त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि

त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि

गणेश देवतेचं सांप्रतचं स्वरूप हे अथर्वशीर्षाच्या रचनाकाली निश्‍चित झालं. ‘त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि’ हे अथर्वशीर्षानं गणेशाला दिलेलं ब्रह्मरूपत्व समाजाच्या सर्व स्तरांत बिंबवण्याचं महत्त्वाचं कार्य पुराणांनी केलं. पुराणांनी या विषयात विशेष लक्ष घातल्यामुळं गणेशमाहात्म्य कळसाला पोचलं. अर्थात पुराणांनी गणेशाच्या स्वरूपात काही नवीन भर घातली असली, तरी ‘एकदन्तं चतुर्हस्तं’ हे गणपतीचं अथर्वशीर्षोक्त ध्यानच आसेतू हिमाचल पूज्य ठरलं आहे.

भारतीय साहित्याच्या इतिहासात वेदांना अग्रगण्य आणि सर्वोच्च स्थान आहे. असंख्य वर्षांपासून लोक वेदांना मानत आलेले आहेत. भारतीय साहित्याच्या इतिहासातली अत्यंत प्राचीन, परंतु महत्त्वाची रचना म्हणजेच ऋग्वेद संहिता किंवा ऋग्वेद होय. ऋग्वेदातल्या मंत्रांतली विविध देवतांची वर्णनं पाहता त्यातले अधिकांश मंत्र देवतांच्या स्तवनासाठी वापरले जात असावेत. आर्यांच्या देवताविषयक कल्पनांचा एक संदर्भग्रंथ म्हणून ऋग्वेदाचं प्रामुख्यानं स्थान आहे.

गणपती ही एक अशीच भारतातली एक प्राचीन देवता. धड मानवाचं आणि शिर हत्तीचं असा संयोग असलेला आणि विविध वैशिष्ट्यांनी नटलेला हा देव आहे. ऋग्वेदीय ऋषींनी देवांना मानवीय शरीर धारण केलेलं असं कल्पिलं आहे. देवांच्या विविध अंगांचा उल्लेख त्यांनी केला आहे आणि या देवांची विविध आयुधं आहेत. यावरून देवांचं मानवीकरण ही गोष्ट साधारण असली, तरी त्यातल्या त्यात त्यांची वेगवेगळी रूपंही निश्‍चित करण्यात आली आहेत.

वेदकालापासून आजपर्यंत गणपती या देवतेच्या स्वरूपामध्ये निरनिराळ्या प्रकारचे बदल झालेले आपल्याला आढळून येतात. अर्थात याला अनेक कारणं आहेत. पुराणकथा, आख्यायिका, दंतकथा इत्यादीमधून या बदलांमागची नेमकी कारणमीमांसा आपल्या लक्षात येते.

फक्त वेदांच्या संदर्भात बोलायचं झाल्यास असं म्हणता येईल, की वेदकाली ‘ब्रह्मणस्पती’ या देवतेलाच गणपती म्हणत असत. त्यानंतर वैदिकांनी देवतेचा वैदिक परंपरेशी संबंध जोडला. ऋग्वेदातल्या निरनिराळ्या मंडळांतल्या एकूण ६२ ऋचांचं संकलन करून तयार केलेलं ‘ब्रह्मणस्पतीसूक्त’ नावाचं सूक्त गाणपत्य संप्रदायामध्ये विशेष प्रचलित आहे. तमिळनाडूमध्ये आजही गणपतीला ‘ब्रह्मणस्पती’ म्हणण्याचा प्रघात आहे. गृत्सांचा गृत्सपती, गणांचा गणपती, व्रातांचा व्रातपती, विरूपांचा विरूप अशा सर्वांचा वैदिक ब्रह्मणस्पतीमध्ये समावेश होऊन, गणेशाचं आजचं विशाल स्वरूप बनलं आहे.

वैदिक दैवतशास्त्राची आधुनिक पद्धतीनं म्हणजेच तुलनात्मक आणि ऐतिहासिक चिकित्सा करणाऱ्या संशोधकांचं किंवा अभ्यासकांचे या देवतेविषयी थोडं वेगळं मत आहे. त्यांच्या मते गणपती ही मूळ आर्येतर देवता आहे. काही आर्येतर गण किंवा समूह किंवा समूह हत्तींची पूजा करीत आणि त्या पूजेतूनच गणेशपूजा विकसित झाली, असं त्यांचं मत आहे. त्यांच्या मते, गणेश ही प्रथम आर्येतरांची एक ग्रामदेवता होती. तशा प्रकारच्या इतर देवतांबरोबर ती खेड्यांत एका झाडाखाली असे. ही आर्येतरांची ग्रामदेवता पुढं वैदिकांनी आपली म्हटली आणि ‘गणांना त्वा गणपती हवामहे’ या वैदिक मंत्रांनी तिची पूजा- अर्चा होऊ लागली. अर्थात हा पारंपरिक आणि आधुनिक अभ्यासकांमधला ‘वाद-संवाद’ आहे आणि तो या देवतेची लोकप्रियता किंवा महत्त्व कमी करण्यासाठी निर्माण केला गेलेला नाही, हे या देवतेविषयी जनमानसात असलेली श्रद्धा आणि उत्कट भक्ती यांवरून लक्षात येते.

गणेश देवतेचं सांप्रतचं स्वरूप हे अथर्वशीर्षाच्या रचनाकाली निश्‍चित झालं. या अथर्वशीर्षावरून हेही समजून येतं, की गणेशाच्या बाह्य स्वरूपाबरोबरच त्याचं आध्यात्मिक स्वरूपही घडत गेलं. ‘त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि’ हे अथर्वशीर्षानं गणेशाला दिलेलं ब्रह्मरूपत्व समाजाच्या सर्व स्तरांत बिंबवण्याचं महत्त्वाचं कार्य पुराणांनी केलं. पुराणांनी या विषयात विशेष लक्ष घातल्यामुळं गणेशमाहात्म्य कळसाला पोचलं. अर्थात पुराणांनी गणेशाच्या स्वरूपात काही नवीन भर घातली असली, तरी ‘एकदन्तं चतुर्हस्तं’ हे गणपतीचं अथर्वशीर्षोक्त ध्यानच आसेतू हिमाचल पूज्य ठरलं आहे.
गणपती हा ‘मंगलमूर्ती’ म्हणजेच सकल मंगलांचा मंगल ठरला आहे. म्हणूनच कोणत्याही कार्याच्या आरंभी त्याच्या नावानं मंगल करतात. या विषयीचा प्रसिद्ध श्‍लोक असा ः

विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा।
सङ्‍रामे सङ्‌कटे चैव विघ्नस्तस्य न जायते।।


‘कलौ चंडिविनायकौ’ असं एक वचन आहे. याचा अर्थ कलियुगात अन्य दैवतांपेक्षा चंडी आणि गणपती हीच दैवतं फलप्रद होतात, असा त्याचा अर्थ. म्हणून भारतात आणि विशेषकरून महाराष्ट्रात गणपतीची अनेक प्रकारे उपासना होते. संकष्ट चतुर्थीचं व्रत, सत्यविनायकाची पूजा, अथर्वशीर्षाची सहस्र आवर्तनं, मोदकांचं हवन, गणपतीला लक्ष दुर्वा वाहणं इत्यादी गणपतीच्या उपासनेचे विविध प्रकार सांप्रत प्रचलित आहेत.
भाद्रपद शुद्ध चतुर्थीस दर वर्षी केलं जाणारं पार्थिव सिद्धीविनायकाचं पूजन हा असाच गणपतीच्या पूजेचा उपासना प्रकार. या चतुर्थीला ‘वरद चतुर्थी’ असंही म्हणतात. ही चतुर्थी रविवारी किंवा मंगळवारी आल्यास तिचं माहात्म्य अधिकच असतं. हा गणेश चतुर्थीचा, गणपतीचा पूजोस्तव सर्वत्र दिसतो.

गणेश चतुर्थीच्या दिवशी ज्या गणपतीचं पूजन होतं, ते ‘पार्थिव सिद्धीविनायक’ या नावानं होतं. कुठल्या युगामध्ये कशापासून बनवलेली मूर्ती पूजेकरता घ्यावी, हे सांगत असताना ‘पार्थिवं तु कलौ युगे’ म्हणजे कलियुगात पार्थिव (मातीची) मूर्ती पूजेकरता घ्यावी, असं सांगितलेलं आहे. ‘मंत्रमहोदधि’ या ग्रंथात पार्थिव पूजेसंबंधीचं माहात्म्य बऱ्याच विस्तारानं आणि तपशीलाने वर्णिलेलं आहे.

महाराष्ट्रात भाद्रपद शुक्‍ल चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत दहा दिवस गणपतीचा उत्सव साजरा केला जातो. घराघरात किंवा कुटुंबापुरताच तो पूर्वी मर्यादित होता. लोकमान्य टिळक यांच्यामुळं त्याचं स्वरूप विस्तारलं. लोकांनी सार्वजनिक गणपती बसवावेत, यासाठी त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला. प्रोत्साहनही दिलं. ‘या गणपतीपुढं कथा-कीर्तनं, समाजातल्या निरनिराळ्या क्षेत्रांतल्या लोकांची व्याख्यानं, त्याचप्रमाणं राष्ट्रीय जागृतीचे पोवाडे गाणारे मेळे काढावेत आणि या निमित्तानं संघटना बांधून राष्ट्रात देशभक्तीचा प्रचार करावा आणि अशा प्रकारे दहा दिवस उत्सव करून अनंतचतुर्दशीच्या दिवशी मिरवणुकीनं गणपतीचं विसर्जन करावं,’ असा लोकमान्य टिळक यांचा विचार होता. भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्तानं राष्ट्रीय जागृती आणि राष्ट्रात देशभक्तीच्या प्रसाराद्वारे जे कार्य झाले, ते दृष्टीआड करून चालणार नाही. महाराष्ट्रात तर तो एक चैतन्यदायी उत्सव ठरला!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com