मोसूल पडल्यानंतर...

रविवार, 23 जुलै 2017

इसिस या कडव्या दहशतवादी संघटनेच्या ताब्यात असलेलं मोसूल पडलं आहे. इराकी सैन्यानं त्याच्यावर पुन्हा नियंत्रण मिळवलं असून, यासंदर्भातलं एक वर्तुळ पूर्ण झालं आहे. इसिसचा म्होरक्‍या अल्‌ बगदादी याच्या दहशतवाद्यांनी इराकच्या ताब्यातून ते २०१४ मध्ये बळकावलं होतं, तेव्हाच इसिस नावाचा धोका स्पष्टपणे जगासमोर आला होता. मोसूल पुन्हा इराकनं घेतल्यानं इसिसचं कंबरडं आता मोडलं आहे. मात्र, इसिसच्या या पराभवानं जगातल्या दहशतवादाचा प्रश्‍न संपणार आहे का, हा मुद्दा उरतोच. केवळ दहशतवादी टिपून दहशतवाद संपत नसतो. त्यांना टिपणं गरजेचं असतंच; मात्र त्यापलीकडं जाऊन दहशतवादी तयारच होणार नाहीत, अशी व्यवस्था तयार करणं, हे खरं आव्हान आहे.
 

इसिस या कडव्या दहशतवादी संघटनेच्या ताब्यात असलेलं मोसूल पडलं आहे. इराकी सैन्यानं त्याच्यावर पुन्हा नियंत्रण मिळवलं असून, यासंदर्भातलं एक वर्तुळ पूर्ण झालं आहे. इसिसचा म्होरक्‍या अल्‌ बगदादी याच्या दहशतवाद्यांनी इराकच्या ताब्यातून ते २०१४ मध्ये बळकावलं होतं, तेव्हाच इसिस नावाचा धोका स्पष्टपणे जगासमोर आला होता. मोसूल पुन्हा इराकनं घेतल्यानं इसिसचं कंबरडं आता मोडलं आहे. मात्र, इसिसच्या या पराभवानं जगातल्या दहशतवादाचा प्रश्‍न संपणार आहे का, हा मुद्दा उरतोच. केवळ दहशतवादी टिपून दहशतवाद संपत नसतो. त्यांना टिपणं गरजेचं असतंच; मात्र त्यापलीकडं जाऊन दहशतवादी तयारच होणार नाहीत, अशी व्यवस्था तयार करणं, हे खरं आव्हान आहे.

इस्लामी दहशतवादाचं आतापर्यंतचं सगळ्यात भेसूर रूप असलेल्या इसिसच्या सामर्थ्याला मोसूलच्या पराभवानं निर्णायक तडाखा दिला आहे. मोसूलची लढाई इसिससाठी प्रतिष्ठेची होती आणि अन्य लढाऊ संघटनांसोबत यात गुतंलेल्या इराकी फौजांसाठीही. अमेरिकेच्या हवाई संरक्षणात या फौजांनी मोसूलवरील कारवाई सुरू केली मागचं वर्ष संपताना. या कारवाईला बराक ओबामा सत्तेवर असेतोवरच यश मिळेल, असा आशावाद व्यक्त केला जात होता. प्रत्यक्षात त्यासाठी बराच काळ जावा लागला. आता इसिस पराभूत झाली असली तरी तिच्या लढण्याच्या क्षमतेचा अंदाज येतो. मुळात इसिसचा म्होरक्‍या अबू बक्र अल्‌ बगदादीनं स्थापन केलेलं कथित राज्य आधुनिक समाजात कायमस्वरूपी टिकणारं नव्हतंच. त्याच पराभव अटळ आहे. मुद्दा हा पराभव करताना लढणाऱ्यांमधील मतभेदांचा आणि त्यातील आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आहे. त्याचाच लाभ घेत बगदादीची खिलाफत इतका काळ तग धरू शकली. इराकी सैन्याचा मोसूलवरचा विजय खुद्द इराकच्या पंतप्रधानांना तिथं जाऊन साजरा करावासा वाटला, यात त्याचं महत्त्व आहे. इराकच्या हातून बगदादीच्या दहशतवाद्यांनी मोसूल जिंकलं ते २०१४ मध्ये आणि इसिस नावाचा धोका स्पष्टपणे जगासमोर आला होता. मोसूल इराकी सैन्यानं पुन्हा ताब्यात घेतल्यानं एक वर्तुळ पूर्ण झालं आहे. 

दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक पाऊल पुढं पडलं आहे. मोसूलनंतरही इसिसचे दहशतवादी राक्का आणि अन्य छोट्या गावांतून कडवा प्रतिकार करत राहतील. त्यांचे स्लिपर सेल दीर्घ काळ जमेल तिथं उत्पात घडवत राहतील. इसिसचा लष्करीदृष्ट्या संपूर्ण पराभव करणं आणि मध्ययुगीन कल्पनेतलं भयराज्य तयार करणाऱ्या बगदादीला संपवणं हे आवश्‍यक आहे आणि मोसूलनंतर त्या दिशेनं कारवाई जाईलही. मुद्दा इसिसच्या पराभवानं जगातल्या दहशतवादाचा प्रश्‍न संपणार का आहे? त्याचं उत्तर म्हणजे, केवळ दहशतवादी टिपून दहशतवाद संपत नाही; ते गरजेचं असतं, मात्र त्यापलीकडं जाऊन दहशतवादी तयारच होणार नाहीत, अशी व्यवस्था तयार करण्याचं आव्हान आहे. इथं दहशतवाद परराष्ट्र धोरणातलं हत्यार म्हणून वापरण्याची नीती आड येते. 

सन २०१४ मध्ये इसिसचे काळे झेंडे मोसूलमध्ये नाचवले गेले आणि तेव्हापासून इसिसच्या खिलाफतीचं मोसूल हे सगळ्यात महत्त्वाचं केंद्र बनलं. जवळपास २० लाख लोकवस्तीचं हे शहर इसिसनं फारशा प्रतिकाराविना इराककडून जिंकलं होतं. याचं कारण या भागातली कमालीची अस्वस्थता. त्या वेळी इराकी सैन्य प्रतिकार करू शकलं नव्हतंच; पण शेवटच्या टप्प्यात चक्क पळून जाण्याचा मार्ग त्या सैन्यानं अवलंबला आणि मोसूलच्याच अल नूरी मशिदीतून बगदादीनं स्वतःला खलिफा घोषित केलं. एक ऐतिहासिक वारसास्थळ असलेली ती मशीद अलीकडच इसिसनं पाडून टाकली. आता इराकनं मोसूल पुन्हा जिकलं तेव्हा शहराची पार रया गेली आहे. लाखो जणांनी शहर सोडून पलायन करणं पसंत केलं. हजारोंचा बळी इसिसच्या दहशतवाद्यांनी घेतला. तीन वर्षांत इराकमधल्या समृद्ध मानल्या गेलेल्या मोसूलला अवकळा आल्याचं पुढं येत आहे. धूळधाण झालेलं हे शहर ताब्यात घेण्यासाठी सुमारे ६० हजारांची फौज लढत होती. इसिसनं जगाची ‘सुष्ट म्हणजे इसिस आणि दुष्ट म्हणजे इसिसला विरोध करणारे’ अशी विभागणी केली होती आणि ‘दुष्टांशी अंतिम मुकाबला याच भागात होईल’, असा इतिहासातल्या भाकितांवर आधारित दावा इसिसकडून केला जात होता. मोसूलच्या पाडावानं तो फोल ठरवला आहे. दहशतवादी संघटनांचं बळ हे अनुयायांना टोकाच्या धर्मभावनेनं भारून टाकण्यात असतं. इसिसनं असाच व्यूह अनुयायांभोवती तयार केला आहे. कितीही पराभव झाले तरी अंतिम विजय खिलाफतीचाच होणार, अशी पक्की धारणा आणि त्यासाठी मरायला तयार असणाऱ्यांच्या फौजा उभ्या करणं हे इसिसचं यश होतं. यासाठी अत्यंत संघटीतरीत्या प्रचार करणं ही इसिसची खासियत. एरवी, मध्ययुगातच वावरणारी ही संघटना आपल्या विचारांच्या प्रसारासाठी अत्यंत आधुनिक संपर्कसाधनं वापरण्यात सगळ्यात आघाडीवर आहे. इंटरनेटवरून तरुणांना जाळ्यात ओढणं, कट्टरपंथी विचारांची लागण करणं यात इसिस नेहमीच पुढं राहिली आहे. इसिसनं दहशतवाद्यांच्या जगात एक विशिष्ट भूमीवर राज्य स्थापन करायचं मॉडेल आणलं. ही भूमी हातातून सुटणं अनिवार्यच होतं. साहजिकच आधुनिक जगाच्या विरोधात मध्ययुगीन दहशतवादी राज्य टिकण्याची शक्‍यता नाही. इसिससाठी राज्य किंवा खिलाफत स्थापन करून कारभार चालवायचा प्रयत्न करणंच अडचणीचं ठरणार होतं. कारण, अन्य दहशतवादी संघटनांच्या हाती भूमी नाही. अचानक हल्ले करून लक्ष वेधणं हीच त्यांची कार्यपद्धती असते. एकदा राज्य स्थापन केल्यानंतर त्याचं रक्षण करणं, हेच मुख्य काम होऊन बसतं आणि रक्षण करता न येणं हा पराभव असतो. इसिसच्या बाबतीत नेमकं हेच घडत आहे. 

‘अल्‌ कायदाच्या मालिकेतली अधिक कडवी कडी’ या स्वरूपात इसिसचं संघटन पुढं आलं. अल्‌ कायदामुळं जगाला; विशेषतः अमेरिकेच्या नेतृत्वाखालील पाश्‍चात्य जगाला दहशतवादाच्या झळांची जाणीव झाली. अल्‌ कायदाचा म्होरक्‍या ओसामा बिन लादेननं जगभर दहशतवाद ‘एक्‍स्पोर्ट’ करण्यावर भर दिला होता. अल्‌ कायदाचा आर्थिक स्रोत प्रामुख्यानं पश्‍चिम आशियातल्या 
दुखावलेल्या धनवंतांच्या देणग्यांमधून येणारा होता. इसिसनं मात्र खिलाफत स्थापन करताना इराक आण सीरियातला लक्षणीय भाग अमलाखाली आणला आणि या भागात आपल्या शैलीचं प्रशासन लागू करायचा प्रयत्न केला. इसिसचा आधार देणग्यांइतकाच ताब्यात असलेल्या भागातून काढलेलं, चोरलेलं तेल काळ्या बाजारात विकणं हाही राहिला. साहजिकच भूभागावरची सत्ता इसिससाठी महत्त्वाची आहे. या इसिसचा पाडाव होऊ शकतो, यावर कुणाचंच दुमत नव्हतं. अमेरिकेसाठी हा लढा अशक्‍य नव्हता. मात्र, इराक-सीरियातली समीकरणं, पश्‍चिम आशियातलं वर्चस्वाचं राजकारण, शिया-सुन्नी वाद आणि अमेरिका-रशियासारख्या बड्यांचे व्यूहात्मक हितसंबंध यातून ‘इसिसनंतरच्या स्थितीचं काय,’ यावर अनेक मतभेद आहेत. तेच निर्णायक लढ्यात आड येणारे बनले. इसिसपेक्षा सीरियाच्या बशर अल्‌ असद यांची राजवट संपवणं अमेरिकेला महत्त्वाचं वाटत राहिलं...रशियाचा असद राजवटीला पाठिंबा आहे...अमेरिकेला अफगाणिस्तानसारखं सर्वंकष युद्धात गुंतायची इच्छा नाही...सौदी अरबला युद्धानंतरच्या स्थितीत इराणला लाभ होऊ नये असं वाटतं...इस्राईलला इसिस नकोच; पण इराणच्या पाठिंब्यावरची असद राजवट हा अधिक मोठा धोका वाटतो...इस्राईलच्या दृष्टीनं इसिस संपणं चांगलंच; पण हिजबुल्ला आणि हमासला बळ मिळता कामा नये...या सगळ्यात इसिसविरुद्ध लढणाऱ्या कुर्दांच्या स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीचं काय करायचं, याचं उत्तर शोधता येत नाही. तुर्कस्तान, इराणला असं घडणं धोकादायक वाटतं. अशी ही सगळी गुंतागुंत इसिसला ऑक्‍सिजन पुरवणारी ठरली. 

-मोसूद पडल्यानंतर काय, याचं उत्तर आता सीरिया आणि इराकच्या गुंत्यात अडकलेल्या सगळ्यांनाच शोधावं लागेल. एकतर इसिसचा संपूर्ण पराभव होईपर्यंत लढावं लागेल. मोसूल सोडावं लागलेले दहशतवादी अन्यत्र जमेल तेवढा प्रतिकार करतील. मात्र, भूमी धरून ठेवणं एका मर्यादेपलीकडं त्यांना शक्‍य नाही. पराभवानंतर इसिस अल्‌ कायदाप्रमाणं लक्ष वेधून घेणाऱ्या हल्ल्यांवर भर देण्याची शक्‍यता अधिक आहे. तसंही फ्रान्स, ब्रिटनपासून उत्तर आफ्रिकेपर्यंत आणि अफगाणिस्तानपर्यंत इसिसनं जाळं पसरलं आहे. लीबिया, इजिप्त, येमेन आदी देशांत इसिसचे तळ आहेत. इसिसचं सीरिया आणि इराकमध्ये भक्कम नेटवर्क आहे. ते आता भूमिगत होण्याच धोका आहे. अमेरिकेच्या हवाई संरक्षणानंतरही मोसूलमध्ये इराकी सैन्याला अक्षरशः इंच इंच भूमीसाठी संघर्ष करावा लागला, हे विसरता कामा नये.  सीरियात पराभूत झालेले इसिसचे दहशतवादी जगभरातून कथित खिलाफत आणि जिहादसाठी एकवटले होते. आता ते आपापल्या भागात परतण्याचा धोका आहे. ही मंडळी ‘इसिस संपली नाही,’ हे दाखवण्यासठीही अतिरेकी कारवायांचा मार्ग अवलंबू शकतात. याहून महत्त्वाचं म्हणजे, इसिसला फावलं ते इराकमधल्या निर्नायकी स्थितीमुळंच. निरनिराळ्या गटांच्या संघर्षात प्रशासन कोलमडतं तेव्हा त्याचा फायदा दहशतवाद्यांना होतो, हे यापूर्वीही दिसलं आहे. इसिसच्या पाडवानंतर सीरिया आणि इराकमधल्या राजकीय, प्रशासकीय व्यवस्था लावणं हे सगळ्यात जिकिरीचं काम आहे. त्यात अनेक देशांचे हितसंबध गुंतले आहेत. या टकरावाचाच लाभ इसिससारख्यांना होतो. इसिसनंतरच्या काळातलं परस्परविरोधी हितसंबंधांचं व्यवस्थापन कळीचं असेल. 

इसिसची उभारणी संघर्षग्रस्त सीरिया आणि इराकमधल्या पोकळीत झाली. त्याला अमेरिका-सौदीचाही नकळत हातभार लागला. या परिसरातल्या व्यूहात्मक गरजांतून इसिसला पुरतं संपवण्याकडं दुर्लक्ष झालं, याचा परिणाम जग भोगत आहे. अमेरिका आपला जगावरचा प्रभाव टिकवण्यासाठी ज्या प्रकारचे खेळ खेळते, त्याचा परिणाम अनेक भागांत अस्वस्थता निर्माण होण्यात झाला. दहशतवाद फोफावण्यात या अस्वस्थतेचाही वाटा आहे. वेळ आल्यानंतर अमेरिकेनं तालिबानचं राज्य बरखास्त करताना हत्यार उचललं आणि लादेनचाही खात्मा केलाच. आता इसिसचं कंबरडं मोडणारा पराभव मोसूलमध्ये झाला आहे. उरल्यासुरल्या ठिकाणांहून दहशतवाद्यांना उखडणं आणि बगदादीला संपवणं ही या लढाईची तार्किक परिणती असेल. कधीतरी ते अटळ आहे. त्यातून इसिस अल्‌ कायदाप्रमाणं कदाचित कमजोर होईलही; पण दहशतवाद कसा संपेल? दहशतवादी बनण्यासाठी वाटेल तेवढा कच्चा माल उपलब्ध आहे आणि या अमानवी सैतानी विचारांचं गारूड जोवर कोणत्याही कारणानं करता येतं, तोवर दहशतवादाचा निर्णायक पराभव होत नाही. द्वेषावर आधारलेल्या आणि आपल्या विचारांखेरीज इतरांना जगण्याचा अधिकार नाही, असं सांगणाऱ्या शिकवणुकीशी, विचारांशी लढा देण्याचा मुद्दा आहे. तो दीर्घ पल्ल्याचा आणि कदाचित पिढ्यान्‌पिढ्या चालणारा असेल. नाहीतर एक दहशतवादी संघटन नेस्तनाबूत केली, की काही काळात त्यातून अधिक खतरनाक काहीतरी आकाराला येतं. अशीच आवर्तनं चालत आली आहेत... 

Web Title: shreeram pawar article