पेरणी भविष्याची

श्रीराम गीत
रविवार, 4 जून 2017

बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. दहावीचेही निकाल लवकरच लागतील. हे विद्यार्थी आता पुढची जुळवाजुळव करायला लागले आहेत. आयुष्याचा हा अतिशय महत्त्वाचा टप्पा. या टप्प्यावर केलेली भविष्याची ‘पेरणी’च पुढच्या सगळ्या आयुष्याची दिशा ठरवत असते. बारावीनंतरच्या करिअरची योग्य निवड कशी करायची? त्यासाठी काय विचार करायचा? माहिती कुठून घ्यायची? पालकांनी मुलांना कशी मदत करायची?...या सर्व प्रश्‍नांचा वेध.

यंदाचा दहावीचा निकाल तोंडावर आला आहे, तर बारावीचा निकाल आणि संबंधित प्रवेशपरीक्षांचे निकाल लागलेले आहेत. दहावी आणि बारावी हे महत्त्वाचे टप्पे असले, तरी त्या विद्यार्थ्यांच्या मनोवस्थेत खूप अंतर असतं. दहावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी खूप स्वप्नं, विविध आशाआकांक्षा आणि नवतेचं आकर्षण यांनी भारावलेला असतो! मात्र, बारावीनंतर याच विद्यार्थ्यांचं रूपांतर अस्वस्थ, संतप्त, निराश किंवा अतिउत्साही तरुणात झालेलं असतं. अर्थात याला अपवाद आहेत. त्यांचेही दोन गट आहेत. दोन्ही गटांत मिळून एकूण विद्यार्थीसंख्या फार तर एक टक्का एवढीच आहे. खूप अभ्यास, कष्ट करून हवं ते साध्य केलेला एक गट असतो. संपूर्ण राज्यात अशा विद्यार्थ्यांची संख्या फार तर सात-आठ हजार इतकी असेल. आणखी एक गट म्हणजे ‘हवं तिथं, हवं तेव्हा बाबा मिळवून देणारच आहेत. मला हवं ते हवंच’ असा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा. हे दोन गट सोडले, तर उरलेल्या ९९ टक्‍क्‍यांची अवस्था दहावी-बारावीच्या परीक्षेनंतर सैरभैर होते. विद्यार्थी आणि त्यांचे पालकही हिंदकळताना दिसतात. 

दहावीनंतर काय हे आपण पहिल्यांदा बघू या. दहावीचे पाच टक्के विद्यार्थी स्वतःच्या मतावर ठाम असतात. मग ते रास्त असो वा अवाजवी. इंजिनिअर, डॉक्‍टर, आर्मी, एरॉनॉटिकल, बिझनेस, सीए किंवा एमबीए यांतलं काही तरी त्यांच्या मनात घट्ट घर करून बसलेलं असतं. सुमारे दहा टक्के विद्यार्थी ऐकीव शब्दांवर आपलं मत ठरवत असतात. मी मुद्दाम ‘ऐकीव’ हा शब्द वापरत आहे. कारण ज्यावेळी विद्यार्थी त्या शब्दाचा, त्या करिअरचा विषय काढतात, त्याच्याबद्दल त्यांना सलग पाच वाक्‍यंही बोलता येत नाही. बोलले तरी चुकीचं बोलतात. यामध्ये गेली पाच-सहा वर्षं काही अत्यंत लोकप्रिय असे शब्द माझ्या कानावर पडत असतात. ॲस्ट्रोफिजिक्‍स, न्युरोबायोलॉजी, न्युरोलिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग, क्‍लाऊड, जेनेटिक्‍स, मेकॅट्रॉनिक्‍स क्रिमिनॉलॉजी (हल्ली फॉरेन्सिक सायन्स मागं पडलं आहे), सीबीआय, आयबी, फूड टेक्‍नॉलॉजी, नॅनोटेक, बायोटेक असे विविध करिअरविषयक शब्द विद्यार्थी फटाफट ऐकवत असतात. गंमतीचा त्यापुढचा भाग म्हणजे बव्हंशी प्रसंगांत त्यांचे पालकच आपल्या पाल्याच्या अगाध ज्ञानानं दीपून गेलेले असतात. 

‘गूगल’बाबा तर्जनीच्या टोकावर नाचून साऱ्या जगातला खजिना तुमच्यासमोर टाकायला लागल्याचा हा एक परिणाम समजा ना!...पण या खजिन्यांतले हिरे कोणते, माणकं कशी असतात, मोती कुठं वापरतात आणि रंगीत दगडांचं काय केलं होतं याचा अर्थ लावण्याची क्षमता नसेल तर? मग ही गोळा केलेली सारी नवीन करिअर्सची फक्त शब्दकळाच बनते. अर्थहीन शब्दकळा. 

या दहा टक्‍क्‍यांमध्ये अजून एक साम्य मला आढळलं आहे. तो खचितच योगायोग नव्हे, इतकं ठळकपणे ते सापडलं आहे. या दहा टक्‍क्‍यांमध्ये मोठा भाऊ किंवा बहीण हुषार असते आणि त्यांचं शिक्षण संपवून ते परदेशात स्थिरावलेले असतात. त्यांचं सहा ते सात वर्षांनी लहान असलेलं भावंड आता दहावीला बसलेलं असतं. त्याची एक नजर मोठ्याच्या ‘स्काइप’वर दिसणाऱ्या सुबत्तेवर, तर दुसरा शोध ‘गूगल’बाबाच्या मदतीनं- तोही सातत्यानं सुरू असतो. असा हा झाला पंधरा टक्‍क्‍यांचा खेळ. मुख्यतः शहरी, निमशहरी भागांतल्या; सीबीएसई, आयसीएसई आणि थोड्या प्रमाणात एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा यात मोठा वाटा असतो. 
दुर्दैवानं उरलेले ८५ टक्के सहसा काहीच मत व्यक्त करत नाहीत. ‘मार्कांवर बघू’, ‘सायन्स आवडतं- कॉमर्स नको’, ‘गणिताची भीती वाटते’ याव्यतिरिक्त काय करायचं याबाबतचं त्यांचं मत, मन कळणं अनेकदा कठीण असतं. क्वचित ‘इंजिनिअरिंग चालेल की’ वगैरे अस्फुटपणे ऐकायला मिळतं; पण एकूण डोळ्यांसमोर तसा अंधारच. खरी मदतीची गरज या गटाला असते; पण ती क्वचितच मिळते. 

दहावीनंतर काय?
विद्यार्थ्यांच्या भविष्याची खरी ‘पेरणी’ इथंच होते. सुरवात कशामधून करायची, या प्रश्‍नातच करिअरविषयक उत्तरही दडलेलं असतं. 
ही सुरवात अशी करता येते 
१) कला शाखा (आर्टस)
२) वाणिज्य शाखा (कॉमर्स)
३) विज्ञान शाखा (सायन्स)
४) डिप्लोमा इंजिनिअरिंग
५) किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम (एमसीव्हीसी) 
६) जीडी आर्टस किंवा कमर्शियल अँड फाइन आर्टस
७) आयटीआय (खासगी किंवा सरकारी)

ही सुरवात करताना काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी विसरल्या जातात. त्या नीट समजून घेतल्या, तर कोणताच गोंधळ होत नाही. त्यासाठी स्वतःचं शिक्षण, त्यातली वाटचाल प्रथम आठवणं अत्यंत महत्त्वाचं राहतं. विद्यार्थ्यानं हे करायला हवंच, शिवाय अर्थातच आईची आणि वडिलांची भूमिका अतिशय महत्त्वाची. हे काही पालक लक्षात घेतात; पण स्वतःच्या हातून सुटलेल्या गोष्टी मुलानं पूर्ण कराव्यात म्हणून आग्रह धरतात. दुर्दैवानं इतिहासाची पुनरावृत्ती अपरिहार्य बनते. त्यामुळं पालकांनी स्वतःच्या चुका प्रथम आठवल्या, तर त्यावर मात करण्याचे मार्ग सापडून मुलांना मदत मिळू शकते. 

अशीच लक्षात ठेवण्याची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कला, वाणिज्य किंवा विज्ञान यांपैकी एका शाखेची निवड. यांपैकी कोणतीही शाखा घेऊन बारावी पूर्ण केल्यावर किमान डझनभर तरी अन्य वेगवेगळे पर्याय आपल्यासमोर असतात. त्यामुळं मूळ शाखेची निवड अचूक असणं फार गरजेचं असतं.
अशाच प्रकारे कोणतीही पदवी घेतली, तरी ज्याला ‘स्पर्धा परीक्षांद्वारे प्रवेश’ असं म्हटलं जातं, तिथंही अनेक पर्याय आपल्यासमोर येतात. तिथं मात्र साऱ्याच पदवीधरांना एकाच रांगेत उभं केलं जातं. तिथं बीए आणि बीई यांत कोणताही दुजाभाव केला जात नाही. ही वस्तुस्थिती पूर्णपणे विसरून जेव्हा एखादी मुलगी बीई करून एमपीएससीची तयारी करायला लागते, तेव्हा तिला असं कळतं, की दहावीत आपल्यापेक्षा पंधरा टक्के गुण कमी पडले म्हणून बीएला गेलेली मैत्रीण स्पर्धा परीक्षा देऊन सरकारी अधिकारी बनली आहे. इंजिनिअर मुुलीला या परीक्षेची तयारी म्हणजे ‘कधीच न ऐकलेल्या गावाकडचा प्रवास’ असं वाटू लागतं. सायन्सवाला बॅंकेत काम करतो, तर कॉमर्सवाला इंजिनिअरिंग इंडस्ट्रीत स्टोअर्स ऑफिसर बनतो, अशीही उदाहरणं आढळतात. त्यामुळं दहावीनंतरच भविष्याची पायाभरणी करायला सुरवात करणं खूप महत्त्वाचं असतं.

विज्ञान शाखेबाबतचा भ्रम
दहावीनंतरच्या शिक्षणाची निवड करताना एक गोष्ट फार प्रकर्षानं जाणवते ती म्हणजे विज्ञान शाखेबाबतचा भ्रम. अभियांत्रिकी, वैद्यकीय, संशोधन या तीन शाखा यांच्याव्यतिरिक्त विज्ञान शाखा कुठंही लागत नसते. या तीन गोष्टी करावयाशा वाटत असतील, तर विज्ञानाला पर्यायच नाही. मात्र, चांगले गुण पडले आहेत, म्हणून विज्ञान प्रसन्न होत नाही. विज्ञानावर प्रेम हवं, चौकसपणा हवा, कष्टांची प्रचंड तयारी हवी. गणित चांगलं हवं. तांत्रिक भाषेत ‘ॲप्टिट्युड’ किंवा क्षमता चाचणीच्या भाषेत सांगायचं, तर आकलन, तर्कविचार, निरीक्षण आणि संख्याज्ञान हे उत्तमच हवं.
‘‘पहिल्यांदा बारावीपर्यंत ‘सायन्स’ घेऊन बघू. नंतर वाटलं, तर ‘कुठं पण’ जाता येतं,’’ हे लाडकं वाक्‍य नेहमी ऐकू येतं. मात्र, अशा मुलांची गाडी अकरावीलाच ‘सायडिंग’ला पडते, कदाचित विषय पण राहतात. मुख्य म्हणजे विनाकारण आपण भिंतीवर धडका घेत आहोत हेसुद्धा लक्षात न घेता क्‍लासला, कॉलेजला, न झेपणाऱ्या अभ्यासाला लाखोली वाहिली जाते. यंदा पुण्यात विज्ञान शाखेला जाऊ इच्छिणाऱ्या सुमारे ३८ हजारपैकी किमान १८ हजार ‘कुठं पण जाणाऱ्या’ गटातले असणार आहेत म्हणून हा उल्लेख. त्यामुळं विज्ञान शाखेबद्दलचा भ्रम काढून विचार करणं अतिशय गरजेचं. 

कला शाखा आणि अन्य पर्याय
कला, वाणिज्य, पदविका यांच्याबद्दल कधी तरी ऐकलेलं असते. यातल्या एखाद्या रस्त्यातून आईवडिलांचा प्रवासही झालेला असतो; पण या रस्त्यांवर सुरवात करून बघा, असं कितीही समजावून सांगितलं, तरी पालकांचे कान बंद असतात. मुलं ऐकण्याच्या मनःस्थितीत नसतात. त्यांच्या मनातल्या कॉलेजांतली ‘मज्जा’ त्यांच्या डोळ्यात तरळत असते.
जीडी आर्टसचंच बघा. चित्रकलेच्या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण आणि दहावी उत्तीर्ण एवढीच अट जीडी आर्टसला असते. पाच वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून उत्कृष्ट काम करणारी पन्नास तरी नावं सहज सांगता येतील. आज सर्वांत जास्त मागणी आणि काम असणारा हा अभ्यासक्रम आहे. पाच वर्षं पूर्ण करून एका वर्षात बीएफएची पदवी मिळवता येते. वृत्तपत्रं, जाहिरात कंपन्या, डिजिटल मीडिया, आयटी, कॅलिग्राफी, प्रकाशनसंस्था इथं हा अभ्यासक्रम खूप उपयोगी पडतो.
एमसीव्हीसी हाही अतिशय चांगला मार्ग. त्यात अनेक पर्याय आहेत; पण सरकार, पालक, विद्यार्थी सारेच या भानगडीकडं तुच्छतेनं बघतात. महाराष्ट्रात प्रत्येक गावी, प्रत्येक जिल्ह्यात हा रीतसर बारावीचं प्रमाणपत्र देणारा अभ्यासक्रम चालतो. ट्रॅव्हल, हॉटेल, सिव्हिल, इलेक्‍ट्रिकल, मेडिकल लॅब इत्यादी प्रमुख प्रकारांतलं थेट कौशल्यविकासाचं प्रशिक्षण दोन वर्षांत मिळतं. याच्या जोडीला दोन भाषा असतातच. दहावीला जेमतेम पन्नास टक्के असोत वा सत्तर टक्के या दोघांनाही अकरावीच्या प्रवेशासाठी, बऱ्या कॉलेजसाठी वणवण करावी लागते. जे काही हाती लागतं, त्याबद्दल नाराजीच असते. यातच त्यांचा अभ्यास वाहून जातो. शंभर जणांच्या मोठ्या वर्गांत सामान्य आकलन असलेल्या विद्यार्थ्यांकडं दुर्लक्ष होतं. याउलट एमसीव्हीसीच्या जेमतेम वीस किंवा तीस जणांच्या वर्गात खेळीमेळीनं, जोमानं, प्रात्यक्षिकांमधून शिकत गुण वाढतात, मुख्य म्हणजे आत्मविश्‍वास अक्षरशः दुणावतो. एकदा बारावी उत्तीर्णचं प्रमाणपत्र हाती आलं, की पुन्हा मुख्य प्रवाहात सामील व्हायला ही मुलं सज्ज होऊ शकतात. सिव्हिल, इलेक्‍ट्रिकलवाली डिप्लोमाला, तर मेडिकल लॅबमधली त्यातल्या पुढच्या शिक्षणासाठी जातात. ट्रॅव्हल, टूर्स व हॉटेल मॅनेजमेंटमध्ये तर येतील त्या प्रत्येकाचं स्वागत आहे, अशी स्थिती आहे. मात्र, आम्हीच पाठ फिरवून ‘कुठं पण’च्या मागं धावणार असलो तर?

आयटीआयला मागणी
आयटीआयला काही जण नावं ठेवतात; पण प्रवेशसंख्येच्या किमान चार ते पाचपट अर्ज इथं प्रवेशासाठी गेली पाच-सहा वर्षे येत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. महत्त्वाच्या ट्रेडसाठी शेवटचा शहरी प्रवेश सहसा पंचाहत्तर टक्‍क्‍यांना थांबतो, इतकी इथं गर्दी होताना दिसते. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे पदवीधर बीई, डिप्लोमा होल्डरपेक्षा सर्वात जास्त मागणी आयटीआयला आहे. पगार तर नक्कीच जास्त आहे. आपल्या शिक्षणपद्धतीचं हे कौतुक अनेक मराठीजन लक्षात घेत नाहीत. त्यामुळे धडधाकट, दणदणीत; पण पुस्तक समोर आल्यावर जांभई देणारे बीएचा रस्ता पकडतात. उत्तीर्ण झाल्यावर सदतिसाव्या वर्षापर्यंतसुद्धा ‘मी एमपीएससीची तयारी करत आहे,’ असं सांगून पालकांकडं मनीऑर्डरची मागणी करत राहतात. आयटीआयमध्ये खासगी असंख्य नव्या-जुन्या संस्था आहेत. चांगले गुण, चिकाटी, जिद्द असेल, तर डिप्लोमा इंजिनिअरिंग पूर्ण करण्याची शक्‍यता असते.
कला, वाणिज्य, विज्ञान, पदविका यांच्यासंबंधी ढीगभर माहिती रोज कुठं ना कुठं मिळत असते. या माहितीचा अक्षरशः रतीब घातला जात असतो. मात्र, दुधाचा रतीब लावून घरच्या घरी मिठाई कधीच बनत नाही. 
त्यासाठी प्रथम कमवावं लागतं आणि मग हलवायाच्या दुकानी जाऊन ती विकतच आणावी लागते याची नोंद कोणी घेत नाही. आज बाजारात उपलब्ध असलेले चकचकीत, गोंडस, गोजिरे-साजिरे, नवीन काढलेले असंख्य अभ्यासक्रम या चारही शाखांतून उपलब्ध आहेत. मात्र, संस्थेच्या प्रत्येक विटेसाठी प्रत्येक पालक घाम गाळून पैसे मोजत असतो, हेही एक प्रखर वास्तव आहे. ‘शिक्षणमहर्षी’ ही पदवी दहा कोटी मराठीजनांची निर्मिती आहे, हेही लक्षात घ्यायला हरकत नाही. 

बारावीनंतरचं ‘महाभारत’
दहावीपर्यंतचं ‘रामायण’ झालं; आता त्यानंतर बारावीनंतर सुरू होणारं ‘महाभारत’ पाहू या. ते थेट निवृत्त होईपर्यंत चालूच राहतं.
विविध आकर्षक शब्द असोत, ठाम समजुतीनं धरलेला रस्ता असो वा काहीच कळत नाही म्हणून प्रवाहपतीत होऊन कलेची सुरवात असो, दहावीनंतरची सुरवात फक्त सात गोष्टींतूनच करावी लागते. बारावीनंतर मात्र करिअरला खूप वाटा फुटतात. दहावीपर्यंत कोणतंही बोर्ड घेतलं असलं, तरी बारावीनंतर असणाऱ्या प्रवेशपरीक्षा मात्र सारख्याच असतात, हे लक्षात घ्यायला पाहिजे.
कोणताही व्यावसायिक अभ्यासक्रम हवा असेल, तर त्याची सामायिक प्रवेशपरीक्षा द्यावीच लागते हे पक्कं लक्षात ठेवा. फक्त बीए, बीकॉम, बीएस्सीसाठी अजून प्रवेशपरीक्षा आलेली नाही. कदाचित काही वर्षांनी तीही येईल. अमेरिकेतल्या सॅटसारखी (SAT). साऱ्यांना एकाच पातळीवर आणणारी ही प्रवेशपरीक्षा. कोणकोणत्या महत्त्वाच्या प्रवेशपरीक्षा असतात बरं?
१) सीएसाठी सीपीटी
२) सीएसची फाऊंडेशन
३) बीबीए, बीसीए, बीबीएम, आयबी 
४) हॉटेल मॅनेजमेंट
५) बीएफए
६) डिझाईन, फॅशन, गेमिंग आणि ॲनिमेशन
७) पंचवार्षिक विधी अभ्यासक्रम
८) मास मीडिया, कम्युनिकेशन
९) बीए ललित कला
१०) आर्किटेक्‍चर
सर्वांत महत्त्वाची आणि अनेकांना माहीत नसलेली गोष्ट म्हणजे या साऱ्या प्रवेशपरीक्षा कोणतीही बारावी झालेला कष्टाळू, अभ्यासू विद्यार्थी देऊ शकतो. बारावीला पन्नास टक्के एवढीच गरज असते. 
या प्रवेशपरीक्षांची निवड फार अचूकपणे करायला पाहिजे. बीएफए, आर्किटेक्‍चर, डिझाईन यांसाठी चित्रकलेची जाण हवी. सीए आणि आर्किटेक्‍चरसाठी बारावीला गणितात किमान सत्तर गुण असणं उपयुक्त राहतं आणि ते गरजेचंही असतं. हॉटेल, ललित, कला आणि मास कम्युनिकेशन यांच्यात प्रवेश घेण्यासाठी सर्जनशीलता लागते. सीए/ सीएस कोणताही पदवीधर/ बारावीचा विद्यार्थी करू शकतो.

अभियांत्रिकी, वैद्यकीयचा मार्ग 
‘कुठं पण’वाल्यांसाठी फक्त दोनच परीक्षा आहेत. अभियांत्रिकी आणि वैद्यकीयची मायबाप सरकार जी सांगेल ती प्रवेशपरीक्षा. त्यात मधूनअधून खेळखंडोबा चालूच असतो. गंमतीची गोष्ट म्हणजे वैद्यकीय प्रवेशाच्या संपूर्ण महाराष्ट्रात जागा फक्त सहा हजार आहेत. त्यासाठी काही खुट्ट झालं, की साऱ्याच महाराष्ट्रावर आभाळ कोसळल्याचा भास व्हायला लागतो. या सहा हजारांतल्या तीन हजार प्रचंड अभ्यासूंसाठी, तर तीन हजार फक्त पन्नास लाखांची बेगमी करणाऱ्यांसाठी. तरीही आभाळ कसं कोसळतं आणि घनघोर चर्चा का होतात, हा एक यक्षप्रश्‍नच आहे.

नंतरही परीक्षाच परीक्षा
बारावीनंतर पदवीला प्रवेश घेतला, तरी तिथंच भविष्याचा शोध संपत नाही. पहिल्या पदवीनंतर एमबीए, मास कम्युनिकेशन, पत्रकारिता, कायदा, एमपीएससी, यूपीएससी, संरक्षण दलं, निमलष्करी दलं, फिल्ममेकिंग, एडिटिंग, अभिनय, बॅंकिंग, विविध दुय्यम सरकारी पदं यांसाठीच्या तीव्र स्पर्धेच्या प्रवेशपरीक्षा पुढंही तुमची वाट बघत असतात. त्या त्या क्षेत्रात तुमची आवडीनुसार प्रगती होत जाते. अनेक डॉक्‍टर्स, बहुसंख्य इंजिनिअर्स यांतलंच काही तरी करायला हिरीरीनं मुख्य प्रवाहात उडी मारतात,

हेसुद्धा लक्षात ठेवावं.
सध्या एवढं पुरे. स्वतःला ओळखा, पालकांशी चर्चा करा, एकेक पर्यायावर काट मारत स्वतःसाठी योग्य काय त्याबाबत विचार करत राहा, म्हणजे करिअरची वाट सापडेल. भविष्याची ही खऱ्या अर्थानं ‘पेरणी’च असते. तुम्ही बी कुठलं पेरता, त्यावर पुढचं पीक कसं येणार हे ठरत असतं एवढंच लक्षात ठेवा म्हणजे झालं! तुमच्या भविष्यासाठी शुभेच्छा!

Web Title: shreeram geet writer about career opportunities