जालियनवाला बाग नरसंहाराची शंभरी (श्रीमंत माने)

Shrimant Mane
Shrimant Mane

तारीख 13 एप्रिल 1919. दिवस रविवार. शिखांचा बैसाखी सण. वेळ दुपारनंतरची. रौलेट ऍक्‍टच्या निमित्तानं ब्रिटिश दडपशाहीच्या निषेधार्थ अमृतसरमधील जालियनवाला बागेत हजारो लोक जमलेले. त्यांच्यावर बेछूट गोळीबार करणारा "बचर ऑफ अमृतसर' जनरल डायर व त्याचे शिपाई. गोळ्या संपेपर्यंत गोळीबार चालला. भीषण नरसंहार. नेमके किती मरण पावले, याची गिनतीदेखील कित्येक महिने सुरू होती. उलटसुलट दावे केले जात होते. अधिकृत नोंदीनुसार डायरच्या फौजेने सोळाशे पन्नास राउंड फायर केले. त्यापैकी पंधराशे सोळा गोळ्या मृत व जखमींच्या शरीरांवर सापडल्या. सामूहिक हत्याकांडाच्या स्मृती जपताना जालियनवाला बागेत जुन्या विहिरीचेही जतन करण्यात आले आहे. तिच्यातून एकशे वीस मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. आपण भारतीयांना आधुनिक जगाचे दर्शन घडवण्यासाठी आल्याचे सांगणाऱ्या ब्रिटिशांचा बुरखा जालियनवाला बागेत टराटरा फाटला. देशाच्या राजकारणाने, राष्ट्रवादाने नवे वळण घेतले. त्या काळ्याकुट्ट अध्यायाला येत्या शनिवारी (13 एप्रिल) शंभर वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त हे स्मरण...
-----------------------
अमृतसरमध्ये सुवर्णमंदिरापासून नजरेच्या टप्प्यात असलेल्या जालियनवाला बागेत 13 एप्रिल 1919 ला शिखांच्या बैसाखी सणाच्या दिवशी महाभयंकर नरसंहार घडला. या घटनेने भारतीय राजकारणाला महत्त्वाचे वळण दिले. राष्ट्रभावना वाढीस लागली. भाषा व धर्म हा आधार नसलेला राष्ट्रवाद या नरसंहारातून वाढीस लागला. भारताचा अपवादात्मक राष्ट्रवाद. या घटनेने महात्मा गांधीजींचे मवाळपण घालवले. "हे राज्य ईश्‍वराचे नसून सैतानाचे आहे', असे कडवट उद्‌गार त्यांनी काढले. तोपर्यंतच्या त्यांच्या नेमस्त भूमिकेला तडा गेला आणि आपण अहिंसेचा मार्ग स्वीकारला असला तरी त्यावर किती काळ राहू याबद्दलची शंका त्यांनी उघडपणे बोलून दाखवली. चार वर्षांपूर्वीच ते दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले होते. तिकडे किंबहुना ब्रिटिशांसाठीही त्यांच्या मनात कणव होती. म्हणूनच बोअर युद्धात त्यांनी जखमी सैनिकांची शुश्रूषा करणारे पथक उभारले होते. त्यासाठी सरकारने त्यांना "हिंदकेसरी' किताबही दिला होता. अमृतसर शीख समुदायाचे शहर असले, तरी मारली गेलेली माणसे सगळ्याच धर्मांची होती. भारतीय उपखंडात त्याआधीही कत्तली झाल्या. फरक इतकाच की जालियनवाला बाग हत्याकांडाचे कर्तेधर्ते आधुनिक जगाचा, प्रागतिक विचारांचा, किंबहुना मागास भारताला आधुनिकतेचे दर्शन घडवण्याचा दावा व सांगावा घेऊन आलेले ब्रिटिश होते.

ब्रिटिशांनी पहिल्या महायुद्धाच्या काळात डिफेन्स ऑफ इंडिया ऍक्‍ट आणला. महायुद्धात ब्रिटिश इंडिया सहभागी असला, तरी बंगाल व पंजाब या दोन क्रांतिकारी राज्यांमधून अधूनमधून उठाव होत होते. विशेषकरून पंजाबमध्ये गदर चळवळीची मुळे खोलवर रुजलेली होती. बंगाल, पंजाबमधील बंडखोर क्रांतिकारांना जर्मन व बोल्शेविक मदत मिळत असावी, असा संशय ब्रिटिशांना होता. सिडने रौलेट यांच्या समितीने या क्रांतिकारकांचा बंदोबस्त करण्यासाठी कडक उपाययोजना सुचवल्या. तोच रौलेट ऍक्‍ट म्हणजे राज्यद्रोहविरोधी कायदा. त्याविरुद्ध एप्रिलच्या प्रारंभी महात्मा गांधी यांनी देशव्यापी बंदची हाक दिली. आधीच्या वर्षी भारतात फ्लूची मोठी साथ येऊन गेली होती. जगभरात युद्धाच्या झळा बसत होत्या. महागाई प्रचंड वाढली होती. महात्मा गांधी भारतात परतल्यानंतर आणि लोकमान्य टिळक मंडालेचा तुरुंगवास संपवून परत आल्यानंतर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे वारे देशात वाहू लागले होते. सन 1916 मधील लखनौ कराराच्या रूपाने कॉंग्रेस व मुस्लिम लीगची युती झाली होती. ते ब्रिटिशांना अधिक खुपत होते.
जालियनवाला बाग नरसंहाराचे निमित्त होते, दोन नेत्यांची अटक. डॉ. सत्यपाल व डॉ. सैफुद्दीन किचलू. त्यांपैकी डॉ. सैफुद्दीन किचलू कॉंग्रेसचे बडे नेते. ते कुटुंब मूळचे ब्राह्मण, काश्‍मीरमधील बारामुल्लाचे. सन 1871 च्या दुष्काळात त्यांचे वंशज काश्‍मीरमधून पंजाबमध्ये स्थायिक झाले. ते व डॉ. सत्यपाल हे ब्रिटिशांविरुद्ध पंजाबमध्ये उभ्या राहत असलेल्या असंतोषाचे कर्तेधर्ते होते. दोघांच्या अटकेविरुद्ध लोकांमध्ये असंतोष होता. त्यांना नेमके कुठे ठेवले आहे, याचा थांगपत्ता ब्रिटिश अधिकारी लागू देत नसल्याने पाठिराखे संतापले होते. नंतर स्पष्ट झाले, की त्यांना गुपचूप सिमल्याला हलवण्यात आले होते. सत्यपाल व किचलू यांच्या अटकेच्या निषेधार्थ 10 एप्रिलला अमृतसरमध्ये जाळपोळ, तोडफोड झाली. ब्रिटिश नागरिकांना लक्ष्य बनवण्यात आले. मिशनरी शाळेची मार्सेला शेरवूड नावाची शिक्षिका जखमी झाली. शहरात दंगाधोपा झाला म्हणून मिसेस शेरवूड शाळा बंद करायला आल्या असताना त्यांना जमावाने घेरले. विटंबना केली. काही पालकांनी त्यांना वाचवले व गोविंदगड किल्ल्यावर नेले. ज्या कच्चा कुरियन गल्लीत हे घडले तिथे अनेकांना रांगत जाण्याची शिक्षा डायरने दिली. मार्सेला शेरवूडच्या विटंबनेचा राग डायरच्या मनात होता.
--------------------
बचर ऑफ अमृतसर
12 एप्रिलला डॉ. किचलू यांचे सहकारी हंसराज यांच्या पुढाकाराने धाब खटिकान कॉलेजमध्ये बैठक झाली. दुसऱ्या दिवशी साडेचारला जालियनवाला बागेत जमायचे ठरले. डॉ. मुहम्मद बशीर व लाला कन्हैयालाल भाटिया आयोजक होते. साडेसहा-सात एकर क्षेत्रफळाच्या त्या मैदानात रविवारी दुपारनंतर वीसेक हजार लोक जमले असावेत. आजूबाजूला दुमजली-तिमजली घरे. बागेत प्रवेश करण्यासाठी तीन मार्ग. तेही अत्यंत चिंचोळे. त्यातल्या त्यात जो रुंद रस्ता तेथूनही एका वेळी फारतर एकमेकांना खेटून चार लोक ये-जा करू शकले असते. मायकेल ओड्‌वायर हा पंजाब प्रांताचा लेफ्टनंट गव्हर्नर होता, तर कर्नल रेडिनाल्ड एडवर्ड हेन्‍री डायर याच्याकडे ब्रिगेडिअर जनरलपदाचा कार्यभार होता. तो "बचर ऑफ अमृतसर' म्हणून इतिहासात कुख्यात झाला. कत्तल सुनियोजित होती. सैन्याची जमवाजमव करण्यात आली होती. बागेत गर्दी जमेपर्यंत वाट पाहिली गेली. जनरल डायर 25 व्या पंजाबी तुकडीत पंजाबी, गोरखा, बलुची पलटणीतले 90 सैनिक व दोन सशस्त्र गाड्या घेऊन चिंचोळ्या प्रवेशद्वारावर पोचला. त्या गाड्याही बागेत जाऊ शकत नव्हत्या. त्यांपैकी 50 सैनिक शस्त्रसज्ज होते. शहरात मार्शल लॉ लागू असल्याचे ध्वनिक्षेपकावरून ऐकून घरी जाण्यासाठी बाहेर पडणाऱ्या निरपराधांवर बेछूट गोळीबार करण्यात आला. लोक सैरावैरा धावत होते आणि जमाव ज्या दिशेला जाईल तिकडे शिपाई गोळीबार करत होते. जालियनवाला बागेत एक जुनी विहीर आहे. पुढे स्मारकासोबत त्या विहिरीचेही जतन करण्यात आले आहे. अनेकांनी विहिरीत उड्या टाकल्या. तिथून किमान 120 मृतदेह बाहेर काढण्यात आले. जवळपास दहा मिनिटे बेछूट गोळीबार सुरू होता. तो केवळ बंदुकीतल्या गोळ्या व शस्त्रसाठा संपल्यामुळे थांबला.

ब्रिटिश सरकारने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, त्या कत्तलीत 379 जणांचा बळी गेला, तर अकराशे लोक जखमी झाले. तेथील सिव्हिल सर्जनने मृतांचा आकडा एक हजार 526 असल्याचे अधिकृतपणे सांगितले. कॉंग्रेसकडून स्वतंत्रपणे सत्यशोधन झाले. त्याची जबाबदारी आधी मोतीलाल नेहरू यांच्यावर, नंतर गांधीजींवर होती. प्रत्यक्ष पंडित मदनमोहन मालवीय यांच्या समितीने किमान पंधराशे लोक जनरल डायरच्या सणकीपणाला बळी पडल्याचा व बाराशेच्या वर जखमी झाल्याचा अहवाल दिला. जालियनवाला बागेतील स्मृतिफलकावरही दोन हजार लोकांचा बळी गेल्याचा उल्लेख आहे. जालियनवाला बागेला 70 वर्षांनी भेट देणारे इंग्लंडचे राजपुत्र फिलिप यांनी तो उल्लेख वाचून सोबतच्या भारतीय राजशिष्टाचार अधिकाऱ्याला, ही जरा अतिशयोक्‍ती वाटत नाही का, असे विचारले होते. जालियनवाला बाग हत्याकांड कथा-कादंबऱ्या, इतिहासाची पुस्तके व नाटक-सिनेमांमध्ये "सोळाशे पन्नास राउंड' या नावाने ओळखले जाते. जनरल डायरच्या सैनिकांनी तितके राउंड फायर केले व त्यांपैकी एक हजार 516 गोळ्या मृतांच्या शरीरावर सापडल्या.

जनरल डायरचा जन्म ब्रिटिश इंडियातलाच. सध्या पाकिस्तानात असलेल्या मऱ्ही किंवा मुरी येथे ता. 9 ऑक्‍टोबर 1864 रोजी तो जन्मला. ते थंड हवेचे ठिकाण जेम्स अबॉट यांनी विकसित केले होते. या अबॉट यांच्याच नावाने अबोटाबाद हे पाकिस्तानातील रावळपिंडीजवळचे शहर ओळखले जाते. कुख्यात ओसामा बिन लादेनचा खातमा अमेरिकन सैनिकांनी अबोटाबादलाच केला. मऱ्ही हे मद्यनिर्मितीचे पाकिस्तानातील केंद्र आहे. बिअर, व्हिस्की, स्कॉचनिर्मितीसाठी अनुकूल असणारे थंड हवामान तेथे असल्याने ब्रिटिशांनी ती कला तेथे रुजविली. जनरल डायरचा पिता मऱ्ही येथे मद्यनिर्मिती करायचा. जनरल डायर 23 जुलै 1927 ला इंग्लंडमध्ये मेंदूतील रक्‍तस्रावाने मरण पावला.
---------------------
रवींद्रनाथांचा संताप
जालियनवाला बागेतील नरसंहाराची बातमी रवींद्रनाथ टागोर यांना 22 मे रोजी समजली. राणीने दिलेला नाइटहूड किताब परत करण्याची घोषणा त्यांनी केली. ता. 31 मे 19 ला व्हाइसरॉय लॉर्ड चेम्सफोर्ड यांच्यामार्फत महाराणी पहिल्या एलिझाबेथला लिहिलेल्या पत्रात टागोर म्हणतात ः ""माझ्या देशातील सामान्य माणसे त्यांच्या हक्‍कासाठी लढत असताना त्यांना दिली गेलेली वागणूक ही मानवतेच्या मूल्यात कुठेही बसत नसेल किंवा ती मानवतेचे इतके अवमूल्यन करणारी असेल तर मी या देशाचा नागरिक म्हणून त्यांच्या बाजूने उभे राहणे क्रमप्राप्त ठरते आणि तुम्ही दिलेली पदके मिरवणे लाजिरवाणे आहे, हे तुम्हाला सांगायची वेळ आली आहे.''
जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन, डायरचा बचाव करणे ब्रिटिशांना शक्‍य झाले नाही. ब्रिटिश संसद या मुद्द्यावर दुभंगली. विरोधी बाकावरील विन्स्टन चर्चिल यांनी ती इतिहासातील काळीकुट्ट घटना असल्याचे म्हटले. त्यामुळे "हाउस ऑफ कॉमन्स'ने 247 विरुद्ध 537 अशा मताधिक्‍याने डायरच्या विरोधात मतदान केले; परंतु इंग्लंडमधील एक मोठा वर्ग डायरच्या मर्दुमकीवर फिदा होता. त्यात अमीर-उमराव आघाडीवर होते. "हाउस ऑफ लॉर्डस'ने डायरची पाठराखण केली. त्याला ब्रिटिश इंडियाचा रक्षणकर्ता ठरवले. इनाम म्हणून डायरला पैशाची एक थैली भेट देण्यासाठी नोबेलविजेते रुडयार्ड किपलिंग यांनी पुढाकार घेतला.

तोपर्यंतचा भारतीयांचा संघर्ष मुख्यत्वे वसाहतीमधील स्वातंत्र्यासाठी होता. सरकारशी शक्‍यतो संघर्ष केला जायचा नाही. अर्थात, लाभ मुख्यत्वे शिक्षित मध्यमवर्गीयांना मिळायचे. सामान्य माणसाला शिक्षणाशिवाय फारसे काही मिळायचे नाही; पण शिक्षण ही मोठी देणगी असल्याने महात्मा फुले यांच्यापासून अनेकांनी त्याचे स्वागत केले होते. ब्रिटिशांच्या दळणवळण, टपाल, रेल्वे इत्यादीमुळेही सगळी शिकलेली पहिली पिढी कर्तबगारीच्या टप्प्यावर आली होती. माणूस एकदा शिकला की त्याच्या आकांक्षा वाढतात. त्या आकांक्षा सामाजिक, राजकीय हालचालीत परिवर्तित होत होत्या. तोपर्यंत भारतीय वसाहतीत ब्रिटिशांची प्रतिमा "सुधारणावादी राज्यकर्ते' अशी होती. "आपण हा सापांचा आणि साधूंचा देश सुधारायला आलो आहोत, मानवतेचे काम करतो आहोत, अडाण्यांना आधुनिक जगाचे दर्शन घडवण्यासाठी, जगण्यात शिस्त आणण्यासाठी, रस्ते-रेल्वे-धरणे ही आधुनिक साधने देण्यासाठी, टपाल-तार अशी व्यवस्था देण्यासाठी किंवा नगर परिषदा स्थापन करण्यासाठी शासन, प्रशासन, न्याय, शिस्तबद्ध व्यवस्था करण्यासाठी पाठवलेली देवाची लेकरे आहोत,' असे मांडण्याचा ते प्रयत्न करत होते. हा सगळा बुरखा जालियनवाला बाग हत्याकांडाने टराटरा फाडला गेला.
--------------------
हंटर कमिशन
हत्याकांडानंतर तब्बल सहा महिन्यांनी, ता. 14 ऑक्‍टोबर 1919 ला भारतविषयक व्यवहाराचे सचिव एडविन मॉंटेग्यू यांनी नरसंहाराच्या चौकशीसाठी हंटर कमिशन नेमले. विल्यम लॉर्ड हंटर आयोगाचे अध्यक्ष होते. मुंबई, दिल्ली, तसेच पंजाबमधील आंदोलने, हिंसाचार व त्यावर केलेल्या उपायांची चौकशी अशी त्या आयोगाची कार्यकक्षा होती. लॉर्ड हंटरशिवाय न्या. जॉर्ज रेन्कीन, डब्ल्यू. एफ. राइस, सर जॉर्ज बरो, थॉमस स्मिथ, एच. सी. स्टोक्‍स या ब्रिटिशांबरोबरच, त्या चौकशी आयोगात तीन भारतीय होते. पहिले सर चिमणलाल हरिलाल सेटलवाड, दुसरे पंडित जगत्‌ नारायण व तिसरे सरदार साहिबजादा सुलतान अहमद खान.

बॅरिस्टर चिमणलाल यांचे कुटुंब मूळचे पंजाबमधील. आडनाव तलवाड. मुगलांकडील दिवाणजी म्हणून त्यांचे पूर्वज सुरतला आले. तलवाड त्यांच्यापैकी प्रमुख म्हणून ते सेठ तलवाड. त्याचेच पुढे सेटलवाड झाले. त्यांचे आजोबा अंबाशंकर ब्रिजलाल सेटलवाड ईस्ट इंडिया कंपनीत मोठ्या हुद्द्यावर, तर वडील हिरालाल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. सन 1924 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या "बहिष्कृत हितकारिणी सभे'चे हिरालाल सेटलवाड संस्थापक-अध्यक्ष होते. चिमणलाल यांचे पुत्र एम. सी. सेटलवाड सन 1950 ते 63 या काळात देशाचे ऍटर्नी जनरल होते. सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड या सर चिमणलाल यांच्या नात. हंटर कमिशनचे दुसरे भारतीय सदस्य पंडित जगत्‌ नारायण हे सन 1916 च्या प्रसिद्ध लखनौ कॉंग्रेसचे स्वागताध्यक्ष, लखनौचे 15 वर्षे नगराध्यक्ष, लखनौ विद्यापीठाचे तीन वर्षे कुलगुरू होते.

"हंटर कमिशनपुढे चौकशीसाठी उपस्थितच राहू नये,' असा काही ब्रिटिश अधिकाऱ्यांचा सल्ला धुडकावून मग्रूर जनरल डायर आयोगापुढे हजर झाला व त्याने चौकशीत उद्धटपणे उत्तरेही दिली. हत्याकांड टाळले जाऊ शकत नव्हते का, या प्रोफेसर सेटलवाड यांच्या प्रश्‍नावर होकारार्थी उत्तर देताना डायर म्हणाला ः ""नक्‍की, पण सभा आटोपून परत जाणारे आंदोलक, तसेच अमृतसरमधल्या लोकांनी मला भेकड ठरविले असते.'' ता. 8 मार्च 1920 ला आयोगाने अहवाल दिला. त्यात डायरच्या कृतीचा एकमताने निषेध करण्यात आला.

जालियनवाला बागेत केवळ आंदोलकच मारले गेले असे नाही. सणाच्या दिवशी घराबाहेर पडलेले, संचारबंदीची अजिबात कल्पना नसलेले अनेक निरपराध, काही कोवळी मुले मारली गेली. हे ज्याच्या डोळ्यांसमोर घडले, त्यात उधमसिंग नावाचा नुकताच मॅट्रिक झालेला, आई-वडिलांचे छत्र लहानपणीच गमावलेला व त्यामुळे तेथील एका अनाथालयात दिवस काढलेला वीस वर्षांचा तरुण होता. गर्दीला पाणी पुरवण्याच्या चमूचा तो सदस्य होता. उधमचा जन्म सगदर जिल्ह्यात ता. 26 डिसेंबर 1899 ला सुनाम येथील. निःशस्त्र लोक, निरपराध बालके मारली गेल्याचा भयंकार प्रसंग उधमसिंगने दोन दशकांहून अधिक काळ पापण्यांआड जपला आणि बदला म्हणून ता. 13 मार्च 1940 ला लंडनच्या कॅक्‍स्टन हॉलमध्ये उधमसिंगने मायकेल ओड्‌वायरवर गोळ्या झाडल्या. ओड्‌वायर मारला गेला. उधमसिंगला पकडण्यात आले. न्यायालयापुढे त्याने, या क्षणाची दोन दशकांहून अधिक काळ वाट पाहत होतो, असे सांगितले आणि ता. 31 जुलै 1940 ला निधड्या छातीने फाशीला सामोरा गेला. "शहीद-ए-आझम' बनला.
या घटनेचे नेमके राजकीय परिणाम सांगताना प्रा. सुरेश द्वादशीवार त्यांच्या "गांधींजी आणि त्यांचे टीकाकार' या ग्रंथात म्हणतात ः ""जालियनवाला बाग हत्याकांडाचा काळ मवाळांचे राजकारण संपण्याचा होता. रानडे कधीचे गेले होते. फिरोज शा हेही काळाच्या पडद्याआड झाले होते आणि गोखले हे मवाळांचे उरलेले नेतेही हयात नव्हते. सन 1914 मध्ये मंडालेहून सुटून आलेल्या जहाल फळीतील लोकमान्य टिळकांच्या हाती राष्ट्रीय चळवळीची सूत्रे आपोआप गेली होती. "पुनश्‍च हरिओम्‌' म्हणून त्यांनी राष्ट्रधर्म जागवण्याचा जहाल मार्ग हाताळायला सुरवातही केली होती. त्यांचे नेतृत्व देशाने मान्य केले होते आणि महाराष्ट्राबाहेर साऱ्या देशात ते "बडे दादा' म्हणून मान्यता पावले होते. टिळक हे असंतोषाचे जनक होते, तर गांधीजी या असंतोषाला आंदोलनाचे स्वरूप देऊन ते रस्त्यावर आणणारे नेते होते. प्रथम असहकार, नंतर खिलाफत, पुढे दांडीयात्रा आणि अखेर व्यक्‍तिगत सत्याग्रह अशी लढ्याची रूपे त्यांनी आखली व बदलली. मात्र, याही मार्गाने स्वराज्य जवळ येत नाही असे दिसले, तेव्हा सन 1942 मध्ये त्यांनी "चले जाव'ची घोषणा करून जनतेला "करो वा मरो' हा संदेश दिला.''
------------------------
सर्वसमावेशक राष्ट्रभावना
राष्ट्रवादाची व्याख्या साधारणपणे धर्म किंवा भाषा या दोन मुद्द्यांवर समूहाने एकत्र येणे, स्वतःची राजकीय, प्रशासकीय व्यवस्था उभी करणे अशी केली जाते. तथापि, धर्माच्या नावावर एखादे राष्ट्र उभे राहिले, तरी भाषेच्या आधारावर तुटते, अशी अनेक उदाहरणे आहेत. उदाहरणार्थ ः बांगलादेश हे राष्ट्र धर्माच्या पायावर उभे राहिले; पण भाषेच्या कारणाने तुटले. युरोपातील अनेक लहान राष्ट्रांचा धर्म एकच असूनही भाषा वेगवेगळ्या असल्याने ती शतकानुशतके स्वतंत्र आहेत. जेथे भाषा वेगळ्या तेथे धर्म बिनकामाचा ठरला. भारताचे उदाहरण मात्र त्या समजाला छेद देणारे आहे. त्याचा प्रारंभ जालियनवाला बाग नरसंहारातून झाला. भारतात एकच एक धर्म नाही. एकच एक भाषा नाही. एकच संस्कृती नाही. तरीदेखील राष्ट्र म्हणून भारत उभा राहिला. त्या राष्ट्रवादाच्या मुळाशी अल्पसंख्याक शिखांसह हिंदू, मुस्लिम, जाट समाजातील निरपराधांचा जनरल डायरने केलेला संहार होता. परिणामी, पुढील आठ-दहा वर्षांमध्ये देशाच्या कान्याकोपऱ्यांत प्रचंड असंतोष निर्माण झाला. सामाजिक सुधारणांची वाट ब्रिटिश राज्यकर्त्यांनी सोडून दिली. वरवर राजकीय सुधारणांचे प्रस्ताव, त्याआडून प्रत्यक्षात भारत वसाहत कायम राहावी, असे डावपेच राहिले. सतीप्रथेवर बंदी, विधवांच्या विवाहांना मंजुरी, बालविवाहांना प्रतिबंध, शिक्षणाचा प्रसार, मुलींचे शिक्षण, अस्पृश्‍यतेला लगाम, मुस्लिमांना व दलितांना शिक्षण-नोकऱ्यांसाठी प्रोत्साहन अशा सामाजिक सुधारणा करणाऱ्या ब्रिटिशांनी नंतर मात्र तसा पुढाकार घेतला नाही. याउलट बॅरिस्टर जीना यांना बळ देणे, त्या माध्यमातून कॉंग्रेससमोर आव्हान उभे करणे, हिंदू-मुस्लिम वादाला खतपाणी घालणे वगैरे डावपेच लढवले गेले. "फोडा व राज्य करा' ही नीती अमलात आणली गेली. सोबतच राजकीय सुधारणांचे गाजर दाखवले गेले; पण भारतीयांनी मर्यादित राजकीय अधिकार धुडकावले. शेवटचा पर्याय म्हणून सन 1935 मध्ये ब्रिटिश संसदेने इंडिया ऍक्‍ट संमत केला, तेव्हा प्रांतिक विधानसभांची स्थापना, त्यावरील प्रतिनिधी जनतेने निवडून देणे या स्वरूपात लोकशाहीचा कृतिशील स्वीकार भारतीयांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com