मुंबईच्या रोखानं ज्वालामुखीचा मूक लाव्हा

सोमवार, 7 ऑगस्ट 2017

गेल्या वर्षीच्या क्रांती दिनाला, 9 ऑगस्ट रोजी औरंगाबादला पहिला मराठा क्रांती मोर्चा निघाला. पाठोपाठ बहुतेक सर्व जिल्हा मुख्यालयं, काही तालुक्‍यांची मोठी गावं मिळून 55 पेक्षा अधिक मूक मोर्चे राज्याच्या कानाकोपऱ्यांत निघाले. लाखो लोक, विशेषत: कधी घराचा उंबरा न ओलांडणाऱ्या महिला, मुलं-मुली, आबालवृद्ध या हुंकाराचा भाग बनले. तरीही कुठेही चुकून अनुचित घटना घडली नाही, शिस्तीला गालबोट लागलं नाही.

परवा, बुधवारी ब्रिटिशांना "भारत छोडो' असा निर्वाणीचा इशारा देणाऱ्या ऑगस्ट क्रांतीला पंचाहत्तर वर्षे पूर्ण होतील अन्‌ त्याच दिवशी एक नवी क्रांती तिच्या सर्वोच्च बिंदूवर पोचलेली असेल.

गेल्या वर्षीच्या 9 ऑगस्टपासून दिसामासानं वाढत गेलेला मराठा क्रांती मोर्चाचा एल्गार मुंबईत वर्षपूर्ती साजरी करेल. भायखळ्यातल्या वीर जिजामाता उद्यानातून निघून आझाद मैदानावर पोचणारा हा मोर्चा आतापर्यंत निघालेल्या सगळ्या मोर्चांपेक्षा मोठा असेल, असा अंदाज राष्ट्रीय स्तरावरच्या माध्यमांनाही आहे. सातारा व कोल्हापूर या मराठ्यांच्या दोन्ही गाद्यांचे वारस, अनुक्रमे उदयनराजे व संभाजीराजे मोर्चात सहभागी असतील. ज्यांची सामाजिक, सांस्कृतिक मुळं सह्याद्रीच्या घाटावर आहेत, असे मुंबईतले डबेवालेही मोर्चात सहभागी होणार आहेत. तीनशे- साडेतीनशे वर्षे सुप्तावस्थेत असलेल्या ज्वालामुखीचा नवा उद्रेक अन्‌ त्या रूपानं पसरणारा तप्त लाव्हा, असं या 55-60 मूक मोर्चांच्या मालिकेचं वर्णन केलं जातंय. जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये त्याची तयारी सुरू आहे. सकल मराठा समाजाच्या बैठका होताहेत. मायानगरी मुंबईनं भूतकाळात कधीही न पाहिलेला असा मूक मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्‍त होतोय. मोटारसायकल रॅली निघताहेत. ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंतच्या मराठा लोकप्रतिनिधींना आवाहन सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे, हा भव्य जागर प्रामुख्यानं सोशल मीडियावर सुरू आहे. 

तसा सोशल मीडिया "व्हर्च्युअल', आभासी; तथापि या मोर्चासारखे काही प्रसंग असतात, की हे माध्यम वास्तवाच्या पातळीवर येतं. सामान्यांच्या आशा-आकांक्षांचं, झालंच तर आक्षेप व आक्रोशाचं प्रतिनिधित्व करू लागतं, त्याचं प्रतिबिंब ठरतं. "जिजाऊंच्या लेकींसाठी, मराठ्यांच्या एकीसाठी', अशा आवाहनाच्या "व्हॉट्‌सऍप'वरच्या पोस्ट हे त्या वास्तवाचंच रूप आहे. "मुंबई एमकेएम' हा "हॅशटॅग' ट्‌विटरवर जोरात आहे. वर्षभरात ठिकठिकाणी निघालेल्या विराट मोर्चांची छायाचित्रे पुन्हा "वॉल्स'वर येताहेत. "मुंबईला यायलाच लागतंय', असा आग्रह धरला जातोय. "आम्हीपण येतोय, तुम्हीपण या', असं आवाहन केलं जातंय. "आता नाही तर कधीच नाही', असे इशारे दिले जाताहेत. रणांगणावर शौर्याची, अटकेपार झेंडा फडकविण्याची परंपरा असलेल्या "मराठ्यांची फौज निघाली मुंबईला', याची जाणीव करून दिली जातेय. "एकत्र आलो तर ताकद दिसली, एकत्र राहिलो तर प्रश्‍नही सुटतील', असा विश्‍वास दिला जातोय. 

गेल्या वर्षीच्या क्रांती दिनाला, 9 ऑगस्ट रोजी औरंगाबादला पहिला मराठा क्रांती मोर्चा निघाला. पाठोपाठ बहुतेक सर्व जिल्हा मुख्यालयं, काही तालुक्‍यांची मोठी गावं मिळून 55 पेक्षा अधिक मूक मोर्चे राज्याच्या कानाकोपऱ्यांत निघाले. लाखो लोक, विशेषत: कधी घराचा उंबरा न ओलांडणाऱ्या महिला, मुलं-मुली, आबालवृद्ध या हुंकाराचा भाग बनले. तरीही कुठेही चुकून अनुचित घटना घडली नाही, शिस्तीला गालबोट लागलं नाही. इतकंच कशाला, मोर्चा आटोपताच त्या मार्गावर स्वच्छता करण्यासारखा उल्लेखनीय पायंडा मोर्चेकऱ्यांनी पाडला. त्या ऑगस्ट- सप्टेंबर- ऑक्‍टोबरची तिमाहीची संपूर्ण जगानं दखल घेतली. 

वर्षभरात काय केलं? 
विराट मोर्चांनी सरकारपुढं काही मागण्या ठेवल्या होत्या. नगर जिल्ह्याच्या कोपर्डीतल्या बलात्कार व निर्घृण हत्या प्रकरणातल्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा, मराठा समाजाला आरक्षण अन्‌ ऍट्रॉसिटी कायद्यात सुधारणा या तीन मागण्या यादीत शीर्षस्थानी असल्या, तरी तिच्या केंद्रस्थानी मुख्यत्वे शेती, शिक्षण व रोजगार हे विषय होते. त्यातल्या मागासलेपणामुळंच कोणतंही नेतृत्व नसताना सामान्य मराठा रस्त्यावर आला होता. झेंडा मराठा समाजाचा असला तरी शेतीवर अवलंबून असलेले अन्य समाजही सोबत होते. पंढरीच्या वारकऱ्यांची मनोभावे सेवा करावी, तशीच सेवा मोर्चेकऱ्यांचीही अन्य समाजांनी केली. त्यांच्या आक्रोशाचं समर्थन केलं. तथापि, मराठा क्रांती मोर्चांनी सरकारपुढं ठेवलेल्या मागण्यांपैकी शेतकरी कर्जमाफीची घोषणा सोडली, तर फारसं काही घडलेलं नाही. या मागण्यांबाबत सरकारनं कधी उघड, तर कधी पडद्यामागं चर्चा जरूर केली. मराठा तरुणांसाठी काही योजनांचं सूतोवाच केलं. आताही समाजानं मोर्चापूर्वी चर्चेला यावं असं आवाहन सरकारनं केलंय. परंतु, वर्षभरात काय केलं, याचा हिशेब मराठा समाज सरकारला नक्‍की विचारेल.

Web Title: Shrimant Mane writes about Mumbai Maratha Kranti Morcha