सारा, मिया, निश अन्‌ बेलाच्या गोष्टी...!

अभिनेत्री अँड्रिया रोजबोरो
अभिनेत्री अँड्रिया रोजबोरो

कथा क्र. 1 - मारी सॅम्ब्रेल ही "सिंगल मदर'. तिची मुलगी सारा. ती तीन वर्षांची असताना मांजरीच्या मागे धावताना हरवते. तेव्हा, काळजीपोटी "अरकांजेल' नावाचं नवं, प्रयोगाच्या पातळीवरचं तंत्रज्ञान मारी स्वीकारते. ती "फ्री ट्रायल' असते. साराच्या मज्जासंस्थेत आईच्या हाती नियंत्रण असलेल्या एका चिपचं प्रत्यारोपण होतं. त्यामुळं मुलगी कुठं आहे, काय करतेय, ती काय विचार करतेय वगैरे आईला समजत असतं. बारा वर्षे अशी तंत्रज्ञानाच्या साह्यानं काळजी घेतल्यानं सारा परावलंबी होते. ताणतणावांचा, दु:खाच्या प्रसंगांचा सामना होतच नाही. निर्विकार असते. मात्र, वयात येतानाच्या शारीरिक, भावनिक बदलांना सामोरं जाताना तिचा संयम ढळतो अन्‌ ती आईवर हात उचलते. कारण समजल्यावर आई "सिस्टिम डीऍक्‍टिव्हेट' करते. प्रथमच मोकळ्या वातावरणात गेलेल्या साराला मित्र-मैत्रिणींकडून सेक्‍स, हिंसाचार वगैरेचं दर्शन घडतं. पार्टीला गेलेल्या साराशी संपर्क होत नसल्याने काळजीनं आई "अरकांजेल' सुरू करते. तेव्हा दिसतं, ती मित्रासोबत रत झालीय, कोकेनचं सेवन करतेय. 

कथा क्र. 2 - मिया लिओन तरुणपणी कारनं सायकलस्वाराला उडवणारा मित्र रॉबला मदत करते. मृतदेहाची गुपचूप विल्हेवाट लावल्यानंतर दोघंही आपापल्या आयुष्यात परततात. पंधरा वर्षांत मियाचा सुखी संसार, व्यावसायिक कारकीर्द फुलते. पुन्हा रॉबची भेट होते. तोपर्यंत त्या सायकलस्वाराच्या पत्नीला नवऱ्याच्या मृत्यूची कल्पना नसते. पश्‍चातापदग्ध रॉब निनावी पत्र लिहून सारं काही कळवण्याचा विचार बोलून दाखवतो. पण, संसार उद्‌ध्वस्त होईल म्हणून मिया नकार देते. उलट रॉबचा खून करते. त्याचवेळी खाली रस्त्यावर आणखी एक अपघात ती हॉटेलच्या खिडकीतून पाहते. विमा भरपाईच्या दृष्टीनं त्या अपघाताची चौकशी करताना शाझिया नावाची तपास अधिकारी "रिकॉलर' नावाच्या "मेमरी हार्वेस्टर'चा म्हणजे स्मृतिपटल उलगडणाऱ्या तंत्रज्ञानाचा अवलंब करते. मियाच्या "मेमरी'तल्या दोन्ही हत्यांचा उलगडा होताच ती शाझियाचीही हत्या करते. तिचा मृतदेह घरी नेते. तिचा नवरा ऍननचा जीव घेते. ते त्याच्या लहान मुलानं पाहिल्याच्या संशयावरून त्यालाही मारते. प्रत्यक्षात ते बाळ जन्मांध असतं. अखेर "रिकॉलर'चा वापर शाझियाच्या घरच्या गिनीपिगवर होतो अन्‌ खुनांच्या मालिकेची तड लागते. 

कथा क्र. 3 - पेन जिलेट यांच्या 1980 मधल्या "पेन ऍडिक्‍ट' कथेवर आधारित "ब्लॅक म्युझियम' हा एपिसोड. आजारी किंवा मृत व्यक्‍तींच्या संवेदना व जाणिवांवर "न्यूरॉलॉजिकल इम्प्लांट'द्वारे ताबा मिळवून परकाया प्रवेशाने अगदी सेक्‍सचा विकृत आनंद देणारं तंत्रज्ञान कथेचा केंद्रबिंदू. गुन्ह्यांशी संबंधित वस्तूंच्या संग्रहालयात निश नावाच्या तरुणीपुढं, एक कोमातली पत्नी, तिच्या संवेदनांचं पतीमध्ये शरीरांतर, त्यातून मुलाला मिळणारं आईचं प्रेम, त्रिकोणात अवतरलेली चौथी महिला, कोमातल्या पत्नीच्या संवेदना व भावना अखेरीस पेंढा भरलेल्या माकडात उतरवण्याचा प्रकार असं अंगावर शहारं आणणारे प्रकार उलगडतात. रोलो हेन्स हा म्युझियमचा मालक मृत्यूदंड ठोठावलेल्या क्‍लेटॉन नावाच्या गुन्हेगारावर तसाच प्रयोग करतो. संग्रहालयाला भेट देणारे लोक "इलेक्‍ट्रिक चेअर'चा "लीव्हर' दाबून क्‍लेटॉनला यातना देण्याचा आनंद घेत असतात. ते पाहून निशला दरदरून घाम फुटतो. क्‍लेटॉन हा तिचा बाप असतो व न केलेल्या गुन्ह्यासाठी त्याल मृत्यूदंड सुनावलेला असतो. ती हेन्सचा खून करते. 
अनुक्रमे "अरकांजेल', "क्रोकडाईल' व "ब्लॅक म्युझियम' नावाच्या या कथा. चौथी कथा "ऑनलाइन डेटिंग ऍप'च्या संगणकीय समीकरणांचे (अलगोरिदम) मोहरे बनलेले ऍमी व फ्रॅंक या दोघांची, "हॅंग द डीजे' नावाची. "डिजिटल कोच'द्वारा नियंत्रित दोघे मनाने जवळ येतात व "आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सिस्टिम'विरुद्ध बंड करतात. "मेटलहेड' नावाच्या कृष्णधवल "एपिसोड'मध्ये रोबोटिक कुत्र्यांनी नायिका बेलाचा केलेला चित्तथरारक पाठलाग दाखवलाय. त्याचा शेवट होतो एका गोदामात पेटीत भरून ठेवलेल्या टेडी बिअरनी. 

माणूस मशिन बनलाच आहे. आता मशिनला माणूस बनवण्याचे प्रयोग जोरात आहेत. अशावेळी मशिनविरुद्ध बंड करणाऱ्या माणसांच्या कथा "ब्लॅक मिरर' दूरचित्रमालिकेच्या चौथ्या आवृत्तीमधून "नेटफ्लिक्‍स'वर साकारल्यात. त्यात वैज्ञानिक कल्पनाविलास आहेच. तो जगाला अजिबात नवा नाही. "ट्‌विलाइट झोन'ला काही दशकं उलटलीत; तथापि, विज्ञान-तंत्रज्ञान कितीही विकसित झालं तरी अखेरीस ते माणसाच्याच कल्याणासाठीच असतं. पुन्हा सगळा खेळ दु:ख-आनंद, भीती, प्रेम वगैरे भावनांचाच. "लेकरू सुरक्षित राहील काय' ही मातृत्वाची चिंता. "जोडीदारावर विश्‍वास ठेवायचा काय', हा संसारसुलभ प्रश्‍न किंवा "घोड्यावर दौडत येणारा कुणी राजकुमार असतो काय' अन्‌ तसा तो सापडला तरी "दुनिया सुखानं संसार करू देईल काय', या शंकांचं मोहोळ, हे सारं "ऑगमेंटेड रिऍलिटी' अन्‌ "आर्टिफिशियल इंटेलिजन्स'च्या जमान्यातही आधी होतं तसंच राहणार. त्यासाठी तंत्रज्ञानाचा अतिरेकी स्वीकार केला, प्रत्यक्षातला माणूस "व्हर्च्युअल रिऍलिटी'त "डाउनलोड' केला, की निसर्गसुलभ भावभावना, नात्यांची गुंतागुंत अन्‌ नवं तंत्रज्ञान यांच्यात संघर्षच उद्‌भवणार. तो टिपताना "नेटफ्लिक्‍स'नं वैज्ञानिक कल्पनाविलासाच्या मर्यादाही अधोरेखित करायला सुरवात केलीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com