कोई मेरा अपना होता !

श्रीकांत कात्रे
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

हमको तुमसे हो गया है प्यार... अशी शबाना आझमीला साद घालणारा अमर, दऱ्याखोऱ्यांतून घोडा उधळत आपल्या अदाकारीने जिवंत केलेला 'मेरा गाव, मेरा देश'मधील डाकू, वादा करले साजना, तेरेबिन मै ना रहू, मेरेबिन तू ना रहे, न होंगे जुदा ये वादा रहा...असा सिमी गरेवालला वादा देणारा विनोद खन्ना. हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या कसदार अभिनयाने स्वतंत्र प्रतिमा निर्माण करणारे व्यक्तिमत्व. विनोद खन्ना म्हणजे रूपेरी पडद्यावरील उत्साही, उमदा, लोभस देखणा, सळसळता आविष्कारच. या गुणी अभिनेत्याचे जीवनही तितकेच सिनेमासारखेच होते. गुरूवारी (ता. 27 एप्रिल 2017) त्याने घेतलेली 'एक्‍झिट' रसिकांना चटका लावून गेली.

अभिनेता- संन्यासी- अभिनेता- राजकारणी असा प्रवास म्हणजे एखाद्या सिनेमासारखाच. स्वातंत्र्यापूर्वी पाकिस्तानमधील पेशावरमध्ये जन्मलेल्या विनोद खन्नाचे कुटुंब स्वातंत्र्यानंतर मुंबईत आले. शालेय जीवनापासूनच सिनेमाची आवड निर्माण झाली. मुंबईच्या सिडनहॅम कॉलेजमध्ये शिक्षण घेतानाच सिनेमाशी जवळीक साधण्याचे प्रयत्न सुरू झाले. परंतु वडिलांचा फिल्मी दुनियेलाच विरोध. अखेर सिनेमात काम करण्यासाठी वडलांकडून दोन वर्षे मुदतीची मुभा त्याने मिळविली.

सुनील दत्तबरोबरच्या 'मन का मीत' या चित्रपटात 1968 मध्ये विनोद खन्नाला पहिली संधी मिळाली ती खलनायक साकारण्याची. तो सिनेमा फारसा नाही चालला. पण विनोद खन्ना मात्र पुढेच चालत गेला. रांगड्या धर्मेंद्रबरोबरीने 'मेरा गाव, मेरा देश' मधील डाकूने रसिकांची मने जिंकली. आन मिलो सजना, मनोजकुमारच्या पूरब और पश्‍चिम, राजेश खन्नाचा सच्चा झुठा या चित्रपटांमधूनही हा चेहरा दिसला.

1971 मध्ये आलेल्या 'मेरे अपने' या सिनेमाने हिंदी चित्रसृष्टीला हा नवा नायक दिला. त्यानंतर विनोद खन्ना हा 1980 च्या दशकातील हिरोच बनला. अमिताभ बच्चन सुपरस्टार असलेल्या काळातही आपल्या कसदार आणि दमदार अभिनयाने विनोद खन्नाने पडद्यावर आपले स्वतंत्र व्यक्तीमत्त्व खुलविले होते. अचानक, ऐलान, इन्कार, लहू के दो रंग, जुर्म, द बर्निंग ट्रेन, कच्चे धागे, कुदरत, लेकिन, राजपूत, रिहाई, हाथ की सफाई, इम्तिहान, कुर्बानी अशा कितीतरी चित्रपटांतून विनोद खन्नाची हिरोगिरी सुरू राहिली. सुपरस्टार अमिताभ बच्चन याच्याबरोबर अभिनयाची जुगलबंदी करण्याची संधी विनोद खन्नाला अनेकदा लाभली. मुकद्दर का सिकंदर, हेराफेरी, परवरिश, खून पसीना अशा चित्रपटातून अमिताभच्या बरोबरीने भूमिका त्याने निभावल्या. मल्टीस्टारकास्ट चित्रपट असला की त्यातील एक प्रमुख भूमिका विनोद खन्नाचीच असावी, असाच एक काळ राहिला. 

सिनेमाच्या पडद्यावरील भूमिकांनी रसिकांच्या गळ्यातील ताईत बनत असतानाच त्याच्या आयुष्याने एक वेगळी कलाटणी घेतली. पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर सारे काही सोबत असताना एकाएकी संन्याशी होण्याची आगळीच भूमिका स्वीकारली. या भूमिकेने रसिकांच्या मनात खळबळ माजलीच. पण त्याच्या खासगी कौटुंबिक आयुष्यातही वादळ निर्माण झाले. 1982 पासून आचार्य रजनीश ओशो यांच्या आश्रमातील जीणे तो जगू लागला. त्यासाठी तो काही काळ अमेरिकेतही गेला. 1987 च्या दरम्यान तो परत चित्रपटसृष्टीकडे वळला. 'दयावान' हा सिनेमा रसिकांनी डोक्‍यावर घेतला. इन्साफ, सत्यमेव जयते या सिनेमात विनोद खन्नाचा अभिनय दिसला. अलिकडील काळातील सलमान खानचा दबंग, दोन वर्षांपूर्वी शाहरूख खानच्या 'दिलवाले'तही विनोद खन्नाचा चेहरा होता. 

अभिनयापासून अलिप्त होत संन्यासी झालेल्या विनोद खन्नाच्या आयुष्याला पुन्हा एकदा वेगळी कलाटणी मिळाली. आणखी वेगळ्याच क्षेत्रात त्याची दमदार एन्ट्री झाली. राजकारणाच्या रिंगणातही तो यशस्वी झाला. पंजाबमधील गुरूदासपूर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून चारवेळा ते संसदेत निवडून गेले. 2002 मध्ये केंद्रात सांस्कृतिक व पर्यटन खात्याचे मंत्रीही झाले. सिनेमा, संन्यास आणि पुन्हा सिनेमा ते राजकारण या प्रवासात त्यांचा सर्वांत अविस्मरणीय जिव्हाळ्याचा विषय सिनेमाच राहिला. 'हाथ की सफाई'मध्ये सिमी गरेवालबरोबरच्या 'वादा करले साजना, तेरेबिन मै ना रहू, मेरेबिन तू ना रहे, न होंगे जुदा ये वादा रहा...' असे गुणगुणणारा विनोद खन्ना आपल्यापसून अखेर जुदा झाला. 

विनोद खन्ना यांच्यावर चित्रित झालेले एक गाणे आहे... 

कोई होता जिसको अपना 
हम अपना कह लेते यारो 
पास नही तो दूर ही होता 
लेकिन कोई मेरा अपना होता ! 

 

या ओळीप्रमाणेच विनोद खन्ना स्वतःच्या आयुष्यात काही तरी शोधत असावा. सिनेमात, संन्यस्त वृत्तीत किंवा राजकारणात. उसका 'कोई अपना' त्याला मिळाला की नाही आपल्या कुणालाच माहित नाही. पण तो मात्र आपल्या सर्वांच्या हृदयात विराजमान झाला, हे नक्की.

Web Title: Shrikant Katre recollects works of Vinod Khanna