मानवधर्माचा संदेश

‘महाप्रलयकाळी ‘वेद’ अव्यक्त अवस्थेत असतो. सर्गाच्या, उत्पत्तीच्या आरंभी परमेश्वर सर्वप्रथम ब्रह्मदेवाला उत्पन्न करतो आणि त्याला वेद देतो...
मानवधर्माचा संदेश
Summary

‘महाप्रलयकाळी ‘वेद’ अव्यक्त अवस्थेत असतो. सर्गाच्या, उत्पत्तीच्या आरंभी परमेश्वर सर्वप्रथम ब्रह्मदेवाला उत्पन्न करतो आणि त्याला वेद देतो...

- श्रीकृष्ण पुराणिक saptrang@esakal.com

‘महाप्रलयकाळी ‘वेद’ अव्यक्त अवस्थेत असतो. सर्गाच्या, उत्पत्तीच्या आरंभी परमेश्वर सर्वप्रथम ब्रह्मदेवाला उत्पन्न करतो आणि त्याला वेद देतो... या वेदांच्या साह्यानं ब्रह्मदेव सृष्टीची उत्पत्ती करतो,’ अशा प्रकारचं वर्णन पुरातन ग्रंथांतून पाहायला मिळतं (श्वेतावतार उपनिषद, वंशब्राह्मण, पुराणं, भगवद्गीता इत्यादी). आणखी काही ठिकाणी वेगवेगळे उल्लेख आढळतात. ‘अजपृश्नि’नामक ऋषींनी तपोबलानं वेद प्रसादरूपानं प्राप्त केले. अशाच रीतीनं अंगिरानामक ऋषींनाही वेद प्राप्त झाले. कुठं असाही उल्लेख आहे की, भगवंतानं मत्स्यावतारात वेदांचं प्रतिपादन केलं. ‘सांख्य’ व ‘योग’ दर्शनकारांच्या मते, वेदकर्त्याचा पत्ताच लागत नाही म्हणून ते अपौरुषेय आहेत, तसंच ‘वैशेषिक’ दर्शनकार व वैयाकरण मतवादी अर्थरूप व ज्ञानरूप वेदांना अपौरुषेय मानतात. मीमांसाशास्त्रानुसार, वर्णमालेची कधी उत्पत्ती होत नसते. ते कण्ठ, तालु इत्यादी अभिव्यंजक उपकरणांनी अभिव्यक्त होतात. मूलतः वर्ण (अर्थात् वाक्) नित्यच आहे. ‘जैमिनी’ मीमांसाकार तर ‘शब्दासहित शब्दार्थही नित्य आहेत,’ असंच म्हणतात.

आर्यसमाजाचे स्वामी दयानंद सरस्वती हे वेदांचे शब्द, अर्थ, शब्दार्थसंबंध तथा क्रम यांनाही नित्य मानतात. त्यांच्या मते, वेदांमध्ये अनित्य व्यक्तींबद्दल वर्णन नाही.

वेदांत दिसणाऱ्या या शब्दांचा ते ऐतिहासिक वा भौगोलिक नावे असा अर्थ न करता त्या शब्दांचा ते यौगिक अर्थ लावतात. उदाहरणार्थ : ‘वसिष्ठ’ हे ऋषींचं नाव नसून त्याचा अर्थ ते ‘प्राण’ असा करतात, तसंच ‘भारद्वाज’ म्हणजे ‘मन’, ‘विश्वामित्र’ म्हणजे ‘कान’ असा अर्थ करतात.

वेदांसंबंधी असा एक विचारप्रवाह आहे; तो मानतो की, ऊर्वशी-पुरुरवा (ऋग्वेदसूक्त १०.९५), नहुष, ययाती, यम, सुदास इत्यादी नामांनी ज्या कर्मांचा निर्देश आढळतो तो नित्य इतिहास आहे; पौराणिक (मर्त्यस्वरूपाचा) इतिहास नव्हे. पुराणकारांनी या नावांच्या नाम-कर्मसंबंधानुसार पौराणिक इतिहासाची रचना केली, म्हणून लोकोत्तर विषय वेदांमध्ये नाहीतच.

वेदांतर्गत मंत्रांना ‘श्रृती’ असं म्हटलं जातं हे वर सांगितलंच.

परमेश्वरानं उच्चारलेल्या वेदांचं ऋषिगणांनी समाधी-अवस्थेत, आपल्या अंतःकरणात ‘श्रवण’ केलं आणि तो अंतर्नाद संसाराच्या कल्याणासाठी विश्वात प्रसारित केला. वैदिक साहित्यापासून तंत्रसाहित्यासह सर्व पुरातन शास्त्रं ‘जसा ईश्वर नित्य आहे तसा वेद नित्य आहे’ असा उद्‌घोष करतात, तसंच तो शाश्वत आहे, अपौरुषेय आहे, ऋषिगणांना तपाचरणानं अक्षर-शब्द-वाक्य-छंदरूपे अंतःकरणात जो वेद प्राप्त झाला तोच वेद सद्यस्थितीत उपलब्ध आहे. जवळपास सर्व आस्तिक मतवादी शास्त्रं वेदाला हिरण्यगर्भसंभूत - कॉस्मिक एग - मानतात. वेदभाष्यकर सायणाचार्य एके ठिकाणी म्हणतात : ‘प्रत्यक्षेण अनुमित्या वा यस्तूपायो न बुध्यते। एनं विदंति तस्माद् वदस्य वेदता।।’ ( प्रत्यक्ष किंवा अनुमानद्वारा जे उपाय अगम्य आहेत ‘त्याचं’ (परमेश्वराचं) ज्ञानसंबोधन करवण्यात वेदांचं वेदत्व आहे). ‘भूतं भव्यं भविष्यं च, सर्वं वेदात् प्रसिध्यति’ (भूत, भविष्य व वर्तमानातील सर्वकाही वेदांपासूनच ज्ञात होत असतं).

ज्ञानी पुरुष वर्तमानातील व भविष्यातील सर्व घटना ‘पाहतो’ (मनुस्मृती). म्हणजेच वेद त्रिकालसूत्रधारी आहे आणि ज्ञानी ऋषीही त्रिकालदर्शी व मंत्रद्रष्टे आहेत.

वेद प्रारंभी केवळ एकच होता; पण तो वाचण्यास सुविधा व्हावी म्हणून तो चार भागांत विभागला गेला. वेदात एकाच ईश्वराचं उपासनाविधान आहे आणि एकाच धर्माचा - म्हणजे मानवधर्माचा - संदेश आहे. वेदात मानवाला मानवता, समानता, मित्रता, उदारता, प्रेम, परस्परसौहार्द, अहिंसा, सत्य, संतोष, अस्तेय (चोरी न करणं), अपरिग्रह, ब्रह्मचर्य, आचार-विचार-आहार-विहार-व्यवहार आदींमध्ये पवित्रता आणि जीवनात तप-त्याग-परिश्रम यांच्या व्यापकतेचा उपदेश देण्यात आला आहे.

वेद हा मानवाचा शाश्वत चक्षू आहे, जो शुभ आणि अशुभ यांचं ज्ञान त्याला करवतो. वेद ही संसारातील सर्व रहस्यांची किल्ली आहे. वेदांना अपौरुषेय म्हटलं गेलं आहे. गुरुद्वारा शिष्यांनी मौखिक रूपानं कंठस्थ केल्यामुळे वेदांना ‘श्रुती’ अशी संज्ञा दिली गेली आहे. वेदांमध्ये ब्रह्म (ईश्वर), देवता, ब्रह्मांड, ज्योतिष, गणित, रसायन, औषधी, प्रकृती, खगोल, भूगोल, धार्मिक नियम, इतिहास, संस्कार, रीती-रिवाज अशा जवळजवळ सर्वच विषयांशी संबंधित ज्ञानभांडार आहे.

हे चार वेद सर्वव्यापक, सर्वान्तर्यामी, सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान परमात्म्यानं सृष्टीच्या आरंभी, अमैथुनी सृष्टीत उत्पन्न केले आणि चार ऋषी - अग्नी, वायू, आदित्य आणि अंगिरा - यांना त्यांच्या आत्म्यात प्रेरणेद्वारा प्रदान केले गेले, असं मानलं जातं.

प्रथम तीन वेदांना अग्नी, वायू आणि आदित्य - म्हणजे सूर्य - यांच्याशी जोडलं गेलं. या तीन नामांच्या ऋषींशी त्यांचा संबंध सांगितला गेला आहे; याचं कारण, अग्नी अज्ञानाचा अंधकार समाप्त करतो, म्हणून तो ज्ञानाचं प्रतीक बनला. वायू प्राय: चलायमान आहे, त्याचं कामच चालणं (वाहणे) हे आहे. तात्पर्य हे की, कर्म अथवा कार्य करत राहिलं पाहिजे; म्हणून वायू हे कर्माशी संबंधित प्रतीक बनलं. सूर्य सर्वाधिक तेजस्वी आहे, त्याला सारे प्रणाम करतात, नतमस्तक होऊन त्याची पूजा करतात; म्हणून तो पूजनीय अर्थात् उपासनायोग्य आहे. (वेदांच्या २८ हजार पांडुलिपी पुण्यात ‘भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट’मध्ये आहेत, त्यातल्या ऋग्वेदाच्या तीस पांडुलिपी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ‘युनेस्को’नं वारसायादीत त्या समाविष्ट केल्या आहेत).

ऋग-स्थिती, यजु-रूपांतरण, साम-गति‍शील आणि अथर्व-जड़. ‘ऋक’ला धर्म, ‘यजुः’ला मोक्ष, ‘साम’ला काम आणि ‘अथर्व’ला अर्थ असं संबोधण्यात येतं. याच आधारे ‘धर्मशास्त्र’, ‘अर्थशास्त्र’, ‘कामशास्त्र’ आणि ‘मोक्षशास्त्र’ यांची रचना झाली.

वेदांचे उपवेद असे : ऋग्वेदाचा आयुर्वेद, यजुर्वेदाचा धनुर्वेद, सामवेदाचा गंधर्ववेद आणि अथर्ववेदाचा स्थापत्यवेद. हे अनुक्रमे चारी वेदांचे उपवेद आहेत. खऱ्या अर्थानं वेदांचं रक्षण करायचं असेल तर वेदांचा उच्चार योग्य माणसानं, योग्य वेळी व योग्य परिस्थितीत केल्यानं त्यातील खरा अर्थ प्रकट होतो अशी धारणा आहे. गुरू-शिष्यपरंपरेनं चालत आलेलं हे ज्ञान सांभाळलं गेलं पाहिजे.

ऋग्वेद : ऋक् अर्थात् स्थिती आणि ज्ञान. यात भौगोलिक स्थिती आणि देवतांना आवाहनमंत्र याबरोबरच बरंच काही आहे.

ऋग्वेदऋचांमध्ये देवतांच्या प्रार्थना, स्तुती आणि देवलोकी देवतांच्या स्थितीचं वर्णन आहे. यात जलचिकित्सा, वायुचिकित्सा, सौरचिकित्सा, मानसचिकित्सा आणि हवनाद्वारे चिकित्सा आदींची माहितीही आहे. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात औषधि-ऋक अर्थात् औषधि-स्थिती आणि ज्ञान सांगितलं आहे. ऋग्वेद हा प्रथम वेद असून तो पद्यात्मक आहे. या दहाव्या मंडलात (अध्यायात) १०२८ सूक्ते असून त्यात ११ हजार मंत्र आहेत.

या वेदाच्या पाच शाखा आहेत : शाकल्प, वास्कल, आश्वलायन, शांखायन, मंडूकायन.

मृत्यूनंतरच्या जीवनासंबंधी काही विचार मांडताना ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात, देवता अंतरिक्षातून मानवाच्या हालचालींचं निरीक्षण करतात, असं म्हटलं आहे.

ऋग्वेदाविषयीची काही निरीक्षणं अशी :

सर्व देव अमर आहेत व ते आपल्या पूजकांना अमरत्व देण्यास तयार असतात. मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याचा पार्थिव देह हा मातीत मिसळून जातो; पण त्याचा आत्मा मात्र अमर असतो.

सृष्टीच्या उत्पत्तीचं सूक्तही ऋग्वेदात आहे. हे जग देवाहूनही श्रेष्ठ अशा कुणा निर्मात्याकडून निर्माण झालं असावं. तो निर्माता म्हणजे पुरुष, विश्वकर्मा, हिरण्यगर्भ किंवा प्रजापती या नावानं ओळखला जातो. ऋग्वेदातील पुरुषसूक्तात म्हटलं आहे की, ‘देवांनी विराट पुरुषाला बळी दिला व त्याच्या अवयवापासून बहुविध सृष्टी निर्माण झाली आहे. ‘हिरण्यगर्भ प्रथम निर्माण झाला व त्यानं सृष्टी निर्माण केली,’, असं काही ठिकाणी म्हटलं आहे तर, ‘पाणी हे सृष्टीचं बीज आहे,’ असं काही ठिकाणी म्हटलं आहे.

पापी, दुष्ट लोकांना परलोकांत स्थान नाही. यमाचा दूत म्हणून कपोत हा या पापी आत्म्यांना अंधकारात व दुःखमय अशा निवासस्थानी आणतो. अशा या निवासस्थानी अधार्मिक, यज्ञ न करणारे, असत्य बोलणारे व आचारहीन लोक राहतात.

पुण्यात्म्यांना परलोकी स्थान आहे.

ऋग्वेदात ‘धर्म’ हा शब्द सुमारे ५६ वेळा आला आहे. ‘नैतिक कायदे व आचार’ असा काहीसा त्याचा अर्थ काही ठिकाणी आहे.

(लेखक अध्यात्मक्षेत्राचे गाढे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com