अंतरंग अथर्ववेदाचं

अथर्ववेदाचा धार्मिक ग्रंथमालिकांमध्ये उल्लेख केलेला नाही म्हणून अथर्ववेदसंहिता या सर्वांच्या नंतरची आहे असं म्हणणं निखालस चुकीचं ठरेल.
atharva veda
atharva vedasakal

- श्रीकृष्ण पुराणिक, saptrang@esakal.com

अथर्ववेदाचा धार्मिक ग्रंथमालिकांमध्ये उल्लेख केलेला नाही म्हणून अथर्ववेदसंहिता या सर्वांच्या नंतरची आहे असं म्हणणं निखालस चुकीचं ठरेल; कारण, कृष्णयजुर्वेदाच्या एका संहितेत आणि कुठं कुठं ब्राह्मणे, उपनिषदे वगैरे ग्रंथांतून अथर्ववेदाचा इतर तीन वेदांबरोबर उल्लेख केलेला आढळतो. अथर्ववेदसंहितेची उपलब्ध प्रत ऋग्वेदसंहितेच्या नंतरची आहे हे जरी खरं असलं तरी त्यांतील सर्वच सूक्ते ऋग्वेदसूक्तांनंतरची आहेत, असं काही त्यावरून म्हणता येत नाही. फक्त एवढं सिद्ध होतं की, अथर्ववेदांतील सर्वांत नंतरची सूक्ते ही ऋग्वेदांतील सर्वांत नंतरच्या सूक्तांनंतरचीं आहेत.

ज्याप्रमाणे अथर्ववेदातील बरीचशी सूक्ते पुष्कळशा ऋग्वेदसूक्तांनंतरचीं आहेत, त्याचप्रमाणे अथर्ववेदातील अभिचारऋचा या ऋग्वेदातील यज्ञसंबंधीच्या ऋचांपेक्षा जरी जास्त जुन्या नसल्या तरी त्यांच्या इतक्याच जुन्या आहेत हेदेखील निश्चत आहे व अथर्ववेदातील अनेक सूक्ते ही ऋग्वेदातील जुन्यात जुन्या सूक्तांइतकीच प्राचीन, त्याच अज्ञात प्रागैतिहासिक कालातील, आहेत.

‘अथर्ववेदकाल’ म्हणून ठराविक मर्यादित काल असा नाही. ऋग्वेदसंहितेप्रमाणे अथर्ववेदातील काही काही सूक्तांच्या रचनाकालात कित्येक शतकांचं अंतर आहे. आणि म्हणून, अथर्ववेदाच्या शेवटची सूक्तेच काय ती ऋग्वेदसूक्तांच्या धर्तीवर रचलेली आहेत असं म्हणता येईल.

‘भारतातील अतिशय जुनं अभिचार गद्यात्मक होतं आणि पद्यमय ऋचा व सूक्ते ही सर्व ऋग्वेदातील यज्ञविषयक सूक्तांच्या धर्तीवर रचलेली आहेत,’ हे ओल्डनबर्ग यांचं मत डॉ. विटरनिट्झ यांना चुकीचं वाटतं.

ऋग्वेदातील विषय व कल्पना या अथर्ववेदाहून अगदी निराळ्या आहेत.

ऋग्वेदातील सृष्टी निराळी व अथर्ववेदातील निराळी. एका सृष्टीत पंचमहाभूतात्मक मोठमोठे देव आहेत, गायक त्यांचा जयजयकार व स्तुती करत आहे, त्यांच्या प्रीत्यर्थ यज्ञ करत आहेत; ते फार बलाढ्य, संकटसमयी धावून येणारे काहीसे उदार मनाचे, बहुतांशी आनंददायी व प्रकाशदायी असे आहेत; तर दुसऱ्या सृष्टीत, मनुष्यजातीवर संकटं व पीडा आणणाऱ्या दुष्ट, असुरी शक्ती, भयप्रद पिशाच्चे, त्यांना उग्र शाप देणारे किंवा त्यांची खोटी प्रशंसा करून त्यांचं शमन व निराकरण करू पाहणारे मांत्रिक आदी आढळतात.

या वेदातील पुष्कळशी सूक्ते व तत्संबंधी तंत्रविधी या गोष्टी अशा प्रकारच्या कल्पनांच्या वर्गात मोडतात की, त्या कल्पना पृथ्वीवरील अगदी भिन्न संस्कृतीच्या लोकांतही आढळत असून त्यांमध्ये विलक्षण सादृश्य असतं. उदाहरणार्थ : उत्तर अमेरिकेतील इंडियन, आफ्रिकेतील कृष्णवर्णीय, मलायी व मोगल, पुरातन ग्रीक व रोमन आणि युरोप खंडातील आजकालचे कृषिवल या सर्व लोकांच्या जारण-मारणविषयक कल्पना व मंत्र-तंत्र आणि त्यांमधील विचारांच्या विलक्षण उड्या या सर्व गोष्टी पुरातन हिंदू लोकांच्या अथर्ववेदातल्याप्रमाणेच दिसतात. तेव्हा, अथर्ववेदातील पुष्कळशा ऋचांचे विषय व त्यांचं स्वरूप अमेरिकी इंडियन वैदूलोक व तार्तरशामन यांचे मंत्र व अतिप्राचीन जर्मन काव्यावशेषांत आढळणारे मर्सेबर्ग मंत्र, यांच्याशी बहुतेक जुळतं.

उदाहरणार्थ : मर्सेबर्ग मंत्रसंग्रहांत एक मंत्र असा आहे की, वोडन या मांत्रिकानं बाल्डर याच्या शिंगराचा मुरगळलेला पाय पुढील मंत्रानं बरा केला : ‘हाडाशी हाड, रक्ताशी रक्त, अवयवाशी अवयव अगदी चिकटवल्याप्रमाणे (एकजीव होवो)’. अगदी यासारखाच मंत्र अथर्ववेदात (४.१२), पाय मोडलेल्यावर आहे. ‘सं ते मज्जा मज्ज्ञा भवतु समु ते परूषा परूः। ते मांसस्य विस्त्रस्तं समस्थपि रोहतु ॥३॥ मज्जा मज्ज्ञा संधीयतां चर्मणा चर्म रोहतु । असृक् ते अस्थि रोहतु मांसं मांसेन रोहतु ॥४॥ लोम लोम्ना सं कल्पया त्वचा सं कल्पया त्वचम्।

असृक् ते अस्थि रोहतु च्छिन्नं सं घेह्योषधे॥५॥ (अथर्ववेद ४.१२.३-४-५)

अर्थ असा : तुझ्या शरीरातील मज्जांशी या तुटलेल्या मज्जा व अवयवांशी तुटलेला अवयव जोडला जावो. शरीरातील नाहीसे झालेले मांस व मोडलेले हाड पुन्हा वाढो (३). मज्जांत मज्जा मिळून जावोत. फाटलेलं कातडं पुन्हा एक होवो. तुझ्या शरीरातील नाहीसं झालेलं रक्त व मोडलेलं हाड पुन्हा उत्पन्न होवो आणि मांसाची वाढ होवो (४). हे वनस्पते, नाहीसे झालेले केस तुझ्यामुळे पुन्हा येवोत, कातड्याशी कातडं मिळून जावो. रक्त व हाड वाढो. आणि, याप्रमाणे झालेली जखम पूर्ण बरी होवो (५).

अथर्ववेदसंहितेला जे विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे ते पुढील गोष्टींमुळे होय. भूतपिशांच्चे, मुंजे, राक्षस वगैरे पुष्कळ निरनिराळ्या योनींसंबंधीच्या माहितीमुळे, तसंच यज्ञसंस्थेविषयीची माहिती आणि तत्त्वज्ञानयुक्त विचार यांपासून पृथकत्वानं वागत असलेल्या लोकांच्या निरनिराळ्या काय समजुती होत्या याबद्दलचं यथार्य ज्ञान यांमुळे हे अमूल्य साधन आहे. हे ज्ञान मानववंशशास्त्र व देवविषयक कल्पनांचा इतिहास यांच्या अभ्यासकांना अत्यंत महत्त्वाचं आहे हे उघड आहे. मनुष्यजातीचा बौद्धिक इतिहास जाणू इच्छिणाऱ्या शास्त्रज्ञाला अथर्ववेदाचं ज्ञान किती आवश्यक आहे हे त्यातील काही निरनिराळ्या प्रकारच्या सूक्तांचा विचार केला असता दिसून येईल.

अथर्ववेद, दुसरी सकारात्मक दृष्टी : ‘थर्व’ चा अर्थ आहे कंपन आणि ‘अथर्व’ चा अर्थ अकंपन. ज्ञानापेक्षा श्रेष्ठ कर्म करत जो परमात्म्याच्या उपासनेत लीन राहतो तोच अकंप बुद्धीला प्राप्त होऊन मोक्ष धारण करतो. या वेदात रहस्यमय विद्या, औषधी वनस्पती (जडी-बूटी), चमत्कार आणि आयुर्वेद आदी आढळतात. याच्या वीस अध्यायांत ५६८७ मंत्र आहेत. याचे आठ खंड आहेत, ज्यांत भेषजवेद आणि धातुवेद ही दोन नामे आढळतात.

अथर्ववेदसंहितेला ब्रह्मवेद असंही म्हटलं जातं. यात देवतास्तुतीबरोबरच चिकित्सा, विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांचेही मंत्र आहेत. अथर्ववेदसंहितेबाबत असं म्हटलं जातं की, ज्या राजाच्या राज्यात अथर्ववेद जाणणारा विद्वान शांतिस्थापनेच्या कार्यात व्यग्र असतो, ते राष्ट्र उपद्रवरहित होऊन सातत्यपूर्ण उन्नती करत जातं. अथर्ववेदाचं ज्ञान भगवंतांनी सर्वप्रथम महर्षी अंगिरा यांना दिलं, महर्षी अंगिरा यांनी ते ज्ञान ब्रह्मदेवांना दिलं.

अथर्ववेद हा चार प्रमुख वेदांपैकी एक आहे. हा ग्रंथ चार वेदांपैकी सगळ्यात शेवटी, म्हणजे इसवीसनपूर्व ६००० या काळात लिहिला गेल्याचं मानलं जातं. आयुर्वेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे. धन्वंतरी यांनी आयुर्वेदाची रचना केली.

अथर्ववेदात तत्त्वज्ञानाबरोबरच जीवनातील अडचणींवरील उपाय, संकटांवरील उपाय, औषधी वनस्पती आदींची माहिती आहे. समाजातील सर्व स्तरांमध्ये, तसंच भारतातील अनेक धर्मांमध्ये अथर्ववेदीय उपासनांचा प्रचार आजही दिसतो. अथर्ववेद हा ‘अथर्वन’ आणि ‘अंगिरस’ या दोन ऋषिसमूहांनी रचला म्हणून त्याला ‘अथर्वांगिरस’ असंही एक प्राचीन नाव आहे. ‘वैदिक गोपथब्राह्मणा’च्या लेखनकाळाच्या उत्तरार्धात हा वेद भृगू आणि अंगिरस यांच्या नावानं ओळखला जाऊ लागला. याखेरीज, परंपरेनुसार यातील काही रचनांचं श्रेय हे कौशिक, वसिष्ठ, कश्यप या ऋषींनाही दिलं जातं. अथर्वशिरस, घोरस्वरूपी अंगिरस, आथर्वण, क्षात्रवेद, ग्रामयाजिन, पूगयज्ञीय, ब्रह्मवेद, भेषज, भृगु अंगिरस, सुभेषज अशी याची विविध नावं आहेत.

शौनकीय व पैपलाद या अथर्ववेदाच्या दोन शाखा आहेत. आयुर्वेद, राजधर्म, समाजव्यवस्था, अध्यात्म, तत्त्वज्ञान अशा विविध विषयांना अथर्ववेदानं स्पर्श केला आहे.

करण्यव्यूहांनी (शौनकीय) अथर्ववेदाच्या नऊ शाखा सांगितल्या आहेत : (पैपलाद. या शाखेचा प्रसार नर्मदेच्या दक्षिणेकडील प्रदेशात झाला), स्तौद, मौद, शौनकीय (या शाखांचा प्रसार नर्मदेच्या उत्तरेकडील प्रदेशात झाला), जाजल, जलद, कुन्तप, ब्रह्मावद, देवदर्श, करणवैद्य. यांपैकी केवळ शौनकीय शाखा गुजरात अणि बनारस इथं अस्तित्वात आहे. ओडिशा इथं पैपलाद टिकून आहे. अलीकडील काळात यात काही भर घालण्यात आली; परंतु पैपलादीय साहित्य हे शौनकीय साहित्यापेक्षा प्राचीन मानलं जातं. अनेकदा अनुरूप स्तोत्रांमध्ये, दोन आवर्तनांमध्ये वेगवेगळे छंद पाहण्यात येतात किंवा जे दुसऱ्या ग्रंथात नाहीत अशी काही अधिक स्तोत्रं एखाद्या प्रतीत आढळतात. पाच कल्पांपैकी संहिताविधी, शांतिकल्प, नक्षत्रकल्प हे काही कल्प स्वतंत्र शाखा म्हणून नसून, दाखले म्हणून शौनकीय परंपरेत आढळतात. अथर्ववेदात विविध कालखंडाची दीर्घ अशी ७२ भागांची परिशिष्टं आहेत, त्यांतील बहुतेक सर्व पुराणकालीन आहेत.

अथर्ववेदाच्या उत्तरार्धात वैनतेयसूत्र आणि कौशिकसूत्र अशा दोन संबंधित उत्तरसंहिता आहेत. वैनतेयसूत्र हे अथर्ववैदिकांच्या श्रौत्र विधींमधील सहभागासंबंधी आहे, तर कौशिकसूत्रातील अनेक सूत्रांमध्ये चिकित्सेसंबंधीची व तंत्रासंबंधीची माहिती आहे. यांचा उद्देश ऋग्वेदामधील विधानांसारखा आहे आणि म्हणून अथर्ववैदिक साहित्यातील उपयुक्ततेचा अभ्यास हा वैदिक काळात बहुमूल्य समजला गेला आहे. यांमध्ये ‘मुंडकोपनिषद’ आणि ‘प्रश्नोपनिषद’ ही उपनिषदे सर्वाधिक महत्त्वाची मानली गेली आहेत. त्यांतील पहिल्यामध्ये (मुंडकोपनिषद) शौनकीय शाखेचे प्रमुख शौनक यांच्याबद्दल महत्त्वाचा संदर्भ मिळतो, तर नंतरचं (प्रश्नोपनिषद) पैपलादीय शाखेशी संबंधित आहे.

(लेखक अध्यात्मक्षेत्राचे गाढे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com