देवभूमीतला अमानवी चेहरा 

Kerala
Kerala

केरळमध्ये जमावाने एका आदिवासी तरुणाच्या केलेल्या हत्येमुळे समाजाचा लोभस मुखवटा गळून पडला आहे अन्‌ गरिबांचा दुःस्वास, तिरस्कार करणारा, प्रसंगी किरकोळ कारणावरून एखाद्याचा जीव घेणारा क्रूर चेहरा समोर आला आहे. 

डोळा मारून जगाला घायाळ करणाऱ्या प्रिया प्रकाश वारियरच्या केरळचं सिनेमा किंवा कलाक्षेत्रातल्या योगदानासाठी फार कौतुक करायची आवश्‍यकता नाही. माणुसकीनं लाजेनं मान खाली घालावी, अशी आणखी एक बातमी साक्षरतेच्या टक्‍केवारीत देशात पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या त्या "गॉड्‌स ओन कंट्री'मधूनच आलीय. चोरीच्या संशयावरून वेडसर आदिवासी तरुणाला शिकल्यासवरल्या टोळक्‍यानं बेदम मारहाण केल्याची, ती मर्दमुकी मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केल्याची अन्‌ शेवटी त्या दुर्दैवी तरुणाचा मृत्यू झाल्याची ही संवेदनशील मनाचा थरकाप उडविणारी घटना गेल्या गुरुवारी पलक्‍कड जिल्ह्यातल्या अट्टापडी इथली. 

थोडा वेड्यासारखा वागणारा, त्याच कारणानं कुटुंबापासून दूर भटकत राहणारा मधू. चोरी करणं हा गुन्हा आहे, हे कदाचित त्याला कळत असावं, पण पोटातला भुकेचा आगडोंब तेवढं भान येऊ देत नसावा. त्यानं किलोभर तांदूळ व अन्य कसल्या तरी खाण्याच्या चिजा चोरण्याचा गुन्हा केला. ज्या दुकानात त्यानं चोरी केली, तिथल्या मंडळीनं त्याला दुसऱ्या दिवशी गावाशेजारच्या जंगलात पकडला. हातपाय बांधले. मारहाण केली. बराच वेळ तो छळ चालला. त्यातल्याच कुणीतरी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी अर्धमेला झालेल्या मधूला ताब्यात घेतलं. दवाखान्यात नेत असताना उलटी झाली. तो कोसळला अन्‌ डॉक्‍टरांनी मृत घोषित केलं. त्याच्या शरीरावर, मानेवर मारहाणीच्या अनेक खुणा आढळल्या. त्याशिवाय बेदम मारहाणीमुळे बऱ्याच अंतर्गत जखमाही दिसून आल्या. पोलिसांनी सोळा जणांना अटक केलीय. 

गाईची भक्‍ती अंगात आल्यानं किंवा कुणाच्या तरी घरात गोमांस शिजत असल्याच्या संशयावरून निरपराधांचे जीव घेणारी देशाच्या उत्तरेकडच्या समूहाची मानसिकता, मुलं पळविणाऱ्या टोळीच्या अफवेला बळी पडून दिवसाउजेडी भररस्त्यावर, गावाशेजारच्या शिवारांमध्ये केवळ संशयापोटी तशाच निष्पापांना ठेचून मारणारे बिहार, झारखंडमधले हिंसक जमाव अन्‌ मधूचा जीव घेणारी, मारहाणीमुळे होणाऱ्या वेदनांचा आनंद साजरा करणारी केरळमधल्या टोळीची मानसिकता, असं बेभान जमावानं न्यायाधीश बनून कायदा हातात घेण्याचं एक वर्तुळ पूर्ण झालंय. सोशल मीडियाचा विचार करता आणखी एक वर्तुळ पूर्ण झालं व त्याचा खलनायक क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आहे. मधूची हत्या करणाऱ्या जमावातल्या केवळ मुस्लिम तरुणांच्या नावाचे ट्‌विट सेहवागनं केलं. तेव्हा लोक त्याच्यावर तुटून पडले. अखेर माफी मागून त्यानं सारवासारव केली. मागे युद्ध व रक्‍तपात नको म्हणणारी शहीदकन्या गुरमेहर कौर हिला हिणवण्याच्या नादात सेहवाग असाच तोंडघशी पडला होता. 

सोशल मीडियावर मधूच्या मारहाणीची जी दृश्‍यं व्हायरल झाली, त्यात त्या केस पिंजारलेल्या, कळकट कपड्यातल्या अभागी जिवाच्या डोळ्यांमध्ये पुढं जे घडलं त्या भीतीची नव्हे, तर वेडसरपणातून आलेल्या अजाणतेची झाक आहे. अवतीभोवतीचं वातावरण असं आहे, जणू काही मंडळी सहलीसाठी जंगलात गेली आहेत व तिथं त्यांना त्यांची शिकार सापडलीय. गरिबांप्रति कळवळा दाखवण्याचा दांभिकपणा या घटनेनं उघडा पडला. गरिबांशी कसं वागू नये, हे जगाला कळलं. इतरांच्या तुलनेत ज्यांचं जरा बरं चाललंय, खाऊनपिऊन सुखी आहेत, वेळात वेळ काढून थोडीशी समाजसेवा ज्यांना आर्थिकदृष्ट्या परवडते, अशांच्या सत्कृत्यानं बऱ्याच वेळा आपल्याला समाज इतका काही वाईट नाही, असं उगीच वाटत राहतं. खरंतर तो समाजानं स्वत:चा क्रूर चेहरा झाकण्यासाठी वापरलेला मुखवटा असतो. मधूच्या हत्येसारख्या एखाद्या घटनेनं तो लोभस मुखवटा गळून पडतो अन्‌ गरिबांचा दुःस्वास, द्वेष, तिरस्कार करणारा, प्रसंगी किरकोळ कारणावरून एखाद्याचा जीव घेणारा चेहरा टळटळीतपणे समोर येतो. 

सलाम मेजर कुमुद डोगरा 
केरळमधल्या मधूच्या हत्येनं अनेकांचं काळीज चरकलं, मात्र आसाममधल्या एका घटनेनं अनेकांचा उर देशप्रेमानं भरून आला. लष्करात मेजरपदावर कार्यरत असलेली कुमुद डोगरा ही वीरपत्नी तिच्या पाच दिवसांच्या मुलीला घेऊन अपघाती मरण पावलेल्या पतीच्या अंतिम दर्शनासाठी जात असल्याचं दृश्‍य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरावं. "ट्विटर' व "फेसबुक'वर हजारोंनी धीरोदात्त मेजर कुमुद डोगरा यांना सलाम केला. जोरहाट एअरबेसवरून अरुणाचल प्रदेशाकडे जाताना दुष्यंत वत्स व जयपॉल जेम्स या भारतीय हवाई दलातील दोन विंग कमांडरांचं मायक्रोलाइट विमान माजुली बेटानजीक, चापोरी इथं ब्रह्मपुत्रा नदीच्या निर्मनुष्य अशा रेताड किनाऱ्यावर कोसळलं. दोन्ही अधिकाऱ्यांचा त्या अपघातात मृत्यू झाला. तेव्हा दुष्यंत व कुमुदची नवजात मुलगी पाच दिवसांची होती. तिला पित्यानं डोळे भरून पाहिलंही नव्हतं. अशा वेळी पतीनिधनानं दुःखाचा डोंगर कोसळला, पण मेजर डोगरा डगमगल्या नाहीत. लष्करी अधिकारी पतीला, लष्करातच अधिकारी असलेल्या पत्नीकडून साजेसा अंतिम निरोप त्यांनी दिला. पूर्ण सैनिकी गणवेशात पाच दिवसांच्या मुलीला सोबत घेऊन त्या ताठमानेने चितेकडे निघाल्या. नोव्हेंबर 2015 मध्ये काश्‍मीरमध्ये कुपवाड्यात वीरमरण आलेले साताऱ्याचे कर्नल संतोष महाडिक यांच्या पश्‍चात लेफ्टनंट बनलेल्या स्वाती महाडिक, त्याच वर्षी पुलवामा इथे हुतात्मा झालेले कर्नल मुनिंद्रनाथ राय यांच्या अंत्यसंस्कारावेळी "भारत माता की जय'चे नारे देणारी त्यांची कन्या अलका या वीरवारसांच्या यादीत मेजर कुमुद डोगरा यांचं नाव जोडलं गेलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com