भूमिका घेत अखेर एक दिवस मनीषानं सासर सोडलं.

मनीषाच्या सासूबाई सुजाण होत्या. सासूबाईंनी तिची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला. ‘‘तुझ्या आवडीप्रमाणे वाग; पण संसार मोडू नकोस,’’ असं त्यांनी तिला विनवलं; पण तिची भरकटलेली बुद्धी स्थिर झालीच नाही.
***

मनीषाच्या भावाला वाटलं, की आपली बहीण इतकी हुशार, लठ्ठ पगार मिळवणारी... तिनं का म्हणून शरणागती पत्करावी? शिक्षणाच्या व पगाराच्या अहंभावामुळं कुणीही तिची समजूत घालून तिला परत सासरी पाठवलं नाही. उलट, भावानं तिच्या अहंकाराला खतपाणीच घातलं व घटस्फोटासाठी न्यायालयात जायला तिला भरीस पाडलं.
तारखेसाठी न्यायालयात आल्यावर मनीषा आणि तिचा नवरा दोघंही एकमेकांकडं पाहायचे.
नव्या संसारातले सुरवातीचे रोमांचक क्षण आठवून तिचं मन डळमळीत व्हायचं. तिचा नवरा मनात म्हणायचा, आपली तर काहीच चूक नाही व नव्हती...
मनीषालाही वाटायचं, चूक आपलीच आहे...मग हार मानायला काय हरकत? मात्र, तिचं दुसरं मन तिला लगेच रोखायचं. अहंभाव जागा व्हायचा...पगाराचं ‘पॅकेज’, साथ देणाऱ्या भावाची नजर आठवायची अन्‌ ती गप्प बसायची. अखेर कंटाळून दोघांनीही न्यायालयात हजर राहणंच बंद करून टाकलं. तिकडं प्रकरण न्यायालयात ‘पेंडिंग’ राहिलं आणि इकडं मनीषाही कायमचीच माहेरी राहिली.

कुणी पाहुणे आले-गेले, की तिच्या माहेरी राहण्याबद्दल विचारायचे. त्यात कुत्सितपणा दिसायचा. उत्तर देताना भावाच्या बोलण्यात बहिणीला आधार दिल्याचा दर्प असायचा. हे ऐकून मनीषा मनातून दुखावली जायची; पण...इतकं मोठं पॅकेज असूनही आपल्या आयुष्याचं कुणाला ओझं वाटावं, याचं तिला आश्‍चर्य वाटायचं. आसपासचे लोकही नाना शंका-कुशंका घ्यायचे. कुणी म्हणायचं ऑफिसात बॉसशी काहीतरी भानगड असेल...कुणी म्हणायचं लठ्ठ पगाराची मस्ती आहे म्हणून सोन्यासारखं सासर लाथाडलं...एक ना दोन. कुणाकुणाला उत्तरं देणार? भावानं भरीला घातलं म्हणून न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्यानं आणि नंतर ‘माघार कुणी घ्यायची’ या विचारापोटी, अहंकारापोटी आपण संसाराचा सारीपाट उधळला, असं मनीषाला अधूनमधून वाटत राहायचं. चूक सुधारता येत असूनसुद्धा आपण केवळ ‘मी’पणापायी आणि भावाच्या प्रतिष्ठेपायी अडून राहत आहोत, हे एकीकडं तिला जाणवायचंही...मात्र, परत सासरी जाण्याविषयी पुढाकार घेण्यात तिचं मन कचही खायचं...मनीषा स्वतःच तयार केलेल्या चक्रव्यूहात अडकली होती...
आता आपला भाऊच आपल्याला आश्रित समजत आहे... परकी पाहुणी समजत आहे...! मनीषाला खूप वाईट वाटलं.  

वर्षांमागून वर्षं सरत गेली. ती कुणासाठी थांबतात? मनीषाचा तारुण्यातला अहंकारही उताराला लागून ती आता सारासार विचार करण्याच्या स्थितीत आली. वाढत्या वयानं आणि अनुभवानं आलेली परिपक्वता मनीषाला आतून सांगू लागली...पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे! आपण इतके का चुकलो? का फसलो? सगळे प्रश्‍नच प्रश्‍न... सगळा गुंताच गुंता! स्त्रीमनाची उकल कोण करणार? तिला उत्तर कोण देणार?
***

आज मकरसंक्रान्त होती. मनीषाच्या वहिनीनं भरजरी शालू नेसला होता. सोन्याचं भलमोठं ठसठशीत मंगळसूत्र घातलं होतं. सासूबाईंनी, म्हणजे मनीषाच्या आईनंच, वारसाहक्कानं दिलेली टपोऱ्या मोत्यांची नथ वहिनीनं घातली होती. तिनं नटूनथटून संक्रान्तीचं हळदी-कुंकू केलं. वाण लुटलं अन्‌ पतीच्या पाया पडली.
आयुष्याच्या उतरत्या घाटावरसुद्धा वहिनीचं सौंदर्य कसं खुलून दिसत होतं....वहिनीचं बारकाईनं निरीक्षण करत मनीषा मनातल्या मनात विचार करू लागली...भावानं वहिनीच्या गालावर हलकेच टिचकी मारली व तो तिला म्हणाला ः ‘‘खरंच, आज किती सुंदर दिसतेस गं तू!’’
नवऱ्यानं केलेलं कौतुक ऐकून वहिनीच्या चेहऱ्यावर लाजेची गुलाबी झळकली. तिचं मन आनंदानं बहरून गेलं. तिच्या व्रताची सांगता झाली.
मनीषा हे सगळं पाहत होती. तिचे डोळे डबडबून आले...न लावलेली टिकली, ‘लोढणं’ वाटणारं मंगळसूत्र हेच आनंदाचं खरं ‘पॅकेज’ आहे, असं मनीषाला वाटून गेलं...सगळ्या गोष्टी कशा वेळच्या वेळी व्हायला हव्यात. प्रवाहाचा आवेग ओसरल्यानंतर हाती काय लागणार?
भावाच्या घरी इतकी वर्षं राहून मनीषानं पगाराच्या पैशातून भारी भारी कपडे घेतले...गाडी घेतली...चैनीच्या अनेक वस्तू घेतल्या...भावांच्या मुलांचे लाड पुरवले...पण...पण अखेर ती मुलं भावाचीच, संसार त्याचाच, सौभाग्य वहिनीचंच. आणि आपलं काय? ना संसार, ना पती, ना मुलं! आपलं फक्त ‘पॅकेज’! काय करायचंय या अशा पॅकेजचं? वहिनीच्या तृप्त संसाराची आणि आपण सुरवातीलाच थांबवलेल्या आपल्या संसाराची तुलना मनीषा मनातल्या मनात करत राहायची. छताकडं पाहून घालवलेल्या रात्री तर ही तुलना अधिकच गडद व्हायची...स्त्रीसुलभ भावना जाग्या करायची. मन होरपळून जायचं...अश्रूंचा बांध फुटायचा...आणि आधारासाठी जीव आकांत करायचा...
***

आयुष्याच्या अखेरच्या वळणावर ऐन संक्रान्तीच्या दिवशी वहिनी दादाच्या पाया पडली अन्‌ दादानं तिचं कौतुक केलं...कौतुक करण्याची ती पद्धत...ते दृश्‍य बघून मनीषाच्या मनात संक्रमण झालं. तिचा उरलासुरला अहंकारही गळून पडला.
आयुष्याची संध्याकाळ अल्पसं का होईना समाधान मिळवूनच संपवायची, असं तिनं ठरवलं... तिनं सूटकेस भरली...भावाला नमस्कार केला व बोलण्यात ठामपणा आणत ती त्याला म्हणाली ः ‘‘दादा, मी सासरी चाललेय.’’ भाऊ अवाक्‌ झाला. तिला म्हणाला ः अगं, अशी अचानक? आता तुझं प्रौढवयही सरलंय...या उतरत्या वयात सासरी कुठं चाललीस तू? लोक काय म्हणतील? शिवाय, न्यायालयातही ते प्रकरणं तसंच पडून आहे...’’ आपला निर्णय भावाला सहजासहजी मान्य होणार नाही, याची तिला जाणीव होतीच; पण ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली. तिच्या मनाचा निग्रह झालेला होता. खूप उशिरा का होईना, स्त्रीमनाचा ‘कायदा’ तिला समजला होता व आता यापुढं तोच मानायचा, असं तिनं ठरवलं होतं... सासरच्या दिशेनं तिची पावलं पडू लागली...कदाचित, एक अर्थपूर्ण संक्रमण होऊ घातलं होतं...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com